आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Menses Cycle By Dr.amol Annadate, Divya Marathi, Family Planning

पाळी नियमनाचे प्रभावी तंत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंब नियोजनाची साधने निवडण्याचा हक्क स्त्रियांना तर नाहीच आणि त्याहीपुढे, राहिलेला गर्भ नको असेल तर त्याविषयी निर्णय घेण्याचा हक्कही स्त्रियांना नाही. ग्रामीण भागातील ही व्यथा असताना शहरी भागात ही स्त्री स्वयंपूर्ण झाली असली तरी गर्भ राहिल्यावर, ती अशा वेळी डॉक्टरांना भेटते तेव्हा, तिला शिक्षित व स्वयंपूर्ण कशावरून म्हणावे, अशी शंका येते. ही चर्चा फक्त विवाहित जोडप्यांपुरतीच मर्यादित नसून, ब-याचदा बाह्यरुग्ण विभागात एखादी षोडशवर्षीय तरुणी म्हणा वा मुलगी, बराच वेळ घुटमळताना दिसते आणि काहीच न बोलता निघून जाते. त्यातच गर्भ नको असलेली कुठलीही स्त्री समोर दिसली की, सर्वप्रथम गर्भपाताच्या कायद्याचे कडक अस्त्र बाहेर येते. या सर्व गोष्टींतून सुटका करून घेण्यासाठी स्त्रियांसमोर एकच मार्ग असतो, तो म्हणजे बेकायदेशीर गर्भपाताचा. भारतात दरवर्षी होणा-या 6.4 दशलक्ष गर्भपातांपैकी 4 दशलक्ष गर्भपात हे बेकायदेशीर व असुरक्षितरीत्या केले जातात. यात तारा, काड्या व तत्सम अणकुचीदार हत्यारे योनीमार्गातून गर्भाशयात घालून गर्भपात करण्याचा उपाय सर्रास केला जातो, त्यामुळे मातामृत्यूंच्या सर्व कारणांपैकी 8% मातामृत्यू हे असुरक्षित गर्भपातांमुळे होतात. हे रोखण्यासाठी व मुळात गरोदर स्त्रीला गर्भपात या शब्दांपर्यंत पोहोचवू देण्याआधीची, एक महत्त्वाची पायरी आज वैद्यकीय क्षेत्र पूर्णत: विसरले आहे. आजच्या घडीला ज्या पद्धतीने पुनरुज्जीवन अत्यंत गरजेचे आहे ते म्हणजे, ‘मेन्स्ट्र्युअल रेग्युलेशन’ अर्थात, ‘मासिक पाळीचे नियमन.’


सर्वप्रथम आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी की, पाळीचे नियमन म्हणजे, गर्भपात नसून गर्भपात टाळण्यासाठी त्यापूर्वीची एक पायरी आहे. जर एखाद्या स्त्रीला पाळी चुकल्याची शंका आली, तर त्यानंतर दोन आठवड्यांच्या आत डॉक्टरांकडे जाऊन ही शंका व्यक्त केल्यास कुठलीही प्रेग्नन्सी टेस्ट न करता ‘कार्मेन्स कॅनुला’ या विशिष्ट प्रकारच्या नळीचा वापर करून गर्भधारणेच्या प्रथम अवस्थेला सुरुवात झाली असली तरीही ती लगेचच टळू शकते. ही प्रक्रिया अगदी सोपी असून काही मिनिटांत पूर्ण होते. महत्त्वाचे म्हणजे, ही पद्धत अतिशय कमी खर्चात होते. या प्रक्रियेसाठी प्रशिक्षण दिलेला कुठलाही डॉक्टर सहज करू शकतो. पाळी नियमनाची फक्त एकच अट आहे आणि ती म्हणजे, तुम्ही पाळी चुकल्यावर लगेचच त्याची दखल घ्यायला हवी.


आधीच्या काळी संततिनियमनासाठी हीच गोष्ट सतत मोठ्या प्रमाणावर वापरली जायची; पण आता ही पद्धत क्लिनिकल प्रॅक्टिसमधून पूर्णपणे कालबाह्य झाली आहे. याचे अस्तित्व वैद्यकीय पुस्तकांमध्ये एका पानापुरतेच मर्यादित राहिले आहे. पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाळी नियमनासाठी एमआय रूम म्हणून एक वेगळी रूम असायची. या पद्धतीसाठी बाह्यरुग्ण विभागाचा एक दिवस राखून ठेवला जायचा. हळूहळू हे सगळेच लुप्त झाले.
नवनवीन औषधांच्या व तंत्रज्ञानाच्या शोधामुळे आमचे खूप भले झाले, असे आम्हाला वाटते; पण, ‘जुने ते सोने’ विसरले की कशी गुंतागुंत निर्माण होते, हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. पहिल्या तीन महिन्यांतील गर्भपातासाठी गोळ्या उपलब्ध झाल्यामुळे आम्ही लोकांना गर्भपातासाठी उशिरा येण्यासाठी मुभा दिली. यातून मग हा उशीर तीन महिन्यांच्याही पुढे जाऊ लागला व त्यातूनही पुढे गर्भधारणेच्या दुस-या तिमाहीतील गर्भपात वाढले. पर्यायाने गुंतागुंत व मातामृत्यूही वाढले.


थोडक्यात, पूर्वी फक्त सायकल उपलब्ध असताना, लोक लवकर घरातून निघत, वेळेवर पोहोचत व तब्येतही चांगली राही. आता गाड्या आल्या, पण ट्रॅफिक जॅममुळे उशीरही होतो व अपघातांमुळे जीवही गमावावा लागतो. त्यामुळे आरोग्यासाठी सायकलच्या प्रसारासारखीच पाळी नियमनाच्या प्रसाराची गरज आहे. या पद्धतीच्या अवलंबनामुळे अजून एक गोष्ट स्पष्ट होईल; ज्या जोडप्यांना गर्भ नको आहे, ते तीन महिन्यांपर्यंत थांबत आहेत. कारण त्यांच्या मनात काही तरी काळेबेरे आहे. त्यांना गर्भलिंग तपासणी करून गर्भपाताचा निर्णय घ्यायचा आहे. या विचाराशिवाय ज्यांना खरोखरच संततिनियमन करायचे आहे, त्यांनी हा निर्णय पाळी चुकल्याच्या पहिल्या दोन आठवड्यांतच का घेऊ नये? पाळी नियमनाची पद्धत रुजल्यास, आपोआपच गर्भलिंग तपासणीसाठी इच्छुक जोडपी ओळखता येतील.
आधुनिक वैद्यक शास्त्राच्या डॉक्टरला जरी ही पद्धत कालबाह्य वाटत असली, तरी डॉ. डॉन,
डॉ. कानिटकर, डॉ. कामत, डॉ. राजन यांसारख्या स्त्रीरोग शास्त्राचे पितामह समजले गेलेल्या वीस भारतीय स्त्रीरोगतज्ज्ञांनी 80च्या दशकातच पाळी नियमनाच्या तंत्राचा आपल्या लेखातून पुरस्कार केला आहे. आज गर्भपातासाठी नवी औषधे, तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी, तो टाळण्यासाठी व निर्णय लवकर घेण्यासाठी आम्ही लोकांची मने वळवू शकलेलो नाही. हे कार्य पाळी नियमनाच्या तंत्रातून होऊ शकते. म्हणून आजच या तंत्राविषयी आपल्या डॉक्टरकडे चौकशी करावी. संततिनियमनासाठी सबंध आयुष्य वेचणा-या र. धों. कर्वेंच्या महाराष्ट्रात तरी किमान पाळी नियमनाचा प्रसार व्हावा, आणि देशात जागृती घडून यावी.


amolaannadate@yahoo.co.in