आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Mahindrasingh Dhoni's Life By Vinayak Dalvi

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग रूपसिंग धोनी. कुणी त्याला ‘माही’ म्हणतं, कुणी एमएस किंवा कुणी एमएसडी. रांचीचा हा मुलगा, एका तपापूर्वी खरगपूर रेल्वे स्टेशनात तिकीट कलेक्टर म्हणून उभा असायचा. आज भारतीय क्रिकेटला सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवणारा मसीहा ठरला आहे. डोंगराएवढ्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन वावरणारा. आरोप-प्रत्यारोपांच्या असंख्य फैरी अंगावर घेणारा. पराभवातही शांत, अविचल राहणारा. विजयाच्या उन्मादापासून चार हात दूर राहणारा. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रकाशझोतातही न बावचळणारा. जाणीवपूर्वक मध्यमवर्गीय कुटुंबाची नीतिमूल्यं जपणारा. भारतातील दुर्गम व महानगरापासून दूर असलेल्या भागांतल्या युवकांना आशेचे किरण दाखविणारा आयकॉन ठरला आहे.

एका तपाच्या वाटचालीत त्याने तमाम विश्वापुढे यशस्वी क्रीडापटूचा मापदंड निर्माण केला आहे. ‘फोर्ब्ज’च्या जगातील श्रीमंत क्रीडापटूंमध्ये २२वे स्थान पटकावणारा, तरीही सर्वसामान्यांसारखे जीवन जगणारा असा हा अजब अवलिया आहे. १९८३चा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर कपिलदेव भारताच्या भावी पिढीचा आदर्श बनला होता. त्यानंतर ती जागा सचिन तेंडुलकरने घेतली होती. २००७ पासून मात्र भारतातल्या युवा पिढीवर महेंद्रसिंग धोनीने एकछत्री राज्य केले. पोषक वातावरण नसताना, पैशांचं पाठबळ नसताना आणि मुख्य म्हणजे, परिस्थितीवर प्रभाव टाकणारा कुणी गॉडफादर नसताना केवळ स्वकर्तृत्वाच्या बळावर एखाद्याला किती उंची गाठता येते, याचे जिवंत उदाहरण धोनीने तमाम भारतीयांसमोर समोर ठेवले. म्हणूनच त्याची ही लोकविलक्षण यशोगाथा "एमएस धोनी-दी अनटोल्ड स्टोरी' या नावाने चरित्रपटाच्या रूपात रुपेरी पडद्यावर आणण्याचा मोह बॉलीवूडलाही आवरलेला नाही. त्या अर्थाने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला तो पहिलावहिला क्रिकेटपटू ठरणार आहे. "वेनस्डे' आणि "स्पेशल २६' फेम नीरज पांडे धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे, तर सुशांतसिंग राजपूत धोनीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. येत्या नव्या वर्षात हा चित्रपट झळकणार असल्याच्या जाहिराती एव्हाना वर्तमानपत्र आणि नियतकालिकांची पाने व्यापून आहेत.

उत्तराखंडच्या अलमोरा जिल्ह्यातील राजपूत कुटुंबांपैकी एक धोनी कुटुंब. महेंद्रसिंगचा जन्म रांचीचा. रांचीमधील मेकॉन कंपनीच्या कॉलनीत दोन खोल्यांमध्ये धोनी कुटुंब राहायचे. वडील रूपसिंग कॉलनीत ‘पंपमॅन’ म्हणून काम करायचे. कॉलनीतल्या मैदानाने त्याला लहानपणापासूनच साद घातली. फुटबॉल हा त्याचा आवडता खेळ. जवाहर विद्यालयाचे प्रशिक्षक होते, केशवरंजन बॅनर्जी. महेंद्रसिंग सहावीत होता, त्या वेळी शाळेच्या फुटबॉल संघाचा गोलरक्षक होता. बॅनर्जींकडे क्रिकेट संघांचीही जबाबदारी होती. एकदा ऐन क्रिकेट सामन्याच्या दिवशी यष्टिरक्षकच आला नाही. बॅनर्जींना महेंद्रसिंगची गोलपोस्टमागची चपळाई ठाऊक होती. त्यांनी गोलकिपरला यष्टिरक्षक बनविला आणि तमाम क्रिकेट विश्वाला एक अफलातून क्रिकेटपटू मिळाला. बॅनर्जी त्याला म्हणाले, ‘तुझी चेंडूवरची झडप चांगली आहे. फक्त फुटबॉलपेक्षा येथे चेंडू लहान आहे, एवढाच फरक आहे. मात्र या फरकाने भारतीय क्रिकेटमध्ये मोठाच फरक घडवून आणला. १९९५ ते १९९८ या काळात कमांडो क्रिकेट क्लबतर्फे तो खेळला.
१६ वर्षांखालील विनू मंकड ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी त्या वेळी निवड झाली व ती त्याने सार्थ ठरविली. दहावीनंतर मात्र क्रिकेट हा खेळ नोकरीपर्यंत नेऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे अधिक रस घेऊ लागला. साऊथ इस्टर्न रेल्वेत तिकीट तपासनीसाची नोकरी मिळाली आणि भारतीय क्रिकेटचा आजचा सुपरहीरो खरगपूर आणि दुर्गापूर रेल्वे स्टेशनवर सतत दिसायला लागला...धोनीला लहानपणापासून युद्धाशी संबंधित पुस्तके वाचण्याचा, चित्रे पाहण्याचा छंद. रणगाडे, युद्धभूमीवरील शस्त्रे आदीविषयी त्याला भारी अप्रूप. लष्कराबद्दलचे त्याचे आकर्षण अगदी तेव्हापासूनचे. शालेय जीवनात असतानाच त्याने लष्करात जाण्याचा निश्चयही केला होता. म्हणूनच लष्करात जाण्यासाठी आवश्यक सर्व ‘अ‍ॅक्टिव्हिटीज’मध्ये तो उत्साहाने सहभागी होत असे. किंबहुना त्याने पाचव्या पॅराशूट रेजिमेंटची जाणीवपूर्वक केलेली निवड त्याचाच एक भाग होती. मात्र मोठा झाल्यावर क्रिकेटने त्याला त्यापासून दूर नेले खरे, पण याच क्रिकेटने सन्माननीय अधिकारी म्हणून त्याला एके दिवशी थेट लष्कराच्या प्रवेशद्वारापाशी आणून सोडले. तोपर्यंत त्याने जवानांच्या कहाण्या फक्त ऐकल्या व वाचल्या होत्या. पण जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान म्हणून लष्करप्रमुखांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली, त्या वेळी त्याने लहान मुलाप्रमाणे त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. लष्कराविषयीची आपली आवड आणि निवृत्तीनंतर आपल्याला लष्कराची कशी सेवा करता येईल, हे त्याने जाणून घेतले. ‘क्रिकेट हेच माझे सर्वस्व नाही. मला स्वत:ला उत्तुंग ध्येयासाठी अर्पण करायचे आहे. झोकून द्यायचे आहे. क्रिकेटने माझ्या घडामोडीच्या कालखंडात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे जोपर्यंत खेळत आहे, तोपर्यंत क्रिकेटला न्याय देणारच. मात्र क्रिकेट सोडल्यानंतर लष्कराच्या आघाडीवरही सेवा द्यायचे, माझे उर्वरित आयुष्याचे ध्येय आहे, असेही तो त्या क्षणी आत्मविश्वासाने म्हणाला...

एरवी, धोनीच्या व्यक्तिमत्त्वातला विशेषत: मैदानावरील अविचलपणा, शांत, धीरगंभीरपणा अतुलनीय आहे. जेव्हा पराजय समोर स्पष्ट दिसत असतो, तेव्हाही तो आशेच्या अंधुक शक्यतेवर अविचल उभा राहतो. परिस्थिती पालटण्याची क्षमता तो त्या वेळी दाखवून देतो. अंगी बाणवलेली लष्करी शिस्त अशा वेळी त्याच्या उपयोगी पडत असावी. खरे वाटायचे नाही, पण लष्कराबद्दल प्रचंड आकर्षण असलेल्या धोनीने मानसशास्त्राचा बारकाईने अभ्यास केला आहे. विविध आव्हाने पचविण्यासाठी काय करावे लागते, हेही अभ्यासले आहे. आश्चर्य म्हणजे, लष्कराच्या चारही रेजिमेंट‌्सचा सखोल अभ्यास असणारा क्रिकेटपटू भारतीय संघाने आजवर बघितलेला नाही.

संघर्षाच्या दिवसांत खरगपूरच्या प्रत्येक छोट्या छोट्या मैदानावर धोनीचा मुक्त संचार असे. सिझन चेंडूची नव्हे, तर टेनिसच्या बॉलची तो त्या वेळी पिटाई करत असे. त्या दरम्यान सायकलवरून होत असलेली त्याची रपेट सर्वांच्या परिचयाची होती. मात्र, तेव्हासुद्धा बाइकच त्याचं खरंखुरं प्रेम होती. पुढे पुढे धोनीची ‘बाइक राइड’ तो ज्या शहरात असेल, त्या शहरातील लोकांसाठी चर्चेचा विषय बनत गेली. जसा तो मित्र जोडताना, सहकारी जोडताना गरीब, श्रीमंत असा भेदभाव करत नाही, तसेच ताफ्यात बाइक घेताना तो उजवं-डावं करत नाही. आजच्या घडीला स्वस्त, महागड्या, उंची, परदेशी, अत्याधुनिक अशा तब्बल पस्तीस बाइक्स धोनीकडे आहेत. फॅट बॉय हर्ली, ड्युकानी पॅन्था, हेलकॅट या आजच्या युगातील श्रीमंती बाइक्स त्याच्याकडे आहेतच; पण जुनीपुराणी टू स्ट्रोक ‘टायम्प’, बीएसए; एवढेच नव्हे तर आपली पहिली बाइक ‘राजदूत’ही त्याने जपून ठेवली आहे. साडेचार हजार रुपयांना खरेदी केलेल्या त्या बाइकच्या डागडुजीसाठी तो मूळ किमतीपेक्षा कितीतरी जास्त खर्च करत आहे. ‘जुन्या बाइक्स’ची मरम्मत त्याला स्वत:लाच करायला आवडते. क्रिकेटमधून मोकळा वेळ मिळाला आणि तो रांचीमध्ये असला की आपल्या या बाइक्सच्या वैभवावर नजर टाकतो, हात फिरवतो, त्यांना पॉलिश करून पुन्हा चकचकीत करतो.

बाइकप्रेमाचा धोनीचा हा किस्सा तर खासच. पहिली खरेदी असलेली ‘राजदूत’ केवळ म्युझियममध्ये ठेवण्यासाठीचा ‘अँटिक पीस’ आहे, असे पाहणा-याला वाटायचे. पण एके दिवशी धोनीने स्वत: इंजिनापासून अन्य सर्व भाग सुटे केले. तेल आणि वंगणाने साफ धुऊन टाकले, आणि पूर्ववत जोडून स्वारीने चक्क तिला ‘चालती’ केले. रांची शहराची रपेट केली... धोनी म्हणतो, मला बाइक्स पॉलिश करायला खूप आवडते. नव्हे, मी त्यातला तज्ज्ञ आहे. या आवडीचे मूळ सांगताना तो चक्क भूतकाळात जातो. तो म्हणतो, ‘मी जेव्हा क्रिकेटमध्ये नुकताच रुळायला लागलो होतो, तेव्हा माझ्या चार सीनियर जोडीदारांपैकी एकाची नवी कोरी बाइक तो कॅच प्रॅक्टिस देताना मुद्दामच माझ्या पाठी ठेवायचा. चेंडू माझ्या हातून सुटून त्या बाइकला लागला, की त्यावर खोचा उमटायचा. मला खोच पडलेला भाग घासून-पुसून आणि पॉलिश करून द्यावा लागायचा. त्यामुळे मी एक तर अवघड झेल ट‍िपण्याचा आटोकाट प्रयत्न करायचो. नाहीतर बाइक पॉलिश करण्यात मग्न असायचो. त्यामुळे झेल ट‍िपण्यात एक्सपर्ट झालोच, पण त्याचबरोबर बाइक पॉलिश करण्यातही तरबेज झालो...बाइक पॉलिश करण्याप्रमाणे बाइकवरून स्वारी करण्याचा छंदही त्याने आजवर जोपासला आहे. मागे दिल्लीहून जयपूरला आंतरराष्ट्रीय सामना खेळायला जाताना त्याने चक्क रांचीहून मित्रामार्फत बाइक मागवली आणि जयपूरपर्यंत बाइकने प्रवास केला. रात्री-अपरात्री रांचीच्या रस्त्यांवर सन्नाटा पसरला की, धोनीच्या बाइकचा आवाज आजही अधूनमधून रहिवाशांच्या कानावर पडत असतो...
‘नियतीकडे
धोनीच्या षटकाराची पुन्हा मागणी करीन’
‘नियतीने जर गतकाळातला एखादा क्षण पुन्हा जगण्याची संधी दिली तर २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलसेखराच्या गोलंदाजीवर लाँग ऑनला मारलेला षटकार परत अनुभवायला आवडेल.’ हे उद्गार आहेत, ‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांचे. हे खरे की, इतर भारतीयांसाठीही तो अभिमानाचा क्षण होता. मात्र, त्या एकमेवाद्वितीय क्षणाचा कर्ताकरविता असलेल्या महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यातील आतापर्यंतचा अभिमानास्पद क्षण तो नाही. धोनी म्हणतो, शाळेत असताना जेव्हा मी ‘पाइपिंग सेरेमनीमध्ये’ कॅडेट म्हणून रँक स्वीकारली, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा, बहुमानाचा, आनंदाचा क्षण आहे.’
vinayakdalvi41@gmail.com