आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखकाची गोष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनचे रॉयल कोर्ट थिएटर हे फार विलक्षण आहे. ते नाटकाचे लेखक म्हणजेच नाटककार घडवण्याचा प्रयत्न करतात. नवीन आवाज हेरून त्यांना जोपासण्याचं महत्त्वपूर्ण काम हे थिएटर करतं. फक्त इंग्लंडच्याच नाही तर जगातील सर्व नाटककारांसाठी इथे सतत विविध कार्यशाळा सुरूअसतात. मी अशाच एका कार्यशाळेसाठी गेलो होतो, तेव्हा पाहिलं की, थिएटरबाहेरच्या बिलबोर्डवर जी नाटकाची जाहिरात होती, त्यात फक्त नाटककाराचे आणि नाटकाचे नाव लिहिले होते! त्यांनी मान्यच केलं होतं, की हा आद्य निर्माता! दिग्दर्शक, नट-नट्या आणि बाकी कलाकार त्याने संहिता लिहिल्याशिवाय काहीच करू शकत नाहीत, त्यामुळे या माणसाचा मान मोठा!

लेखक हा प्राणी समाजासाठी फार महत्त्वाचा असतो. त्याचे काम एकट्याने बसून करण्याचे असले तरी त्याची नाळ सा-या समाजाशी जुळलेली असते. दर्जेदार लेखक जे चिंतन करतो ते समजून घेणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण तो माणसांची गोष्ट सांगत असतो. काही वेळा घडून गेलेली तर काही वेळा भविष्याचा वेध घेणारीही. दर्जेदार लेखनातून आपल्याला वाटणा-या, पण व्यक्त न करता आलेल्या गोष्टी नेमकेपणानं पकडलेल्या असतात. त्यामुळेच चांगले लेखक ही समाज म्हणून आपली फार मोठी गरज असते. ज्या समाजामध्ये लेखनाचा दर्जा घसरलेला असतो, तो समाज गोंधळलेला किंवा एकांगी झालेला असतो. आपण सगळ्यांनीच लेखकांविषयी, लेखनाविषयी जागरूक राहायला पाहिजे. कारण आपणही जगताना आपापली गोष्ट लिहीतच असतो. त्या अर्थाने आपण सारेच लेखक असतो. आपली गोष्ट सापडली, तरच आपली ऊर्जा एका दिशेला जाऊ शकते. ही गोष्ट सापडणं महाकठीण काम असतं. कारण त्यासाठी खूप विचार करावा लागतो- आपला, भवतालाचा आणि एकंदरीतच जगण्याचा. बहुतेकांना हा एवढा विचार करणं कंटाळवाणं किंवा कष्टाचं वाटतं. याबाबत जपानी लेखक मुराकामी फार मार्मिक टिप्पणी करतो. तो म्हणतो - प्रत्येकाला जगताना गोष्ट लागते. ज्यांना आपली गोष्ट सापडत नाही, ते इतरांची गोष्ट उधार घेऊन जगतात.

या वाक्याचा गर्भितार्थ ध्यानात घेतला तर माणसाच्या जगण्यातल्या अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. उदा. हिटलरने जर्मन लोकांना ज्यू कसे वाईट आणि आपले शत्रू आहेत, ही गोष्ट परिणामकारकरीत्या सांगितली. स्वत:ची गोष्ट नसलेल्या अनेक जर्मन लोकांनी ती उधार घेऊन आपली मानली. त्यामुळे या जर्मन नाझींनी ज्यूंची कत्तल केली आणि आपली गोष्ट मान्य नसलेल्या जर्मन लोकांनाही मारले. त्यांची आपापली गोष्ट हिटलरच्या महागोष्टीत वाहून गेली आणि सारे जगच महायुद्धात ओढले गेले. म्हणूनच मानवी समाजाच्या संतुलित आरोग्यासाठी अनेक गोष्टी जिवंत राहणं गरजेचं असतं.

गोष्ट ही मानवी देवाणघेवाणीचं चलन आहे. आपण जगताना एक-दुस-याला सारख्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो. आता नवीन काहीतरी सांगण्यासाठी तसं नवीन जगावं लागतं. नाहीतर आपल्या जगण्याची गोष्ट लांबलेल्या सीरियलसारखी कंटाळवाणी होऊ शकते. माणसं एकमेकांपासून दूर जाण्याचं महत्त्वाचं कारण ब-याचदा हेच असतं. दोघांनाही गुंतवून ठेवणारी नवी गोष्ट न सापडणं.

शिवाय आपल्या वैयक्तिक गोष्टीच्या जोडीला समाजाची एक महागोष्ट चालूच असते, जी आपल्या छोट्या गोष्टीला वादळातल्या पाचोळ्यासारखी उडवून लावू शकते. सध्याची आपली अशी महागोष्ट काय?

आज आपण समाज म्हणून आधीपेक्षा जास्त प्रगत झालो आहोत. आधीपेक्षा जास्त सोयी-सुविधा आज आपल्याला मिळत आहेत. काही लोकांना अजून त्या मिळाल्या नाहीत, हे मान्य करूनसुद्धा अनेकांचं जगणं आधीच्या पिढीपेक्षा जास्त सुखकारक झालं आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. पूर्वीच्या पिढीसारखा आज अनेकांचा अस्तित्वासाठी लढा होत नाही. पूर्वीच्या पिढीची गोष्ट श्री. ना. पेंडसेंच्या ‘लव्हाळी’सारखी होती- आपलं स्वत:चं घर असावं म्हणून आयुष्यभर झटणारा नायक. आज अनेक तरुण तिशीतच घर, गाडी घेऊन आणि बंगला बांधून मोकळे झाले आहेत...ही अवस्था फार चांगली आहे. कारण तरुणांना त्यांची ऊर्जा स्वत:च्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी वापरता येईल. अर्थात, त्यासाठी त्यांना प्रेरित करणारं एखादं ध्येय, एखादी गोष्ट असायला पाहिजे. पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य मिळवणे, हे भव्य ध्येय (गोष्ट) देशातील तरुण पिढीपुढे होतं. त्यानंतर सत्तरच्या दशकात स्वातंत्र्यानंतरचं शैथिल्य झटकणं व नवा समाज निर्माण करणं, ही महागोष्ट त्या वेळच्या तरुणांपुढे होती. नंतर जगभरच सर्व विचारधारां(गोष्टी)विषयी भ्रमनिरास उत्पन्न झाला. सर्वच श्रद्धांविषयी शंका उत्पन्न झाल्या. त्यामुळे आत्ताचा काळ हा आयडिआॅलॉजिकल व्हॅक्युम म्हणजेच वैचारिक पोकळीचा आहे. त्यात भांडवलशाहीचा जोर असल्याने ही पोकळी भरून काढण्यासाठी माणसं त्वेषाने पैसे कमवत आहेत. जास्तीत जास्त सुख मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्टाचार वाढण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे.

हीच आजच्या काळाची महागोष्ट होऊन बसलेली आहे. वैयक्तिक छोट्या-मोठ्या गोष्टी यात वाहून जाताहेत. संक्रमणावस्थेतून जात असलेल्या आपल्या समाजाला एका महागोष्टीची गरज आहे, जी सर्व छोट्या गोष्टींना मारून न टाकता सामावून घेईल. जितक्या वैविध्यपूर्ण गोष्टी जिवंत राहतील तितकं आपलं जगणं सघन होईल. एकच गोष्ट मोठी होऊन बसली, तर समाज कडवा आणि एकसुरी होऊन बसतो.

आताच्या काळाची, सर्व समाजाची स्पंदनं पकडणारे लेखक निर्माण होणं, ही काळाची गरज आहे. लेखकांनाही या वेगवान युगाचा आणि ऐहिक यशाचा ताण आहेच. त्यामुळे आपल्या लेखनापाशी थांबण्याचा अवधी घेणं त्यांना जड जातंय. सगळं काही चटाचट करण्याचा मोह लेखनाला चटपटीतपणाकडे घेऊन जातोय. या ताणाच्या पलीकडे प्रामाणिकपणे आणि परिणामकारकरीत्या विविध गोष्टी सांगणं आणि टिकवणं ही लेखकाची जबाबदारी आहे. पण महत्त्वाचं म्हणजे, त्याकडे संवेदनशीलपणे पाहणारा समाज तयार झाला तरच आपण बहुआयामी प्रगती करू शकू. ही संवेदनशीलता वाढण्यासाठी आपली वैयक्तिक गोष्ट काय सांगते आहे, हे समजून घेण्याची व गरज पडल्यास त्याचा दुसरा खर्डा करण्याचीही गरज आहे. जर आपण रॉयल कोर्ट थिएटरसारखे जगण्याच्या विविध क्षेत्रांत लेखनाविषयी आणि लेखक वाढण्यासाठी सुपीक वातावरण करू शकलो, तर हे सारे निश्चित बहरू शकेल. ते बहरणं समाजाच्या निरोगी तब्येतीसाठी महत्त्वाचं आहे. ती आपली जबाबदारी आहे.