आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूस्‍वरूप...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या लोकसाहित्यातून स्त्रीच्या तीन रूपांचं रसभरीत वर्णन केलं गेलं आहे/ सापडतं. तिचं पहिलं रूप कन्येचं, जी कालांतराने गृहिणीचं रूप घेते. लग्नानंतरही तिचं लेकीचं रूप टिकून असतं, पण आता ती प्राधान्याने पत्नी असते. त्यानंतर तिला प्राप्त होणारं तिसरं रूप मातेचं. या तीन रूपांच्या कहाण्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वारंवार सांगितल्या जातात. मात्र या तीन रूपांशिवाय आणखी एका रूपाबद्दल फारसं कुठे सांगितलं गेलेलं नाही. ते आहे तिचं सासूस्वरूप. ज्येष्ठ नागरिकांची आपण जी विविधांगी मीमांसा करत आहोत त्यात स्त्रीचं हे सासूस्वरूप अधिक महत्त्वाचं आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीचा -हास होत असला तरी अजूनही नववधू लक्ष्मीच्या पावलाने येते ती बहुतेक वेळा सासू-सास-यांच्या घरातच! इतकंच काय, सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून सुनेचं काही काळ तरी सासूच्या नजरेखाली राहणं घडतं, अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक अशा सासूची भूमिका महत्त्वाची ठरते.

स्वत:च सासूनं नववधू म्हणून ज्या घरात प्रवेश केला होता त्या घरातलं वातावरण आता खूप बदललेलं असतं. ते जुनं घर, जुनी अर्थव्यवस्था, जुने सामाजिक वळणं आणि एकूणच जीवन पद्धती आमूलाग्र बदललेली असते. हा बदल आपल्याला आवडो वा न आवडो, त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही. इथे हेही लक्षात घ्यायला हवं की, हे बदल नववधू म्हणून येऊन आता सासू झालेल्या स्त्रीनेच कळत न कळत घडवलेले असतात. मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं तर सासूचं, खरं तर प्रत्येक व्यक्तीचं वर्तन दोन भूमिकांतून नियंत्रित होत असतं.

सून म्हणून या घरात प्रवेश केल्यावर सासूला बंधनांना तोंड द्यावं लागलं होतं. त्यात तिनं बराच अन्यायही सहन केला होता. ते सारं आठवून आलेल्या सुनेकडूनही तशीच अपेक्षा केली तर कलहाचा प्रारंभ व्हायला वेळ लागणार नाही. स्वत: संयुक्त कुटुंबाच्या रामरगाड्यात किती मरमर काम केलं होतं याचं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करत राहिली तर तिचं सुप्त मनही सुनेकडून तशाच कामाची अपेक्षा करू लागेल आणि आता हे घडणं शक्य नसल्यामुळे मनात असंतोष उमटेल. यथावकाश हा असंतोष शाब्दिक टोमण्याच्या रूपात प्रकट होईल आणि कधी तरी अशी वेळ येईल जेव्हा दोन्ही पक्षांकडून मर्यादेचं उल्लंघन होईल. आता याच्या उलट कल्पना करा. मी त्या काळात पुष्कळ अन्याय सहन केले. जुनाट चालीरीतींमुळे मला ज्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं त्यातलं काहीच सुनेच्या वाट्याला येऊ नये, अशी भूमिका सासूने घेतली तर?

मला सहन करावं लागलं तसं तुला लागू नये या भूमिकेनं संपूर्ण कुटुंबाचं सुख आणि शांतता अबाधित राहण्याची शक्यता निर्माण होईल. इथे शक्यता अशासाठी की मोठ्या मनानं सासूनं अशी भूमिका घेतली तरी सुनेकडून योग्य प्रतिसाद मिळेल याची खात्री देता येत नाही. गेल्या 20-25 वर्षांत पालक बनलेली मंडळी स्वत:च्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात अहोरात्र बुडालेले असतात. त्यापैकी बहुतांश पालकांना आपल्या मुलांवर कौटुंबिक संस्कार करता आलेले नाहीत.
त्यांनी मुलांना महागडं शिक्षण दिलं आहे. नृत्य, संगीत, वक्तृत्व इ. कला जोपासण्याची संधी दिली आहे. पण कौटुंबिक जीवनासाठी आवश्यक अशा विवेक आणि विनयपूर्वक वर्तनाचे धडे दिलेले नाहीत. परिणामी स्त्री-स्वातंत्र्याच्या उथळ कल्पना त्यांच्या मनात अशा काही ठासून भरलेल्या असतात की कौटुंबिक जीवनाचा पायाच डळमळायला लागतो, सासूच्या उदार मनाला सुनेकडून प्रतिसाद मिळणे अशक्य नसलं तरी अवघड असतं.

इथे सासूची परीक्षा असते. हा पेपर तिनं संयमाने लिहायला हवा. कुटुंबाच्या सुखासाठी सुनेच्या पटत नसलेल्या वागण्याकडे डोळेझाक करायला हवी. मात्र, नव्या सुनेला या घराची जीवनशैली किंवा चालत आलेले कुळाचार इ. गुंडाळून ठेवून हवं तसं जगण्याचा अधिकार मिळावा, असे नाही; पण सासूनं कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती म्हणून थोडी सहनशीलता दाखवणं आणि जिथे मर्यादेचं उल्लंघन होत असेल तिथे मोजक्या, स्पष्ट शब्दांत सांगणं अभिप्रेत आहे. याच्या जोडीला तिला तिच्या नैमित्तिक जबाबदा-यांपासून मुक्त व्हायलाही शिकायला हवं. आजवर ती गृहस्वामिनी होती. आता त्यात सुनेचाही वाटा आहे. स्वयंपाकघरापासून बैठकीतल्या फर्निचरच्या मांडणीपर्यंत आता सुनेच्या मताला अधिक वजन आहे. यात स्वत:चा अपमान होत आहे, असं मानण्याची गरज नाही. हे वाचायला, ऐकायला सोपं वाटलं तरी वागताना अवघड जातं; पण वेगानं बदलणा-या काळात हे स्वीकारल्यावाचून चालणार नाही. (क्रमश:)
अनुवाद-डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर