आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Nilu Phule's Villan Role In Marathi By Raghvir Kul

जगदंब... जगदंब...जगदंब..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९३० मध्ये पुण्यात महात्मा जोतिबा फुल्यांचा वारसा सांगणा-या फुले घराण्यामध्ये नीळकंठ कृष्णाजी फुले जन्मले. स्वत: स्वातंत्र्यसैनिक म्हणून चळवळीतही भाग घेतला. राष्ट्रीय सेवा दलाची बांधिलकी आयुष्यभर मानली. आर्मी फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये ८० रुपये पगारावर काम करतानासुद्धा दरमहा १० रुपये निळूभाऊ राष्ट्र सेवा दलाला देत असत. माळ्याच्या नोकरीमधून स्वत:ची नर्सरी असावी, एवढीच इच्छा होती; पण पैशांअभावी ते स्वप्न पुरे झाले नाही.

रवींद्रनाथ टागोर वाचल्यानंतर प्रभावित होऊन त्यांनी ‘उडान’ नावाचे नाटकही लिहिले होते. पण पिंड सोशल वर्करचा! सोशल वर्करवरून आठवले, माझ्या ‘मोहरे’ चित्रपटामध्ये निळूभाऊंनी एका सोशल वर्करचा रोल केला होता. तेव्हा सेटवर लेंगा, झब्बा, गांधी टोपी, खांद्यावर शबनम बॅग टाकल्यावर त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला होता की, ‘हा सोशल वर्कर खरा, प्रामाणिक आहे, का चोर आहे?’ प्रामाणिक आहे, म्हटल्यावर ‘बस्स, आता माझ्यावर सोडा’, इतकेच ते म्हणाले. एवढेच ब्रीफिंग पुरेसे होते. अर्थात, निळूभाऊंना अधिक सांगण्याची गरज नव्हती. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तळागाळातील कार्यकर्त्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्व स्तरावरील राजकारणी त्यांनी पाहिले होते. कोण सच्चा आणि कोण लुच्चा, हे त्याच्या हालचालीवरून ओळखणे आिण तसा रोल करणे त्यांच्यासाठी सहज होते. आपण बाळासाहेब देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांच्याकडून अनेक लकबी घेतल्या, असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.

१९५७च्या लोकसभा निवडणुकीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम उभे राहिले तर काय होईल, या कल्पनेवर त्यांनी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे?’ हे लोकनाट्य लिहिले. ते प्रचंड गाजले. पुढील लोकनाट्य ‘कथा अकलेच्या कांद्याची’ याचे दोन हजारावर प्रयोग झाले. हेच लोकनाट्य बघून दिग्दर्शक अनंत माने यांनी निळूभाऊंना १९६८मध्ये ‘एक गाव बारा भानगडी’मध्ये झेल्या पाटलांचा रोल दिला आणि अस्सल गावाकडचा इरसाल व्हिलन जन्माला आला.
डोक्यावरती कडक तिरपी गांधी टोपी, अंगामध्ये पांढरा भट्टीचा झब्बा, त्यावर काळे जाकिट, खाली पांढरे शुभ्र धोतर, त्याचा सोगा जमिनीवर लागू नये म्हणून एका हाताने वर उचललेला. या सोगा वर उचलण्याची उंची सिनेमातील प्रसंगानुसार कमी जास्त होणारी. पायात कोल्हापुरी चपला आणि चालण्यामध्ये गावातील वळूप्रमाणे माज! बोलण्यामध्ये तोंडातील तंबाखूची पिचकारी मारली, तरी दुनियेला कचरा समजण्याची अरेरावी.

अशा आवेशात निळूभाऊंनी एक नव्हे, दोन नव्हे, २५० चित्रपट केले. मराठी चित्रपटांमधील लौकिक त्यांना हिंदीमध्ये घेऊन गेला. माझ्या चित्रपटामधील एका प्रसंगात त्यांचा अनुपम खेरबरोबर सहभाग होता. ‘ये सोशल वर्कर कौन कर रहा है?’ अनुपमने सेटवर मला विचारले. मी म्हणालो, निळूभाऊ. ‘निळूभाऊ?’ अनुपम म्हणाला, ‘आ रहे है वो?’ आणि भाऊ आल्यावर अनुपम त्यांच्या अगदी वाकून पाया पडला. तेवढा मान भाऊंनी कमावला होता. कारण, अनुपमच्याच पहिल्या चित्रपटामध्ये निळूभाऊंनी सत्तांध राजकारण्याची महत्त्वाची खलनायकी भूमिका केली होती. त्यांच्या त्या रोलमधील भगव्या कफनीवरून मोठे वादळ झाले होते. चित्रपट होता, ‘सारांश’.

मशाल, कुली, वो सात दिन, मोहरे अशा हिंदीमधील भूमिका त्यांनी केल्या, पण जीव मात्र मराठी चित्रपट आणि नाटकांत अडकला होता. नेहमीच्या छापाच्या गणपतीप्रमाणे निघणा-या फॉर्म्युला चित्रपटाबरोबर वेगळी वाट धरणारे चित्रपटही ते करीत होते. ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’मधील दरोडेखोर, ‘पिंजरा’मधील नाच्या, हे दोन टोकाचे रोल; तर ‘चोरीचा मामला’मधील ललिता पवारबरोबरचा हातगाडीवाला अविस्मरणीय आहे. ‘सिंहासन’मधला मूक प्रेक्षक बनलेला ‘पत्रकार’ सत्तेच्या खेळामधील जीवघेण्या चाली बघून वेडा होणारा आणि सहकाराच्या चळवळीतून ओसाड रानामध्ये द्राक्षाचे बगीचे फुलवणारा ‘सामना’मधील सरपंच भाऊंनी ज्या ताकदीने केला, ते बघून त्यांच्याच एन्ट्रीला ते घोष करतात, तसा करावासा वाटतो, ‘जगदंब, जगदंब, जगदंब...’

रंगमंचावर ‘कथा अकलेच्या कांद्यांची’, ‘येरा गबाळ्याचं काम नाही’ या नाटकांचे दौरे चालूच होते, त्यात भर पडली होती ‘सूर्यास्त’ची. पण त्याही आधी आले होते, ‘सखाराम बाईंडर’. विधवा, परित्यक्ता बायकांना डोक्यावर छप्पर आणि पोटाला अन्न देऊन आपली वासना भागवणा-या प्रेसमधील बाईंडरची ही कहाणी निळूभाऊ जगले. त्यामधील वास्तवता त्यांना पुरेपूर माहीत होती. गावोगाव कामानिमित्त, समाजकार्यानिमित्त नाटकांच्या दौ-यासाठी दिवसरात्र फिरताना त्यांना अशी सामान्य माणसे भेटली होती. सखाराम अशाच सामान्य माणसांमधील होता. चित्रपटांमध्ये ‘ह-याना-या जिंदाबाद’, ‘नाव मोठं लक्षण खोटं’, ‘भामटा भुजंग’ असे अनेक चित्रपट होत होते. यादी मोठी आहे. १९७३ ते ७५ अशी लागोपाठ तीन वर्षे त्यांना राज्यशासनाचे अभिनयाचे पारितोषिक मिळाले. १९९१मध्ये संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक आणि ‘कला गौरव’सारखे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे जमा झाले.

अर्थात, या सरकारी किंवा खाजगी पुरस्कारांसाठी कोणी काम करीत नसतो. निळूभाऊंसारख्या कलावंताने व्हिलन म्हणून जरी पडद्यावर एन्ट्री घेतली, तरी टाळ्या आणि शिट्यांच्या वर्षावात त्यांचे स्वागत होत असे. हेच त्यांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र असे. या सन्मानाला देश, प्रांत, धर्मांची कुंपणे नसतात. मी खलनायकाबद्दल लिहितो आहे, हे माझ्या एका बनारसमधल्या मित्राला समजले, तेव्हा त्याने आवर्जून ‘निळू फुलेजी के बारे में जरूर लिखना, उनके जैसा व्हिलन अक्सर देखने नही मिलता’ म्हणून आग्रह केला.
तळागाळातील माणसांसाठी कळवळा असणारा, अडल्या- नडल्याला सढळ हस्ते मदत करणारा, डॉ. राम मोहन लोहियांबद्दल प्रचंड आदर असणारा, निर्मात्याला पैशांसाठी कधीही न नडणारा, असा हा सज्जन खलनायक होता.
ये लो ‘बनारसी बाबू’ खलनायकों के कांटो मे एक ‘फूल’ खिला था।

raghuvirkul@ gmail.com