आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम दर्शन-राज्यपालांचं आणि नूपी लानचं!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिसेंबरचा पंधरवडा पूर्वयोजनेनुसार नागालँड आणि मणिपूर या दोन राज्यातील दिमापूर, कोहिमा आणि इम्फाळ या शहरात गेला. कोहिमाला जाण्यामागचं एक कारण होतं, ‘हॉर्नबिल फेस्टिव्हल’ला भेट देण्याचं, इम्फाळला जाण्यामागचं मुख्य कारण होतं, ‘मोरेह’मधून सीमा पार करून म्यानमारमध्ये जाण्याचं.
सेंबरचा पहिला पंधरवडा पूर्वयोजनेनुसार नागालँड आणि मणिपूर या दोन राज्यांतील दिमापूर, कोहिमा आणि इम्फाळ या शहरात गेला. कोहिमा ही नागालँडची राजधानी, तर दिमापूर हा नागालँडला जाण्यासाठीचा सोयीस्कर विमानतळ आणि इम्फाळ ही मणिपूरची राजधानी. कोहिमाला जाण्यामागचं एक कारण होतं, ते एक ते दहा डिसेंबर या काळात तिथे भरलेल्या ‘हॉर्नबिल फेस्टिव्हल’ला भेट देण्याचं, परंतु दुसरं त्याहूनही महत्त्वाचं कारण होतं. ते तिथे राज्यपाल म्हणून रुजू झालेल्या पद्मानाभजी आचार्यांना भेटण्याचं. इम्फाळला जाण्यामागचं मुख्य कारण होतं, ते तिथून दीडेकशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘मोरेह’मधून सीमापार करून म्यानमारमध्ये जाण्याचं आणि मोरेहमच्या वाटेवर असलेल्या चेकपोस्टवरून ६२ च्या युद्धभूमीचं दर्शन घेण्याचं.
पद्मानाभजी मूळचे मुंबईचे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष, या नात्यानं देशभर प्रवास केलेले. १९६२ चं भारत-चीन युद्ध झालं, त्या युद्धात भारताचा दारुण पराभव झाला आणि भारताच्या ईशान्यपूर्व सीमेला लागून असलेला हा भूभाग एकदम प्रकाशात आला. मंगोलियन चेहरेपट्टी असलेले, बसक्या नाकाचे, मिटत्या डोळ्यांचे पूर्वांचलवासी भारतीय नसून, चिनी आहेत, अशी चुकीची समजूत त्या युद्धानंतर सर्वदूर पसरली आणि ती ऐकून पद्मानाभजी अस्वस्थ झाले.
खरं तर भारतीय संस्कृतीतील असंख्य धाग्यांनी समृद्ध बनलेला असा हा परिसर, परंतु त्या धाग्याचाच विसर आपल्याला पडला आणि आपण पूर्वांचलवासीयांना परके मानू लागलो. मनामनांत रुजलेली ही परकेपणाची भावना काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावेत, असं मनाशी ठरवून लगेचच १९६४ मध्ये पद्मानाभजी पूर्वांचलात गेले. पूर्वांचलातील तरुणांना मुंबई-पुण्यात आणावं, इथल्या कुटुंबांमध्ये त्यांची महिना-पंधरा दिवस राहण्याची व्यवस्था करावी, आपले-परके ही भावना नाहीशी करण्याचा प्रारंभ करावा, आपणही मूळ भारतीय भूमीशी भूपुत्र या नात्याने जोडले गेलो आहोत, असं त्यांना वाटावं, यासाठीची योजना करून पद्मानाभजींनी आंतरराज्य छात्र जीवन दर्शन (स्टुडंट्स एक्स्पिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग किंवा सील किंवा एसईआयएल) नावाच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्या प्रकल्पाचं यंदाचं पन्नासावं वर्ष..
‘मेरा घर भारत देश’ किंवा ‘माय होम इज इंडिया’ हा होता त्याचा पुढचा प्रकल्प टप्पा... या पुढच्या टप्प्यात पूर्वांचलातील सुदूर भागातून शालेय विद्यार्थी मुंबईत आले, अनेक कुटुंबांमध्ये त्यांच्याच मुलांप्रमाणे वावरले, राहिले, शिकले आणि मोठेही झाले. त्यातल्याच काही विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीत घरोघरी पोहोचवण्यासाठी म्हणूनच मुंबईहून आम्ही काही जण पूर्वांचलात गेलो, ते वर्ष होतं १९६९. त्यानंतरच्या ४५ वर्षांत बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. पद्मानाभजी अभाविपच्या कामातून मोकळे होऊन राजकीय पक्षाचं काम करू लागले होते. प्रारंभी जनसंघाचं, मग जनता पार्टीचं आणि त्यानंतर भाजपचं; परंतु या तिन्ही कालखंडांत पूर्वांचलाचंच दायित्व त्यांच्याकडे राहिलं होतं.
मोदी सरकार सत्तेवर आलं आणि पद्मानाभजींचा अनुभव लक्षात घेऊन प्रथम त्रिपुराचं राज्यपालपद त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. यथावकाश नागालॅँडचं राज्यपालपद त्यांच्याकडे आलं. तब्बल ४५-५० वर्षांपूर्वी ज्या शाळकरी मुलांना आणि परकरी मुलींना पद्मानाभजींनी मुंबईत आणि देशभरात नेलं होतं, त्या सर्वांशीच नव्हे, तर पुढल्या कालखंडातही देशभरात गेलेल्या मुलांशी पद्मानाभजींचा संपर्क होता आणि आजही आहे. आज त्यातले अनेक जण शिकून आपापल्या मूळ गावी परतले आहेत, सरकारी सेवेमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून वावरताहेत. पद्मानाभजी राज्यपाल म्हणून आल्याचा सर्वाधिक आनंद त्यांना झाला होता. तो आनंद जवळून न्याहाळणं, हा एक उद्देश मनात होताच.
परंतु हॉर्नबिल फेस्टिव्हल पाहायचा होता, ‘फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स’ असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो हा फेस्टिव्हल. एक डिसेंबरला फेस्टिव्हलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. फेस्टिव्हलचं उद्घाटन करायला पंतप्रधानांनी येण्याचा हा पहिलाच प्रसंग. दहा दिवसांच्या या कालखंडात एक दिवस पद्मानाभजी मुद्दाम वेळ काढून या दोन्ही गावांत गेले होते, गावकऱ्यांचे आभार मानण्यासाठी. राज्यपाल दिसतो कसा, हे पाहण्याची संधी प्रथमच या गावाला मिळत होती. पद्मानाभजी पायी चालत गावभर फिरले, सोबतच्या पाहुण्यांना त्यांनी नागा भाषेतील शब्दही शिकवले आणि स्वत:सह पाहुण्यांना ‘झूथो’ची, राइस बिअरची चवही चाखवली.
नागालँडमध्ये शिक्षकांची वानवा भरपूर, ६८ टक्के शिक्षक हे बदली म्हणूनच नोकरी करणारे. पद्मानाभजींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नींना आठवड्यातून दोन-तीन दिवस वेळ काढायला लावून शाळाशाळांशी जोडून दिलं. सुरुवात स्वत:च्या घरापासून केली आणि प्रत्यक्ष कविता वहिनीही एका शाळेत शिकवू लागल्या. राज्यपाल या नात्यानं, थ्री-ई चा कार्यक्रम त्यांनी घोषित केला. एम्प्लॉयमेंट-एज्युकेशन आणि इलेक्ट्रिसिटी या तीन ‘ई’कडे ते पुढल्या काळात स्वत: लक्ष देणार आहेत. फेस्टिव्हलचाच एक दिवस आता ‘बर्ड्स डे’ म्हणून पाळला जायचा आहे. ज्याच्या नावानं फेस्टिव्हल होतो, तो हॉर्नबिल तर दिसेनासा झालाच आहे, परंतु कावळा-चिमणीसारखे पक्षीही शिकारीमुळे दुर्मिळ झाले आहेत. ते पुन्हा दिसू लागावेत हाच एक उद्देश त्यामागे आहे.
मणिपूरच्या पाच दिवसांच्या वास्तव्यातच एक दिवस आला होता नूपी लानचा. नूपी लान ही मणिपुरी महिलांनी महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेली चळवळ. ‘नूपी लान’चा पहिला लढा १९०४ चा आणि दुसरा १९३९ चा. यंदाचं वर्षं हे त्या १९३९ च्या लढ्याचं अमृतमहोत्सवी वर्षं. १९०४ चा मणिपुरी महिलांचा पहिला लढा तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांंनी विनाकारण मणिपुरी पुरुषांना एका ब्रिटिश अधिकाऱ्याचं घर बांधण्यासाठी मजूर म्हणून जुंपल्याच्या विरोधातला. आणि त्यांचा दुसरा लढा मणिपुरी मुस्लिम महिलांनी उभारलेला. तांदळाची निर्यात करण्यास शासनानं परवानगी दिल्यानं तांदळाची जी अभूतपूर्व टंचाई उद्भवली त्याच्या विरोधात केलेलं हे आंदोलन. त्या आंदोलनकर्त्या महिलांनी दरबार हॉलवर व टेलिग्राफ ऑफिसवरच हल्ला चढवला. ब्रिटिशांशी चकमक झाली आणि अनेक महिला जखमी झाल्या. आधुनिक मणिपुरची निर्मिती त्यानंतरची. तो दिवसही इम्फाळमध्ये राहून जवळून जाणून घेता आला आणि नागालँड-मणिपूरची भेट सत्कारणी लागल्यासारखं वाटलं.
sumajo51@gmail.com
(समाप्त)