आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द ग्रेट अमेरिकन नॉव्हेल !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्क ट्वेन या जगप्रसिद्ध लेखकाच्या ‘अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन’ या कादंबरीपासून बहुतेक अमेरिकन कादंब-यांचा उदय होतो, असे अर्नेस्ट हेमिंग्वेचे मत होते. ‘हकलबरी फिन’ हा साधारणपणे तेरा-चौदा वर्षांचा नायक आहे. आईविना वाढलेला आणि दारुड्या बापाचा मार सहन करणारा. हा हक एक दिवस बापाच्या जाचाला कंटाळून घर सोडायचे ठरवतो आणि मिसिसिपी नदीवरून किना-याच्या गावांवरून प्रवास करत जातो. ही सारी कहाणी म्हणजे हक फिनची गोष्ट. पण घर सोडताना हक फिन एका डुकराला बंदुकीने मारतो आणि त्याचे रक्त पसरून आपला खून झाल्याचा देखावा तयार करतो. ‘अ‍ॅडव्हेंचर ऑफ टॉम सॉयर’ 1876मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत टॉमच्या मित्राचे म्हणजेच हकलबरी फिनचे पात्र येते. 1885मध्ये ही हक फिनवरची कादंबरी प्रसिद्ध झाली, तेव्हा तिच्याकडे पुस्तकाचा पुढचा भाग म्हणून पाहिले गेले. खरं तर ती अतिशय गहन अशी कादंबरी आहे आणि स्वतंत्रही आहे. त्याहीपेक्षा ही ‘टॉम सॉयर’सारखी लहान मुलांची कादंबरी नाही. मिसुरीवरून निघून हक फिन इलिनॉस, किंटुकी आणि अर्कान्सास अशा ठिकाणी प्रवास करत जातो, पण हा छोटासा प्रवास म्हणजे त्याच्या दृष्टीने जगप्रवासच ठरतो. प्रवासात त्याला जीमसारखा पळालेला गुलाम भेटतो. ग्रॅनफोर्डसारखे प्रेमळ कुटुंबीय भेटतात. त्यांच्या घरातील मुलाचा खून झालेला हक पाहतो. अर्कान्सासमध्ये त्याला ड्यूक आणि किंग ही मनोरंजनाचे कार्यक्रम करणारी जोडगोळी भेटते. ती चक्क जिमला रंगवून तिच्यावर तिकीटही लावतात. पैसे कमवायच्या त्यांच्या अनेक लबाड योजनांमुळे सा-यांचाच जीव धोक्यात येतो. त्या प्रकारचा हा सारा प्रवास, तेव्हाचे दक्षिण अमेरिकेतील जगण्याचे नितांत सुंदर दर्शन घडवतो. वेगवेगळ्या माणसांच्या प्रवृत्ती, त्यांचे सुष्ट- दुष्ट मनसुबे यांचे सम्यक दर्शन त्यातील हक हे पात्र आणि वाचक यांना येतात. शेवटी त्याची टॉमशी भेट होते. तो आपल्या पुस्तकी ज्ञानानुसार जिमची सुटका करण्याची योजना आखतो.
या पुस्तकाचा अतिशय सुंदर अनुवाद भा. रा. भागवत यांनी ‘भटूक बहाद्दर’ या नावाने केला आहे. ‘युसिस’ने (युनायडेट स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस लायब्ररी) त्या काळात इंग्रजी पुस्तकांचे जे अनुवाद करून घेतले, त्यात हेही पुस्तक होते. अमेरिकेतल्या ग्रामीण भागातली गावंढळ भाषा दाखवण्यासाठी भागवतांनी वेगळीच मराठी वापरली आहे.
म्हणजे युक्तीला ‘युगत’ म्हणणे इत्यादी. शाळेत हक फिन जो तराफा घेऊन मिसिसिपी नदीवरून जातो, तो सगळा प्रवास मार्क ट्वेन रंगवू शकला, कारण त्याने स्वत: रिव्हरबोट पायलटचे काम केले होते. मार्क ट्वेन हे त्याचे टोपणनावही नदीच्या पाण्यातील खोली मोजण्याच्या गोष्टीवरून पडले होते.
तो लिहितो, ‘धरलं हातात वल्हं अन् किना-यापासून होडी एक-दोन पावले आत नेली, आणि तशीच सावली-सावलीतून अलगद आत जाऊ दिली. चंद्र चांगला चकाकत होता आणि त्याने पाडलेल्या थोड्याशा सावल्या सोडल्या, तर प्रकाश कसा दिवसासारखा लखलखत होता. मी चांगला तासभर तरी होडी पुढे नेत होतो. सारं कसं खडकासारखं घट्ट आणि गप्प होतं अन् झोपेत दंग. करता करता एव्हाना मी बेटाच्या पायथ्यापाशी आलोच होतो, म्हणा ना. त्या वेळी वा-याची गार झुळूक लागली, त्याचा वेगळा अर्थ असा की, रात्र हळूहळू सरली होती. वल्ह्याने वळसा देऊन मी होडीचं तोंड किना-याकडे आणलं आणि बंदूक घेऊन किना-यावर पाय टाकला आणि जंगलात शिरलो. तिथल्या एका ओंडक्यावर बसून मी पानांच्या जाळीकडे पाहिले. आपली पाळी हुडकून चंद्र निघून गेलेला मी पाहिला. नदीवर काळोखाचं पांघरूण पसरलं.’ हा आहे भागवतांच्या अनुवादातील उतारा. मूळ इंग्रजी कादंबरीतील बोलीभाषांचा वापर पाहिला, तर हे काम किती कठीण होते, हे लक्षात येईल.
कादंबरीला ‘द ग्रेट अमेरिकन नॉव्हेल’ म्हणतात; त्याचे कारण हेमिंग्वेने सांगितल्याप्रमाणे, अनेक अमेरिकन कादंब-यांचा उगम या कादंबरीत दिसतो. विसाव्या शतकात ‘रोड मुव्हीज’ या नावाने कथानकातील प्रयोग सुरू झाला आणि चित्रपटात महत्त्वाचा ठरला. या रोड मुव्हीजमध्ये चित्रपटाचं कथानक नायकाच्या प्रवासानुसार बदलत जातं. ही ‘रोड मुव्ही’ची शैली हकलबरी फिनमध्ये दिसते. त्या दृष्टीने रचनेतील प्रयोग, भाषा, कथानक आणि जिवंत अनुभव देण्याची ताकत, या सर्वच स्तरावर ही कादंबरी क्लासिक ठरते.
shashibooks@gmail.com