आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Motherhood By Dr.Vrushali Kinhalkar, Rasik, Divya Marathi

तिच्या छोट्या छोट्या गोष्‍टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक अंधुकशी आठवण आहे. खूप लहान वयातली. बसने कुठे तरी जात होतो, आम्ही बहिणी आणि आई. एखादा चुलतभाऊदेखील असावा सोबत. मोठे माणूस म्हणजे, फक्त आईच. इतर आम्हा सर्वांचं वय दहा वर्षांपेक्षा कमीच. बस काही निघेचना स्टँडवरून. कंडक्टरने सांगितले, ‘डेपोत जाईल बस आता. दुरुस्तीला दोन-तीन तास लागतील. उतरा सगळे.’
आईसोबत सगळे स्टँडवर बसून राहिलो. बारा वाजले. खूप भूक लागली. आईने एसटी कँटीनमध्ये नेले सगळ्यांना. ‘खा पोटभर’ म्हणाली. आम्ही सगळे पुरी-भाजी खाऊन सुखावलो. वडील, काका कुणी सोबत नव्हते. कँटीनच्या काउंटरवर आईने नोटा काढून दिल्या, तेव्हा मला माझी आई खूप शूर वाटली! मला आजदेखील हे सगळे जसेच्या तसे स्पष्ट आठवते. कदाचित, त्या अबोध वयात आईला पैशाचे व्यवहार करताना मी अजून पाहिलेले नसावे. त्यामुळे तिने सगळ्यांना कँटीनमध्ये खाऊ घातले; तेही वडिलांच्या माघारी, यामुळे तिचे ते कृत्य मला शूरपणाचे वाटले...


त्या काळी सर्रासपणे हॉटेलमध्ये जाणे शिष्टसंमत नव्हतेच. प्रवासातदेखील घरचा डबा असे. त्यात आईने वडिलांच्या माघारी एवढे पैसे खर्च केले आणि कँटीनमध्ये खाण्याची आमची चैन पुरवली, याचाही आनंदमिश्रित अचंबा वाटला होता. पुढे मग कधीही बस ‘फेल’ झाल्याच्या गप्पा निघाल्या की, मला आईचा शूरपणा आठवायचा.
आज आता इतकी वर्षे गेली, या छोट्याशा प्रसंगाला; पण आठवतं सगळं जसंच्या तसं आणि विशेष म्हणजे, त्या भावनेची तीव्रता जराशीही कमी होत नाही. मी आता स्वत: केवढे मोठे आर्थिक व्यवहार करतेय ना; पण आईच्या हातातून दिल्या गेलेल्या त्या नोटांचे अप्रूप काही वेगळेच! ‘ती’ शूरपणाची भावना, मला माझ्या बाबतीत जाणवणं कधीच शक्य नाही; कारण आता सगळ्याच स्त्रिया सर्रास आर्थिक व्यवहार करतात. विशेष म्हणजे, आईला हे कधीच मी सांगितले नाही आजपर्यंत!


माझ्या लग्नाच्या वेळचा एक प्रसंग असाच आठवतो. आईवडिलांनी मला डॉक्टर बनवले आणि माझ्या आंतरजातीय प्रेमविवाहास त्यांनी दोघांनीही अगदी सहजपणे मान्यता दिली. मला उगीचच अपराधी वाटायचे, त्या काळात. या दोन्ही गोष्टींचे मनावर दडपण होते माझ्या. आई दागिने खरेदीसाठी मला घेऊन गेली. घरातील ‘किडूकमिडूक’ सोने तिने सोबत घेतले होते. सात तोळ्यांचे दागिने घ्यायचे होते. मला अजून औरंगाबादमधील ते बाबूलाल बेचरभाईचे मोठे दुकान आठवते. आईजवळच्या बजेटमध्ये आपली आवड बसवण्याचा मी प्रयत्न करीत होते. आईने तिच्याजवळचे, हातरुमालात बांधून आणलेले नोटांचे पुडके आणि थोडे सोने (किडूकमिडूक) त्या शेठकडे दिले. त्या शेठने बेपर्वाईने, थोडे तुच्छतेने त्या एवढ्याशा सोन्याकडे बघितले की मलाच तसे वाटले, नीट बोध होत नाही. आईचा तो कष्टाळू हात आणि उंचावर गादीवर बसलेला तो माणूस यातली तफावत! मला खूप भरून आले! सोन्याच्या दागिन्यांबद्दलचे माझे नवखे आकर्षण क्षणात संपून गेले! आईवडील गरीब नसले तरी श्रीमंतदेखील नव्हते. त्यांचे कष्ट मला दिसायचे. त्यामुळे आईवडिलांना आर्थिक ताण देण्याचा मला मुळीच हक्क नाही, असे मनातून वाटले अन् माझे अंत:करण त्यांच्याविषयीच्या अपार कृतज्ञतेने रडू लागले. मी आईला तसे दिसू दिले नाही; मात्र मी दागिन्यांचे नमुने फारसे न पाहता पटकन थोडेसे काही तरी पसंत करून आईबरोबर घरी आले. तिला तिच्या बजेटमध्ये सगळे बसले, याचाच आनंद होता. आजपर्यंत तिला मी हेदेखील सांगितले नाहीये.


आज मी अनेक वेळा सोने खरेदी करते; पण दागिन्यांबद्दलची आसक्ती आणि मोह मात्र त्या दिवशी, त्या प्रसंगानेच पूर्णपणे संपून गेलेला आहे. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात, आईच्या! ती किती शंभर टक्के आईच असते, आपल्यासाठी. तिला व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून आपण मोजतच नाही कधी. तिला सतत आई म्हणून गृहीत धरून तिच्यावर कितीदा तरी अन्याय केला आहे, हे आठवलं की कागदावरची अक्षरं डोळ्यातल्या पाण्याने अस्पष्ट होऊन जातात...


कधी तरी तिला काही प्रापंचिक समस्या असावी; ती मिठाची संकष्टी चतुर्थी करायची. दिवसभर उपवास. सगळ्यांचा स्वयंपाक करून मग स्वत:साठी मोदक बनवायची. वीस मोदक गोड आणि एकात केवळ मीठ! आमची जेवणं झाल्यावर देवापुढे ताटात मोदक घेऊन डोळे मिटून बसायची. एक-एक मोदक खायची. मिठाचा लागला की थांबायची. पाणी पिऊन देवाला नमस्कार करून झोपायची. आम्ही चौघी बहिणी. आईच्या हातचे मोदक फार चविष्ट असायचे. ते जास्त खायला मिळावेत, म्हणून आईला कधी मिठाचा मोदक लागतो; याकडे टक लावून पाहायचो. उरलेले मोदक चौघीत वाटून खायचो; पण आईचे पोट भरले नसेल, याची जाणीवच नसायची! आज हे आठवले की, स्वत:च्या क्षुद्रपणाची लाज वाटते.
तिला नऊवारी साडीची हौस होती. एरवी रोज ती पाचवारी साडी नेसायची, पण एका भावाच्या मुंजीत तिने हौसेने नऊवारी पातळ खरेदी केले होते. आम्हा बहिणींना आईने नऊवारी नेसलेले आवडायचे नाही. एकदा ती कुठे तरी बाहेर गेली होती तर आम्ही चौघी बहिणींनी ट्रंकेतून ते पातळ काढले. पाचवारी साडीला धरून, मोजून उरलेले पातळ फाडून टाकले व त्याची पाचवारी साडी करून, घडी करून ट्रंकेत ठेवून दिली. आई घरी आल्यावर चौघींपैकी कुणी तरी तिला ते सांगून टाकले! ती खूप रडली होती तेव्हा, इतकेच आता आठवते... या अक्षम्य अपराधाबद्दल खरे तर कधी तरी तिला एखादे छानसे नऊवारी पातळ घेऊन द्यायला हवे होते; अन् मुख्य म्हणजे तिला आनंदाने, मनसोक्त ते वापरू द्यायला हवे होते, पण हेदेखील कधी सुचले नाही.


आईवर प्रेम नाही, अशी व्यक्ती तर कुणी नसेलच जगात; पण तरीही तिला आपण किती गृहीत धरत असतो! अन् तिच्या आतल्या व्यक्तीला, स्त्रीला आपण सहजपणे नाकारत असतो! आई, तू हे वाचशील का गं? माफ करशील का? असे म्हणतच नाही... ती माफ करणारच. एव्हाना तिला यातले काहीच आठवत नसणार! पुन्हा तिला गृहीत धरूनच मी वाक्य लिहितेय... कारण ती आई आहे. (ती फक्त आईच आहे, असे माझ्या मनात घट्ट रुजलेले आहे.)
हे लिहून झाल्यावर मी त्याला शीर्षकदेखील कसे दिलेय- ‘छोट्या छोट्या गोष्टी’. खरं तर या गोष्टी छोट्या नाहीतच; पण पुन्हा आईचे मूल्यमापन तिला गृहीतच धरून केले गेलेय.


vrushaleekinhalkar@yahoo.com