आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाच्या समुद्राचा तळ गाठणार नाटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भद्रकाली प्रॉडक्शन ही मच्छिंद्र कांबळी यांची संस्था. या संस्थेने ‘वस्त्रहरण’, ‘घास रे रामा’सारखी नाटके रंगभूमीवर आणून मालवणी मुलुखातल्या झणझणीत कोंबडी अन् कोंबडीवड्यांच्या परंपरेची नाटके दिली. ‘वस्त्रहरण’ तर माइलस्टोन ठरले. ‘मालवणी नटसम्राट’ असा लौकिकही मच्छिंद्र कांबळी यांनी मिळविला. पु. ल. देशपांडे यांनी ‘वस्त्रहरण’ला दिलखुलास दाद दिली. अन् नंतर पुलंची प्रतिक्रिया जाहिरातीत टाकून मच्छिंद्र कांबळी यांनी ‘वस्त्रहरण’चे एक हजारावर प्रयोग केले. भद्रकाली प्रॉडक्शनने एकूण ५०च्या वर नाटके मराठी रंगभूमीला दिली. मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर भद्रकालीची सूत्रे कविता कांबळी आणि प्रसाद कांबळी यांनी हाती घेतली अन् भद्रकालीच्या रूढ परंपरेला छेद देत, या संस्थेने अतिशय वेगळे, चाकोरीबाहेरचे नाटक रंगभूमीवर आणले.

मिलिंद बोकील यांच्या ‘समुद्र’ कादंबरीवरचं चिन्मय मांडलेकर यांनी नाट्यरूपांतर केलेलं ‘समुद्र’ हे असंच चाकोरी मोडणारं नाटक. एखादी कादंबरी अथवा कथेवरून रंगभूमीवर आलेल्या अनेक नाटकांची परंपरा आपल्याकडे आहे. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’, ‘रथचक्र’वरून नाटके रंगभूमीवर आली. रत्नाकर मतकरींच्या ‘जौळ’ या कादंबरीवरून ‘माझं काय चुकलं?’ हे नाटक रंगभूमीवर आलं. जयवंत दळवींच्या ‘महानंदा’ कादंबरीवरून शं. ना. नवरे यांचे ‘गुंतता हृदय हे’ रंगभूमीवर आले. रणजीत देसाईंच्या ‘स्वामी’ कादंबरीवरून ‘स्वामी’ नाटक आले. विनिता ऐनापुरेंच्या ‘नराधम’ कादंबरीवर ‘कुसुम मनोहर लेले’ आले. उदाहरणे अनेक देता येतील. कादंबरीचे नाट्यरूपांतर तसा धाडसी प्रवास असतो. कारण कादंबरीची भट्टी नाट्यरूपांतरात जमावी लागते. कधी कधी ही भट्टी इतकी परिणामकारक होते की, कादंबरीपेक्षा नाट्यरूपांतर सरस ठरतं. रंगभूमीवर येताना हे माध्यमांतरण बेमालूम झाले, तर निर्माता खुश. कलाकारही खुश. असो.

‘समुद्र’ने एका अतिशय गंभीर विषयाला वाचा फोडली आहे. हा विषय आहे, एका स्त्रीच्या विवाहबाह्य संबंधाचा. समुद्राचा तळ शोधणे जसे महाकठीण, तसाच मनाचा तळ शोधणे कठीण. एका विशिष्ट क्षणाला आपल्या पतीपेक्षा वेगळ्या पुरुषाचं आकर्षण एका स्त्रीला वाटतं. दोघेही ‘कलासक्त’. संस्कृती आणि इतिहास अर्थात जुनी लेणी, गड-किल्ले आदी चर्चेच्या रूपाने एकत्र येतात, अन् चर्चेसोबतच एकमेकांच्या प्रेमपाशात अडकतात. आयुष्यात एका बेसावध क्षणी दुस-या पुरुषाचं आकर्षण त्या स्त्रीला का वाटावं? असा बेसावध क्षण खरं म्हणजे द्रौपदीच्याही आयुष्यात आला होता. कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं होतं. तसंच ‘समुद्र’मधील नायिकेचं मन पाकुळलं-आपल्या मित्रासोबत. खरं म्हणजे, ज्या बेसावध क्षणी ती पतीला सोडून या मित्राच्या बाहुपाशात रमली, त्या बेसावध क्षणाची माहिती तिनं पतीला दिली. अन् तेथेच तिच्या पतीच्या मनात समुद्राचं तुफान आलं. किंबहुना, दोघांच्याही आयुष्यात तुफान आलं. तिच्या पतीच्या मनातलं हे तुफान उसळलेल्या लाटांचं अन् तिच्या मनातल्या तुफानाचं स्वरूप किना-याच्या खडकावर उसळून आपटलेल्या अन् शांत झालेल्या लाटेचं आहे.

आपल्या पतीशी प्रतारणा करण्याचा पत्नीचा मानस नव्हता, पण आयुष्यात जे घडलं, त्याबद्दल अपराधीपणाची भावनाही पत्नीची नसते. पतीसमोर माफीनामा अथवा कबुलीजबाब देण्याचा तिचा मानस नाही, तर विवाहबाह्य संबंध घडल्याचं सांगून केवळ मन मोकळं करण्याची तिची भावना असते. आपल्या आयुष्यातला तो क्षण सावध क्षण होता की बेसावध, असा चकवाही तिच्या मनात नाही. भास्कर या आपल्या मित्राबरोबर जे क्षण घालवले, ते निश्चितच आनंदाचे होते अन् अक्कल हुशारीचे होते, अशी तिची भावना असते. मित्राने आपल्या पतीशी स्पर्धा करण्यासाठी आपला वापर केला, असं त्याच्या बोलण्यावरून लक्षात येताच, ती मित्राच्या थोबाडीत मारते. मित्राच्या थोबाडीत मारल्याचा कबुलीजबाब तिच्याकडून येताच, तिच्या पतीच्या मनात उसळलेल्या लाटा शांत व्हायला सुरुवात होते. विशिष्ट परिस्थिती आणि विशिष्ट व्यक्ती यांच्या संदर्भातली प्रत्येकाची गणितं एक असतील, असं नाही. समुद्राच्या वरच्या लाटांच्या खाली अगदी तळापर्यंत वेगवेगळ्या घडामोडी सुरू असतात. त्या समुद्रातल्या देवमाशाला कळत असतील. समुद्राची गाज वेगवेगळी असते. प्रत्येकाचा समुद्र वेगळा, अन् प्रत्येकाच्या समुद्राचा तळ वेगळा. झालं गेलं विसरून पती-पत्नी एक होतात. आपल्या पती-पत्नी असण्याचा अन् मित्राबरोबर आलेल्या माझ्या शरीरसंबंधाचा काही संबंध नाही, दोन्ही विषय वेगवेगळे आहेत, अशी स्पष्ट भूमिका पत्नीची असते. त्या दृष्टीने ‘समुद्र’ हे भलतंच गुंतागुंतीचं, उंची, खोलीचं नाटक आहे. हे नाटक केवळ आजच्या आधुनिक युगात स्त्रीकडून घडलेल्या विवाहबाह्य संबंधापुरतं थांबत नाही, तर ते स्त्री-पुरुष मनाच्या समुद्राचा तळ गाठणारं नाटक आहे.

स्पृहा जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांनी ‘समुद्र’ नाटकात पती-पत्नीचे काम केले आहे. चाकोरीबाहेरचे कथानक अन् आव्हानात्मक भूमिका, असे ‘समुद्र’ चे स्वरूप आहे. नाटकाला या दोघांनी अतिशय उत्तम न्याय दिला आहे. कारण ‘समुद्र’ हे ‘संभाषण केंद्री’ नाटक आहे. या नाटकातील प्रत्येक संवाद हा जिवाचा कान करून ऐकावा, असा आहे. एखादा जरी संवाद आकलनातून निसटला तरी नाटकाची समज उमज देणारा रस्ता निसरडा होणार, हा धोका आहे. १२ वर्षाखालील मुलांना नाटकाला प्रवेश नाही, हे अगदी सयुक्तिक वाटते, कारण नाटक पोरसवदा नाही, पोराटकीचे नाही. द्विपात्री खांबावर पेललेला हा अवघड विषय आहे.
मराठी रंगभूमीवर अलीकडच्या काळात आलेल्या नाटकांमध्ये ‘समुद्र’ निश्चित वेगळे आहे. विशेषतः ज्या भावविश्वात आजवर मराठी नाटक घडले, ते भावविश्व ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कन्या सासुराशी जाये’ अशा स्वरूपाचे होते. पुरुषप्रधान संस्कृती ही मराठी रंगभूमीची ओळख होती. त्या पार्श्वभूमीवर ‘समुद्र’ हे हादरा देणारे नाटक आहे. आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीतील स्त्री-पुरुष संबंधाच्या तीक्ष्ण कंगो-यांचे दर्शन घडविणारे आहे.

prakash.khandge@gmail.com
बातम्या आणखी आहेत...