आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Marathi Play By Prof.Dr.Prakash Khandge

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाट्यदर्पण: हुरहुर लावणारी 'लगीनघाई'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘लग्न’ या सामाजिक संस्थेवर बेतलेल्या अनेक नाटकांनी कौटुंबिक जिव्हाळ्याची लव्हाळी आजच्या जागतिकीकरणाच्या काळातही टिकवून ठेवली आहेत. कौटुंबिक मालिकांचा प्रेक्षकवर्ग सध्या फ्लॅट स्क्रिनसमोर आपले डोळे खिळवून बसलेला असताना कौटुंबिक जिव्हाळ्याच्या शिळ्या कढीला ऊत आणावेसे नाट्यनिर्मात्यांना वाटले तर गैर काय आहे?

आता लग्नसंस्था आणि नाटक यांचा मागोवा घेतल्यास असं लक्षात येतं की, लग्न आणि नाटकाचा धागा थेट गो. ब. देवल यांच्या जरठ-बाला विवाह या प्रश्नावर बेतलेल्या ‘शारदा’ नाटकाशी जुळतो. द्विभार्या प्रतिबंधक कायद्यावर प्रकाश टाकणारे ‘जुगार’ हे नाटक असो, अथवा प्र. के. अत्रे यांचे ‘लग्नाची बेडी’ असो; लग्नाच्या सात फे-यांचा आणि नाटकाच्या अनेक फे-यांचा असा हृद्य संबंध आहे. ‘तारू लागले किनारी’, ‘अशी बायको हवी’, ‘कन्यादान’, ‘आमदार सौभाग्यवती’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘माझा कुणा म्हणू मी’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘कुर्यात सदा मंगलम्’ अशी लग्नाभोवती रुंजी घालणा-या नाटकांची नावे तरी किती घ्यावी? अगदी अलीकडच्या नव्याको-या नाटकाचा म्हणजेच शिवदर्शन साबळे यांच्या ‘मी आणि ती’ नाटकाचा उल्लेख करता येईल.

नाटकांसारखीच लग्नावर बेतलेली वगनाट्ये अथवा लोकनाट्येही रंगभूमीवर आलेली आहेत. यातून देवही सुटले नाहीत. १९७९मध्ये इंडियन नॅशनल थिएटर या संस्थेचं ‘खंडोबाचं लगीन’ हे नाटक रंगभूमीवर आलं. त्याची संकल्पना ज्येष्ठ नाटककार अशोकजी परांजपे यांची होती, तर संशोधन अस्मादिकांचं होतं. या नाटकाचे नाटककार सुरेश चिखले होते. यात खंडोबा-बाणाई-म्हाळसा असा प्रेमत्रिकोण होता आणि खंडोबा-बाणाईच्या लग्नाची कथा सादर झाली होती. रोहिणी हट्टंगडी, विठ्ठल उमप, शिवाजी साटम, विजय कदम अशा मंडळींनी त्यात काम केले होते. त्या आधीही ‘गाढवाचं लग्न’ अर्थात चित्रसेन गंधर्वाची कथा हे वगनाट्य रंगभूमीवर गाजलं होतं. या गाढवाच्या लग्नाचे हजारावर प्रयोग झाले. दादू इंदुरीकरांनी त्यात सावळ्या कुंभाराची भूमिका केली होती. ती अजरामर ठरली. ‘गाढवाचं लग्न’ हा वग हरी वडगावकर यांनी लिहिला होता. त्यानंतर काळू-बाळूंच्या ‘जहरी प्याला’ या राजवाडी वगातही प्रधान, राणी आणि राजा असा प्रेम-त्रिकोण होता. सांगायचं तात्पर्य, लग्नाच्या प्रसंगातून पौराणिक वगनाट्यंदेखील सुटली नव्हती.

या लग्नप्रपंचाचे कारण म्हणजे, ‘सुयोग’ या नामांकित संस्थेचे अद्वैत दादरकर लिखित आणि दिग्दर्शित ‘लगीनघाई’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे. डोक्याला ताप न देणा-या आणि कॉमेडीचे माप ओलांडणा-या या नाटकात बापाच्या भूमिकेतील अशोक सराफ या विधुर बापाची प्रेयसी म्हणजे माप ओलांडण्यास उतावीळ झालेली आदिती देशपांडे, या विधुर बापाचा ‘ल्योक’ ओंकार राऊत अन् त्याची प्रेयसी नियती घाटे, असा हा ‘टू प्लस टू’ प्रेमाचा चौकोन आहे.
‘आधी लगीन बापाचं की लेकाचं’, प्रेयसींची तोफांची सलामी झाली तरी बाप-लेकात ‘सी-सॉ’चा खेळ, ‘पहले आप, पहले आप’चा खेळ सुरू असतो. शेवटी लेकानं बापाच्या मनचं हेरलं अन् दोघेही संयुक्तरीत्या बोहल्यावर उभे राहायला तयार झाले. मंडळी! तशी ही अगदी सरधोपट कथा; पण त्यात रंग भरला तो अशोक सराफ यांनी. त्यांनी प्रेक्षकांना ‘मामा’ न बनविता, त्यांच्या पदरात मनोरंजनाचे पुरेपूर माप टाकले. अशोक सराफ यांचं वय लपतं तरी त्या वयातली ती गंमत आहे.

अद्वैत दादरकर मुळात मुंबई विद्यापीठाच्या ‘अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट’च्या मुशीत तयार झाले आहेत. त्यांचे एकेकाळचे गुरू प्रा. वामन केंद्रे यांनीही ‘सुयोग’साठी नाटक दिग्दर्शित केले होते. कौटुंबिक हलक्या-फुलक्या कॉमेडीचा मार्ग ‘सुयोग’चे प्रमुख गोपाळ अलगेरी आणि अद्वैत दादरकर यांनी स्वीकारला, त्याचे कारण मध्यमवर्गावर सध्या कौटुंबिक दूरचित्रवाणी मालिकांचा विलक्षण प्रभाव आहे. एखाद्या खंडोबा मालिकेचा अपवाद वगळला, तर सध्या सर्वच कौटुंबिक जिव्हाळ्याचं सुरू आहे.

कॉमेडी म्हटलं की, एकेकाळी बबन प्रभू, आत्माराम भेंडे या जोडीच्या वेगवेगळ्या कौटुंबिक फार्सची आठवण होते. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’सारखी नाटके कोण विसरेल. ‘लगीनघाई’ नाटकात अशोक सराफ यांनी आपल्या चतुरस्र अभिनयाची चुणूक दाखविली आहे. अशोक सराफ यांनी ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकात चाकोरीबाहेरची भूमिका केली होती. आजचा अशोक सराफ यांचा रंगभूमीवरचा वावर लाजवाब आहे.

मराठी चित्रपटातील वलयांकित व्यक्तिमत्त्व असतानादेखील सातत्याने रंगभूमीवर वेगवेगळ्या भूमिकांद्वारे आपली बांधिलकी व्यक्त करण्याची मोठी परंपरा मराठीत आहे. ही परंपरा डॉ. लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रमेश देव अशा अनेक नटांपर्यंत जाऊन भिडते. अशोक सराफ याच परंपरेतील आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील चित्रपटांच्या व्यग्रतेत आपले रंगभूमीवरील अस्तित्व टिकवूून ठेवले होते. ‘टूरटूर’, ‘शांतेचं कार्ट’ अशा नाटकांची उदाहरणं देता येईल. अशोक सराफ, सचिन, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे अशा नटांच्या चित्रपटांना ‘बालपट’ असे संबोधून काही मंडळींनी हिणवले असले तरी या नटांच्या चतुरस्र अभिनयाने मराठी चित्रपटाचे एक युग तयार केले होते. असो.

अशोक सराफ ‘लगीनघाई’त धमाल उडवून देतात. विधुर पित्याच्या ‘जीवनसाथी’साठी सुरू असलेल्या धडपडीचे वर्णन ‘माप ओलांडणारी नावीन्यपूर्ण कॉमेडी’ असे केलेले असले, तरी या कॉमेडीत सहजीवनाचा हळवा कोपरा आहे. भिडस्त, बुज-या स्वभावाचा एखादा नोकरदार मध्यमवर्गीय गृहस्थ बालपणापासून हा भिडस्तपणा एखाद्या दागिन्यासारखा वागवतो अन् नंतर अगदी आपल्या व्यक्तिगत जीवनात सहजीवनाला मुकण्याचा कडेलोट प्रसंग येईपर्यंतही मन मारतो. जणू ‘माझ्या मना बन दगड’ म्हणतो. ‘लगीनघाई’ केवळ नावीन्यपूर्ण कॉमेडी आहे, असे नव्हे; तर या कॉमेडीला एक चुकल्या, हुकल्या क्षणांची हुरहुर आहे.

‘लगीनघाई’ या नाटकाची निर्मितीच मुळात हलक्याफुलक्या विषयाचे नाटक, अशी झालेली असल्याने नाटकाला विषयाची मर्यादा आहे. रंगभूमीवरील सर्वच नाटके सदासर्वकाळ गंभीर, समस्याप्रधान असतीलच असे नाही. अशा नाटकांचा स्वतंत्र असा प्रेक्षकवर्ग असतो, आणि सिरियलजीवी प्रेक्षकांचाही एक स्वतंत्र वर्ग असतो. लगीनघाई तसे सिरियलजीवी प्रेक्षकांचे नाटक आहे, असेच म्हणावे लागेल. ज्या नाटकांचा मगदूर सिरियलसारखा हलकाफुलका ती नाटके सिरियलजीवी. नाटकातील पात्रांचा अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या सर्व गोष्टी अगदी नीटनेटक्या आहेत. एकूणच लगीनघाई हे डोळ्यांना व कानांना तृप्त करणारे नाटक आहे.
prakash.khandge@gmail.com