आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Medicine By Dr. Anupam Dandgaval, Divya Marathi

एक औषध सर्व रुग्णांना सारखेच परिणाम देईल, असे नसते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या युगातील प्रदूषण, सांसर्गिक विकार, ताणतणाव, वातावरणातील विचित्र बदल या सर्वांपासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेद शास्त्राबद्दल कुठलीही शंका घेण्यासारखे नसले तरी मात्र काही लोकांचे गैरसमज झालेले आढळतात. त्यांस अनेक कारणे असून आयुर्वेदिक औषध म्हणजे नेमके काय इथपासून ते रोग बरा करण्यासंदर्भात अवास्तव अपेक्षा इथपर्यंत कारणांची जंत्री सापडते. संभ्रम निर्माण होऊ नये, तसेच कुणीही आयुर्वेदाच्या नावाने आपली शारीरिक व आर्थिक फसवणूक करू नये म्हणून आपण थोडीशी माहिती घेऊ या.


आयुर्वेद शास्त्राची विचारसरणी...
1) प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही भिन्न (वेगवेगळी) असते.
2) तीन दोष (वात, पित्त, कफ) सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र) तीन मल (पुरीष, मूत्र, स्वेद) आणि मन या सर्व घटकांनी मिळून शरीर तयार होते.
3) वरील सर्व घटक निरोगी निर्मळ असल्यास आजाराची निर्मिती होत नाही.
4) म्हणूनच कोणत्याही प्रकारचे औषध देण्याअगोदर रुग्णाची प्रकृती परीक्षण करणे, त्यांच्या दोषांची स्थिती बघणे, सप्तधातूंची स्थिती तपासणे. तसेच मानसिक स्थितीचा अंदाज घेणे आवश्यक असते.
5) रुग्णाच्या अग्नी (पचनशक्ती), वय, रुग्णबल, भोजनसवयी, कामाचे स्वरूप, ऋतू, काळ, व्याधीचा स्वभाव, व्याधीबल इ. अनेक बाबींचा सूक्ष्म विचार करून औषध द्यावे लागते.
6) द्रव्य म्हणजेच जे औषध वापरले जाणार आहे त्याचे रस (सहा रस), वीर्य (2 प्रकार), विपाक (3 प्रकार), गुण (20 प्रकार), कर्म, उपयुक्तांग (पान, फूल, फळ, बीज, मूळ, साल, रस इ.) या सर्वांचा विचार करणे आवश्यक असते.
7) रुग्णाचा व्याधी मार्ग : आयुर्वेद शास्त्रामध्ये स्रोतसे (यंत्रणा) चे वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे शाखा, गती आणि कोष्ट मार्ग अशा गतींचे म्हणजे व्याधी शरीराला ग्रासण्याचे वाढत जाण्याचे प्रकार सांगितलेले आहेत.
8) एक औषध सर्व रुग्णांना सारखेच परिणाम देईल, असे नसते. मित्रांनो हे सांगण्याचे कारण म्हणजे वरील सर्व बाबींचा अभ्यास करून जे औषध दिले जाते त्यासच खरोखर आयुर्वेदिक औषध म्हणावे. कारण ते आयुर्वेद शास्त्राच्या सिद्धांताशी निगडित असते. मात्र, वरील सर्व बाबींचा यथासांग अभ्यास करून रुग्ण परीक्षण करणे त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरच असावा लागतो म्हणूनच शासनाद्वारे विद्यापीठांच्या माध्यमातून 12 वी सायन्सनंतर साडेचार वर्षे शिक्षण व एक वर्ष प्रात्यक्षिक अभ्यास करवून पदवी दिली जाते. ह्या चार-पाच वर्षांमध्ये आयुर्वेदाचा मूळ संहिता ग्रंथ, सिद्धांते, औषधे बनविण्याच्या पद्धती इ. सर्व ज्ञान दिले जाते. म्हणूनच असे डॉक्टर रुग्णाचा व औषधांचा सुयोग्य विचार करून औषध देत असतात.
आयुर्वेद औषधांना साइड इफेक्ट नसतात, या गोंडस गैरसमजाखाली आयुर्वेदिक डॉक्टर नसलेले अनेक महाठग व स्वत:ला विद्वान समजणारे लोक राजरोसपणे आयुर्वेद औषधे विकत असतात. त्यातून अनेकांची फसवणूक झालेली आपण ऐकलीच असेल.


याबाबत करू नये धाडस...
1) घरगुती उपाय (पाच रुपयांपासून असे पुस्तक मिळते)
2) वर्तमानपत्रे, मासिके यांमध्ये सांगितलेले उपाय (डॉक्टरांना विचारून मग करावे)
3) आध्यात्मिक गुरू, धार्मिक गुरू अशा लोकांनी सांगितलेले उपाय.
4) डॉक्टर नसलेले समाजातील इतर मान्यवर लोक.
5) खेडोपाडी डिग्री नसलेले वैदू लोक, घरोघरी फिरून औषध विकणारे.
6) दारोदार भस्मे विकत फिरणारे व अनेक मान्यवरांनी आपल्याकडून औषध घेतले आहे, असे फोटो दाखविणारे लोक.
7) परंपरागत औषध विकणारे, औषधी कंद, मुळ्या विकणारे.
8) आयुर्वेद औषधे किंवा चूर्ण आदी विकणारे दुकानदार.
9) अनेक पानटप-यांवर मिळणारे मूळव्याध, मायग्रेन, कावीळ, डायबेटिसचे औषध.
10) सर्व रोग बरे करणारे एकच औषध, मुळी.
11) भरपूर तपश्चर्या करून देव प्रसन्न केलेले साधक (???आश्चर्य)
12) हिमालयातून आलेले (असे सांगणारे) महाराज.
13) अनेक खेडोपाडी हंगामी (म्हणजेच काही दिवस) असणारे वैदू.
14) स्वत:ला आयुर्वेदाचे जाणकार समजणारे विद्वान.
15) फळांवर, चूर्णावर, मुळीवर मंत्र मारून जादू करून देणारे.
16) आवळा, भोपळा, कारले इ. असे ज्यूस विकता विकता स्वत:ला वैद्य समजणारे लोक.
17) अनेक बाबा, बापू, गुरुजी, महाराज, साधक इ. गोंडस नावे असणारे.
18) डायबेटिस, हार्ट ब्लॉक दूर करण्याचे उपाय सांगणारी पत्रके.
वरीलपैकी कुणाकडून आपण औषध घेत नाही ना याबद्दल नक्कीच विचार करा ही एक अत्यंत गंभीर व महत्त्वाची गोष्ट आहे. कारण भस्म तयार करण्याची, वापरण्याची, साठवण्याची विशिष्ट पद्धत असते. ती वरील लोकांना माहीत नसते. म्हणूनच या लोकांकडून औषध घेतल्याने शरीरावर, किडनीवर तसेच महत्त्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम होऊ शकतात. अशा लोकांकडून विचित्र लक्षणे उत्पन्न होणे, गंभीर उपद्रव निर्माण होणे, अशी वाईट अवस्था निर्माण होऊ शकते व रुग्णाचे विनाकारण शारीरिक, आर्थिक नुकसान उद्भवते.
आयुर्वेद औषधे ही प्रशिक्षित अशा कायमस्वरूपी पत्ता असणा-या डॉक्टरांकडूनच घ्यावी व स्वत:ची फसवणूक टाळावी. आयुर्वेद शास्त्रामधील औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास कधीही नुकसान करीत नाहीत.
आयुर्वेद डॉक्टर लोकांनीसुद्धा आपल्या मित्रपरिवारातील लोकांना याबाबत कल्पना द्यावी व सुयोग्य परिणामकारक अशा आयुर्वेदशास्त्राचा सर्वांना फायदा करून द्यावा.


(लेखक हे आयुर्वेद डायबेटिस तज्ज्ञ आहेत)
anpmgyt@yahoo.com