आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Marathi Playwriting By Bharat Sasane, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'नाटककारा'च्या शोधात आपण सगळे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखक पात्रांना निर्माण करतो आणि कधी कधी पात्रे जिवंत होतात. कधी कधी अमर होतात (पर्यायाने लेखकालादेखील अमर करतात!) पात्रांचे स्वतःचे भागधेय असते. स्वतःचे प्राक्तन असते. त्यामुळे लेखक पात्रांना ‘घडवतो’, असं म्हणणं तितकंसं योग्य नसतं. पात्रे आपल्या स्वतःच्या नशिबाने, स्वतःच्या स्वभावाने वागतात-वागत राहतात. पात्रे स्वायत्त होऊन, पुस्तकातून बाहेर येऊन स्व-तंत्रपणे जगण्याची मागणी करीत आहेत, ही कल्पना आपल्याला नाटकातून भेटते. सन १९२१ मध्ये इटलीच्या ‘लुईगी पिरान्देलो’ने ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ हे नाटक लिहिलं. या नाटकाची सुरुवात मोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाटकाची तालीम चालू आहे. दिग्दर्शक, काही नट, नेपथ्यकार इत्यादी मंडळी चर्चा करीत आहेत. डोअरकीपर सहा व्यक्तींना आत घेऊन येतो. बाप, आई, सावत्र मुलगी, मुलगा, १४ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांची लहान मुलगी अशी ही सहा पात्रे आहेत. ही पात्रे नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी अचानक येतात आणि दिग्दर्शकाशी बोलायला लागतात. दिग्दर्शक अर्थातच, व्यत्यय आल्यामुळे चिडतो. त्यानंतरचा संवाद -
बाप : (पुढे येऊन) आम्ही इथे एका लेखकाच्या शोधात आहोत!
दिग्दर्शक : लेखक? कसला लेखक?
बाप : कोणीही लेखक असला तरी चालेल-साहेब!
दिग्दर्शक : पण इथं कोणी लेखक-बिखक नाहीये! इथं आम्ही काही नवं सादर करीत नाही!
सावत्र मुलगी : (पुढे येऊन) हे तर आणखीन छान झालं! आमच्यामार्फत आम्हीच इथे काहीतरी नवं सादर करू! म्हणजे... मला असं म्हणायचं, की जे काही नवं सादर होईल ते सादरीकरण आम्हीच असू!
जे काही नवं सादर होईल ते सादरीकरणच आम्ही असू, असं विधान करणारी पात्रे नाटककाराच्या शोधात फिरत आहेत. त्यांची कैफियत ऐकण्यापूर्वी आणखी एक संवाद पाहिलेला बरा.
दिग्दर्शक : (आश्चर्य वाटल्याचा अभिनय करीत) अच्छा... अच्छा! म्हणजे तुम्ही आणि तुमच्यासोबत आलेली ही मंडळी मुळातून नाटकातील पात्रेच असल्याप्रमाणे जन्मली आहेत तर?
बाप : अगदी बरोबर! आम्ही नाटकातली पात्रे आहोत... अगदी ओरिजिनल... इथे आमच्यातून जास्त जिवंतपणा ओसंडून वाहतोय... आम्हाला पाहा तुम्ही! (दिग्दर्शक व अन्य नट हसतात. बाप दुःखी होतो.) खेदाची गोष्ट आहे... तुम्ही हसता आहात! आमच्या आत एक ड्रामा-एक नाटक लपलेलं आहे आणि तुम्ही हसता आहात!
दिग्दर्शक : (रागावून) बस करा बडबड! निघून जा इथून! अरे, यांना कुणीतरी बाहेरचा रस्ता दाखवा!
बाप : नाही... नाही! जरा ऐका तरी!
दिग्दर्शक : (ओरडून) आम्ही इथं काम करायला आलोय! समजलं?
बाप : (दृढ निश्चयाने पुढे सरकून) तुम्ही विश्वास का ठेवत नाही? लेखकाने निर्माण केलेली पात्रे आपल्या आतल्या आत जिवंत होताना तुम्ही कधी पाहिली नाहीत? आम्ही सगळी पात्रे आहोत, नाटकातली आणि आम्ही पुस्तकात नाही आहोत! ...म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही?
सावत्र मुलगी : (खोडसाळ हसते, पुढे सरकते. दिग्दर्शकाला उद्देशून) तुम्ही विश्वास ठेवा! आम्ही सगळे खूप इंटरेस्टिंग अशी पात्रे आहोत! फक्त आम्ही जरा भरकटलो आहोत इतकंच!
बाप : हो... आम्ही भरकटलो आहोत! कदाचित असं समजा, की ज्या लेखकाने आम्हाला जन्माला घातलं, तो आमचा कलात्मक वापर करू शकला नाही... कदाचित त्याचं तेवढं सामर्थ्यच नसणार! आणि विश्वास ठेवा, हा दखलपात्र आणि माफ न करता येण्यासारखा गुन्हा आहे! पात्र एकदा जिवंत झालं की,जगाच्या अंतापर्यंत ते पात्र जिवंतच राहतं! ते पात्र मृत्यूची चेष्टा करू शकतं, इतकं सामर्थ्यशाली असतं! अमर असतं! मृत्यू त्या पात्राला काहीच इजा पोहोचवू शकत नाही! मात्र या पात्राला जन्म घालणारा तो लेखक मात्र संपून गेलेला असतो! लेखक मरून जातो-पात्र नाही! पात्र तर जिवंत असतं... जिवंत राहतं! कोणत्याही चमत्काराचा आधार न घेता! शतकांपासून कितीतरी पात्रं आज जिवंत आहेत! लेखकाने-ज्याने आम्हाला जन्माला घातलं तो आमचा यथायोग्य कलात्मक वापर करू शकला नाही, ही ती कैफियत आहे. म्हणजे, पात्रे जिवंत तर झाली, त्यांच्यात रसरशीत जिवंतपणा तर निर्माण झाला, पण पात्रांना भरकटण्यासाठी सोडण्यात आलं. अशा भरकटलेल्या पात्रांची वेदना समजून घेता येते. लेखक मरतोच. पण पात्रं जिवंत असतात. ती अखेरपर्यंत जिवंत राहतात, हे या नाटकात सांगितलं गेलंय. म्हणून त्यावर आता वेगळं भाष्य नकोच. पण पात्रे मूळ निर्मात्याला जुमानत नाहीत, स्वतंत्रपणे वागतात, अनिर्बंध होतात, अशी फॅन्टसी नंतरच्या काळात आलेली आहे. १९व्या शतकाच्या सुरुवातीलाच पात्रे निर्मात्याच्या शोधात बाहेर पडतात, ही विलक्षण कल्पना या लेखकाला सुचली, हे विशेष. वाचता वाचता आणि वाचण्याच्या विशिष्ट वयात, कदाचित त्यानंतरसुद्धा; असं जाणवलेलं असतं की, आयुष्य रंगभूमी आहे आणि ईश्वर हा नाटककार असतो. त्याने नेमलेली पात्ररचना आपल्याभोवती असते. आपण आपल्या वाट्याला आलेली भूमिका वठवायची असते. कदाचित म्हणून, आपल्यालाही आपल्या निर्मात्याचा-ईश्वराचा शोध घ्यायचा असतो. आपणही आपल्या ‘निर्मात्या’च्या शोधातच असतो. आपल्यालाही तक्रारी करायच्या असतात. कैफियत मांडायची असते. आपला, आपल्या क्षमतेप्रमाणे योग्य तो ‘कलात्मक वापर’ जीवनरूपी नाटकात करून घेतला गेला नाही, अशी आपली तक्रार असते. आपणही ‘आद्य नाटककारा’च्या शोधात असतोच. या शोधातून आपली अंतर्यात्रा सुरू होते. वाचता वाचता आपण आपला शोध घेतो. स्वतःला आणि जगाला शोधतो. आपल्या बरोबरीने अगणित काळापासून अनेक लेखकसुद्धा अशाच प्रवासाला बाहेर पडलेले असतात. त्यांची असंख्य पात्रेसुद्धा आपले सोबती बनून आपल्या अंतर्यात्रेत, आपल्या प्रवासात आपले सोबती म्हणून सामील झालेले असतात. वाचनही म्हणून एक अंतर्यात्रा, एक शोधयात्रा असतेच, आणि ही यात्रा आपल्याला थांबवायची नसते. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अपरिहार्यपणे विविध ग्रंथ आणि विविध पात्रे जसजशी आपल्याला सापडत जातात, तसतसा आपल्याला आपलाच शोध लागत जातो. ग्रंथांची मैत्री इतकं काही आपल्याला सांगू पाहत असते. त्याचं सांगणं आपण ऐकायचं की नाही, हे आपण ठरवायचं असतं.

bjsasane@yahoo.co.in

(पुढील आठवड्यापासून अशोक पवार यांची लेखमाला)