आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपट बोलू लागले...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्ता बदलली, ती स्थिर होण्याची चिन्हं दिसू लागली, की सत्तेशी आणि सत्ताधा-यांंशी जुळवून घेणा-यांची जमात डोकं वर काढू लागते. ती संधीच शोधत असते, सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याची...
मोदी सत्तेत आले, त्यांच्या सत्ताग्रहणाला दीडशे दिवस पूर्ण झाले, केंद्रातलं सरकार मोदींच्या व्यक्तिगत करिष्म्यानं आलं, असं म्हणणा-यांना महाराष्ट्र् आणि हरियाणाच्या निवडणुकीतला मोदीकरिष्मा दिसू लागला, तेव्हा पुढली सत्तासूत्रं जमविणा-यांची आणि वळचण गाठणा-यांची मोठीच प्रभावळ मोदी सरकारभोवती जमू लागल्याचं प्रकर्षानं जाणवू लागलं...
गेल्या आठवड्यातल्या दोन घटना ही प्रभावळ जमू लागल्याच्या निदर्शक होत्याच; परंतु सत्तासोपानावर बसता यावं, सत्तावृक्षाची सावली प्राप्त करता यावी, यासाठी प्रयत्न करणा-यांची खूणगाठ पटवणा-या होत्या. यातली पहिली घटना होती जम्मू-काश्मीरची.
जम्मू-काश्मीर आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच झाली आहे. मोदी-शहा करिष्मा महाराष्ट्र-हरियाणाप्रमाणे जम्मू-काश्मीर, झारखंडवरही जादू करणार, याचा अंदाज राजकीय वर्तुळाला येऊ लागल्यामुळेच मोदी-शहांचं गुणगान करणा-यांची आणि भाजपत प्रवेश करणा-यांची रांग लागताना दिसू लागली आहे.
काश्मीरमधील नौशेरा-लाम विभागातील मौलवी इमाम इखलाक अहमद नक्षबंदी हे अशा रांगेत उभे राहिलेले पहिले. गेल्याच आठवड्यात जम्मूमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात नक्षबंदींनी भाजपत अधिकृतरीत्या प्रवेश केला. भाजप प्रामाणिकपणे विकासाला बांधलेला पक्ष आहे, याचा शोध तर नक्षबंदींना लागलाच; परंतु भाजप प्रादेशिक-जातीय-धार्मिक निकषावर काम करीत नाही, तो खरोखरीच धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, याचाही साक्षात्कार झाल्याचा कबुलीजबाब त्यांनी दिला.
भाजपप्रेमाच्या रांगेत उभे असलेले दुसरे नेते म्हणजे, उत्तराखंडाचे राज्यपाल अझीझ कुरेशी. कुरेशी राज्यपाल झाले ते यूपीए सरकारच्या काळात. यूपीएचे बहुतांश राज्यपाल पदे रिकामी करून निघून गेले, परंतु कुरेशी मात्र अजून खुर्ची टिकवून आहेत. वास्तविक पाहता, याच कुरेशींनी राज्यपालपद सोडण्यासाठी मोदी सरकारची सूचना आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेलं त्यांचं ते प्रकरण अजून संपलेलं नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयही आपल्याला फार काळ खुर्ची उपभोगू देणार नाही, याचा अंदाज आल्यानेच बहुधा कुरेशींनी मोदीराग आळवण्यास प्रारंभ केला आहे. गोहत्या करणं कसं पाप आहे, गोहत्या करणा-यांना भारतीय म्हणवून घेण्याचा अधिकार कसा नाही, त्यांनी भारतात राहणं कसं अयोग्य आहे, गाय ही कुरेशी समाजाची माता कशी आहे, कोट्यवधी मुस्लिमांच्या भावना गायीशी कशा जोडल्या गेल्या आहेत, गोहत्या करणं म्हणजे कायद्याचीच हत्या करणं कसं आहे, वगैरे वगैरे गोष्टी उच्चरवानं आळवण्यात कुरेशी सध्या गुंगून गेले आहेत. यूपीएनं आणि कॉँग्रेस पक्षानं कुरेशींचं हे मोदी राग आळवणं म्हणजे पदावर राहण्याची अंतिम धडपड असल्याचं म्हटलेलंच आहे. त्यांचं ते प्रतिपादन कितपत खरं, हे नजीकचा काळच ठरवेल.
एका सहस्रकाला अभिवादन...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तामिळनाडू शाखा ९ नोव्हेंबरचा आजचा रविवार वर्षप्रतिपदेसारखा भव्यदिव्य स्वागत यात्रा काढून साजरा करते आहे. ९ नोव्हेंबर ही तारीख इतिहासप्रसिद्ध चोला राजघराण्यातील कर्तृत्ववान राजा राजेंद्र याच्या राज्याभिषेकाला एक हजार वर्षे पूर्ण होत असल्याची तारीख. राजेंद्रचे पिताश्री म्हणजे पहिले राज राज हयात असतानाच त्यांनी राजेंद्रची नियुक्ती युवराज म्हणून केली होती, ते वर्ष होतं १०१२. राज राज यांचं निधन झालं १०१८मध्ये, परंतु तत्पूर्वीच १०१४मध्ये राजेंद्र यांनी सत्तासूत्रे स्वीकारली आणि स्वत:ला राज्याभिषेकही करवून घेतला. त्या राज्याभिषेकाचंच हजारावं वर्ष म्हणजे २०१४-१५.
चोल वंश हा दक्षिण हिंदुस्थानातील एक प्राचीन राजवंश. सम्राट अशोकाच्या शिलालेखात चोलांचा स्वतंत्र देश, असा उल्लेख सापडतो. श्रीरंगमचा कावेरीवरचा कालवा ही त्यांचीच निर्मिती. तंजावर ही त्यांचीच राजधानी. चोल वंशाची अधिकृत नोंद आढळते ती इसवीसन ८५० पासून. तेव्हापासून इसवीसन ९८५ पर्यंतच्या चोल घराण्याच्या वाटचालीची फारच अल्प माहिती इतिहासात आढळते. मात्र इसवीसन ९८५मध्ये सिंहासनावर आलेल्या राज राजनं चोल घराण्याला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली.
त्यानं केरल आणि पांड्य राजांचा पराभव केला, मालदीव बेट जिंकलं, श्रीलंकेवर स्वारी करून त्यांचा उत्तर भाग आपल्या अधिपत्याखाली घेतला. वेंगीच्या सिंहासनावर आपल्या हस्तकाला बसवलं, जमाबंदी खात्यातल्या सुधारणा, तंजावरच्या राजराजेश्वर किंवा बृहदीश्वर मंदिराची निर्मिती त्याच्याच कार्यकाळातली. राजेंद्र हा त्याचा मुलगा. राज राजनं आपल्या हयातीतच राजेंद्रला युवराज म्हणून नेमलं. पित्याइतकाच थोर निघालेल्या राजेंद्रनं उत्तरेत गंगानदीपर्यंत दिग्विजय केला; जाताना कलिंग, दक्षिण कोसल, बंगालच्या राजांना पराभूत करून त्यांना गंगेचं पवित्र जल वाहायला लावलं.
राजेंद्रनेही गंगेकोंडचोळपुरम नावाची राजधानी वसवली, तिथे देवालयं-प्रासाद बांधले. वेदांच्या अध्ययनासाठी विद्यालय स्थापन केलं आणि शेतीसाठी उपयोगी पडावा म्हणून २६ किलोमीटर लांबीचा गंगासागर नावाचा तलाव खोदला. त्यानं बापापुढे जाऊन आपल्या आरमाराच्या साहाय्यानं जावा, सुमात्रा, मलाया द्वीपकल्प यावर स्वारी करून तत्कालीन शैलेंद्रांच्या राजधानीचा विध्वंस केला. उत्तरेस गंगेपासून दक्षिणेस श्रीलंकेपर्यंत आणि पूर्वेस मलायापर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्याचा तो अधिपती बनला. १०१४ ते १०४४ अशी तीस वर्षांची त्याची कारकीर्द. त्यातल्या १०१४ या राज्याभिषेकाच्या वर्षाचं यंदा हे सहस्रावं वर्ष.
इसवीसन ८५० ला सुरू झालेलं चोल वंशाचं राज्य इसवीसन १२७९मध्ये, म्हणजे तब्बल ४२९ वर्षांनी संपुष्टात आलं. तिसरा राजेंद्र हा चोल घराण्याचा शेवटचा वंशज. १२७९मध्ये तिसरा राजेंद्र पांड्य नृपतीचा मांडलिक बनला, तर इसवीसन १३१०मध्ये चोल राज्यावर अल्लाउद्दीनचा सेनापती मलिक काफूर यानं स्वारी करून ते राज्य संपूर्णपणे संपवूनच टाकलं. चोल राजांनी विविध कलांना, धर्माला आणि विद्येला आश्रय दिला. राजराजेश्वर देवालय हा त्यांच्या कारकीर्दीतील बांधकामांचा उत्तुंग बिंदू. चोल राजे शिवोपासक, त्यांनी देवालयातील मूर्तिपूजेत सुधारणा घडवून आणली, देवालयं अंत्यजांना खुली केली. चोलांच्या दरबारी विद्येला तर आश्रय होताच. तामिळ आणि संस्कृतमधील असंख्य ग्रंथांची निर्मिती याच काळात झाली. कंबन कवीचं रामायण हे त्यातलंच एक. राज्याभिषेकाच्या या सहस्राव्या वर्षाच्या निमित्तानं आज, ९ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूभर संघ स्वयंसेवक तसेच नागरिकांचा सहभाग असलेली पथसंचलनं निघणार आहेत, मिरवणुका काढल्या जाणार आहेत.
रा. स्व. संघाचे सरकार्यवाह सुरेश तथा भय्याजी जोशी यांनी तसे आवाहनच तामिळनाडूवासीयांना केले आहे.

sumajo51@gmail.com