आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Medical Education And Health Service By Dr.Amol Annadate

वैद्यकीय शिक्षणाची सत्त्वपरीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय शिक्षण ही उच्च शिक्षणाची शाखा आहे. त्याच्याशी आपला काय संबंध, असे ब-याचदा अनेकांना वाटते. पण आपण आपला जीव ज्याच्या हातात विश्वासाने देणार असतो, त्या डॉक्टरच्या गुणात्मक दर्जावरच आपले आणि समाजाच्या आरोग्याचे भवितव्य अवलंबून असते, हे वास्तव नाकारता येत नाही. वैद्यकीय क्षेत्र हे इतके आदरणीय क्षेत्र आहे की, उपचार करण्याअगोदर ‘डॉक्टर तुम्ही ‘एमबीबीएस’ला किती मार्कांनी पास झालाय?,’ असा प्रश्न विचारण्यास अजूनही कोणी रुग्ण धजावत नाही. अशा वेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक ज्या प्रकारच्या वैद्यकीय शिक्षणावर अंधविश्वास ठेवतात, दुर्दैवाने त्या वैद्यकीय शिक्षणाची दृष्टीआडील सृष्टी मात्र भ्रष्टाचार, शिक्षकांचा तुटवडा व अनागोंदीने बरबटलेली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात उच्च शिक्षण पोहोचावे, राज्यात उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी निर्माण व्हाव्या, या शुद्ध हेतूने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा घाट घातला; पण यामुळे मूळ हेतूला फाटा देत, विविध पक्षीय नेत्यांनी सहकारी साखर कारखान्यांप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे निर्माण केले. परिणामी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व वैद्यकीय शिक्षणामध्ये केवळ संख्यात्मक वाढ झाली, गुणवत्ता मात्र घसरतच गेली. आज संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्या अर्थी सर्वात जास्त डॉक्टर असलेले राज्य आरोग्य क्षेत्रात सर्वात अग्रेसर असायला हवे. पण हे चित्र नेमके उलटे आहे.

आज वैद्यकीय शिक्षणामध्ये शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो आहे. जीव तोडून शिकवणारे शिक्षक हे वैद्यकीय शिक्षणाचा प्राण असतात. एखादा रुग्ण शेवटचे श्वास घेत असतो, तेव्हा त्याची तपासणी करत असताना साक्षात्कार व्हावा, तसा कधीकाळी एखाद्या शिक्षकाने दिलेला कानमंत्र आठवतो आणि उपचारांना नवी दिशा मिळते. रुग्णाचे प्राण वाचतात. आपणही वैद्यकीय शिक्षणाची एक पायरी चढतो. म्हणूनच वैद्यकीय व्यवसायाला ‘प्रॅक्टिस’ असे संबोधले जाते. पण आज वैद्यकीय शिक्षणातून हा शिक्षकरूपी प्राणच हरपला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पूर्णवेळ शिक्षक अनिवार्य केले आहेत, पण ब-याचदा गावात व्यवसाय करणारे डॉक्टरच पूर्णवेळ शिक्षक म्हणून दाखवले जातात. ते सकाळी फेरफटका मारण्यापुरतेच वैद्यकीय महाविद्यालयात येतात. त्यामुळेच विद्यार्थी व शिक्षक हे पवित्र नाते, ज्येष्ठांकडून मिळणारी मूल्ये, संस्कार या गोष्टी इतिहासजमा होऊ लागल्या आहेत.
केवळ खासगीच नव्हे, तर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही ब-याचदा गरजेपुरते कागदांवरच शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात. यातून खरे तर सरकार स्वत:चीच फसवणूक करून घेत आहे. आज वैद्यकीय विद्यार्थी एम.बी.बी.एस. पास झाल्याझाल्या पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षांच्या मागे लागतो. त्यामुळे एम.बी.बी.एस.नंतर प्रत्यक्ष रुग्ण तपासणीचा अनुभव देणारी इंटरशिप अस्तित्वहीन झाली आहे. त्यामुळे ख-या अर्थाने डॉक्टरांचा रुग्णांशी संबंधच येत नाही.

आयुर्वेद, होमिओपॅथी व इतर पॅथींच्या वैद्यकीय महाविद्यालयांची तर व्यथाच निराळी आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना फक्त ‘डॉक्टर’ या उपाधीचा टिळा कपाळावर लावून घ्यायचा असतो. एकदा ‘डॉक्टर’ बनले की त्यांना पुढे अ‍ॅलोपॅथीचीच प्रॅक्टिस करायची असते. खरे तर अतिशय प्रभावी असलेल्या या पॅथी अंगी निष्ठेचा अभाव असलेल्यांमुळे लोप पावत चालल्या आहेत.

वैद्यकीय परीक्षा व प्रवेश परीक्षा हा वेगळाच वादाचा विषय आहे. एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षानंतर एक वर्ष इंटरशिप व त्यानंतर पदव्युत्तर प्रवेश परीक्षा, असा नवा पॅटर्न अस्तित्वात आल्याने, आता विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस. परीक्षांचे महत्त्वच वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर याविषयी सांगतात की, विद्यापीठ परीक्षांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठीच प्रत्येक पेपर दोन वेगळ्या परीक्षकांकडून तपासून घेण्याची, त्याची सरासरी काढून मार्क देण्याची नवी तरतूद केली होती. त्यामुळे परीक्षांमधील गैरप्रकारही कमी होऊन मूल्यमापन अधिक जबाबदार झाले असते. पण हा बदल पालकांनी स्वीकारला नाही. त्याविरोधात आंदोलन केले. दोन परीक्षकांपैकी जो जास्त गुण देईल, ते ग्राह्य धरण्यास पालकांनीच भाग पाडले. यावरून समाजाला वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारावा, असे वाटत नसल्याचे दिसते. ब-याचदा पालक आमची मुले नापास कशी झाली, म्हणून कुलगुरूंकडे दाद मागतात; त्याऐवजी आमच्या मुलांना काही येत नसताना त्यांना पास कसे केले, म्हणून पालकांनी जाब विचारायला हवा. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारावा, म्हणून विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय अभ्यासक्रमात संवाद कौशल्य, वैद्यकीय नीतिमूल्यांचा अभ्यास अशा गोष्टींचा समावेश केला आहे. वैद्यकीय शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग राबवून परदेशी विद्यापीठांशी संलग्नतेतून पदव्युत्तर शिक्षणाच्या संधीही निर्माण केल्या आहेत, अशी माहितीही कुलगुरू डॉ. जामकर देतात. पण वैद्यकीय विद्यार्थी, शिक्षक व समाजाच्या सहभागाशिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारणे शक्य नाही.
खरे तर वैद्यकीय शिक्षण हे फक्त शिक्षण नसून ती एक प्रक्रिया व तपश्चर्या आहे. त्यात जसा प्रशिक्षकही आवश्यक असतो, तसाच प्राण एकवटून धावणारा धावपटूही हवा असतो. वैद्यकीय शिक्षणाची ही परंपरा खंडित झाली तर आज नाही, पण अजून २० वर्षांनी जेव्हा भारत जगातला सर्वात तरुण देश बनलेला असेल, तेव्हा त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतील.

amolaannadate@yahoo.co.in