आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Marathi Literature World By Sukrut Karandikar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कशाला उद्याची बात ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मराठी भाषा मुमूर्षु आहे’ हे कठोर उद्गार इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९२६मध्ये काढले. मुमूर्षु म्हणजे मरणाची इच्छा धरणारी किंवा मरणाच्या वाटेवर असणारी. राजवाडे यांच्या विधानाला पंच्याऐंशी वर्षे होऊन गेली. त्यांचं विधान अगदीच खरं ठरलं नसलं, तरी त्यातला धोका सातत्यानं जाणवत आलाय. भारतावर इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरू झाल्यापासून मराठीच्या अस्तित्वाबद्दलची भाकितं वर्तवली जाताहेत. मराठी जगणार की मरणार, याची चिंता महाराष्ट्र तब्बल दीडशे वर्षांपासून वाहतोय.
इंग्रजीचा प्रभाव पडण्यापूर्वीची काही शतकं ‘फारसी’च्या आक्रमणाची चिंता करण्यात गेली. बहामनी काळापासून म्हणजे चौदाव्या शतकापासून फारसी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची भाषा बनली होती. गमतीचा भाग असा की, कधीकाळची परकी फारसी मराठीशी इतकी एकरूप झाली की, फारसी शब्द जणू प्राचीन मराठी असल्याप्रमाणं मराठी लोकांच्या जिभेवर आता रुळले आहेत. गुलाम, इमारत, जागा, गरीब, गुलाब, हवा, जिल्हा, तालुका, पैसा, जमीनदार असे शेकडो मूळ फारसी शब्द मायमराठीने आपलेसे केले. याच पद्धतीनं कॉम्प्युटर, इंटरनेट, टॅब, मोबाइल, टीव्ही, चेक, जॉब, कार, क्रेडिट कार्ड असे शेकडो इंग्रजी शब्दही आणखी शंभर वर्षांनंतरच्या मराठी पिढीने ‘मराठी’च मानले तर नवल वाटू नये.
मराठी मुमूर्षु आहे की नाही, हे काळ ठरवेल; पण ती प्रवाही नक्की आहे. नव्या संकल्पना, नवी जीवनशैली भाषा घडवते. पहिला आघात अर्थातच बोलीभाषेवर आणि कालांतराने लिखित भाषेवर होतो. नेमक्या याच परिणामाची काळजी मराठी प्रकाशन विश्वाला जाणवते आहे. इंग्रजी शाळांचं तालुकास्तरापर्यंत फुटलेलं पेव आणि मराठी शाळांची वेगानं घसरणारी संख्या या काळजीच्या बुडाला आहे. अर्थव्यवहाराची भाषा इंग्रजी आणि दैनंदिन व्यवहारात हिंदी-इंग्रजी वरचढ ठरल्यानं मराठी संपणार की काय, ही सनातन चिंता उसळी घेऊ लागली आहे. मराठी वाचण्याची आवड असणारा नवा वाचकवर्ग तयार होत नाही. मराठी वाचकांच्या नव्या पिढ्या शाळा-महाविद्यालयांमधून घडणारच नसतील, तर मराठी पुस्तकं, नियतकालिकं, माध्यमं यांचं भवितव्य अंधारात जाणार, ही शंका घ्यायला पुरेपूर जागा आहे. मराठी बोलणारी, वाचणारी, उमजणारी मंडळी कमी झाल्यावर दहा-अकरा कोटी लोकांपुरतं मर्यादित असणारं मराठी प्रकाशन विश्व बुडायला कितीसा वेळ लागणार, अशी सार्थ भीती प्रकाशकांच्या मनात दाटते आहे.
मराठी साहित्य संमेलन पाकिस्तानी सीमेवरच्या घुमान या पंजाबी गावात होणार म्हटल्यानंतर मराठी प्रकाशकांकडून विरोधी सूर उमटला. दूर घुमानला मराठी पुस्तकं विकत घ्यायला कोण येणार, ही शंका मुख्यत्वेकरून यामागे आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून मराठी पुस्तकांची विक्री घटली आहे. या मंदीचे सावट या विरोधामागे आहे. या पडत्या काळात साहित्य संमेलनाकडे सावरण्याची संधी म्हणून प्रकाशक पाहतात. पण साहित्य संमेलनाची पर्वणी वांझ ठरण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर मराठी प्रकाशन विश्व किती कोटी रुपयांना बुडणार, याचे हिशेब मांडले जात आहेत. मराठीचा सर्वोच्च उत्सव मानल्या जाणा-या साहित्य संमेलनात मराठी ग्रंथव्यवहार होणारच नसेल तर ग्रंथविश्वाचे पर्यायाने मराठी भाषेची किती हानी होईल, ही चर्चा या निमित्ताने ऐरणीवर आलीय.
मराठी ग्रंथव्यवहार
इ. स. १८२२ मध्ये ‘पंचोपाख्यान’ हे मराठी पुस्तक खिळा-मुद्रित झाले. त्यानंतर १८२६मध्ये शिळा मुद्रण सुरू झाले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचा जन्म याच शिळा मुद्रणावर झाला. मराठी ग्रंथव्यवहाराचं आयुष्य आणखी आठ वर्षांनी दोनशे वर्षांचं झालेलं असेल. गेल्या १९२ वर्षांत किती मराठी ग्रंथ-पुस्तकं छापली गेली, हा तपशील मिळवणं हे कठीण काम आहे. शंकर गणेश दाते या अभ्यासकानं ‘ग्रंथ सूची’चं शिवधनुष्य पेललं. मराठीच्या प्रेमापोटी असं नि:स्वार्थी काम अलीकडच्या काळात कोणी केलेलं नाही. इंग्रजांनी एक चांगली पद्धत पाडली होती.
भारतात प्रसिद्ध होणारं प्रत्येक पुस्तक मुंबई, चेन्नई, कोलकाता, नागपूर आदी सहा ठिकाणच्या शासकीय ग्रंथालयांना पाठवले पाहिजे, हा नियमच ब्रिटिश राजवटीत होता. ही पद्धत आजही सुरू आहे. मात्र, याचं काटेकोर पालन तेवढं होत नसल्यानं दरवर्षी मराठीत किती पुस्तकं प्रकाशित होतात, हे समजण्यास मार्ग नाही. पुस्तकांची संख्या जशी कळत नाही तसंच आवृत्त्या आणि एका आवृत्तीतल्या प्रतींची संख्या हेही मोठं गौडबंगाल आहे.
आवृत्त्या आणि प्रतींच्या संख्येचा मुद्दा थेट पैशांशी निगडित असतो. तरी प्रकाशक सांगेल त्या माहितीवर विसंबून राहण्याखेरीज लेखकरावांसमोर पर्याय नसतो. यावर उत्तर म्हणून काही खटपटे लेखक स्वतःच प्रकाशक होतात. पण ही संख्या फार थोडकी. मराठी पुस्तके काढणा-या प्रकाशकांची संख्या दीडशेहून अधिक आहे. सातत्य राखणा-या प्रकाशन संस्थांची संख्या मात्र पन्नासपेक्षा अधिक नाही.
अभिरुची की व्यावसायिकता
पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची परंपरा इतर भाषकांच्या तुलनेत मराठीजनांमध्ये अधिक आहे. तरीही वाचकसंख्या घटत असल्याचं अनेक प्रकाशकांना का वाटतं? मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि ‘पद्मगंधा प्रकाशन’चे अरुण जाखडे वाचकांची अभिरुची बदलत चालल्याचं निरीक्षण नोंदवतात. ते म्हणतात, ‘साहित्यिक मूल्य असलेल्या पुस्तकांपुढचे आव्हान वाढले आहे. कारण, साहित्य ही आता लोकांची गरज राहिलेली नाही. जगण्याला आलेला जीवघेणा वेग, टोकाची स्पर्धा आणि वेळेची कमतरता या सर्वांमध्ये सांस्कृतिक, वाङ‌्मयीन प्रेरणांना धक्का बसतोय. ज्ञानार्जनापेक्षाही चरितार्थाला उपयुक्त, करिअरच्या दृष्टीने फायदेशीर वाचनाकडे कल वाढतोय. शहरीकरणामुळं प्रांतोप्रांतीचे मराठीचे वैभव लोप पावत चालले आहे. शब्दकळा, म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर होत नाही. माणसांचं वागणं-बोलणं साचेबद्ध झालंय. ३०-४० वर्षांपूर्वीच्या पुस्तकातले संदर्भ, भाषा नव्या पिढीला उमजेलच असं नाही. जगण्यातला एकसुरीपणा आणि अनुभवांमधलं साम्य मराठी लेखकांमध्ये आणि त्यांच्या लेखनात उतरते आहे. अमुक एक लेखक वेगळं काहीतरी देईल, याची खात्री वाचकाला वाटत नसल्याचा परिणाम पुस्तकांच्या खपावर होतो आहे. मराठी लेखकांमधल्या या त्रुटींमुळेच अनुवादित पुस्तकांचे दालन समृद्ध होत चालले आहे. विशेषतः चरित्र, गुन्हेगारी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी नात्यांवर आधारित अनुवादित पुस्तकांना चांगली मागणी आहे.’
मराठीत सर्वाधिक वेगाने पुस्तके प्रकाशित करणा-या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या सुनील मेहता यांचे मत वेगळे आहे. दर्जेदार, वैविध्यपूर्ण पुस्तकांची मराठी वाचक वाट पाहतो. त्यांची अभिरुची बदलली असली तरी वाचकांपर्यंत पोहोचण्यात लेखक-प्रकाशक कमी पडतात, हे मान्य करायला हवे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुका स्तरावर चांगले पुस्तकविक्रेते नाहीत, असे मेहता यांना वाटते. ते म्हणतात की, लहान मुलांना मराठी वाचनाची गोडी लावण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी चित्ररूप पुस्तकांवर भर द्यायला हवा. इंग्रजीतल्या ‘हॅरी पॉटर’सारखी पुस्तके मराठीत आली, तरच लहानपणापासून मराठी वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण होईल.
ग्रामीण भागातल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया, ई-बुक्सचा वापर अधिक व्हायला हवा, यावरही मेहता भर देतात. ‘कागदांच्या वाढत्या किमती पाहता ई-बुक्सनाच भवितव्य असेल. अशा वेळी ईमेल, पत्र यांद्वारे वाचकाशी वैयक्तिक संपर्क महत्त्वाचा ठरतो. माझ्याकडे अडीच लाख वाचकांचे पत्ते आहेत’, असा अनुभव मेहता यांनी सांगितला.
दिवस चांगलेच आहेत
एलबीटीसारखे कर, ग्रंथालयांना मिळणारी शासकीय अनुदाने रखडणे, राजभाषा असलेल्या मराठीच्या प्रसारासाठी ठोस कार्यक्रम नसणे, यांसारख्या सरकारी अडचणींचा अडसर मराठी प्रकाशकांसमोर आहे. परंतु, ई-बुक्सच्या माध्यमातून पुस्तकांच्या किमती आटोक्यात ठेवणे शक्य आहे. शाळा-महाविद्यालये, पुस्तकालये, ग्रंथालये येथे वाचक-लेखक भेटीचे कार्यक्रम, तसेच मोबाइल, टॅब, सोशल मीडिया आदींचा वापर करून जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचणे शक्य आहे. परंतु, या मराठी वाचकांना आकृष्ट करण्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी नव्या दमाच्या लेखकांनी समोर यायला हवे. मराठी ‘बेस्ट सेलर्स’ पुस्तकांच्या लेखकांची यादी आजही वीस-तीस वर्षांपूर्वींचीच आहे. अच्युत गोडबोले यांच्यासारखे एखाद-दुसरेच नाव या यादीत नव्याने समाविष्ट होताना दिसते. बागकाम, पाळीव प्राणी, चित्रकला, कला, छायाचित्रण, आर्किटेक्ट यांसारख्या शेकडो नव्या विषयांवरची पुस्तके मराठी वाचकांना हवी आहेत. मराठीत जेमतेम शंभर विषयांवरची पुस्तके निघतात. इंग्रजीत प्रसिद्ध होणा-या पुस्तकांत विषयवैविध्य पाचशेपेक्षा जास्त आहे. तेच स्मरणरंजन, तोच ग्रामीण परीघ, तोच सूर्य-चंद्र-तारे आणि टीचभर अनुभवविश्वावर मारल्या जाणा-या शिळ्या गप्पांना नव्या मराठी वाचकाने तरी किती प्रतिसाद द्यावा? अर्थकारण, उद्योग, क्रीडा, कॉर्पोरेट विश्व, कॉम्प्युटर युग, बँकिंग, परराष्ट्र धोरण आदी मराठी मानसिकतेच्या चाकोरीबाहेरच्या क्षेत्रात मराठी माणूस गती घेतोय. मराठी लेखक-प्रकाशकांचा प्रवास या गतीला धरून झाला, तर ग्रंथव्यवहाराचे पाऊल अडणार नाही.
sukrut.k@gmail.com