आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व कट्टरतावाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंच व्यंगचित्र साप्ताहिक शार्ली हेब्दोतील दहा पत्रकारांच्या पॅरिसमध्ये झालेल्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण जग हादरलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व कट्टरतावाद यांच्यातील संघर्ष जगाने पूर्वी अनुभवला होता, पण ही घटना नव्या जगाच्या प्रामुख्याने युरोपच्या सामाजिक संरचनेला धक्का देणारी होती. या संदर्भात गणेश मतकरी यांची फेसबुकवरील पोस्ट विचार करायला लावणारी होती. ते म्हणतात, ‘शार्ली हेब्दोसंबंधात आता दोन उघड तट पडलेले दिसतात. त्यांना
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या युद्धातले हुतात्मे समजणारा एक, तर त्यांच्यावरील हल्ला चूकच असला तरीही त्यांचं काम चिथावणारं आणि कनिष्ठ दर्जाचं असल्याने त्यांची झाल्या प्रसंगात चूक नव्हतीच असं नाही, असं म्हणणारा दुसरा. या दुस-या गटात बरेच पुरोगामी मानले जाणारे तसंच अनेक आधुनिक विचारसरणी जपणारे मुस्लिमही पाहायला मिळतात.
ही कार्टून्स हे अत्यंत टुकार दर्जाचं आणि खोडसाळ काम होतं, हे आपण धरूनच चालू. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य. ते संबंधित व्यक्तीच्या गुणवत्तेच्या टक्केवारीप्रमाणे कमी-अधिक होऊ शकत नाही. त्यांचा मूर्खपणा गृहीत धरला तरी त्यांच्यावरचा हल्ला जस्टिफाय करण्याचा विचारही आपण करू शकत नाही. ती चूक किती तरी अधिक मोठी आणि कितीतरी अधिक घातक ठरेल.’’

याला प्रत्युत्तर देताना वर्षा म्हसकर-नायर म्हणतात, ‘freedm of expression’ एक गोष्ट आहे... पण त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही हीदेखील तितकीच खरी गोष्ट आहे. आणि तसं नसतं तर जगात कायदेच अस्तित्वात नसते. उद्या वर्तमानपत्रात एखाद्याबद्दल अब्रुनुकसानी करणारे जर खोटे लिहिले तर तो माणूस लिहिणा-या व्यक्तीला कोर्टात खेचू शकतो... मानहानी आणि अब्रुनुकसानीबद्दल.... आणि हेच जर धर्माविषयी लिहिले तर धर्मांध लोक कायदा हातात घेतात.
चूक दोन्हीकडे थोडी थोडी आहे. प्रत्येक गोष्टीचा गैरफायदा घेणारे लोक आहेत. उमेश नेवगी यांनी या संदर्भात वेगळा मुद्दा मांडला. ते म्हणतात, दोन तट पडले आहेत हे मान्य; मात्र दोहोंपैकी फक्त एकच गट अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो आहे, हे अमान्य. माझ्या मते, दोन्ही गटांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिप्रेत आहे व या हल्ल्याचे कोणतेही समर्थन या दोघांपैकी कोणत्याच गटाकडून होत नाही आहे (हे फारच महत्त्वाचे).
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे शिव्या देण्याचेदेखील स्वातंत्र्य’ असे नाही, हे मी मानतो. असे असताना एकाने अर्वाच्य शिव्या दिल्या म्हणून दुस-याने त्याचा खून केल्यास त्या खुनाचे समर्थन निश्चित होत नाही. पण शिव्या देण्यात पहिल्याने चूक केली, हे मात्र स्वतंत्ररीत्या मान्य व्हावे. मांडलेला एखादा विचार अथवा मजकूर वेडावाकडा वा हेटाळणीपूर्वक वा बदनामीजनक वा चुकीचा असल्यास त्यावर चर्चा/प्रतिरोध/सभा/खटले जरूर व्हावेत; पण शस्त्र उगारण्याची वा हिंसेची मुभा कोणत्याच व्यक्तीस कधीच नाही.

एकंदरीत धर्म, वंश, भाषा, संस्कृती, परंपरा यांची ओझी घेऊन माणूस आज एका देशातून दुस-या देशात रोजगारासाठी स्थलांतर करत असताना या स्थलांतरामुळे निर्माण होणारे वांशिक प्रश्न, बहुसंख्य समाजाकडून इतरांना दिली जाणारी अल्पसंख्याकत्वाची जाणीव, सातत्याने केली जाणारी सामाजिक अवहेलना आज सामाजिक असंतोषासाठी कारणीभूत ठरत
आहे. दहशतवादाला या असंतोषाची जोड मिळत असल्याने प्रश्न अधिक जटिल झाला आहे.