आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदवन: मानवमुक्तीच्या 'विकास'वाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवमुक्तीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी बाबा आमटेंनी आनंदवनाचा दुर्मिळ प्रयोग साकारला. डॉ. विकास आमटे यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून तो नेटाने पुढे नेला. हा प्रयोगशील प्रवास ‘समकालीन प्रकाशना’ने ‘आनंदवन-प्रयोगवन’ या पुस्तकात मांडला आहे. १ फेब्रुवारी रोजी पुणे येथे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाच्या निमित्ताने डॉ. विकास यांचा मुलगा कौस्तुभ यांनी आनंदवनाच्या सातत्यपूर्ण उभारणीमागील उलगडलेला हा पट...
आनंदवनात१९५१मध्ये शेतीला जोडून दुग्धव्यवसायाची अर्थात, डेअरीची सुरुवात झाली. त्या वेळी खरे तर साधनाताईंची(साधना आमटे) प्रकृती सुधारावी म्हणून विनोबांनी बाबांना (बाबा आमटे) गाय घेण्यासाठी पैसे दिले होते. त्यातून बाबांनी एक लंगडी गाय विकत आणली होती. हळूहळू त्यांनी गाई-म्हशी वाढवल्या. दुधाचे उत्पादन सुरू केले. पण डेअरीचा उद्योग पुढे नेणे, तो वाढवणे सोपे काम नव्हते. २००९मध्ये गजानन वसू हा धडाडीचा कार्यकर्ता आनंदवनात दाखल झाला. त्या वेळी त्यानेच डेअरीचा विषय काढला. गजानन हाही कुष्ठमुक्त रुग्णच. केवळ सातवी शिकलेला. डेअरी उद्योगाची त्याला पार्श्वभूमीही नव्हती. पण आपल्या धडपड्या स्वभावामुळे त्याने डेअरी उद्योग पुढे नेला. चा-याच्या जाती शोधण्यासाठी अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जाऊन अभ्यास करणे, जनावरांच्या बाजारात जाऊन चांगल्या गायी-म्हशींची पारख करणे इथपासून गाय-म्हैस खरेदी व्यवहारात पारदर्शकता आणण्यापर्यंत गजाननने मजल मारली. त्याच्या या प्रयत्नातून २००९मध्ये पहिला टर्नओव्हर झाला, ३२ लाख रुपये. पुढल्या वर्षी तो ८५ लाखांवर गेला. त्या वेळी गजाननने म्हटले, ‘आता आपल्याला एक कोटीची उलाढाल करायला हवी.’ कुष्ठरोगाच्या वेदनेतून गेलेल्या या गजाननने पुढल्या वर्षात १ कोटी १५ लाखांपर्यंत उलाढाल नेत ते खरेही करून दाखवले.
सदाशिव ताजने
दोन्ही पायांनी अपंग असलेला इंग्लंडचा काऊंट ऑर्थर तार्नोवस्की ‘रीडर्स डायजेस्ट’ या मासिकातर्फे आशियातील अपंगांच्या कामाची पाहणी करत फिरत होता.
आनंदवनाविषयी माहिती मिळाल्यानंतर तो आनंदवनामध्ये भेट देण्यास आला. ते वर्ष होते १९६४. आनंदवनातील वातावरण पाहून भारावून जात, त्याने आपल्या पुस्तकाच्या रॉयल्टीतून मिळणारे पैसे द्यायची तयारी दाखवत अपंगांसाठी येथे एक केंद्र उभारले जावे, अशी बाबांना विनंती केली. लगोलग ‘संधिनिकेतन’ या केंद्राचे काम सुरू झाले. इमारत उभीही राहिली, पण या केंद्राबद्दल गावातल्या अपंगांना माहिती कुठून होणार, हा प्रश्न होताच. मग हरी बढे आणि सदाशिव ताजने या दोघा कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी उचलली. हरी कुष्ठरुग्ण होता, तर सदाशिव अपंग. सदाशिवला लहानपणी पोलिओ झालेला. त्यामुळे अपंगांशी हे दोघे थेट जोडले जाऊ शकत होते. या दोघांची जोडी वरोरा तालुक्यातल्या ३३ गावांमध्ये फिरली. गावात किती कुष्ठरुग्ण आहेत, अपंग आहेत, कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे, हे लोक काय करतात, असे भरभक्कम सर्वेक्षण या दोघांनी केले. पहिला दोन वर्षांचा काळ अवघड गेला, पण सदाशिवच्या सर्वेक्षणाचा हळूहळू उपयोग व्हायला लागला. संधिनिकेतनला आकार येत गेला. संधिनिकेतनचा एक प्रकारे पाया तयार करण्याचे काम सदाशिवने केले.तोच या केंद्राचा पहिला प्रशिक्षणार्थी बनला.दोन्ही पाय लुळे असूनही सदाशिव सपासप पोहायचा. हातांवर चालत शाळेत जात, त्याने शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला. आज तो आनंदवनातील सगळे उद्योग शिकत, संधिनिकेतनची पूर्ण जबाबदारी सांभाळत आहे. त्याला सगळे आनंदवनाचा ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणतात.
मणिराम लंजे
चपलानिर्मितीचा उद्योग सुरू झाल्यानंतर या विभागात दाखल झालेल्या मणिराम लंजे नावाच्या अस्थिव्यंग असलेल्या व्यक्तीमुळे या व्यवसायाला जोडूनच लेदरच्या वस्तू तयार करण्याचं काम सुरू झालं. बाबांकडे बिर्लांनी भेट दिलेली लेदरची एक देखणी फोल्डिंग बॅग होती. एकदा बाबांनी ती मणिरामला दाखवली. तो ती सोबत घेऊन गेला आणि १२ तासांत त्याने त्याच पद्धतीची परंतु जास्त चांगली, टिकाऊ बॅग तयार करून बाबांना आणून दाखवली. मग तो एक स्वतंत्र विभागच सुरू झाला. लेदरच्या पर्सेस, पिशव्या, सॅक्स अशा ब-याच वस्तू इथे तयार व्हायला लागल्या. उत्तम दर्जा आणि परवडणारी किंमत यामुळे उत्पादनही झपाट्याने वाढले. लंजेला शिवणातल्या कसबाबरोबरच सौंदर्यदृष्टीही होती. त्यामुळे त्याने या उद्योगात कमालीचे वैविध्य आणले...
-------------
बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केली. त्यातून मानवमुक्तीचे स्वप्न पाहिले. पण या आनंदवनाचे खांब भक्कम करणा-या काहीशा अपरिचित शिलेदारांचा वेध समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या ‘आनंदवन प्रयोगवन’ या पुस्तकातून माझे वडील विकास आमटे यांनी घेतला आहे.त्यातील ही तीन प्रातिनिधिक उदाहरणे.शिकल्या-सवरलेल्या शहरी
माणसाला लाजवतील अशी कामे या आणि अशा अनेकांनी आनंदवनात आजवर साकारली आहेत.

आज आनंदवन हे चार हजारांचं भलंमोठं कुटुंब आहे. हे कुटुंब यांत्रिकीकरणाच्या आहारी न जाता नांदत आहे. मला वाटतं, हे सगळे कसे शक्य झाले, हे आजच्या तरुणांना कळणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, इथे जे तरुण येतात ते भारावलेल्या अवस्थेत काम करायला तयार होतात, पण ती अवस्था संपली की पुन्हा आपल्या ‘टेक्निकली अपडेट’ असलेल्या विश्वात परतात. पुढच्या पिढ्यांनी जर आनंदवनासारख्या संस्थांमध्ये निष्ठेने काम केले नाही, तर समाजाचा फार मोठा भाग दुर्लक्षित राहू शकतो.

आज अनेक तरुण-तरुणी व्यवहारी जगण्यातून येणा-या नैराश्याला कंटाळून आत्महत्या करतात. परंतु इथे तर दूध कुष्ठरोग्यांनी काढले म्हणून, कित्येक दिवस आनंदवनाच्या बाहेरचा समाज ते दूध विकत घेत नव्हता. इतका आत्मसन्मान या कुष्ठरोग्यांनी गमावला होता. अशा वेळी त्यांना या उद्योगांतून जगवणे, त्यांचा सन्मान त्यांना परत मिळवून देणे, हे जितके सामाजिक कार्य आहे, तितकेच सर्जनशील कार्यदेखील आहे. शिवाय या माणसांच्या जगण्यातून, त्यांच्या संघर्षातून जगण्याची प्रेरणा नाही मिळाली तरच नवल.

मूलभूत गोष्टींसाठीचा झगडा काय असतो, हे न कळणारी तरुण पिढी या माणसांकडून खूप काही मिळवू शकते. या उद्देशानेच विकास आमटे यांनी आनंदवनातल्या प्रत्येक माणसाला या पुस्तकात बोलते केले आहे. समकालीन प्रकाशनाने या माणसांच्या तासन‌्तास मुलाखती घेतल्या आहेत, अगदी आनंदवनात पाणी कसे आले, पाण्याचा भीषण प्रश्न कसा सोडवला गेला, इथपासून दुधाचा व्यवसाय कसा उभा राहिला इथपर्यंत प्रयत्नपूर्वक शोध घेतला गेला आहे.
आज हेमलकसा ‘डाॅ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हीरो’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रकाशात आले आहे. आनंदवनाकडेही नागरिकांनी डोळस दृष्टीने पाहावे, ही अपेक्षा आहे. किंबहुना, हे पुस्तक वाचकांना साहित्यमूल्यांच्या पलीकडे जगण्याचा नवा दृष्टिकोन देऊ करेल, असाही आम्हाला सार्थ विश्वास आहे.

kvamte@gmail.com