आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉबनायक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळवेळ न पाहता एका धुंदीत ऐश्वर्या रायच्या घरापुढे तमाशा करणारा, तर कधी थंडीने कुडकुडणा-या झोपडपट्टीवासीयांमध्ये रजया वाटणारा... कधी निष्पापांना गाडीखाली चिरडल्याचा ठपका असलेला, तर कधी दोन्ही हातांनी समाजाला भरभरून दान देणारा... कधी खटकेबाज संवादबाजी करत प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्या घेणारा, तर कधी एकांतात मनस्वीपणे कॅनव्हासवर रंगांची उधळण करणारा... अशा कितीतरी विरोधाभासी रूपांत तो आजवर दिसत राहिला. पण एका बड्या बापाचा हा बिघडलेला पोर दक्षिणेतल्या रजनीकांतच्या तोडीची अपार लोकप्रियता मिळवून चित्रपटसृष्टीचा कणा बनला कसा नि ‘बिइंग ह्युमन’चा नारा देत सामाजिक कार्यात गुंतला कसा, याचे कोडे भल्याभल्यांना उलगडले नाही...व्यवसायातून समाजकार्य या उद्देशाने मुंबईत नुकत्याच सुरू झालेल्या ‘बिइंग ह्युमन’ क्लोदिंग लाइन स्टोरच्या निमित्ताने शाहरुख-आमिरच्या तुलनेत अभिजनांच्या दुस्वासाचा धनी ठरत गेलेल्या सलमान खानचा वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही अंगांनी रेखाटलेला हा मर्मग्राही आलेख..
सलमान खान आणि सोहेल खान यांनी ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटासाठी धर्मेंद्रला काजलच्या बापाच्या रोलसाठी बोलावले, तेव्हा तो योगायोग नव्हता. इतरांना ठाऊक असो वा नसो; पण सलमान खानला पूर्ण माहीत आहे की तो धर्मेंद्रच्या लिगसीचा हक्कदार आहे. दिलीपकुमारच्या अभिनयशैलीला प्रथम फॉलो करत आणि मग स्वत:चे ‘हीमॅन’ स्कूल डेव्हलप करत धर्मेंद्रने जो सातत्याचा चमत्कार घडवला आहे, तो बॉलिवूडमध्ये कोणालाही जमलेला नाही. धर्मेंद्रने हेमामालिनीबरोबर तर सलमान खानने ऐश्वर्या राय, कतरीना कैफबरोबर म्हणजे, त्या त्या काळच्या ड्रीमगर्लबरोबर रोमान्स केला. सलमानही मिथुन चक्रवर्ती, सगळे खान, ऋतिक रोशन, रणबीर कपूर या सगळ्यांना तोंड देत आजही हिरोचे काम करतो आहे.
धर्मेंद्र आणि सलमान खानच्या या सातत्याचे रहस्य काळाप्रमाणे ताबडतोब स्वत:ला उत्क्रांत करण्यात आहे. उदाहरणार्थ, नवीन अ‍ॅक्शन शैलीत केबल फाईट्सचा उदय झाल्यावर सलमान खानने ती ताबडतोब आत्मसात केली. सलमान खानची ही नवीन गोष्टी शिकण्याची उमेद सहजासहजी डोळ्यात भरत नाही, कारण ‘बिग बॉस’प्रमाणे त्याचा तल्लख मेंदू हा नेहमी कॅमे-यासमोर अप्सेंट असतो आणि कॅमे-यात दिसते ते त्याचे साधारण बुद्धिमत्तेचे खोटे पैलवानी रूप. ज्यामुळे सलमान खान हा नाठाळ खान वाटायला लागतो आणि सलमानची सगळी ताकद ‘शारीरिक’ आहे, असा गैरसमज पसरायला लागतो. खरे तर स्वत:चे शरीर नीट कळलेला आणि त्याला अत्यंत प्रभावीपणे सादर करणारा सलमान खान हा एकमेव अभिनेता आहे.

शरीरविषयक जाण ही प्रामुख्याने नैसर्गिक, व्यायामाधारित, वैद्यकीय, अभिनय अशा चार पातळ्यांवर असते. सलमान खान हा या चारही पातळ्यांचा मास्टर आहे. त्यामुळेच तो अभिषेक बच्चनपासून ते अर्जुन कपूरपर्यंत सर्वांना जिम किंवा एक्सरसाईजविषयी मार्गदर्शन करतो. अभिनयात आपल्या शारीरिक मुद्रांद्वारे निष्काळजीपणाचे नाटक करत असला तरी तो दुस-या बाजूला स्वत:च्या शारीरिक स्वास्थ्याची अत्यंत व्यवस्थित काळजी घेतो. शरीराच्या बाबतीत तो सर्व खानांचा बाप आहे व त्याची खरी ताकद इथेच आहे. शेवटी शरीर हे अभिनयाचे माध्यम आहे आणि कवी जसा भाषेवर प्रभुत्व ठेवतो तसाच सलमान खान हा आपल्या शारीरिक भाषेवर प्रभुत्व ठेवतो. त्यामुळेच 48व्या वर्षीही 24 वर्षांच्या युवकाप्रमाणे दिसणारा सलमान खान हा बॉडिबिल्डिंगचा भारतीय आदर्श ठरतो.

सलमान खानचे तत्त्वज्ञान काय आहे? किंबहुना तसे ते आहे का? भारतात आणि जगातही हजारो वर्षे गौतम बुद्ध हा सर्वात प्रभावी दार्शनिक म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्यक्षात समस्त जनता जनार्दनापैकी 90 टक्के लोक मक्खली गोशालकचे फॉलोअर्स आहेत. गोशालकच्या मते, ‘सर्व काही नियतीच घडवते आणि माणूस नियत झालेला आहे. त्याला कसलेही स्वातंत्र्य नाही. सर्व काही आधीच ठरलेले आहे. त्याप्रमाणेच सर्व काही होते आहे. आणि भविष्यात जे होणार ते आधीच ठरलेले असणार आहे.’ हा गोशालकच्या नियतीवादाचा पाया आहे. विधिलिखित हा शब्दच गोशालकाचा. त्याच्या या तत्त्वज्ञानाचा प्रभाव ग्रीक, रोमन, भारतीय असा सर्वत्रच पडला. गौतम बुद्धाने त्याच्याशी प्रचंड वाद घालूनही गोशालकाने आपले मत बदलले नाही. (गोशालक गौतम बुद्धाला सिनियर होता.) उलट गौतम बुद्धाला ‘तुझे बुद्ध बनणे हीही तुझी नियती आहे’ असे गोशालकाने सांगितले. हा प्रभाव इस्लामवरही प्रचंड प्रमाणात पडलेला असल्याने इस्लामची श्रद्धा अशी आहे, की सर्व काही अल्लानेच लिहिलेले आहे. सलमान खानच्या जगण्याचे तत्त्वज्ञान हे गोशालकाचे तत्त्वज्ञान आहे. त्याच्या मते, ‘त्याचा आता चांगला काळ आहे म्हणून पिक्चर चालताहेत. वाईट काळ आला की चांगले चित्रपटही आपटतील. (याचे उदाहरण म्हणून सलमान खान नेहमी ‘अंदाज अपना अपना’ ( दिग्दर्शक राजकुमार संतोषी) या चित्रपटाचे उदाहरण देतो. हा आपटला पण नंतर कल्ट सिनेमा झाला.) कारण सर्व काही अल्लालिखित आहे.’ आपल्याकडच्या बुद्धिवादी विचारवंतांची या नियतीवादाविरोधात सतत ओरड चाललेली असते. त्यामुळे सलमान खानला डायजेस्ट करणे अधिक अवघड जाते. गमतीची गोष्ट अशी, की सलमान खान जेवढी मेहनत करतो तेवढी मेहनत नियतीवादी मंडळींपैकी फार थोडे लोक करतात. उदाहरणार्थ, ‘एक था टायगर’च्या वेळी सलमानचा संपूर्ण चेहराच हँडिकॅप्ड झाला होता. तरीही अभिनय करताना आपल्या सर्व वेदना लपवत त्याने हा चित्रपट पूर्ण केला व मगच तो अमेरिकेला गेला. त्याच्या मते, हे सर्व होणे ही त्याची नियतीच होती. शूटिंगच्या वेळी चेहरा डॅमेज झाला असता तर... यावर त्याचे उत्तर ठरलेले आहे, ‘अल्ला की मर्जी.’ आपल्या यशाचे श्रेयही तो नशिबाला देतो. त्याच्याच भाषेत सांगायचे तर ‘कमसे कम हजार अ‍ॅक्टर्स मुझ से बेटर अभिनय कर रहे है मगर सलमान खान बनना मेरे नसीब में लिखा था इसलिए मै सलमान खान हूँ।’ या गोशालकी भूमिकेमुळेच सलमान खान हीट आणि फ्लॉपच्या टेन्शनपासून मुक्त आहे. कारण एकच, सर्व नशिबाच्या अधीन! चित्रपट चालला तरी नशिबामुळेच आणि पडला तरी नशिबामुळेच. याचा एक फायदा सलमानला असा होतो, की त्याचा चित्रपट पडला तरी सलमान खानला त्याचे अपश्रेय जात नाही. मिस्टर अँड मिसेस खन्ना, वीर, युवराज या चित्रपटांच्या मेगाफ्लॉप होण्यामुळेही सलमानच्या करिअरवर काहीही परिणाम झाला नव्हता. याचा आणखी एक फायदा असा, की सलमान खान दिग्दर्शक फार काळजीपूर्वक निवडतो. चांगल्या दिग्दर्शकांच्या मागे लागतो. (‘दबंग-2’साठी त्याने अभिनव कश्यपला तब्बल 20 फोन केले होते.) आपल्या चित्रपटाचे संगीत दर्जेदार व्हावे म्हणून रात्ररात्रभर संगीत दिग्दर्शकाबरोबर राबतो. त्याचा परिणाम चित्रपटाची गुणवत्ता वाढण्यात होतो. शिवाय हे राबताना फळ नशिबाच्या हाती असल्याने फक्त कर्म करत राहण्याची वृत्ती बळावते. हा एका अर्थाने कर्मयोग आहे आणि सलमान खानला तो उत्तम साधला आहे.

सलमान खानच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक आकर्षक पैलू म्हणजे, त्याची पॉझिटिव्ह भावनाशीलता. याच पॉझिटिव्ह भावनाशीलतेपोटी तो स्वत:च्या चित्रपटासाठी कंपोज झालेले ‘पो पो पो’ हे गाणे अजय देवगणच्या ‘सन आॅफ सरदार’साठी दोस्तीखात्यात देऊन टाकतो. सलमान खानची ही दिलदारी व मैत्रीची जाणीव बॉलिवूडला चिरपरिचित असल्यानेच त्याच्या एका कॉलसरशीच बॉलिवूडच्या ए टू झेड टॉप अ‍ॅक्ट्रेस आपापसातली भांडणे विसरून त्याच्याबरोबर कॅटवॉक करायला येतात. आणि स्पॉटबॉयलासुद्धा आपण अडचणीत असू तर सलमानभाई आपल्याला मदत करणार, याची खात्री असते.

‘मला फक्त दहा लाख रुपये कमवायचे होते. त्यामुळे त्या दहा लाखाच्या वर मिळालेले सर्व पैसे बोनस आहेत. ते मी पब्लिकमध्ये वाटले म्हणून काय बिघडले?’ असा प्रश्न सलमान खान नेहमीच करतो. त्याच्या रिअ‍ॅलिटी शोमधला बहुतांश पैसा हा डोनेशनमध्येच जातो. त्यामुळे त्याच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच सलमान खानचे मीडियाच्या दृष्टीने निगेटिव्ह भावनाशीलतेचे उद्रेक म्हणून अनेक प्रसंग मीडियाकडून पब्लिकपुढे आणले गेले आहेत. अशा कित्येक प्रकरणांत सलमान खान हा व्हिलन म्हणून दिसतो. पण सामान्य माणूस मात्र त्याला व्हिलन मानत नाही. सलमान खानच्या ज्या गाडीखाली रस्त्यावरचे लोक सापडले ती गाडी सलमान खानचा ड्रायव्हर चालवत होता, असे सलमान खानचे म्हणणे. ड्रायव्हरच्या चुकीचे खापर माझ्या डोक्यावर का फोडले जाते, असा संतप्त सवालही तो करतो आणि फिलॉसॉफिकल होत स्वत:चे उत्तरही देतो, की ‘हे सर्व घडले ही अल्लाची मर्जी आहे. अल्लाला लोकांना हे सांगायचे होते, की दारू पिऊन गाडी चालवली तर सलमान खानलाही अटक होते. त्यामुळे जिथे सलमान खानही कायद्यापुढे वाचत नाही तिथे तुम्ही काय वाचणार! तेव्हा कृपया दारू पिऊन गाडी चालवू नका. कायदा मोडू नका. हा मेसेज देण्यासाठी अल्लाने सलमान खानची निवड केली व हा अपघात घडला.’ आता या फिलॉसॉफिकल स्पष्टीकरणापुढे तुम्ही काय युक्तिवाद करणार किंवा कतरीना कैफच्या संदर्भात ‘अगर ओव्हरएक्स्पोज करेगी तो थोडेही सह लूँगा?’ हा त्याचा प्रश्न सामान्य माणसाला आवडतो, कारण सामान्य माणसालाही आपल्या गर्लफ्रेंडने अंगप्रदर्शन केलेले चालत नाही. त्यामुळेच सलमान खानचे युक्तिवाद हे विचारवंतांना पटलेले नसले तरी सामान्य माणसांना पटलेले असतात आणि त्यांना आपला सलमानभाई करेक्टच वाटतो. त्याच्या लोकप्रियतेच्या कारणांमध्ये सामान्य माणसांच्या बौद्धिक कुवतीशी त्याचे जुळलेले हे कनेक्शनही जबाबदार आहे.

थोडक्यात काय, सलमान खान हा सामान्य माणसांचा सुपरस्टार आहे. तो आमीर खानप्रमाणे एलिट नाही किंवा शाहरूख खानसारखा रोमँटिक स्वप्नांचा बादशहाही नाही. तो ‘मॉबचा मिडिया’ आहे. त्याला वाचणे म्हणजे मॉब वाचणे. जोपर्यंत मॉब आहे आणि या मॉबचा सलमान खानला पाठिंबा आहे, तोवर कुणी कितीही डोक्यावरचे केस उपटले तरीही सलमान खानची लोकप्रियता अबाधित आहे, अबाधित राहणार आहे.
दानवीर कर्ण
के. बालचंदर या दिग्दर्शकाचे दोन शिष्य. एक अ‍ॅक्टिंगचा बादशहा तर दुसरा स्टाईलचा सम्राट. यातल्या स्टाईलचा सम्राट असणा-या रजनीकांतने आपला मित्र अभिनयाचा बादशहा कमल हसनवर मात केली. हा चमत्कार कसा घडला, त्याचे उत्तर रजनीकांतच्या ‘फिलँथ्रॉपिक नेटवर्क’मध्ये दडलेले आहे. रजनीकांतला आपल्या अभिनयाच्या कुवतीबद्दल नीट जाण असल्याने त्याने आपल्या चाहत्यांना गरजेनुसार वैद्यकीय, आर्थिक अशी मदत करायला सुरुवात केली. हळूहळू रजनीकांतच्या दानशूरतेचा विस्तार इतका वाढत गेला, की तामिळनाडूच्या लोकसंख्येपैकी तब्बल 10 टक्के लोक त्या नेटवर्कशी जोडले गेले. या दहा टक्क्यांची फॅमिली मेंबरशिप व मित्रपरिवार यामुळे रजनीकांत हा जवळजवळ 40 टक्के तामिळींशी थेट जोडला गेला आणि हेच लोक रजनीकांतचा प्रत्येक चित्रपट किमान दोन आठवडे हाऊसफुल करू लागले. यामध्ये रजनीकांतला मानधन म्हणून मिळालेल्या रकमेपैकी जवळजवळ 70 टक्केरक्कम रजनीकांत लोकांनाच परत करू लागला. त्यामुळे एका अर्थाने लोकांकडून मिळालेले पैसे हे पुन्हा लोकांच्यातच परत गेले. यामुळे रजनीकांत हा फिनॉमिना झाला. सलमान खानने रजनीकांतचाच आदर्श उचलल्याने त्याने सुरुवातीला आपल्या फॅन्सना आजारपणात मदत करायला सुरुवात केली. रजनीकांतप्रमाणेच दानवीर बनत आपल्या मानधनातले 50 टक्के पैसे वेगवेगळ्या एनजीओमार्फत व स्वत:च्याही एनजीओमार्फत लोकांत वाटायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला, की मुंबई व महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ 14 लाख लोक हे या ना त्या कारणाने सलमान खानच्या दानशूरतेशी जोडले गेले आहेत. त्यामुळेच ‘दबंग-2’सारखा साधारण कथा असलेला चित्रपटही 144 करोडचा धंदा करून जातो.
shridhartilavepublic@gmail.com