आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Marathi Poetess Indira Sant By Aruna Dhere, Divya Marathi

जीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा संत हे नाव मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रथम आले ते सत्तर-बहात्तर वर्षांपूर्वी. 1940 मध्ये ‘सहवास’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. मात्र, हा त्यांचा स्वतंत्र संग्रह नव्हता. कवी
ना. मा. संत आणि कवयित्री इंदिरा संत या पती-पत्नींचा मिळून तो सिद्ध झाला होता. 1935मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले आणि मधल्या पाच वर्षांच्या परस्पर सहवासाच्या सगळ्या आनंदखुणा वागवीत ‘सहवास’ आला.
मात्र, इंदिराबाईंची निजखूण उमटली ती ‘सहवास’मध्ये नव्हे. ती उमटली ‘शेला’ या त्यांच्या पहिल्या स्वतंत्र काव्यसंग्रहात. 1951 मध्ये ‘शेला’ प्रसिद्ध झाला आणि इंदिरा या नावाची वीजरेघ जाणत्या रसिकांच्या मनात लखलखून उमटली. तिची तीक्ष्ण चमक मर्मज्ञ समीक्षकांनाही दृष्टीआड करता आली नाही.
‘शेला’नंतर त्यांचे आणखी आठ संग्रह आले. ‘मेंदी’ हा दुसरा संग्रह ‘शेला’ पाठोपाठ चारच वर्षांनी, 1955मध्ये प्रसिद्ध झाला आणि ‘मृगजळ’ तर अवघ्या दोनच वर्षांच्या अंतराने 1957मध्ये प्रसिद्ध झाला. पुढच्या संग्रहांची प्रकाशनाची गती थोडी संथ झाली. रंगबावरी(1964), बाहुल्या(1972), गर्भरेशीम (1982), चित्कळा(1989), वंशकुसुम (1994), निराकार (2000) असे संग्रह सहा-सात वर्षांच्या अंतराने पुढे प्रसिद्ध होत राहिले.
साठ वर्षांचा एकूण कालखंड आणि दहा कवितासंग्रह. शिवाय अगदी लहान असे तीन कथासंग्रह, लहान मुलांसाठी तीन कवितासंग्रह, ललित गद्याचे दोन संग्रह आणि तीन संपादने असे इतरही लेखन झाले. पंचाऐंशी वर्षांच्या दीर्घ आयुष्यात (1914-2000) सत्तर वर्षे त्या लिहीत राहिल्या.
वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी म्हणजे 1930-31 मध्ये इंदिराबाईंच्या कवितालेखनाची सुरुवात झाली. तेव्हापासून ‘शेला’ हा त्यांचा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह प्रसिद्ध होईपर्यंतचा काळ हा मराठी कवितेतले जुने नामवंत अस्तंगत होण्याचा आणि नवे कवी उदयाला येण्याचा मोठा गजबजता काळ होता.
इंदिराबाईंच्या कवितेतले नवेपण ‘शेला’मध्ये जे प्रथम प्रकटले त्याचे स्वरूप समजून घेण्याआधी या गजबजत्या सर्जक काळाच्या पार्श्वभूमीवर ‘सहवास’चा विचार करणे अगत्याचे आहे. कारण इंदिराबाईंच्या विशिष्ट गुणभारित कवितेच्या प्रातिभ क्षमतांची अर्धस्फुट पण निश्चित चाहूल ‘सहवास’मध्ये लागते आहे. ‘सहवास’ हा रविकिरण-मंडळाच्या छायेतला संग्रह आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यशवंत आणि माधव जुलियन हे इंदिराबाईंचे आवडते कवी होते आणि ‘सहवास’ला प्रस्तावना आहे तीही यशवंतांचीच आहे.
विसाव्या शतकाचा प्रारंभकाळ हा शिकू लागलेल्या स्त्रियांच्या जीवनात चहूबाजूंनी मोकळेपणाचे वारे शिरण्याचा काळ होता. या वा-याने काही लिहित्या स्त्रियांच्या जाणिवांचे पदर उलगडले. स्वत:च्या प्रतिमेकडे, कुटुंबाकडे, नातेसंबंधांकडे पारंपरिकापेक्षा स्वतंत्र दृष्टीने पाहण्याचे भान त्यांना आले. त्यामुळे नव्या वळणाची आणि नवा आशय असणारी कविता त्यांच्याकडून लिहिली गेली. अनुभवले, पाहिले-साहिले, ते मनातळाशी तसेच आहे. वडिलांच्या वियोगाचे दु:ख आहे, तापट काकांनी दिलेल्या मनस्तापाचा क्षोभ आहे. वेळोवेळी कुस्करल्या गेलेल्या मनोभावांचे, अपेक्षाभंगांचे, नकारांचे, अन्याय-अपमानांचे सल आहेत, पण प्रियकराच्या सहवासाने त्यावर फुंकर घातली गेली आहे. वय तरुण आहे आणि प्रेम करण्याची शिक्षा म्हणून काकांनी हातावर तप्तमुद्रा उमटवली तरी मनाजोगती साथसोबत मिळाली आहे आणि मनाचा भार तिथे हलका करता येतो आहे.
कोठे खोल तळात पूर्वस्मृतिचे ज्वालामुखी जागृत
त्यांची साहुनि आच नित्य मन हे आतूनिया पोळले
अशी कबुली देताच, आतले ते कढत रसायन वर आणणे प्रियकरालाही साहवणार नाही, म्हणून तो ज्वालामुखी तसाच निद्रिस्त ठेवण्याची त्यांची धडपड आहे. ‘सहवास’ ते ‘शेला’ हा दहा-अकरा वर्षांचा काळ इंदिराबाईंच्या आयुष्यातला फार सुखाचा आणि फार दु:खाचाही काळ ठरला. घरचा तीव्र विरोध पत्करून संतांशी त्यांनी प्रेमविवाह केला होता. तीन मुले झाली होती आणि उभ्या जगात परस्परांना आपणच फक्त काय ते आहोत, अशा गाढ विश्वासावर दिवस सरत होते. ते जर तसेच जात राहिले असते तर इंदिराबाई कवयित्री म्हणून फारशा क्रियाशील राहिल्या असत्या असे वाटत नाही. ‘माझे स्वप्न माझ्या हाती आले होते. आनंदाने मन भरलेले होते...कवितारचनेकडे माझे लक्ष नव्हते.’ असे त्यांनी स्वत:कडे वळून बघताना पुढे म्हटले आहे.
1946 मध्ये संतांच्या आकस्मिक मृत्यूने मात्र संसार एकदम हेलपाटला. तीन मुलांची ती आई अवघी तीसच वर्षांची होती. त्या अवघड आणि शोककारी प्रसंगात सहनशक्तीच्या शोधात इंदिराबाई कवितेकडे वळल्या आणि दोन्ही परस्परांमध्ये वितळून गेल्या.
‘शेला’ सर्वस्वी इंदिराबाईंचा असा पहिला संग्रह. स्वतंत्र असा बासष्ट कवितांचा संग्रह. मनोरमाबाईंच्या कवितेतल्या गोडव्याशी आणि रविकिरण मंडळाच्या शैलीशी काहीशा क्षीण स्वरूपातच पण दृश्यमान असलेला पूर्वीचा बंध या संग्रहाने पुरा नाहीसा झाला आणि इंदिराबाईंच्या विविध भावावस्थांचे नकाशे-अगदी त्यांच्याच शैलीने कवितेत
उमटून आले. ते एकाच मन:प्रदेशाचे नकाशे होते आणि तो सारा प्रदेश दु:खार्त वा-याने झडपून गेल्यासारखा झाला होता.
‘सहवास’ ते ‘निराकार’ हा दहा संग्रहांमधला इंदिराबाईंच्या कवितेचा पट पाहता आज असे लक्षात येते की, अनेक अवघड पेच या कवितेने पार केले आहेत. विलक्षण प्रक्षोभ आणि विलक्षण तडफडाट कमालीच्या संयतपणावर तोलून अतिशय सूक्ष्म कणाकणांनी जिवंतपणे कवितेत धरणे सोपे नव्हे. भावस्थितीला नेणिवेच्या खोलातून खेचून आणलेल्या प्रतिमांमध्ये संक्रमित करत इंदिराबाईंनी ते अवघड साध्य केले आहे.
उगमापासून इंदिराबाईंची अखेरपर्यंतची कविता बघत येताना तिचे अनन्यसाधारण स्वरूप जसे मराठी काव्यपरंपरेच्या संदर्भात दिसते तसे स्त्रीलिखित कवितेच्याही संदर्भात दिसते. रविकिरण मंडळाची कविता अगदी निकट असताना आशयाने आणि अभिव्यक्तीनेही संपूर्ण वेगळी कविता इंदिराबाईंनी लिहिली. कवितेच्या सगळ्या घटकांची सेंद्रिय एकात्मता उत्कट संवेदनशीलतेच्या बळावर त्यांना साधली होती. पंचेंद्रियांच्या संवेदनांमध्ये रसरशीतपणे घोळलेले त्यांचे भावसंवेदन कमालीचे सर्जक होते. मराठी कवितेत अशी सर्जक संवेदनबहुलता फार दुर्मिळ आहे.