आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना ते जपान व्हाया कोइंबतूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारावी पूर्ण केल्यानंतर मेडिकलला प्रवेश घ्यायचा आणि डॉक्टर व्हायचं, हे जालन्यातल्या एका सर्वसामान्य घरातल्या मंजिरी कुलकर्णीचं स्वप्न. परंतु काही गुणांच्या फरकामुळे तिचा मेडिकल प्रवेश हुकला. मात्र, निराश न होऊन तिने संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग निवडला. परभणी कृषी विद्यापीठातून पदवी, कोइंबतूरच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी असा प्रवास करत तिने आता जपान गाठले आहे. सध्या जपानच्या सर्वात मोठ्या सुखोबा प्रयोगशाळेत ती डेंग्यू या डासावर संशोधन करते आहे. असंख्य अडचणींवर मात करत आपले संशोधन पूर्ण करण्यासाठी तिचा आटापिटा सुरू आहे.

मंजिरीने परभणी कृषी विद्यापीठातून बीएससी अ‍ॅग्रीकल्चर ही पदवी घेतली. त्यानंतर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कोइंबतूर विद्यापीठातून तिने एमएससी बायोटेक्नॉलॉजी केलं. या विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत मंजिरीने देशातून विसावा क्रमांक मिळवला होता. एमएस्सी पूर्ण केल्यानंतर तिने जपानमधल्या मोम्बुशो स्कॉलरशिपसाठी अर्ज केला. तिथे ती पात्र ठरली व तिला टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अँड टेक्नोलॉजीमध्ये डिपार्टमेंट ऑफ लाइफ सायन्सेस या विभागात संशोधनासाठी प्रवेश मिळाला. अडीच वर्षांपासून ती फोटॉन फॅक्टरी, सुकुबा येथे जैवतंत्रज्ञान विभागात डेंग्यू-३ या डासावर संशोधन करीत आहे. संशोधनासाठी तिला जपान सरकारकडून १ लाख ६५ हजार येन शिष्यवृत्ती मिळते. ३१ जानेवारी २०१५पर्यंत तिचे संशोधन पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरवर्षी शेकडो लोकांचा जीव घेणा-या डेंग्यूवर लस शोधण्याचा तिचा प्रयत्न आहे. यासाठी अहोरात्र ती कष्ट करत आहे.
संशोधन किंवा उच्च शिक्षणाशी संबंधति कोणतीही पार्श्वभूमी नसताना मंजिरीने स्वत:च्या हिमतीवर हे क्षेत्र निवडले. प्रत्येक टप्प्यावर अनेक अडचणी आल्या; परंतु त्यांवर तिने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मात केली.
वेळेला सर्वाधिक महत्त्व
‘महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावातून जपानमध्ये गेल्यावर मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेषत: तेथील भाषा, संस्कृती यांच्याशी जुळवून घेताना चांगलीच कसरत करावी लागली. टोकियोमधील अनेक मुलींशी मैत्री केली, मात्र ही मैत्री केवळ हाय-बायपर्यंतच मर्यादति आहे. जपानी लोक कामात जास्त वेळ देतात. सुरुवातीला मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र आपण बोलत असताना त्यांचे काम सुरूच असते, हे लक्षात आल्यावर आपल्यामुळे कुणाचा वेळ वाया जायला नको हे लक्षात घेऊन मीसुद्धा बोलणे कमी केले. जपानमध्ये प्रत्येकाला स्वत:ची कामे स्वत:च करावी लागतात. त्यामुळे स्वयंपाक करण्यापासून ते इतर सर्व कामे मी स्वत: करते. त्याशिवाय प्रयोगशाळेत गेल्यानंतर तेथील उपकरणे आपल्यालाच स्वच्छ करावी लागतात. लॅबच्या बाहेरील रस्त्यावर खूप बर्फ पडला असेल तर आमचे गाइड आणि आम्ही फावडे घेऊन तो स्वच्छ करतो. सुरुवातीला मला हे अवघड वाटले; परंतु १२ विविध देशांत संशोधनाचे कार्य केलेले आमचे गाइड युकावा कुरोडा जेव्हा ही कामे स्वत: करतात तेव्हा आपल्याला त्याबाबत काहीच वाटत नाही. जपानी लोक बोलण्यात फारच मृदू आहेत. कमी आवाजात आणि आर्जव करून बोलणे हा त्यांचा गुण मला फारच आवडतो. सकाळी आठ वाजता मी प्रयोगशाळेत पोहोचलेच पाहिजे, असा नियम आहे. थोडा जरी उशीर झाला तरी गाइडचा मेसेज येतो, मात्र त्यात अर्थात ते रागावत नाही. तू पोहोचत असशील किंवा आज तू इतके काम पूर्ण करशील, अशा अपेक्षा व्यक्त करतात. सर्वच जपानी लोकांमध्ये हा गुण ठासून भरलेला दिसून येतो. मला तो फारच आवडला. जपानच्या संस्कृतीशी आपल्याला मिळतेजुळते घेता यावे म्हणून मी जपानी भाषा लिहिणे, बोलणे शिकून घेतले.
टोकियो सर्वात
महागडे शहर
‘टोकियो या जगातील सर्वात महागडे शहर आहे, असे म्हणतात त्याचा अनुभव येतो आहे. येथे आल्यावर जपान विद्यापीठाचे होस्टेल ते प्रयोगशाळा या १० ते १२ किलोमीटर अंतरासाठी मला तीन हजार रुपये मोजावे लागले.’ ‘इतका खर्च नको म्हणून मी काही दिवस पायी गेले. त्यानंतर सरळ सायकल विकत घेतली. त्याशिवाय शाकाहारी जेवणासाठी मोठा खर्च होतो. पोह्याच्या एका प्लेटसाठी तीनशे, डोशासाठी हजार रुपये, झुणकाभाकरीसाठी तीन हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मी माझे जेवण स्वत:च तयार करते. आपल्याकडे रेशनवर मिळणा-या तांदळासारखा किलोभर तांदूळ विकत घेण्यासाठी ४०० ते ५०० रुपये मोजावे लागतात,’ असे मंजिरीने सांगतिले.
असा मिळाला महाकाय
प्रयोगशाळेत प्रवेश
‘काही दिवसांपूर्वीच जपान विद्यापीठाच्या २० विविध विभागांच्या विभागप्रमुखांनी सलग तीन तास मुलाखत घेतली.त्यात उत्तरे देताना श्वास घेण्याची संधी मिळत नव्हती.
अर्थात तयारी चांगली केली होती. त्यामुळे मी सर्व प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली. त्यामुळे जपान सरकारने संशोधक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर माझी नोंदणी केली. या संदर्भातील वृत्त तेथील वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध होताच, जपानच्या सर्वात मोठ्या सुकुबा प्रयोगशाळेने मला निमंत्रति केले. त्यामुळे माझे संशोधन सध्या याच प्रयोगशाळेत तपासण्याची संधी मला मिळाली आहे. महिन्यातून चार दिवस मला येथे प्रवेश मिळतो. मदतीसाठी दोन रोबोही मिळतात.’
प्रत्येक टप्प्यावर
अडचणी
‘बारावी पूर्ण झाल्यानंतर मेडिकलला जाण्याचे स्वप्न होते; मात्र तेथे जाता आले नाही. बीएस्सी झाल्यानंतर एमएस्सी करण्यासाठी कोइंबतूर विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. मात्र, बीएस्सीच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा सुरू असतानाच एमएस्सीची प्रवेश परीक्षा होती.
सुदैवाने रविवारी पेपर नसल्याने पुण्याला प्रवेश परीक्षेला उपस्थित राहता आले. तेथे पोहोचण्यास अर्धा तास उशीर झाल्याने परीक्षेला बसू देण्यासाठी विनवणी करावी लागली. रात्रभराचा प्रवास केल्यानंतर थेट परीक्षा केंद्र गाठले आणि देशात २० क्रमांक मिळवला. कोइंबतूर विद्यापीठाला प्रवेश घेणे स्वप्न होते, मात्र मला तेथे प्रवेश मिळू नये म्हणून तेथील लॉबीने भरपूर प्रयत्न केले. मला दुस-या विद्यापीठात प्रवेश घेण्याचे सुचवले, मात्र मी खंबीरपणे त्यांना विरोध केला त्यामुळे प्रवेश मिळाला. काेइंबतूरमध्ये सर्व सेमिस्टर पूर्ण केले, तेथे मी पपईच्या झाडावर रिसर्च केले. शैक्षणिक कर्ज घेऊनच माझे शिक्षण सुरू होते.’

वडील अजूनही सायकलवरच
मंजिरीचे वडील रवींद्र कुलकर्णी भाजपचे पूर्वाश्रमीचे सक्रिय कार्यकर्ते. जालना शहरातील कचेरी रोडवर त्यांचे छोटेसे घर असून ते गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करतात. त्यांच्याकडे अजूनही दुचाकी किंवा चारचाकी वाहन नाही त्यामुळे ६५ वर्षं वय असतानाही ते कामासाठी सायकलवरच फिरतात.