आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरमिसळ रूढी-परंपरांची...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकणात स्थायिक झालेल्या बेने इस्रायलींचे इतरत्र स्थलांतर झाले. इतर ज्यूंबरोबर साहचर्य वाढले. पण बेने इस्रायलींच्या परंपरा, त्यातील मराठी संस्कृतीचा प्रभाव, अनेक शतके कायम राहिला. कोकणात राहिलेल्या बेने इस्रायली समाजाने बोलीभाषा म्हणूनही मराठीचा स्वीकार केला. ब्रिटिश गॅझेटियरमध्ये त्यांची मातृभाषा मराठी असा उल्लेख दिसतो. कोकणी भाषेतील अनेक शब्द बेने इस्रायली लोक वापरत. त्यातील काही शब्द आजही वापरले जातात. उदा. बापुस, आईस, बाय, बेस, फूय इ. त्या वेळच्या बेने इस्रायलींच्या नावाचेही मराठीकरण झाले. पहिल्यांदा साधारण अब्राहम, डेव्हिड, मोझेस, सालोमन आणि सॅम्युअल अशी नावे असत. तर स्त्रियांमध्ये मरियम, रिबेका, रेहेल आदी. यांचे मराठीकरण होताना पुरुषांमध्ये हसाजी, बालाजी, एलोजी, तर स्त्रियांमध्ये लाडूबाई, येसुबाई, सखुबाई असे झालेले दिसते. त्यानंतर धर्मजागृती झाल्यावरही नावात बदल झाले. जुन्या नावांचा उल्लेख बेने इस्रायलींच्या प्रार्थना मंदिरात ज्यांच्या स्मरणार्थ देणग्या दिल्या गेल्या, त्यात आढळतो. यानंतर बायबलमधील नावे प्रचारात आली, तरी त्यामध्ये ‘जी’ कायम राहिला. अब्राहमजी, इसाकजी, सिलेमानजी, राहिमीमजी, योसेफजी इ. आंग्-यांच्या काळात बेने इस्रायली समाजाला हिराकोट किल्ल्यावरील तोफ वाजवून सणाच्या शुभेच्छा दिल्या जात. या काळात राघोजी आंग्रे व त्यांचे मंत्री विनायक परशुराम बिवलकर यांनी सॅम्युअल जेकब किहीमकर यांच्याकडून बेने इस्रायली धर्माविषयी माहिती लिहून घेऊन संग्रहित केली होती. नावांप्रमाणेच बेने इस्रायलींचे रीतिरिवाज, सणसमारंभ यातही मराठी परंपरांचा समावेश झाला. किहीमकरांनी लिहिलेल्या ‘दि हिस्ट्री ऑफ द बेने इस्रायली ऑफ इंडिया’ या पुस्तकात समाजातील व्यक्तींची मराठी नावे व सणांची माहिती दिली आहे. त्यात रोश हश्शाना (बेने इस्रायलींचा वर्ष प्रतिपदेचा दिवस), हान्नुका (दिव्यांचा सण), योम किप्पुर (पश्चात्ताप व्यक्त करण्याचा दिवस), शीळा सण (योम किप्पुरच्या दुस-या दिवशी साजरा होणारा सण), खिरीचा सण (नवीन वर्षाच्या तिस-या दिवशी साजरा होणारा, विविध प्रकारांची खीर खाण्याचा दिवस. सध्या हा दिवस ‘सिमहाप तोरा’ म्हणजेच मिस्र देशातून केलेल्या खडतर प्रवासाची आठवण म्हणूनही पाळला जातो.), होळीचा सण (लहान मुलांचा म्हणून साजरा होतो.), तिशआ-बे-आब (या दिवशी घरोघरी वालाची उसळ करतात.), आनशी धाकाचा सण (मोशेंनी इस्रायलींची मिस्र देशातून सुटका केल्याची आठवण म्हणून साजरा होणारा सण) आदी सण-उत्सवांचा विस्ताराने उल्लेख आलेला आहे. भारतात आलेले बेने इस्रायली लोक इतर ज्यू जमातीपासून अनेक वर्षे स्वतंत्र- पूर्ण अलग राहिले. त्यांनी फक्त त्यांना माहीत असलेल्या प्रार्थना परंपरा पाळल्या. परंतु कालांतराने इतर परंपरा पाळत असताना महाराष्‍ट्रातील परंपरांची सरमिसळही केली. जसे विवाहाच्या विधीमध्ये महाराष्‍ट्रीय विवाहाप्रमाणेच साखरपुडा हा विधी केला जातो. फक्त साखरपुडा न देता साखर भरवली जाते. विवाहाच्या आधी मेंदीचा कार्यक्रम असतो. आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो. त्या वेळेस मुलीला मुंडावळ्या म्हणजे शेरे (चांदीच्या किंवा फुलांच्या) बांधल्या जातात. समई लावतात. सुपात नारळ, तांदूळ, सुपारी, खायची पाने ठेवून ओवाळणी केली जाते. नव-या मुलाकडून नवरीसाठी दागदागिने, साड्या पाठवतात. लग्नाच्या वेळेस नवरीस सफेद कपडे परिधान करावे लागतात. लग्नात धर्मगुरू नवरा-नवरीला द्राक्षरस देऊन ‘लग्यंन’ लावतात. लग्नविधी म्हणजे धार्मिक संस्कार व करार असे मिश्रण आहे. त्याला ‘अखताना’ म्हणतात. नवरीला सौभाग्य अलंकार घालतात. त्यात मंगळसूत्र, अंगठी, हिरव्या बांगड्या यांचा समावेश असतो. याशिवाय बेने इस्रायली समाजात आठव्या दिवशी मुलाची सुंता करतात. त्याच दिवशी त्याचे नाव ठेवतात. त्यात त्याची आई सहभागी होत नाही. कारण तिला 40 दिवसांचा सुवेर (सोयर) असतो. त्यामुळे तिला प्रार्थनालयात जाता येत नाही. मुलीचा सोयर 80 दिवस असतो. स्नान विधीने आईची शुद्धी केली जाते. शुद्धीच्या स्नानासाठी प्रार्थना मंदिरातील (तेबिला हाऊस) हौदातील पाणी वापरले जाते. (सुंता विधीत महाळुंग हे फळ प्रसाद म्हणून वाटले जाते) बारसे हे मराठी पद्धतीनुसार केले जाते. मुलाला पाळण्यात घालून नाव ठेवले जाते. आईची तांदूळ, नारळ, उकडलेले चणे (घुग-या), खोब-याचा तुकडा, पेढा यांनी ओटी भरतात. हिंदू धर्मात उच्च वर्गात मौंजीबंधन करण्याची पद्धत आहे. ते फक्त मुलाचे केले जाते. बेने इस्रायलींमध्ये मुलाला तेरावे वर्ष पूर्ण व्हायच्या आत हा विधी केला जातो. यानंतर धार्मिक प्रार्थनांच्या वेळेस दहा जणांत त्याचा समावेश होऊ शकतो. त्याचे बालपण संपून तो समंजस झाला, असे समजले जाते. मुलींचाही असा विधी केला जातो. त्याला ‘बाथमित्सवा’ असे म्हणतात. प्रार्थनालयांत तेब्यावर जाऊन तिला मात्र ‘सेफेरतोरा’चे वाचन करता येत नाही.

बेने इस्रायलींचे पोषाख, दागदागिने, कौटुंबिक व्यवहारावरही कोकणी माणसाची छाप दिसते. सुरुवातीला बेने इस्रायली बायका कुणबी स्त्रियांप्रमाणे काष्ट्याची नऊवार साडी नेसत. पोलका घालत. पुढे मुस्लिम व ख्रिश्चन प्रभावाने पोलक्याचे हात लांब घालण्याची पद्धत आली. पदर डोक्यावरून घेतला जाई. काही वेळा गुजराती पद्धतीची साडी नेसली जाते. समारंभात जरीच्या/ रेशमी साड्या नेसत. दागिन्यात सुरुवातीला नथीचा समावेश दिसतो. नंतर ही पद्धत कमी झाली. मात्र काचेच्या बांगड्या सोन्याच्या बांगड्यांबरोबर घातल्या जात. पुरुषाच्या पोषाखात मात्र हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही पद्धतींचा समावेश दिसतो. धोतर, त्यावर लांब कोट, डोक्यावर मुस्लिम पद्धतीची वा पारशी/ तुर्की पद्धतीची टोपी, पायात चप्पल किंवा इंग्रजी पद्धतीचा पोशाख पुढील काळात केला जाई.


फ्लोरा सॅम्युएल यांच्या ‘संस्कृति संग्राम’ या पुस्तकात हिंदू व मुस्लिम सणांत बेने इस्रायली (रोहा) अष्टमी गावात एकत्रपणे कसे राहत, त्याचे उल्लेख आले आहेत. हिंदूंच्या अधिक मासात गौराची मिरवणूक काढली जाई. त्याच वेळेस बेने इस्रायलींचा ‘किप्पूर’ हा उपवासाचा दिवस असे. बेने इस्रायली संध्याकाळी प्रार्थना मंदिरात पांढरे कपडे घालून जात. तेव्हा या मिरवणुका थांबवून त्यांना जाण्यास वाट दिली जाई. ‘सेनेगॉग’वरून जाताना वाद्ये बंद केली जात. थोडक्यात, बेने इस्रायली महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात मिसळत गेले, तसेच महाराष्ट्रीय समाजानेही त्यांना त्यांच्या रूढी-परंपरांसह आपलेसे केले.