मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्या न्यूड जाहिरातींमुळे एकेकाळी खळबळ माजली होती. न्यायालयीन वादापर्यंत हे प्रकरण गेले होते. एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टी व जाहिरातीतील मराठी कलाकारांचा असा बोल्ड अॅप्रोच त्या काळी खूपच नवीन आणि धक्कादायक होता. बीभत्सता आणि कलात्मकता यातल्या सीमारेषा निदान मराठीच्या बाबतीत ठरवायची वेळच कधी कुणावर आली नव्हती. कारण बहुसंख्य नट्या त्या वेळी पडद्यावर सोज्वळ वा अंगभर पोशाखात वावरायच्या. हिंदी चित्रपटांसारखे मराठीला त्या वेळी न्यूडिटीचे वारे लागलेले नव्हते. ‘माहेरची साडी’सारख्या चित्रपटांनी तयार केलेल्या इमेजमध्ये नट्या अडकून होत्या.
अर्थात, सप्रे आणि सोमण यांचे न्यूड्स अश्लील होते की देखणे वा कलात्मक, हा मुद्दा निराळा; पण हा वाद आठवायचे कारण, मराठी नट्यांचा हा काकूबाईचा चेहरा झटकून टाकण्याचा वरपांगी, पण तसा बरा प्रयत्न नुकताच ‘झी चॅनेल’ने केला आहे. एरवी, तोंडदेखलं म्हणायला मराठी नट्या तशा आधुनिक झाल्या होत्या. आधुनिक म्हणजे काय तर एकेकाळची सहावार साडी, फुग्यांचे कोपरापर्यंतचे ब्लाऊज, कपाळावर टिकली हा अवतार सोडून जीन्स-टॉप वा कुर्त्यापर्यंत वा अगदीच पार्टी वेअरपर्यंत या नट्या पोहोचल्या होत्या; पण मराठी नट्या आणि बिकिनी या कॉम्बिनेशनची कल्पनाच मायबाप प्रेक्षकांनी कधी केली नव्हती.
अर्थात, अगदी कृष्णधवल काळात ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात ‘यमुनाजळी खेळू खेळ’ म्हणत मीनाक्षी शिरोडकरांनी कमी व तंग कपड्यांमध्ये बिनधास्त दर्शन देऊन मराठी नट्यांच्या प्रतिमेला तडा दिला होता खरा; तेच धाडस अलीकडे सई ताम्हणकरने बिकिनीमध्ये दृश्ये देऊन केले. अर्थातच तिचे कौतुक होण्याबरोबर तिच्यावर टीकाही झाली. पण या निमित्ताने मराठीत असा बोल्ड लूक देणा-या इतरही नट्या आहेत का, याचाही सुप्त शोध त्यानंतर अनेकांनी घेतला असावा.
नवीन वर्षाच्या कॅलेंडरसाठी ‘झी’ला अशा नट्या गवसल्या. त्यात मग पूर्वा पवार, सई ताम्हणकर, तेजस्विनी लोणारी, गिरीजा जोशी, आश्लेषा येसगुडे, पूजा सावंत, श्रिया पिळगावकर, मॉडेल व गायिका शिवानी दांडेकर, नेहा पेंडसे, प्रिया बापट, ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे या एरवी सालंकृत, पारंपरिक प्रतिमांमध्ये दिसणा-या नट्यांनी प्रत्येकी एकेका महिन्यासाठी कलात्मक अर्धनग्न मादक दृश्ये दिली आहेत. मध्यंतरी, यातील तेजस्विनी लोणारीनेच सासवडच्या साहित्य संमेलनात मीनाक्षी शिरोडकरांच्या त्याच ‘यमुनाजळी...’ गाण्यावर तशाच वेशभूषेत नृत्य सादर करून मराठी तडका उपस्थितांना दिला होता. मराठी अभिनेत्री आता बदलताहेत, हे या कॅलेंडरवरून खरं मानायचं तर ‘झी’नं या कॅलेंडरची फारशी प्रसिद्धीही केलेली दिसत नाही. हा बदल आपल्यापुरताच ‘झी’ला करायचा आहे की काय, असे महिना उलटूनही हे कॅलेंडर फारसे प्रकाशात न आल्याने वाटायला लागले, तर त्यात नवल नाही. पण मराठीत बिपाशा, कॅटरिना, करिनासारखे हॉट सीन्स देणा-या नट्या आहेत, हे मात्र या कॅलेंडरद्वारे अधोरेखित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे. म्हणजे, मृण्मयी देशपांडे कंचुकीविना हातात सतार घेऊन वाजवताना दिसते, तर पूर्वा पवारची उघडी पाठ बघायला मिळते. पूर्ण कॅलेंडरला दिलेला मादक व पारंपरिक आभूषणांचा लूक मराठी नट्यांची अशी बोल्ड इमेज समोर आणतो खरा; पण त्यात बीभत्सता दिसत नाही, हे खरे. तरीदेखील एकट्या सईच्या बिकिनी शॉट्सचा अपवाद वगळल्यास, इतर नट्यांचे पारंपरिक चेह-यांचे हे कॅलेंडर पाहतानाही विस्मरण होत नाही, हेही नाकारता येत नाही.
चित्रपटात नट्यांचा असा लूक दिसण्यासाठी चित्रपटाचाच, एकंदर कथानकाचा व सादरीकरणाचा लूक मराठी दिग्दर्शकांना बदलावा लागणार, हे मात्र खरे. हिंदीमध्ये ‘रामलीला’सारख्या चित्रपटातून भन्साळींनी एरवी नट्यांचे दाखवले जाणारे अंगप्रदर्शन न दाखवता रणवीर सिंहचे अंगप्रदर्शन दाखवले. आपल्याकडे मराठी नट्यांपर्यंत हा प्रवास आताशा येऊन ठेपलाय. नट्यांची सेन्शुअॅलिटी प्रोजेक्ट होण्याची ही सुरुवात आहे. नटांचा प्रश्न अजून दूरच आहे.
dahalepriyanka28@gmail.com