आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीम बिस्मिल कई होंगे, कई बेजॉं होंगे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नावक अंदाज जिधर दीदा-ए-जानां होंगे
नीम बिस्मिल कई होंगे, कई बेजां होंगे
मोमीनखाँ मोमीन यांच्या सोप्या तरीही गहि-या आणि स्वतंत्र शैलीतील गजला अनेक गायकांनी गायल्या आहेत. मात्र ही गजल माझ्या माहितीप्रमाणे, फक्त मेहंदी हसन यांनीच गायलेली आहे.
मोमीन संपन्न घरात जन्मले आणि दिल्ली दरबारात हकीम (वैद्य) असलेल्या वडलांकडून त्यांच्या शिक्षणावर भरपूर खर्च झाला. ते स्वतः हकीम बनले. त्यांनी इतिहास, संगीत, खगोलशास्त्र आणि गणिताचेही शिक्षण घेतले. बुद्धिबळातील त्यांचे प्रावीण्य लोकमान्य होते.
त्यांच्या शायरीत प्रेम, सौंदर्य यांचे पूजन दिसते. आयुष्यातल्या खडतरपणाकडे मिश्कीलपणाने बघण्याचा निराळा अंदाज दिसतो. म्हणूनच त्यांची उपरोधिक भावात व्यक्त होण्याची तऱ्हा मोहवते. त्यांच्या प्रख्यात
वो जो हममें तुममें करार था तुम्हें याद हो के न याद हो
या गजलेवरून त्यांना शायरीचे चाहते ओळखतात. तसेच अनेकांनी त्यांचे काव्य मनात कोरून ठेवले आहे. मोमीनखाँ मोमीन यांचे दोन लोकप्रिय शेर याप्रमाणे...
तुम हमारे किसी तरहा न हुए
वरना दुनिया में क्या नहीं होता
(जगात सगळं काही होतं, फक्त तू माझी होत नाहीस.)
मांगा करेंगे अब के दुआ हिज्र-ए-यार की
आखिर तो दुश्मनी है असर को दुआ के साथ
(तू मला भेटत नव्हतीस, त्यामुळे तू आता मला भेटूच नये, अशीच प्रार्थना आता मी देवाकडे करणार. कारण, मला असं लक्षात आलेलं आहे, की जे मागतो त्याच्या उलटंच होतं.)
गालिब, जौक आणि बहादूरशहा जफर यांचे समकालीन असलेले मोमीनखाँ मोमीन या तिघांच्या बरोबरीने आपले नाव लावण्यास भाग पाडतात.
१९७८ मध्ये मेहंदी हसन यांची भारतातली पहिली मैफल झाली होती. मैफलीस चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तिकीट न मिळालेले पण त्यांचा आवाज कानात साठवण्यासाठी आतुरलेले तसेच तिकीट न परवडणा-यांनी कार्यक्रम स्थळाजवळच्या झाडांवर चढून जागा पटकावली. आणि या ‘रिक्षावाल्या’ ऑडियन्सकडून त्यांना एका गजलेची फर्माईश झाली.
नावक अंदाज जिधर दीदा-ए-जानां होंगे
नीम बिस्मिल कई होंगे, कई बेजां होंगे
(माझ्या प्रियेचे नेत्रकटाक्ष ज्या ज्या दिशेने पडतील, त्या त्या ठिकाणी काही अर्धवट जखमी आणि काही मृत झालेले आढळतील.)
तुलनेने सोपे लिहिणा-या मोमीनची ही फारसीयुक्त आणि आशयानेही गुंतागुंतीची असलेली गजल आहे. अशा गजलेची फर्माईश अशा चाहत्यांकडून येणे, ही मेहंदी हसन साहेबांसाठी चकित करणारी गोष्ट होती.
त्यांनी नंतर एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख करत सांगितलं होतं, की ती मैफल संपल्यानंतर ते नमाज पढले. म्हणाले, अल्लाह, मैने अपना हक अदा किया। (मी माझं, या जगातलं कर्तव्य पार पाडलं.)
ताब-ए-नज्जारा नहीं आईना, क्या देखने दूं
और बन जाएंगे तस्वीर जो हैरां होंगे
(तुझ्यात जे आहे ते पाहण्यासाठी मी आरसा का देऊ? कारण, तू ते पाहून चकित होणार. या शेरात मोमीन असंही सांगतोय, की तुझं खरं सौंदर्य फक्त मीच तुला दाखवू शकतो, जे तू कधीच पाहिलं नाहीस.)
फिर बहार आई वही दश्त-ए-नवर्दी होगी
फिर वही पांव वही खार-ए-मुगीला होंगे
(पुन्हा बहार आलेली आहे. हा मोसम तर सगळ्यांच्या आवडीचा. आनंदोत्सवाचा. पण शायराच्या वाट्याला मात्र जंगलातील भटकेपणा आहे. कारण, त्याच्या नशिबी प्रेमविव्हळता आहे. हा ऋतू इतरांसाठी रोमँटिक असला, तरी त्याच्यासाठी मात्र वाळवंटातील काट्यांना त्याच्या (घायाळ पायांनी) रक्ताने सिंचणे आहे.
या शेरातून आध्यात्मिक अर्थही निघतो. कारण, मुगीला हे काटेरी झाड मक्केच्या परिसरात आढळते. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी मानवाने केलेल्या या रक्तरंजित पायांच्या नृत्याने बहरलेला हा मोसम आहे.
तू कहां जाएगी कुछ अपना ठिकाना कर ले
हम तो कल खाब-ए-अदम में शब-ए-हिजरां होंगे
(हे वियोगाची रात्र, तू आता कुठे जाणार आणि काय करणार ते ठरव. कारण, मी आता नसणार तुझ्या सोबतीला. कारण मी कधीतरी मृत्यूच्या सोबत जाणारच आहे. सगळे शायर स्वतःचा एकटेपणा, स्वतःच्या सोबतीची चर्चा करतात. मोमीन मात्र ज्याबद्दल माणूस एकटेपणा अनुभवतो, त्या वियोगाच्या रात्रीच्या एकटेपणाची चर्चा करतोय. तो म्हणतो, की आतापर्यंत मी तुझ्यासोबत होतो, पण पुढे नसणार, तर तुझं कसं होईल?)
प्रेमाची भावना माणसाला स्वस्थ बसू देत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचे चक्र सुरू असते. काही जण या प्रेमाच्या अत्याचाराने, छळाने हैराण झालेले आहेत, आणि त्याच वेळी या प्रेमाचा विलक्षण अनुभव घेण्यासाठी अन्य कोणी कितीतरी आतुरलेले असतात.
एक हम हैं के हुए ऐसे पशेमान के बस
एक वो है के जिन्हे चाह के अरमां होंगे
आणि यातील एका शेरात ते अत्यंत थोर प्रतिष्ठेचा दाखला देतात. मी मृताला जीवन देऊ शकणा-या इसा मसीह म्हणजे येशूकडे कधीही विनंती करणार नाही (की मला पुन्हा जिवंत कर.). कारण तसं केलं तर जे आयुष्य मिळेल, ते परक्यांच्या उपकाराने मिळाल्याने लज्जास्पद ओझ्याखाली काढावं लागेल.
मिन्नत-ए-हजरत-ए-इसा न उठाएंगे कभी
जिंदगी के लिए शरमिंद-ए-एहसां होंगे
आणि शेवटी त्यांचा मिश्कील स्वभाव पुन्हा व्यक्त होतो. आयुष्यभर वाट्टेल तसं वागून शेवटी देवमार्गाला लागणा-या किंवा लोकांना लुबाडून कमावलेल्या पैशांतून तीर्थयात्रा काढणा-या पाखंडीपणाला, त्यांनी आपल्या उपरोधिक शैलीत लगावलेली ही चपराक आहे-
उम्र तो सारी कटी इश्क-ए-बुतां में मोमीन
आखरी वक्त में क्या खाक मुसलमां होंगे

ibrahim.afghan@gmail.com