आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Mir Taki Mir By Ibrahim Afghan, Rasik

खुदा-ए-सुखन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीर तकी मीर यांना उर्दू शायरीचे पितामह मानलं जातं. ‘खुदा ए सुखन’ म्हणजे काव्याचा ईश्वर, असंही संबोधलं जातं. कारण त्यांनी इथल्या स्थानिक हिंदवी भाषेतील सोपेपणा आणि तत्कालीन मुघल साम्राज्याच्या प्रभावाखाली वाढणा-या पर्शियन भाषेतील अलंकार, तत्त्वज्ञान यांच्या संगमातून नवीन परिभाषा निर्माण केली. ‘पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा
जाने है, जाने न जाने गुल ही न जाने बाग तो सारा जाने है...’ म्हणत शायरी मैफलीच्या बंधनातून बाहेर काढून आम जनतेपर्यंत नेली. त्यातूनच पुढे उर्दू काव्याने आपले अवकाश फुलवले. त्या अवकाशाच्या सीमा ब-याच अंशी मीरने आखून दिल्या होत्या.
प्रेमाच्या सर्वोच्च मूल्यांचे संस्कार लहानपणीच धार्मिक वृत्तीच्या वडलांकडून झाले होते, ते आयुष्यभर पुरले. मात्र, वडिलांची सावली लहानपणीच सरली. आगरा किंवा तेव्हाच्या अकबराबादेतून पुढचे शिक्षण आणि शाही आश्रयाच्या इराद्याने ते दिल्लीला आले. दिल्ली तेव्हा राजकीय उलथापालथीचे केंद्र होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कमकुवत
बनले होते. मराठे दिल्लीत घुसले होते. त्याच्या दोन वर्षानंतर नादिर शाहने दिल्लीला तबाह केले. पाच वर्षांनंतर अहमद शाह दुर्राणीने दिल्लीवर ताबा मिळवला. मराठ्यांनी पुन्हा दिल्ली मिळवली, पण दुर्राणीच्या हाती ते हरले. लवकरच महादजी शिंदे यांनी दिल्लीवर निर्णायक सत्ता मिळवली. त्यानंतर इंग्रजांनी दिल्लीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. हा सगळा मीरचा काळ आहे. म्हणून त्यांच्या अनेक शेरांमध्ये दिल्लीचा उल्लेख येतो. मराठे दिल्लीत आले, तेव्हा मीर पंधरा वर्षांचे होते आणि इंग्रजांनी दिल्ली घेतली, तेव्हा ते ऐंशी वर्षांचे होते. या सतत उद्ध्वस्त होत पुन्हा वसत राहिलेल्या दिल्लीलाच त्यांनी प्रतीक बनवलं.
दिल वो नगर नही जो फिर आबाद हो सके
पछताओगे सुनो हो, ये बस्ती उजाड के
व्यक्तिगत जीवनात त्यांना दिल्लीसारखेच नशीब लाभले. त्यांची ओळख सांगणारा एक त्यांचाच प्रसिद्ध शेर आहे,
हमको शायर न कहो मीर के साहब हमने
कितने रंज ओ गम किए जमा तो यह दीवान बना।
बायको, मुलगा, मुलगी यांचे मृत्यू त्यांना पाहावे लागले. प्रेमात उद्ध्वस्त अनेकदा झाले, पण त्यावरचा विश्वास नाही उडाला. मात्र या वेदनांना त्यांनी आपल्या काव्यात अजरामर करून ठेवले. एक काळीज पिळवटून टाकणारा त्यांचा शेर पाहा आणि मुद्दाम बेगम अख्तर यांच्या दर्दभ-या आवाजातील ही गजल ऐका,
या के सपैद ओ सियाह में हमको दख्ल है सो
इतना है
रात को रो रो सुबह किया और दिन को ज्यू तू
शाम किया
(इथे प्रकाश आणि अंधार या दरम्यानचा अवकाश इतकाच जाणवतो की, रात्र रडून पहाट होते आणि दिवस कसाबसा
रात्रीत बदलतो.)
आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात मीर लखनऊला गेले. तेथे नवाब आसफ उद् दौला यांच्या दरबारात दाखल झाले. तिथल्या दरबारी आणि अन्य कवींशी त्यांचे काव्यविषयक मतभेद झाल्याने, त्यांनी दरबार त्यागला.
चारागरी बीमार ए दिल की रस्म ए शहर ए
हुस्न नही वरना दिलबर ए नादान भी इस दर्द का चारा
जाने है
(समस्येचं निवारण हा काही या शहराच्या संस्कृतीचा भाग नाही. तसं बघायला गेलं तर ज्याने समस्या निर्माण केली,
त्या भाबड्यालाही त्यावरचा उपाय माहिती आहेच की.)
उर्दू काव्यातील शायर हा ट्रॅजिडी किंगच असतो. ते स्वीकृत रूप असते. स्वत:हून स्वीकारलेले. मात्र मीरच्या बाबतीत ती हकिकत बनली. आणि हे केवळ त्यांच्या हयातीतच नव्हे, तर त्यांच्या मृत्यूनंतरही.
उल्टी हो गयी सब तदबीरें कुछ न दवा ने काम किया
देखा इस बीमार ए दिल ने आखीर काम तमाम किया
(सगळ्या गोष्टींचे परिणाम उलटेच झाले. औषध काही उपयोगी ठरले नाही. शेवटी या हृदयाला जडलेल्या रोगाने माझा
अंत ओढून आणलाच.)
त्यांचा मृत्यू लखनऊत झाला. तेथेच त्यांना दफन करण्यात आले. त्यांच्या चिरनिद्रास्थानाची खूण निर्माण झाली. तथापि,
नंतर भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर त्याच्या मार्गात कबर आल्याने अखेरची ती खूणही नष्ट झाली.
मेहर ओ वफा ओ हुस्न ओ इनायत एक से वाकिफ इनमे नही
और तो सब कुछ तंज ओ किनाया रम्ज ओ इशारा जाने है
(चांगुलपणा, सन्मान, निष्ठा यापैकी काहीही त्याला येत नाही. अवमान, उपहास आणि छुप्या पद्धतीने छळणे मात्र उत्तम
जमतं.)
त्यांचा हा एक खूप प्रसिद्ध आणि गोंधळात टाकणाराही शेर आहे. त्यांच्या धर्माबद्दलचा हा मसला आहे.
मीर के दीन ओ मजहब को अब पूछते क्या हो उसने तो
कश्का खैंचा दैर मे बैठा कबका तर्क इस्लाम किया
याचा अर्थ असा की, मीरच्या धर्मकर्माबद्दल आता काय विचारताहात? तुम्हाला माहीत नाही का, त्याने कपाळाला टिळा लावलाय आणि मंदिरात बसतो. त्याने इस्लामला कधीच सोडचिठ्ठी दिलीये. मीर हे सुफी परंपरा मानणारे शायर होते. प्रस्थापित धर्मापेक्षा ईश्वरापर्यंत पोहोचवणा-या प्रेमाच्या मार्गाला मानणारे होते. मीरचे शेर हे आजही रोजच्या जगण्यात वापरले जाणारे मुहावरे बनून जिवंत आहेत. आगे आगे देखिए होता है क्या किंवा फिर मिलेंगे अगर खुदा लाया, हे त्यांच्या शेरातील मिसरे आहेत. त्या बाबतीत त्यांचे स्वत:बद्दलचे भाकीत खरे ठरले.
पढते फिरेंगे गलियों मे इन रेख्तों को लोग
मुद्दतों रहेंगी याद ये बाते हमारीयाँ

ibrahim.afghan@gmail.com