आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Municipal Corporation Works By Pratibha Hampras

महापालिकांचे चोख काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नवत रस्ते, विकलांगांचे जग, आदी लेखांतून आपल्या लक्षात आले असेलच की लोकांकडून घेतलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला सुखसोयींमधून मिळालाच पाहिजे आणि तो त्यांचा हक्कच आहे, हेच पाश्चिमात्त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. जो कर आकारतात आणि जो निधी ज्या कामाकरिता म्हणून निर्धारित करतात, त्याच कामाकरिता पूर्णपणे वापरतात.
महापालिकेकडून शहर विकास-सुशोभीकरण-सफाई आणि सुंदर चौपदरी रस्ते व ठिकठिकाणी रेस्टरूम, स्वच्छता, पाणी-वीजपुरवठा, आरोग्य तपासणी, आरोग्य जनजागृती, संसर्गजन्य व साथीचे रोग निर्मूलन आणि काळजी, नवजात शिशूपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत वेगवेगळे उपक्रम, वाचनालये, पर्यटनस्थळांचा विकास व देखभाल, तसेच शहरात काही अतिरेकी/नैसर्गिक आपत्ती आलीच तर त्याची पूर्वकल्पना प्रत्येक नागरिकापर्यंत वेळोवेळी पोहोचवणे आणि त्यापासून बचाव-सुटका करण्याची जबाबदारी-काळजी घेणे, हे अग्रक्रमाने केले जाते. यात नवीन ते काय
असेच वाटते ना? पण हे सर्व नियम आणि कामे फक्त कागदोपत्री राहत नाहीत, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते.
पालिकेकडून ठिकठिकाणी सुसज्ज आणि समृद्ध बगिचे, सौंदर्यस्थळे, व्यायामशाळा, तसेच वाचनालये लोकांच्या तैनातीत असतात. वाचनालयात पालकांसोबतच मूल चार वर्षांचे झाले की त्याचे स्वतंत्र ओळखपत्र काढले जाते. या वाचनालयातून मुलांना साहित्यातून संस्कृतीची माहिती दिली जाते. वाचनालयात मुलांकरिता प्रत्येक दिवसाची एक थीम ठरवलेली असते. त्याप्रमाणे वेगवेगळ्या देशांच्या प्रथा-सण-उत्सव-चालीरीती यांची त्यांना पुस्तके आणि सादरीकरणातून ओळख करून दिली जाते. गोष्टी आणि विनोद वगैरे प्रकारची मुलांची पुस्तके साभिनय व चित्रकृतीतून त्यांना समजावून दिली जातात. प्रत्येक मुलांना ह्या साभिनय आणि वेगळ्या भूमिकेत भाग घेत येतो.
विशेषत: जे मूल संकोची आणि अलिप्त असते त्याला मुद्दाम अशा उपक्रमात सहभागी करून घेतले जाते आणि त्याची संकोची वृत्ती दूर करून त्याला मुख्य प्रवाहात आणले जाते. मूल स्वावलंबी आणि कुठल्याही प्रसंगास एकट्याने सामोरे जाण्यास सक्षम होणे हे त्यांचे प्रथम ध्येय असून हे पूर्ण करण्यास पालकांइतकाच सहभाग शाळा व पालिकेच्या उपक्रमाचा आहे. ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अग्रहक्क असतो. त्यासाठी त्यांना तिकीट घ्यावे लागत नाही. केवळ तेथील नागरिकांकरिताच आहे, असे नाही तर ज्यांच्याकडून करमणूक कर घेतला जातो त्यांच्या ज्येष्ठ पालकांनाही हा नियम लागू आहे. जागोजागी महिला, मुले, युवावर्ग, तसेच वृद्धांकरिता आरोग्य तपासणी शिबिरे, व्याख्याने असे उपक्रम पालिकेकडून राबवले जातात.
आपल्याकडे पाणीपट्टी म्हणजे अधिकृत नळ जोडणीवरचा कर. विदेशात इनकमिंग (म्हणजे घरात येणारे) पाण्यावर कर असतो तसाच आउटगोइंग पाण्यावरही (म्हणजे सांडपाणी) कर आकारला जातो. मलनिस्सारण योजना आणि त्यांचे उत्कृष्ट कार्य आहे ते अशा सहयोग आणि सहकार्यामुळे हे लगेच लक्षात येते.
कचरा निर्मूलन ही यंत्रणा तेथे उत्कृष्टपणे राबवली जाते. याचे सारे श्रेय जसे नागरिकांच्या शिस्त आणि स्वच्छतेला आहे तसेच तेथील महापालिकेलाही आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच तेथील सौंदर्यात अधिक भर पडते. ठिकठिकाणी मोठ्या आणि बंद कचराकुंड्या असून या कुंड्यांमध्येच प्रत्येकाने कचरा टाकावा, असा नियम आहे. नागरिक महिन्याच्या किराणा सामानासोबत अशा गार्बेज बॅग्ज विकत आणतात. घरातल्या प्रत्येक डस्टबिनमध्ये या बॅग्जचा वापर करतात. बॅग भरली की तोंड बंद करून मगच ती बाहेरच्या मोठ्या कचराकुंडीत नेऊन टाकतात.
आठवड्यातील एक दिवस प्रत्येक वस्ती, परिसरात कचरा नेण्यास येणा-या गाडीचा ठरलेला असतो. (जसा आपल्याकडे घंटागाडीचा असतो, मात्र प्रत्यक्षात ती येतेच असे नाही.) त्या दिवशी आपल्या घरातील सर्व कचरा मोठ्या गार्बेज बॅग्ज वा बॉक्समधून ते घरासमोर आणून ठेवतात. चार वाजण्यापूर्वी ही गार्बेज गाडी कचरा उचलून नेते. त्यानंतर आपल्या घरासमोर ठेवलेले रिकामे गार्बेज बॉक्स प्रत्येकाने घरात न्यायलाच हवे, नसता त्याचाही दंड आकारला जातो.
कोणाकडेही पाळीव प्राणी असेल तर त्याला सकाळ-संध्याकाळी फिरायला नेताना सोबत पेपर नॅपकीन आणि बॅग्ज ठेवतात. रस्त्यात, बागेत, कुठेही कुत्र्या-मांजराने मलविसर्जन केले तर लगेच ती विष्ठा ते पेपर नॅपकीनने उचलून बॅगमध्ये टाकतात. ती बॅग जवळच्या कचराकुंडीत टाकतात. ज्या प्रेक्षणीय ठिकाणी घोडागाडी आहे तेथे घोड्याच्या मलविसर्जनासाठी एक प्लास्टिक बॅग त्या ठिकाणी बांधलेली असते. ती भरली की डस्टबिनमध्ये टाकून त्वरित दुसरी बांधण्याची जबाबदारी घोडागाडी वाहकाची असते. तसे न केल्यास दंड आहे. पाळीव प्राण्यांबाबत इतकी दक्षता आणि स्वच्छता तेव्हा मानव प्राणी रेस्टरूमशिवाय दुसरा विचार कितीही घाई झाली तरी करत नाही. त्यामुळे तेथे सौंदर्य आणि शिस्त अबाधित आहे. पालिकेचे नियोजन, कार्य, सहकार्य, नियमांचे काटेकोर पालन आणि लोकांचे आरोग्य, मनोरंजन, हित जपण्याची पद्धत निर्विवाद प्रशंसनीय आहे.
pratibha.hampras@gmail.com