आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजाला गरज 'मंटोनियत'ची!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगभूत बंडखोरीने एकेकाळी साहित्य आणि विश्व ढवळून काढणारे लेखक सआदत हसन मंटो यांचा आज ६०वा स्मृतिदिन. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मंटो यांच्यासाठी सर्वस्व होते. त्यासाठीच आयुष्यभर त्यांनी खस्ता खाल्ल्या. हाच धागा पकडून चतुरस्र अभिनेत्री नंदिता दास मंटो यांच्यावर चित्रपट तयार करत आहेत. या निमित्ताने मंटो आणि समकालीन
वास्तवाचा नंदिता दास यांनी लावलेला हा अर्थ...
सआदत हसन मंटो यांच्या साहित्यविश्वाचा आधार घेऊन मी "फिराक'(२००८) हा चित्रपट बनवला होता. आज दहा वर्षांच्या संशोधनानंतर खुद्द मंटो यांच्यावरच चित्रपट साकारण्याचा माझा प्रयत्न आहे. इतका काळ उलटल्यानंतर मला पुन्हा ‘मंटोनियत’ची गरज का वाटावी? मंटो यांना जाऊन ६० वर्षांचा काळ लोटला आहे; पण या अवधीमध्ये आपण किती बदललोत? साहित्यामध्ये पुष्कळ बदल झालेत, चित्रपटमाध्यमातही झालेत; पण सगळ्याचे मूळ बदललेय का?
मुळात साहित्य वाचणारा वाचक आणि चित्रपट पाहणारा प्रेक्षक बदललाय का? त्याचा दृष्टिकोन बदललाय का? दोन ओळींमधला गहन अर्थ समजून घेण्यातली त्याची क्षमता विस्तारलीय का?
मला वाटते, ‘क्लास’मध्ये हे बदल झाले असतील, पण 'मास'मध्ये बदल झालेले नाहीत. खरे तर, मंटो यांनी साहित्यातून मांडलेले प्रश्न आजही त्याच जागी आहेत. पण माझ्या चित्रपटातून मंटो यांना साकारताना हा न झालेला व सामान्यांपर्यंत न झिरपलेला बदलच मांडण्याची माझी मुख्य भूमिका आहे. आपल्याकडे इस्मत चुगताई आणि पाकिस्तानात मंटो ही दोन
नावे त्या काळी बंडखोर म्हणून गणली जात होती. मला ज्या लेखकाने महाविद्यालयीन जीवनापासून वेड लावले, विचार करायला लावले, त्या मंटो यांना साकारून हे बंडखोरीचे वास्तव अधोरेखित करायचा माझा प्रयत्न आहे. कारण समकालीन स्थिती पाहता फक्त काळ घड्याळाच्या गतीने पुढे सरकला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अधिकच तीव्र बनला आहे.
मंटो यांच्या लेखनातून जो प्रस्थापित आणि उपेक्षित समाजाविषयी लेखनाचा प्रवाह वाचकाला भिडत आला, स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयीचे जे थेट विचार मंटो यांनी मांडले, हे त्या काळात त्यांच्या देशात (नि आपल्या देशातही) आक्षेपार्ह होते, तथाकथित धर्म बुडवणारे होते.
तरीदेखील मंटो लिहीत राहिले. त्यांचा पाकिस्तानच्या सरकारने कधी गौरव केला नाही,
की कुठला पुरस्कार दिला नाही. त्यांचे लेखन म्हणजे निषेधार्हच होते. पण आज काय वेगळी स्थिती आहे. चित्रपटात कुणी धर्माचे नाव उच्चारले, तरी आपल्याकडे संस्कृतीरक्षक, धर्मरक्षक मोर्चे घेऊन येतात. इतकेच काय, स्त्रियांनी काय घालायचे, काय घालू नये, याचेही नियम लादले जाताहेत. मला वाटते, आतापर्यंत आपला समाज व्यापक दृष्टिकोन असणारा घडायला हवा होता. पण उलट प्रश्न गंभीर होत चालले आहेत. खरे तर प्रत्येक वाचकाला वा प्रेक्षकाला ‘चॉइस’
असतो. त्याने काय पाहावे व काय पाहू नये, काय वाचावे वा काय वाचू नये, हे त्याचे त्याने ठरवावे, असे मला वाटते.
मंटो यांनी ‘बू’ या कथेमध्ये स्त्रीच्या छातीला छाती म्हटले, तर त्यांच्यावर लाहोरमध्ये खटला भरला गेला. अलीकडचा पॅरिसमधील ‘शार्ली हेब्दो’वरील हल्ला वा जर्मनीमधील मासिकावरील हल्ला, यात एकच समान धागा आहे. अशाने आपण सामाजिक जडणघडणीची कुचंबणा करतो आहोत, हे कुणालाच लक्षात येत नाही. मंटो एकदा म्हणाले होते, ‘व्हाय वुड आय वाँट टु अनड्रेस सोसायटी, दॅट इज ऑलरेडी नेकेड.’ हेच सत्य आजही लागू होते. जो तो आपल्या चेह-यावर एक मुखवटा घेऊन समाजात वावरत असतो. पण हे मुखवटे आहेत, हे ओळखण्याची
प्रत्येकाला आता समज-उमज आली आहे. मंटोंनी समाजातील सभ्यतेच्या, पांढरपेशांच्या मुखवट्यांमागील उघड्या पडलेल्या वास्तवालाच मांडले होते. आजही तेच घडते आहे. बुवाबाजी, स्त्री-शोषण या सगळ्या बाबी आता जाहीरपणे होऊ लागल्या आहेत.

दुसरा मुद्दा येतो तो अश्लीलतेचा. मंटोच्या ‘काली सलवार’, ‘बू’ यांसारख्या कथांमधून स्त्रीजीवनाचे वास्तव खुलेपणाने मांडलेले दिसते. स्त्रीसौंदर्याबाबत मंटोंनी खुलेपणाने आपला दृष्टिकोन मांडला होता. मात्र आज आपल्याकडे अश्लीलता आणि कलात्मकता यांमधली नाजूक सीमारेषाच आपण पुसून टाकली आहे. मंटो यांच्या ‘बू’ कथेवर त्या काळी म्हणूनच तर
खटला भरला गेला होता. आजही असाच संकुचित दृष्टिकोन आहे, कलात्मक बाबींकडे बघण्याचा. आणखी एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, मंटोंच्या लेखनाबाबत निषेध नोंदवले गेलेत; पण मंटो यांनी त्या विरोधात कायम आवाज उठवला. खंबीरपणे ते शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांना पाठिंबा देणारा एक वर्गही हिमतीने त्यांच्यामागे उभा होता. पण आज काय घडतेय? कुणी वादात सापडले वा एखाद्या साहित्यकृतीवर आक्षेप घेतला गेला, की बाकी सगळे मूक होतात. क्वचित कुणी विरोधाला उत्तर देण्याचा प्रयत्न करते. सामाजिक भूमिकाही अंग चोरूनच घेतली जाते. आपण बनवलेली कलाकृती ज्या वेळी एखादी सामाजिक-सांस्कृतिक भूमिका घेत असते, त्या वेळी ती फक्त कलाकृती म्हणून उरत नाही तर समाजातल्या बदलांचे ती प्रतिनिधित्व करीत असते. हे भान जपताना प्रसंगी विरोध
झाल्यास त्याचा सामना एकजुटीने करावा लागतो, मात्र तसे होताना दिसत नाही. खरे तर प्रगल्भ मानसिकतेचा काळ अजूनही आलेला नाही. ‘इफ यू कॅन नॉट बेअर माय स्टोरीज, देन धिस इज अनबेअरेबल टाइम’ असेही मंटो यांनी एकदा म्हटले होते. खरे आहे, हा ‘अनबेअरेबल टाइम’ अजूनही संपलेला नाही; उलट वाढतच आहे. हा प्रकार संपवायचा असेल,
तर सामान्य माणसापर्यंत माध्यमांमधून प्रबोधन होणे ही गरज आहे. रोज उठून आपल्या दैनंदिन जगण्यात गुरफटणा-या माणसांच्या खरे तर गावीही नसते, की अवतीभवती किती गंभीर प्रश्न आहेत ते.
अंगाशी येत नाही, तोवर जो तो आपला आपला जगत असतो. हे मुख्यत: धर्माभिमान, वंश-जात वर्चस्व यातून येतेय. आपल्याला शब्द सुटे सुटे करून त्यांचे अर्थ लावायची सवय आहे. या सवयीतूनच उमजणे खुंटते नि जगभरात धर्माभिमान, वंश-जात वर्चस्व वाढीस लागते. त्यातून असहिष्णू वृत्ती वाढते आहे. पेशावरचा हल्ला वा मलालावर झालेला हल्ला, ही याचीच उदाहरणे. या व्यवस्थेची केवळ कठोर चिकित्साच नाही, तर तिला पूर्णत: बदलण्याचीच वेळ आली आहे. हा बदल घडवताना एक लक्षात घ्यावे लागते, की स्त्री ही परंपरा-संस्कारांच्या अभिसरणाची माध्यम आहे. पुरुषप्रधान वर्चस्वातून तिला त्या भूमिकेत आपण ढकलले आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. आजच्या सामान्य स्त्रीला आपण आपल्या पुढच्या पिढीला कसे घडवतोय, यावर त्याची व पर्यायाने समुदायाची मानसिकता, विचारधारा अवलंबून आहे,
याची क्वचितच जाणीव असावी, असे मला वाटते. मला वाटते, समानतेचे तत्त्व आपण फार उथळपणे स्वीकारल्याने हे घडते आहे. सामान्य स्त्रीला जर समुदायाचे, समाजाचे परंपरा, धर्म, वर्चस्ववादाच्या दृष्टीने भान द्यायचे असेल तर खरे तर समाजाचे संतुलन हे जागतिकीकरणाच्या रेट्यानुसार आपण आधी साधायला हवे. आपण पायाभूत सुविधांमध्ये जागतिकीकरण स्वीकारले; पण मानसिकता मात्र अजूनही सनातनी आहे. मंटाे यांच्यासारखा लेखक म्हणूनच
आपल्याकडून दुर्लक्षितच राहिला. त्यांचे साहित्य आपण केवळ कलात्मक पातळीवर ताेलले, पण अनुसरू शकलाे नाही. म्हणूनच समाजाला अजूनही ‘मंटोनियत’ची गरज आहे...