आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Marathi Film Industry By Chandrakant Shinde, Divya Marathi

बॉलीवूड कॉलिंग...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामगोपाल वर्मा जेव्हा पूर्ण बहरात होता तेव्हा त्याच्या चित्रपटांमध्ये तो मराठी कलाकार, तंत्रज्ञांना प्राधान्य द्यायचा. पार्श्वसंगीतापासून ते विविध महत्त्वपूर्ण भूमिकांसाठी तो मराठी रंगमंच आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आवर्जून घ्यायचा. त्यापूर्वी मराठी कलाकार नोकर वा नायकाच्या मित्राच्या छोट्याशा भूमिकांमध्ये दिसायचे. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले आदी कलाकार मात्र महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसायचे. मात्र मराठी कलाकारांना स्टार व्हॅल्यू नसल्याने रामगोपाल वर्मा व बरेच दिग्दर्शक त्यांना मुख्य भूमिकेत घेत नाहीत, हे मात्र वास्तव आहे. वर्मा यांनी असे बोलूनही दाखवले होते.

रामगोपाल वर्माचे हे वक्तव्य खरेच होते. मराठी कलाकारांमध्ये प्रतिभा भरलेली असतानाही त्यांना हिंदीप्रमाणे वलय नाही. चित्रपट निर्मितीसाठी गुजराती-सिंधींवर पैशासाठीचे अवलंबित्वसारख्या अनेक गोष्टींवर मात करत मराठी चित्रपट आज मात्र बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात, समीक्षकांची वाहवा मिळवण्यात, मल्टिप्लेक्सवर प्राइम टाइम शो मिळवण्यात बव्हंशी यशस्वी झाला आहे. मराठीचा चित्रपट निर्मितीपासूनचा प्रवास आता ख-या अर्थाने सुरळीत होतो आहे. थोडक्यात शो मिळत नाहीत, धंदा होत नाही, अशी रड थांबली आहे. अमिताभ बच्चन, एकता कपूर, अक्षय कुमार, गुड्डू धनोआ अशी बॉलीवूडमधील मोठी नावे मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरली आहेत. परंतु मराठी कलाकारांना हिंदीत मोठे स्थान देण्याचे काम मात्र या कलाकारांनी केलेले नाही. रामगोपाल वर्माप्रमाणे रोहित शेट्टी काही प्रमाणात मराठी कलाकारांना आपल्या चित्रपटात संधी देतो, परंतु दुस-यांकडे काम करण्याऐवजी मराठी कलाकार, तंत्रज्ञांनी आपली कला आता मराठीकडून हिंदीकडे वळवावी, असे वाटू लागले आहे. याला कारण मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद. गेल्या दोन-तीन वर्षांत मराठी चित्रपट कोट्यवधींचा गल्ला गोळा करू लागलेले आहेत. याची सुरुवात संतोष मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ने केली. या चित्रपटाने पाच कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता. त्यानंतर टाइमपास, दुनियादारीनेही कोट्यवधींचा गल्ला गोळा केला. रितेश देशमुखचा ‘लय भारी’ तर आता 50 कोटींपर्यंत मजल मारण्याचा विक्रम करणार आहे. अस्तु, फँड्री, अनुमती, रमा माधव, पोश्टर बॉयज, यलो असे अनोखे चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांची समीक्षकांनी चांगली प्रशंसा केली; तसेच यापैकी काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच यशस्वीही झाले. म्हणजे आता मराठी चित्रपटाचे आर्थिक गणितही जुळू लागले आहे. शिवाय बॉलीवूडबरोबर स्पर्धा करण्याऐवजी मैत्री वाढवून मार्केटिंगचा नवा फंडा अमलात आणला जात आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, ‘सॅटर्डे संडे’च्या प्रीमियरला आमिर खान उपस्थित राहिला तो चित्रपट चांगला होता आणि मकरंद देशपांडेबरोबर चांगले संबंध होते म्हणूनच. विशेष म्हणजे आमिरला चित्रपट आवडला म्हटल्याने अमराठी प्रेक्षकांनीही चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. याचाच अर्थ असा की, केवळ मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकांनाही मराठी चित्रपट आवडू लागलेला आहे. मराठी चित्रपट निर्मितीत उतरणार का, असे आमिर खानला एकदा विचारले असता त्याने सांगितले होते, मराठी चित्रपट निर्मिती करण्यास हरकत नाही; परंतु संपूर्ण देशभरात मराठी चित्रपट पाहिले गेले पाहिजेत, तरच कोट्यवधी रुपये खर्च करून मराठी चित्रपट बनवले जाऊ शकतील. आणि ही वेळ इतक्यात येईल असे मला वाटत नाही. पण आता मूलभूत मागण्यांच्या बाबतीत मराठी चित्रपट स्थिरावलेला असताना मराठी चित्रपटाने सक्षमपणे हिंदीकडे वळायला हवे. प्रादेशिक सीमा ओलांडायला हव्यात. अलीकडेच ‘लय भारी’ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर हैदराबाद, बंगळुरू अशा अमराठी टेरिटरीमध्ये प्रदर्शित करण्यात आला. तेथेही या चित्रपटाने उत्तम प्रतिसाद मिळवला. शिवाय रितेश देशमुखच्या सलमान खानशी असलेल्या मैत्रीमुळे ‘किक’ प्रदर्शित होत असतानाही ‘लय भारी’ला प्राइम टाइम मिळाला. अभिजित पानसे यांचा ‘रेगे’ नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाबरोबर अजय देवगणचा ‘सिंघम रिटर्न्स’ही प्रदर्शित होणार होता. ‘रेगे’वर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून अजय देवगण, रोहित शेट्टी, अभिजित पानसे यांनी एकत्र बैठक घेतली आणि एवढेच नव्हे तर एकत्र पत्रकार परिषदही घेतली. सिंघम रिटर्न्ससारखा मोठा चित्रपट असतानाही ‘रेगे’ला प्राइम टाइम त्याचमुळे मिळाला. रेगे बॉक्स ऑफिसवर चांगला यशस्वी होत असून त्याची प्रचंड प्रशंसाही होत आहे.

मराठी चित्रपट जसे प्रेक्षकांना आवडू लागलेत तसेच त्यांना देण्यात येणा-या पुरस्कारांमध्येही वाढ झालेली आहे. आणि विशेष म्हणजे मराठी चित्रपटांचे पुरस्कार सोहळे हिंदीच्या तोडीस तोड असे परदेशात आयोजित करण्यात येऊ लागले आहेत. महेश मांजरेकरने मराठीत आपले बस्तान बसवल्यानंतर हिंदीतही आपला ठसा उमटवला आणि आता पुन्हा मराठीकडे लक्ष वळवले आहे. महेश मांजरेकरनेच मराठी चित्रपटांसाठी पुरस्कार सोहळा परदेशात आयोजित करण्यास सुरुवात केली. गेली चार वर्षे लंडन, दुबई, सिंगापूर आणि मकाऊमध्ये मराठी चित्रपट पुरस्कार सोहळे आयोजित केले आणि यंदा पुन्हा लंडनमध्ये मिक्ता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महेशने सांगितले, मराठी चित्रपट, नाटक आणि कलाकारांना परदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि त्यात मला यश येत असल्याचे दिसत आहे. अनेक मराठी चित्रपटांचे प्रीमियर आता परदेशात होऊ लागले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकर, ऊर्मिला मातोंडकर, मंगेशकर भगिनींनी बॉलीवूडमध्ये आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हा ठसा पुसला गेला असल्याने आता नव्या दमाच्या तरुणांनी ही जागा भरून काढली पाहिजे...
अभिजित पानसे, निशिकांत कामत, रवी जाधव, संजय जाधव यांनी आता हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकून आपला मराठी ठसा उमटवला पाहिजे. सचिनसह या नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी दर्जेदार हिंदी चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन करून पुन्हा एकदा मराठी माणसाला बॉलीवूडच्या शिखरावर पोहोचवले पाहिजे, असे या निमित्ताने नमूद केल्यास वावगे ठरू नये.

shindeckant@gmail.com