आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Making Of Poem By Aishwarya Patekar, Divya Marathi

कवितेच्या नवी कोरी पाटी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवीला कविता आपोआप सुचते. ती आपसूक येते. हे जरी खरं असलं; तरी त्यापाठी कवीची खूप मोठी साधना असते. तप असतं. आपलं आयुष्य स्वत:च्याच हातानं कवीनं कवितेच्या हाती सोपविलेलं असतं. कविता अत्यंत कमी वेळात लिहून होणारी -हस्व रचना असली; तरी कवीच्या मेंदूत दीर्घकाळ चालणारी ती प्रक्रिया असते. वर्ष-सहा महिन्यांचं चिंतन ते कवीचं असू शकतं. अशा संदर्भातले आपले मतप्रकटन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी कवितेच्या निर्मितिप्रक्रियेविषयी केलं आहे. ते सत्यच आहे. मेंदूच्या पातळीवरचं सततचं चालू असलेलं चिंतन अनुभवांच्या निमित्तानं; प्रतिमा-प्रतीकांच्या साहाय्यानं सगुण साकार होतं. थोडक्यात, तिच्या शोधात सतत असावं लागतं. डोळस दृष्टी घेऊन तिला आजूबाजूला धुंडाळावं लागतं. ती कशातही गवसू शकते.
रानावनातल्या ढेकळा-धसकटांमध्ये ती कण्हताना सापडते. कोरड्या झालेल्या नदीबारवात; कोरड पडलेल्या पाखरांच्या घशात पाण्याविना दम टाकताना सापडते. भाकरीमागे लागलेल्या जिवांत धाप टाकताना सापडते. गरीब जित्राबांच्या अवस्थेत सापडते. शहरातल्या रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न अन् ट्रॅफिक जाममध्ये गुदमरताना; रस्त्यारस्त्यावरून कर्णकर्कशताना सापडते. मातीच्या ढिगा-याखाली गडप झालेल्या गावाजवळ ती तुमची वाट पाहत उभी असते. माणसांच्या संपलेल्या संवेदनशीलतेत सापडते. मिटलेल्या संवादात सापडते. इमारतीच्या आतल्या श्वासामध्ये कोंडलेली सापडते. कुठेही...

कविता गाईच्या डोळ्यातल्या कारुण्यात ओथंबून आलेली सापडते. पापण्यांच्याही काठोकाठ ऊतू जाताना दिसू शकते. कधी आईच्या व्याकूळ डोळ्यांत; दूर गेलेल्या लेकालेकीच्या आठवणींनी पाणवताना दिसते. उनाड पोरांनी दगड मारून पांगळ्या केलेल्या कुत्र्याच्या दुख-या पायात ती असतेच असते. मात्र त्यानं तोंडात धरलेल्या लचक्यातही कविता असते. सामान्य लोकांच्या वर्तमान दु:खात, भिका-याच्या झोळीत दीनवाणी पडलेल्या भाकरीत. परिस्थितीनं पाठीत घातलेल्या दांडक्यातही कविता असते. नुस्तंच पाणी पिऊन झोपलेल्या माणसाच्या रिकाम्या पोटात भुकेली झालेली कविता सापडते. तसेच कृषीवलाच्या दैनंदिन अवस्थेत. त्याच्यावर आत्महत्या लादणा-या व्यवस्थेत तर ती अतिशय ठळक झालेली सापडते. नव्या कृषिसंस्कृतीनं बदल घडविण्याच्या नावाखाली ग्रामसंवेदनांचा गळा घोटला आहे. व्यवस्थेच्या विस्तवावर ग्रामीण माणसाचं जगणं, त्याची स्वप्नं जळून करपून गेली आहेत. सगळ्या बाजूंनी माणसाची भयाण कोंडी झाली आहे. त्याचं सगळंच हिरावून घेतल्याच्या जाणिवेनं तो मरणाला कवटाळतो आहे. त्याच्या आत्महत्येचं रामायण अन् त्याच्या भाकरीचं महाभारत केलं जातंय. तिथं कविता असणार नाही हे कसं शक्य आहे? ती तर तिथंच घोटाळत उभी असते. समग्र सजीवांचं सजीवपण गहाळ होऊन एक कृत्रिम अवकळा पर्यावरणास लोंबकळून आली आहे. माणूस तुटत चाललाय एकमेकांच्या धाग्यादो-यांतून, असं म्हणण्यापेक्षाही माणूस माणसाच्या छाताडावर दगडी खिळ्यांच्या टाचा करकचून रोवत चाललाय. एक विचित्र अवघडता माणसानंच माणसाच्या जगण्यात निर्माण केलीय. या अनुभवापाशी तर कवीला कविता थेट फरपटतच घेऊन जाते. कवीची इच्छा नसली तरीही त्याला तिच्या मागोमाग जावंच लागतं.
कवितेची विषयसूत्रे तुमच्या परिस्थितीत, व्यवस्थेत, अवतीभोवती चिक्कार उगवून आलेली असतात. त्यांची ‘पारख’ करून त्यांना शब्दांच्या टोकावर पाखडता यायला हवं किंवा सुपात घोळून घोळून मागं जे काही सकस उरतं, अस्सल उरतं त्यात तर असते कविता. सकस म्हणून जे काही मागं उरलेलं असतं; त्यावर प्रतिमा- प्रतीकांची मुद्रा उमटलेली असते. थोडक्यात, प्रतिमा-प्रतीकांच्या बलावर उभी राहत असते कविता. पण ही कमाई वाटते तितकी सोपी नसतेच. त्यासाठी संपूर्ण आयुष्य कवीला पणाला लावावं लागतं. कित्येकदा स्वत:लाच उस्कटत नेऊन पुन्हा शिवत जावं लागतं. अनुभवांच्या जंजाळात स्वत:ला शाबूत ठेवावं लागतं. खंडोबाचा भंडारा अंगाला माखून घ्यावा; इतकी माखलेली असते ख-या कवीला कविता. या ख-या कवीला त्याची संपत्ती कुणी विचारत नाही. जमीनजुमला विचारत नाही. डिग्री विचारत नाही. आपण आकंठ अनुभवत असतो फक्त त्याची कविता. केशवसुत, बालकवी, मर्ढेकर, कुसुमाग्रज, आरती प्रभू, इंदिरा संत, बा. भ. बोरकर, नारायण सुर्वे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, ग्रेस, भालचंद्र नेमाडे ही ठळक उदाहरणे आहेत ख-या कवीची. आपल्याला कविता शोधायची असेल तर यांच्याच कवितेच्या रानातून आपल्याला जावं लागतं. संस्काराची विभूती कपाळाला लावावी लागते. तरी ती त्यांच्या मदतीनं तुम्हाला सापडेलच असे नाही. ती वाट कवीनं एकट्यानंच चालायची असते. तो भेलकांडून पडतो, पुन्हा उठतो. चालू लागतो. तेव्हा कुठे त्याला ती थोडीबहुत दिसू शकते.

कवितेचा शोध घ्यायला निघालं तर आपलं म्हणून जे काही सुखदायी आहे ते सारंच फेडून ठेवावं लागतं. कविता कवीच्या लगेच हाती लागेल असं होत नाही. कवितेसाठी चार चांगल्या प्रतिमा शोधायच्या असल्या तर त्यासाठी मनाच्या पायांना सारखं भटकत फिरावं लागतं. गावंच्या गावं, शहरंच्या शहरं, डोंगरद-या, नदीनाले, काट्याकुट्यांची जंगलं पायाखाली तुडवत राहावं लागतं. मनाचे पाय कधी रक्तबंबाळ होतात. कधी मऊशार मखमालीवर सुखावून जातात. सुखाची शिरशिरी मेंदूपर्यंत पोहोचण्याची अनुभूती मनाचे पायच देतात. कधी हेच पाय मेंदूपर्यंत वेदनेची सणकही पोहोचवतात. मनाचे पाय शिणत नाहीत की भागत नाहीत. ते किंकाळ्यांच्या प्रदेशात, वेदनांच्या प्रदेशात, काट्याकुट्यांच्या प्रदेशात घेऊन जातात. मेंदूस एक काम देऊन टाकतात. ते काम कोणतं तर किंकाळ्यांचा अर्थ शोधण्याचं. वेदनेचा अर्थ शोधण्याचं. तुमचा मेंदू कवीचा असतो. म्हणून अर्थाचा उलगडा केल्याशिवाय तुम्हास सुटका नाही. असंच नाही की वेदनेच्या किंवा दु:खाच्याच प्रदेशात तुमच्या मनाचे पाय घेऊन जातात. हे पाय तुम्हाला अशाही ठिकाणी तुम्हाला घेऊन जातात, तिथे तुमच्या कवीला असे काही अद्भुत दाखवतात की कवी अचंबित होऊन जातो.

कवितेच्या शोधात कविराय तुकारामानं उधळून दिलं अख्खं आयुष्य. ज्ञानदेवांनी तिच्यासाठी समर्पण केलं आपल्या अस्तित्वाचं. म्हणूनच कवितेचे अलौकिक लाखो दीप उजळून निघाले. चोख्याच्या हाडांतून निघाला कवितेचा ध्वनी. गोरा कुंभाराच्या चिखलात मातीशी एकरूप होत मडक्यागाडग्यांतून उभी राहिली कविता. जनाईच्या जात्यातल्या पिठातून राळ राळ होता होता, ओवीच्या रूपात सगुण साकार झाली कविता. तर माझ्या बहिणाबाईला लोकगीतात ती सापडली. नारायण सुर्वेंना कामगारांच्या कष्टाचा धडा गिरवता गिरवता त्याच्या समस्यांच्या विद्यापीठात सापडली. शेतीमातीचा लळा लागलेल्या महानोरांना ती मातीत सापडली.
मग माझ्या हाती कविता इतक्या सहजी लागेल कशी? कवितेचा शोध फक्त मी घेतोय. हा तिच्या शोधाचाच प्रवास आहे. मला खरी कविता सापडेल तेव्हा सापडेल. मात्र कवितेच्या संशोधन केंद्रात मी माझं नाव नोंदवलंय. भुकेनं तडफडून मरताना माणसं पाहिली. झाडाच्या फांदीला दोर टांगून आत्महत्या करणारी माणसं पाहिली. कपभर जहरात आयुष्य संपवून घेणारी माणसं पाहिली. त्याचप्रमाणे हत्यारं हातात घेऊन फिरणारी मेंदू गहाळ झालेली माणसं पाहिली. चिमणीला चोचीनं टोचे मारून मारून मारणारे कावळे पाहिले. आणखी लाखभर तरी गोष्टी असतीलच. त्यांच्या आसपास तर शोधतोय मी माझी कविता. त्याकरिताच कवितेच्या शोधाची नवी कोरी पाटी मी विकत आणलीय संवेदनशीलतेच्या बाजारातून. सृजनशीलतेच्या लेखणीनं तिच्यावर तर गिरवतोय अनुभवांची ‘अ ब क ड ई...’

oviaishpate@gmail.com