आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नव्या पिढीला मराठी कादंब-यांत रस नाही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र : सुदेश हिंगलासपूरकर, ग्रंथाली, मुंबई )
एखाद्या पुस्तकावर ते बाजारात आल्यावर वाङ‌्मयीन चर्चा व्हावी, त्यावर वाद-प्रतिवाद रंगावेत, सामान्य वाचकापर्यंत हा संवाद पोहोचावा, हा प्रकार अलीकडे अत्यंत दुर्मिळ होत चालला आहे. एखादे पुस्तक बाजारात आल्यावर ते खपण्यास किमान तीन ते चार वर्षे जावी लागणे, याच्या मुळाशी नेमके काय काय आहे?
कालबाह्य विषय? लेखकांची कालबाह्य लेखनशैली ? नव्या पिढीचा बदललेला वाचन स्तर, मराठीशी असलेला दुरावा की सक्षम विक्री व्यवस्थापन आणि प्रभावी मार्केटिंग तंत्राचा अभाव? मान्यवर प्रकाशकांनी ग्रंथ विक्रीला लागलेल्या आहोटीसंदर्भात नोंदवलेल्या या प्रतिक्रिया...

‘नव्या पिढीला मराठी कादंब-यांत रस नाही’
गेल्या वर्षभरात ललित, कथा, कादंबरी आदी प्रकारांतील पुस्तकांच्या विक्रीचा आकडा ४० टक्क्यांनी घसरला आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढणारच आहे. इंग्रजी वाचनाकडे कल असलेली पिढी झपाट्याने पुढे येतेय. सिडने शेल्डन वा तत्सम लोकप्रिय परदेशी लेखकांच्या कादंब-यांमध्ये गुंतलेल्या या पिढीला मराठी कादंब-या वाचण्यात फारसा रस उरलेला नाही. मागील पिढीदेखील वयोमानानुसार वाचनाच्या बाबतीत एका विशिष्ट मर्यादेत अडकून पडली आहे. मराठी मातृभाषा असणे आणि त्या भाषेतील साहित्य वाचायला आवडणे, या दोन भिन्न गोष्टी आहेत.
- सुदेश हिंगलासपूरकर, ग्रंथाली, मुंबई.

बहुतेक सगळेच वाचन करिअर- केंद्री
आपल्याकडच्या तरुण पिढीतल्या वाचकांच्या वाचनाचा स्तर विलक्षण बदलला आहे. ही पिढी सध्या गंभीर चिंतनात्मक किंवा ललित साहित्य वाचण्यापेक्षा करिअरच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त रॉबिन शर्मा, शिव खेरा आदींची मोटिव्हेशन प्रकारातली पुस्तकेच अधिक प्रमाणात वाचत आहे. हा वाचक एकवेळ इंग्रजीतली कादंबरी नजरेखालून घालेल, पण मराठी ललित लेखनाच्या वाटेलाही जात नाही. त्यामुळेच कदाचित मराठी ग्रंथ विक्रीच्या क्षेत्रात मंदीसदृश माहोल अनुभवास येत आहे.
- मंदार नेरुरकर,
आयडियल बुक डेपो, दादर, मुंबई.
ग्लॅमर मिळाले तरच विक्री
मराठी ग्रंथ विक्रीला चालना मिळण्यासाठी प्रतिष्ठेचा पुरस्कार वा कथा-कादंबरीवर बेतलेला चित्रपट, असे ग्लॅमर असलेले निमित्त लागत आले आहे. अलीकडे हे प्रमाण खूपच वाढले आहे. नवलेखक अवधूत डोंगरे यांच्या ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि आठवडाभरात या कादंबरीच्या ५० प्रती खपल्या. गेल्या वर्षी सुहास शिरवळकरांच्या ‘दुनियादारी’ कादंबरीवर चित्रपट आला, त्या आधी मिलिंद बोकिलांच्या ‘शाळा’ कादंबरीवर चित्रपट आला, त्याने या कादंब-यांची मागणी वाढली; पण अशा घटना तुलनेने कमीच घडतात. एरवी, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत आदी जुन्या लेखकांच्या कादंब-यांनाच आपल्याकडे मागणी असते.
ग्लॅमर मिळाले तरच विक्री
त्यामुळे बाजारात दर आठवड्याला २५ ते ३० नवी पुस्तके आली तरीही त्यातली मोजकीच पुस्तके खपतात. ग्रामीण भागामध्ये तशीही मर्यादित स्वरूपात पुस्तके उपलब्ध असतात. अशा ठिकाणी पुस्तक प्रदर्शने मुंबई-पुण्याच्या वितरकांनी, संस्थांनी भरवल्यास तिथे पुस्तकांना खूप मोठी मागणी नोंदली जाते. ‘अक्षरधारा’तर्फे वितरण प्रक्रियेचा एक भाग म्हणून पारंपरिक माध्यमांबरोबर फेसबुक पेजपासून वृत्तपत्रांमधल्या जाहिरातींपर्यंत अनेक मार्ग अवलंबले जातात. ग्रंथ तुमच्या दारी, मान्सून सेल, बालवाचक ग्रंथालय असे अनेक उपक्रम शहरांमध्ये, गावांमध्ये राबवले जातात. पुस्तकांचा आशयही अनेकदा पॅम्पलेट‌्सच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचवला जातो. त्यासाठी वितरकांचे वेगळे असे बजेटच आखलेले असते.
- वैभव पिंपळखरे, अक्षरधारा.
साहित्यमूल्य नसलेल्या पुस्तकांना मोठी मागणी
मराठीत अनुवादित साहित्याला सततची मागणी असते. त्यामुळेच मेहता प्रकाशन सारख्या संस्थांनी प्रकाशित केलेली अनुवादित पुस्तके खपताना दिसतात. एरवी पुस्तक विक्रीच्या बाबतीतही राजकारण होत असते. सध्या साहित्यमूल्य नसलेल्या पुस्तकांना मोठी मागणी असल्याचे या कंपन्यांनी चांगले हेरल्याने मार्केटिंग कौशल्य पणाला लावून ते पुस्तके विकून दाखवतात. पण साहित्यमूल्य असलेल्या पुस्तकांच्या बाबतीत मात्र विक्रीची रड सुरू आहे आणि येत्या काळात ही रड वाढणारच आहे.
- अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई.
कालबाह्य विषय आणि लेखनशैली हा मुख्य अडसर
ग्रंथविक्रीच्या क्षेत्रात सध्या अनुभवायला येणारी मंदी साहित्यमूल्य असलेल्या पुस्तकांच्या बाबतीत अधिक जाणवत आहे. वाचकवर्गाच्या वाचनाच्या गरजा त्यांच्या जीवनशैलीला अनुसरून बदलत आहेत. हा बदल ओळखूनही अनेक लेखक जुने विषय आणि जुन्याच लेखनशैलीत रमताना दिसताहेत. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम पुस्तक विक्रीवर होताना दिसत आहे. - येशू पाटील, शब्द प्रकाशन, मुंबई
संकलन - प्रियांका डहाळे