आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉबनायकाची शोकांतिका!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतातील सर्वात गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट व्यक्तिमत्त्व कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे, महारथी कर्ण. एका बाजूला अत्यंत पारदर्शक, दानशूर, उत्तम योद्धा, कुशल राज्यकर्ता असलेल्या कर्णाला द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी स्वत:च्या मनाचा समतोल सांभाळता आला नाही आणि एका अत्यंत ‘रॅश इमोशनल ड्राइव्ह’मध्ये तो जे काही बोलून बसला आणि करून बसला, त्याने त्याचे संपूर्ण आयुष्यच मलीन झाले. सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी ठरलेल्या दिलदार, ‘यारों का यार’ अशी ओळख असलेल्या ‘मॉबनायक’ सलमान खानच्या शोकांतिकेकडे पाहताना नेमके असेच जाणवत राहते...
एकीकडे दानशूर, दिलदार म्हणून गौरवलेला, गरिबांविषयी कळवळा बाळगणारा, असा एक सलमान खान आहे; आणि दुसरीकडे खटल्याच्या निकालानंतर थेटपणे सामोरा आलेला काहीसा आक्रमक आणि संवेदनाशून्य आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करणारा सलमान खान आहे. एकाच व्यक्तिमत्त्वाचे हे दोन चेहरे आहेत. यातला खरा चेहरा कुठला, अशी चर्चा येती दहा वर्षे होणे अटळ आहे. कारण भारतीय न्यायव्यवस्थेचा वेग पाहता आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशी सलमानला उपलब्ध असलेली पुढील दोन न्यायालये पाहता आणि या दोन्ही न्यायालयांचा किमान पाच वर्षांचा कालावधी गृहीत धरला तर साधारण २०२५पर्यंत तरी ही केस चर्चेत राहणे अटळ आहे. यदाकदाचित अण्णा हजारे यांनी सुचवलेले ‘ज्युडिशियल स्टॅण्डर्ड आणि अकाउंटेबलिटी’ हे बिल पास झालेच, तर कदाचित चार वर्षे कमी होऊ शकतील. असो.

सलमान खानला सेलिब्रिटी स्टेटसमुळे हे सर्व भोगावे लागले आहे काय? या अंगाने आलेल्या बॉलीवूडवाल्यांच्या प्रतिक्रियांना मीडियाने बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण मानलेले स्पष्टच दिसते. पण ज्यांना बॉलीवूड हे कसे एखाद्या टोळी(Tribe)सारखे काम करते हे माहीत आहे, त्यांना बॉलीवूडमधल्या प्रतिक्रियांचे आश्चर्य वाटणार नाही. सेलिब्रिटी स्टेटसचे सगळे फायदे उपटायचे आणि त्या स्टेटसचा एखादा विघातक परिणाम झाला की प्रचंड आरडाओरडा करायचा, ही बाॅलीवूडची प्राचीन परंपरा आहे. पण आयुष्यात कुठलीही गोष्ट पॅकेज डील म्हणून येते, हे लक्षात घेतले तर असा आरडाओरडा करण्यात काहीच अर्थ नाही, हे स्पष्टपणेच कळू शकते. अर्थात, एका बाजूला सलमान खान हा सेलिब्रिटी स्टेटसमुळेच या प्रकरणात अधिक तीव्रपणे अडकला, यात शंभर टक्के सत्य नसले तरी काही प्रमाणात सत्य उरतेच. उदाहरणार्थ, सर्वसाधारणपणे अशा केसमध्ये गुन्हा घडला की, वकील लोक ती व्यक्ती गुन्ह्याच्या जागी हजरच नव्हती, अशा युक्तिवादाने प्रतिवादाला सुरुवात करतात. परंतु सलमान खानला
अनुपस्थितीचा युक्तिवाद करता येणे शक्यच नव्हते. याला कारण त्याचे सेलिब्रिटी स्टेटसच होते. त्याची अनुपस्थिती दर्शवण्यासाठी अपघात झाला तेव्हा तो पाणी प्यायला गाडीबाहेर गेला होता, अशी एक थिअरी मांडली गेली; जी बालिशच सिद्ध झाली. कारण सेलिब्रिटीला तहान लागली तर त्याच्या गाडीत पाणी नसते. यावर कोण विश्वास ठेवणार? शिवाय पाणी हवेच असेल तर सेलिब्रिटी स्वत:हून पाणी आणायला गाडीतून उतरत नाही, हे सेलिब्रिटीविषयीचे तथ्य सलमानला उघडे पाडून गेले. पण या सगळ्या केसचा प्रमुख आधार ठरला, तो रवींद्र पाटील आणि त्यांची लिखित साक्ष. रवींद्र पाटील यांचे आगमनही सलमान खान सेलिब्रिटी असल्यामुळेच झालेले होते. हीच गोष्ट अल्कोहोलबाबतच्या मुद्द्याबाबत झाली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान खानने स्वत:च कबूल केले होते की, त्या रात्री त्याने बाकार्डी प्यायली होती. आता हे सर्व छापील स्वरूपात उपलब्ध असताना नंतर मी दारू प्यायलो नव्हतो, असं म्हणण्यात काही अर्थच नव्हता. सेलिब्रिटी स्टेटसमुळे दिलेला इंटरव्ह्यू अशा रीतीने महागात पडणे, स्वाभाविक होते.

एका बाजूला खटला योग्य रीतीने चालला आहे की नाही, याचे अनेक तपशील या खटल्याचा अचूकपणे पाठलाग करत मीडियाने नोंदवले. साहजिकच न्याय मिळावा म्हणून दबाव निर्माण झाला. सामान्य माणसाचा मृत्यू हादेखील कुठल्याही सेलिब्रिटीइतकाच महत्त्वाचा आहे. इतकी मूलभूत मानवता तरी आपल्याला अवगत असलीच पाहिजे. ही मानवता बॉलीवूडच्या ठायी नाही, हे अंडरलाइन करण्यातही मीडियाचा सिंहाचा वाटा होता. थोडक्यात, सलमान खानचे सेलिब्रिटी स्टेटस हे त्याला जसे न्याय लांबणीवर टाकायला मदत करते झाले, तसेच निकाल देणा-या आदरणीय न्यायपालि केलाही मदत करते झाले. पण मुळात सेलिब्रिटी स्टेटसमुळे कायद्यात काही सुटका मिळावी, अशी अपेक्षा स्वत: सलमान खानने कधीही व्यक्त केलेली
नव्हती. किंबहुना न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य असेल, असे त्याने निखिल वागळे यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

बॉलीवूडमध्ये सध्या चर्चेला असलेला दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे, सलमान खानचे व्यक्तिमत्त्व या घटनेला कितपत जबाबदार आहे? त्याचा चांगुलपणा, दानशूरपणा, दिलदारपणा सर्वांना मान्य आहे; पण तरीही सलमान खान अपघातप्रसंगी असा का वागला, हा इथे वारंवार निर्माण होणारा प्रश्न आहे. विल्यम शेक्सपिअरने ‘कॅरेक्टर इज डेस्टिनी’ असे म्हटले आहे. सलमान खान आणि संजय दत्त या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचे अवगुण म्हणजे, बेफिकिरी (केअरलेसनेस) आणि बेपर्वाई (कॅज्युअलनेस). एरवी मनाने चांगली असणारी ही दोन माणसे या दोन गोष्टींमुळे वारंवार गोत्यात सापडलेली दिसतात. कलावंत हा भावनाशील असतो, पण कधी कधी त्याची भावनाशीलता बुमरँगसारखी त्याच्यावर उलटते. अनेक कलावंत त्या-त्या क्षणातल्या भावनेत वाहात जातात. सलमानच्या बाबतीतही असेच घडले असल्याची दाट शक्यता आहे. ‘रॅश ड्रायव्हिंग’पोटी पुढे काय होणार, याची त्याने कल्पनाही केली नसावी. नेहमीच्या टीपिकल फिल्मीपणात त्याने हा निर्णय घेतला असावा. आणि काही समजायच्या आतच हे सर्व घडून
गेलेले असावे. अशा वेळी माणूस भान राखून जे अपघातात सापडलेत त्यांना इस्पितळात घेऊन जातो किंवा भय ही भावना दाटून येऊन, तो परिस्थितीला तोंड न देता पळून जातो. सलमान खानच्या मनातही कदाचित प्रचंड भय दाटले असावे आणि परिस्थिती तशीच सोडून तो तिथून
निघाला असावा.

कलावंतांकडे तर्कसुसंगतपणा नसतो. त्यातच या सगळ्याला सर्वात मोठे कारण ठरलेली दारू त्याने घेतली होती. त्यामुळे आधीच तर्कविसंगत आचार-विचार, अंगी बेफिकिरी आणि बेपर्वाई, त्यात ‘रॅश ड्राइव्ह’ची उबळ आणि दारू प्यायलेली यातून हे सर्व शोकात्म नाट्य घडले. आपण जे काही करतो त्याचे रूपांतर एखाद्या निर्हेतूक हत्येमध्ये होत असेल, तर त्याला कुठल्याच संस्कृतीत क्षमा नसते. बॉलीवूड एवढीही एक मूलभूत गोष्ट जरी शिकले, सलमान खानमुळे किती करोडचे नुकसान झाले, हे सांगण्याबरोबरीनेच सर्वसामान्य माणसांच्या प्राणांचाही कळकळीने हिशेब मांडला तरी खूप झाले, असे म्हणता येईल.
आपण सगळेच सलमान!
टोकाचं नैराश्य आणि आसुरी आनंद या दोन परस्परभिन्न भावना. टोकाचं नैराश्य अनुभवत होते, सलमान आणि त्याचे कुटुंबीय; आणि काहीसा आसुरी आनंद मिळवत होता, टीव्हीचा प्रेक्षक बनलेला उर्वरित समाज. हेवा वाटावा असे सेलेब्रिटी स्टेटस, उदंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी यातून निर्माण झालेल्या अहंकारयुक्त असुरक्षिततेतून, स्वत:चा बचाव करताना एका पाठोपाठ एक चुका होत गेल्या आणि त्यातूनच सलमान खानच्या वाट्याला नैराश्याचा क्षण आला, बहुधा. हे खरे की, संवेदनशील याचिकाकर्त्यांचा चिवटपणा आणि मीडियाचा अशिष्टपणा यामुळे खटला निर्णयाप्रत पोहोचला; पण यात आसुरी आनंद घेण्यासारखे काय होते? तसा आनंद अनेकांना झाल्याचे दिसले. ‘खूप माजलेत सिनेस्टार, रस्ता यांच्या बापाचा, गाडी यांच्या बापाची, पोलिस आणि कायदाही यांच्या बापाचाच... आता खडी फोडत बसा तुरुंगात...’ ही निकाल लागल्यानंतरची कॉमन रिअॅक्शन. यामागे कायद्याबद्दलचा आदर होता की, ‘लॅव्हिश’ जीवनशैली जगत असलेल्या सलमानसारख्या सेलेब्रिटींचा वाटणारा द्वेष? काही का असेना, यातून काय झळकले? आपण कायदाप्रिय, समान न्यायप्रिय आणि तो सलमान कायद्याबद्दल टोकाचा अनादर असलेला अहंकारी, आक्रमक नि उद्दाम नट? पण अहंकार काय फक्त सलमानलाच असतो? आक्रमक नि उद्दाम काय फक्त सलमानच असतो? मग चेहरा नसलेला, तथाकथित ‘नाकासमोर चालणारा’ समाज अहंकारमुक्त असतो? रस्त्यावर पोलिस नसताना रेड सिग्नल न तोडणारा असतो? घराच्या व्यवहारात काळ्या-पांढ-याचा हिशेब न मांडणारा असतो? रस्त्यावरचे अपघात, घरगुती वा सार्वजनिक तंट्यात ओळखीतल्या अधिकारी-नेत्याचा वशिला वापरून ‘सेटलमेंट’ न करता प्रामाणिकपणे गुन्हा कबूल करणारा असतो? दारू न पिऊन गाडी चालवणारा असतो? खरं तर स्टेटस असो वा नसो; चेहरा असो वा नसो; एका पातळीवर संधी मिळाली की, आपण सगळेच सलमान होत असतो. पण हे मान्य आहे, सलमान खटल्याची संधी साधून सेलेब्रिटींचा माज काढणा-या समाजाला आणि या समाजातल्या तमाम धुरीणांना? न्यायाची असह्य प्रतीक्षा सलमान खानचे स्टेटस, मीडिया आणि जनहितयाचिकाकर्त्यांचा चिवट पाठपुरावा यामुळे १३ वर्षांत का होईना, सत्र न्यायालयाच्या पातळीवर हिट अँड रन प्रकरणात निकाल लागला. परंतु देशातली सध्याच्या प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता, न्यायाधीशांनी विनाविलंब, प्रत्येक तासाला १०० खटले हातावेगळे करण्याचा टोकाचा प्रयत्न केला तरीही बॅकलॉग भरून काढण्यास ३५ हून अधिक वर्षे लागतील.
त‍िळवे यांचा मागील लेख वाचण्‍यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-on-mob-hero-by-shridhar-tilve-4988606-NOR.html
shridhar.tilve1@gmail.com
बातम्या आणखी आहेत...