आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Making Of Poems By Shashikant Shinde, Divya Marathi

कविता हीच माझी माउली आणि लेकही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा विषय सुचणं आणि त्याने बेचैन होणं, ही माझ्या कवितेची सुरुवात असते. नदीला जसे अनेक प्रवाह येऊन मिळतात आणि ती पुढे समुद्राला जाऊन मिळते, माझ्याही रक्तातून शब्दांच्या होड्या वाहू लागतात शरीरभर आणि मग माझे संपूर्ण शरीरच कवितेचा एक अथांग समुद्र होऊन जातं.
मला माझ्या अवतीभोवती घडणा-या घटना खूप अस्वस्थ करतात. शेतीमालाचे कोसळणारे दर, नापिकीमुळे आणि कर्जाखाली दबल्याने घडणा-या शेतक-यांच्या आत्महत्या, नातेसंबंधात आलेलं तुटलेपण, धर्माच्या नावाखाली चाललेला दंभाचार, तापमानवाढ, घटत चाललेले पर्जन्यमान, ‘खाऊजा’चे अतिरेकी उदात्तीकरण, मराठी भाषेची गळचेपी, नद्यांचे प्रदूषण या गोष्टी माझ्या अस्वस्थतेत भर घालत असतात. संवादाची दारे खुली केली आणि समर्पित भावनेने एकमेकांना समजून घेतले तर कितीतरी प्रश्न चुटकीसरशी सुटतील. माणसे माणसांना माणूस म्हणून भेटतील. माणसांचे नवे जग उदयाला येईल. या अशा सुंदर स्वप्नाचा मी पाठलाग करतो आहे. ते कधीतरी वास्तव असेल, याची मी आस बाळगून आहे.

इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमात आम्हाला कविता होती, ‘दूर दूर माझे घर, जोगाईच्या पलीकडे...’ डोंगराच्या पलीकडे असणारे ते काल्पनिक घर नजरेसमोर साकार व्हायचे. या स्वप्नातून बाहेर पडूच नये, असे वाटत राहायचे. माझ्या मनावर कोरलेला कवितेचा तो पहिला संस्कार होता. मग दरवर्षी पाठ्यपुस्तकांतून कविता भेटत राहिल्या. त्या सगळ्याच कवितांनी माझ्यावर गारूड केले. शांता शेळके, इंदिरा संत, ग. दि. माडगूळकर, ना. धों. महानोर, कृ. ब. निकुंब या कवींच्या पाठ्यपुस्तकातल्या कविता मला तोंडपाठ असायच्या. शाळा सुटताना मनाचे श्लोक म्हटल्याशिवाय सुटका नसायची. त्यामुळे ते आपसूक पाठ होत गेले. कविता पहिल्यांदा ही अशी भेटली. लेकराने माउलीची गळाभेट द्यावी, तसा मी कवितेला जाऊन बिलगलो. तिनेच मला माउली करून टाकले आणि ती माझी लेक झाली. त्यामुळे आजही कुठे कविसंमेलनात जाताना तिला जरीकाठाची साडी नेसवावी की तिला परकर पोलक्यात न्यावे, तिचे बोट धरून जावे की तिला बोटाला पकडून न्यावे, आणि कविसंमेलनात मी तिची ओळख करून द्यावी की तिने माझी, अशा प्रश्नांनी मी आजही संभ्रमित असतो. त्यामुळे ती एकाच वेळी माझी माउली आहे आणि लेकही आहे, अशा दुहेरी नात्याने आम्ही एकमेकांशी संबंधित आहोत.

वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे घरी किशोर, चांदोबा ही मासिके यायची. त्यातील गोष्टींचा, कवितांचा आणि चित्रांचाही मी फडशा पाडायचो. मग वडील शाळेतून जादूच्या, राक्षसांच्या, प-यांच्या, राजा-राणींच्या गोष्टींची पुस्तके आणून द्यायचे. संध्याकाळच्या वेळी घराच्या ओट्यावर मित्रांना जमवून आम्ही एक एक पुस्तक कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात वाचून काढायचो. माझे प्रकट वाचणे चांगले होते, त्यामुळे मी वाचायचो आणि बाकीचे तल्लीन होऊन ऐकायचे. माझ्या खोडकरपणाला कंटाळून घरच्यांनी मला आठवीत असताना बोर्डिंगवर ठेवले. आमच्या बोर्डिंगच्या जवळच एक मोठी वेस होती. विशाल दगडी बांधकाम, सुबक कोरीव काम. दुपारच्या वेळी तिथे कुणीच नसायचे. मी एकटाच कृ. ब. निकुंबांची ‘घाल घाल पिंगा वा-या’ ही कविता मोठ्याने गाऊन म्हणायचो. घर आठवायचे, आई आठवायची, वडील, भाऊ-बहीण, मित्र, सगळा गाव आठवायचा. या सगळ्यांची उणीव कविता भरून काढायची. कविता सदैव अशी माझ्या सोबत होती. त्यामुळे तिच्या-माझ्यात अतूट असा बंध निर्माण झालेला आहे. या जन्मी तो तुटणे केवळ अशक्य आहे.

सुटीत मामाकडे गेलो की घरापासून जवळच असणा-या नदीवर जाऊन बसायचो. नदीचे स्वच्छ स्फटिकासारखे पाणी, दोन्ही काठांवर पसरलेले वाळवंट, बाजूला वड, पिंपळ, जांभूळ, करंजाची दाट गर्दी, संध्याकाळ कलू लागल्यावर पाण्यात ओघळणारे आभाळाचे विविध रंग... काठावर बसून पाण्यात पाय सोडून दिले की हा सगळा नजारा खुला व्हायचा. मी हे सगळं अधाशासारखा टिपत राहायचो. दूरवरच्या मंदिरातून आरतीचे मंजूळ स्वर हवेवर तरंगत कानांपर्यंत पोहोचायचे. त्या पवित्र प्रार्थना मी साठवून ठेवायचो. अंधारात बुडत चाललेल्या भवतालाला कापत घरी परतायचो. परंतु प्रार्थनेचा तो स्वर, तो नाद, ते शब्द, त्या आर्त ओळी कानामनात घुमत असायच्या. कवितेसारख्या त्या मी हृदयी घट्ट धरून ठेवायचो. अशाच एका उन्हाळ्याच्या सुटीत कधीतरी बाबा कदमांच्या कादंब-या वाचनात आल्या. त्या अनघड वयात त्यांनी माझ्यावर खूप मोठा प्रभाव टाकला. मी भारावून जाऊन त्यांचे काय काय वाचत राहिलो. त्या भारावलेपणातच कधीतरी कोरे कागद समोर ओढले आणि जे सुचले ते लिहीत गेलो. लिहून झाल्याचे काठोकाठ समाधान मात्र मनात मावत नव्हते. तसाच उठून मित्राकडे गेलो. मन:पूर्वक वाचून तो म्हणाला, ‘थोडे पॉलिश केले तर त्यांना कविता म्हणता येईल.’ त्याच्या प्रशस्तिपत्राने मी भारावून गेलो...
पाठ्यपुस्तकातल्या कवितांशी लहानपणीच जमलेली गट्टी, घराच्या ओट्यावर बसून कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात केलेले पुस्तकांचे वाचन, खोडकरपणामुळे बोर्डिंगचा लाभलेला सहवास, अंधाराच्या भीतीमुळे निर्माण झालेला न्यूनगंड, सायंकाळी नदीच्या काठावर बसून आरतीच्या आर्त ओळींचा ऐकलेला कल्लोळ या सगळ्या गोष्टी मला माझ्या कवितेच्या निर्मितीच्या शक्यता वाटतात. बाबा कदम हे निमित्त ठरले. त्यांनी अडलेला प्रवास प्रवाही केला. वर्षानुवर्षे जे दडले होते ते बाहेर पडले. माझ्या घरात कविता लिहिण्यासाठीचे पोषक असे वातावरण नव्हतेच मुळी, परंतु विरोधही नव्हता. त्यामुळेच कदाचित कवितेत मन:पूर्वक काही मांडता आले. कवितेच्या वाटेवर खुणेचा एक दगड रोवता आला. कवी लिहितो म्हणजे काय करतो? तर तो प्रतिक्रिया देत असतो. भूकंप झाल्यावर मातीच्या ढिगा-याखाली तीन दिवस एक चिमुकला जीव जिवंत असतो, तर तो त्या मातीच्या ढिगा-यालाच आईच्या गर्भाची उपमा देतो. पाऊस वेळेवर आला तर निर्मितीचा गंध आणि हंगाम टाळून आला तर जगण्याच्याच वाटा बंद होऊन जातात, हे जळजळीत वास्तव तो अधोरेखित करतो. त्याची घुसमट होत राहते. म्हणून कवी केवळ त्याच्या कुटुंबाचा नसतो. विश्वाशी त्याचे नाते असते. ही सृष्टी त्याचे अंगण असते. पृथ्वीचे उसे करून तो आभाळ पांघरतो.

- शब्दांकन : विष्णू जोशी