आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभवसमृध्‍द दोघी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा निव्वळ योगायोग म्हणता येईल, पण नंदना सेनचा ‘रंगरसिया’ आणि लिसा हेडेनचा ‘द शौकिन्स’ हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झालेत. तसं पाहता या दोघी ए लिस्टमधील नट्या नाहीत. त्यांची मार्केट व्हॅल्यू कतरिना-दीपिकाइतकी मोठीही नाही. सध्या ग्लॅमर आलेल्या हंड्रेड-टू हंड्रेड करोड क्लबच्या त्या सन्माननीय सदस्यही नाहीत. एवढंच कशाला, आपल्या अभिनय सामर्थ्याचंही त्यांनी पुरेशा ताकदीनं अद्याप दर्शन घडवलेलं नाही. मात्र काही बोल्ड प्रकारातल्या भूमिकांमुळे उगाचच त्यांची उच्छृंखल, उथळ अशी प्रतिमा तयार झालेली आहे. याच प्रतिमा डोक्यात ठेवून त्यांचं मूल्यमापन (खरं तर विच्छेदन) आजवर झालेलं आहे. याचमुळे त्यांची पार्श्वभूमी, त्यांच्या गाठीशी असलेला ‘सुरक्षित मध्यमवर्गीय’ चौकटीपलीकडचा अनुभव, त्यांचे विविध विषयांवरचे विचार आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यातलं फारसं पोहोचलेलंच नाही.
ब-यापैकी सुरक्षित नि सुस्थितीतलं मध्यमवर्गीय जगणं, कुटुंबीय-नातेवाइकांचा आश्वासक आधार, त्यात मिळत जाणारे संस्कार, शिक्षणाच्या संधी यामुळे आपण ‘एज्युकेटेड’ नक्कीच होतो, पण त्याने आपल्याला जगाचं सर्वंकष भान येतंच वा आपल्या जाणिवा-नेणिवांचं वर्तुळ किंवा संवेदनांचा परीघ विस्तारतोच असं नाही. पण जेव्हा एखादं माणूस अशा आई-वडलांच्या पोटी जन्माला येतं, ज्याने रूढी-परंपरांची चौकट मोडत आपला परिसर, आपला समाज, आपला देश असं सगळं आभासी सुरक्षितता देणारं वातावरण नाकारून स्वत:च्या अटीवर आयुष्य जगलेलं असतं. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत स्वत:चं माणूसपण अधिक ठसठशीत केलेलं असतं. निरनिराळ्या संस्कृती-परंपरांचा सहिष्णुतेनं स्वीकार केलेला असतो, तेव्हा त्या माणसाचंही आयुष्य समृद्ध होत जात असतं. तसंच काहीसं समृद्ध आयुष्य नंदना आणि लिसाच्या वाट्याला आलेलं आहे. हेच दोघींचा सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याचा योगायोग अधोरेखित करण्याचं कारणही.
नंदना सेन ही भारतरत्न, नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांची मुलगी. तिच्या वडलांचं कर्तृत्व जगभरातल्या बुद्धिवंतांनी मान्य केलंलं आहे. तिची आई नबनिता देव-सेन ही पद्म पुरस्कारप्राप्त लेखिका –अभ्यासक. माणूस आणि माणुसकी हाच त्यांच्या चिंतनाचा मुख्य विषय. भारत- इंग्लंड, अमेरिका या देशातल्या साहित्यिक-विचारवंतांचा (पती जगविख्यात पेंग्विन प्रकाशनाचा सीईओ आहे.) सहवास तिला लाभलेला आहे. ती स्वत: प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठातली साहित्याची पदवीधर आहे. त्याच विषयात पीएचडी करणे हा तिचा ध्यास आहे. गेला काही काळ ती बालसाहित्यात मुशाफिरी करून बघत आहे. पटकथा लेखनात तिला स्वत:ला आजमावून बघायचं आहे. जगात जे जे चांगलं आहे, सौंदर्यपूर्ण आहे, त्याचा तिला मनापासून आस्वाद घ्यायचाय. महत्त्वाकांक्षा, स्पर्धा त्यासाठी ऊर फाटेस्तोवर धावत सुटणं, हे तिला मान्य नाही. आपल्याला एकच आयुष्य मिळतं, त्या एका आयुष्यात जेवढं म्हणून वैविध्यपूर्ण जगता येईल तेवढं तिला जगायचंय. इथेच बॉलीवूडमधल्या इतर नट्या आणि तिच्यात वेगळेपण आहे.
नंदनाची जडणघडण जशी साहित्यिक-विचारवंतांच्या सहवासात झाली, तशी लिसा समाजसेवेची पार्श्वभूमी असलेल्या आई-वडलांच्या सावलीत वाढली. लिसाची आई अ‍ॅना आॅस्ट्रेलियाची. फॅमिली केअर इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेच्या ध्यासापायी हजारो मैलांवरून भारतात आली. लिसाचे वडील वेंकट मल्याळी. तिचं सगळं लहानपण संस्थेच्या गोतावळ्यात गेलं. कधी मुंबई, कच्छ, तर कधी ओडिशातल्या दुर्गम भागात समाजोपयोगी काम बघत, अनुभवत तिने अनेक सुट्या घालवल्या. तेव्हा तिच्या वयाच्या इतर मित्र-मैत्रिणींना मोठा धक्का बसायचा. दिवा‌‌ळी आणि उन्हाळ्याच्या सुट्या कुणी असं घालवतं का? पण लिसाला त्याही वेळी आपण काही गमावतोय, असं वाटायचं नाही. आई-वडलांसोबत जे जग तिला अनुभवायला मिळायचं, ते तिला कुठेही न शिकायला मिळणारे धडे देऊन जायचं. बहुधा इथेच वेगळ्या वाटेवरच्या अनुभवाची बेगमी सुरू झाली होती. मुलं मोठी झाली, तसा आई-वडलांनी काही काळासाठी ऑस्ट्रेलियात जाण्याचा निर्णय घेतला. तिथं वेगळी संस्कृती, वेगळे रीतीरिवाज, वेगळी नीतिमूल्यं आणि विचारांनी ब-यापैकी मोकळा-ढाकळा समाज यात लिसाची जडणघडण झाली. संगीतनृत्यादी कलांनी तिला भुरळ घातली. त्यातूनच जॅझ, हिप-पॉप-कथ्थक अशा वेगवेगळ्या नृत्यप्रकारांत तिने रस घेतला. मग तिने मॉडेलिंगचा ध्यास घेतला. फ्रेंच संस्कृतीच्या अभ्यासाचं वेड तिला लागलं. भारत-ऑस्ट्रेलिया-फ्रान्स-अमेरिका अशा प्रवासात ती अधिकाधिक स्वतंत्र आणि प्रगल्भ होत गेली. आत्मविश्वासाच्या बळावरच तिने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात मुसंडी मारून बघितली. क्वीनमध्ये जितकी कंगना राणावतच्या अभिनयाची तारीफ झाली, तितकेच लिसाच्या व्यक्तिरेखेनेही जाणकार-समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता ‘द शौकिन्स’च्या निमित्ताने ती नायिका म्हणून चमकलीय. पण म्हणून आता आपण स्पर्धेत उतरावं आणि दीपिका-कतरिनाला टक्कर द्यावी, असा विचार तिने केला नसणार. तशी आभाळाला हात-बित टेकवण्याची तिची ईर्षा दिसत नाही. स्वत:च्या अटींवर जगण्याचा आनंद लुटावा, इतपतच तिचं स्वप्न असावं. एका अर्थानं नंदना काय किंवा लिसा काय, इतरांपेक्षा खात्यावर सिनेमे कमी जमा झाले म्हणून अस्वस्थ होण्यापेक्षा जगणं समृद्ध असावं, यासाठी दोघींचाही आग्रह असावा. मागे एकदा सुश्मिता सेनला प्रश्न विचारण्यात आला, आप फिल्मे बहुत कम करती हैं, ऐसा क्यू…त्यावर गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणारी सुश्मिता त्या मुलाखतकर्त्याला एवढंच म्हणाली होती, मैं फिल्मे बहुत कम करती हूँ मगर जिंदगी ज्यादा जीती हूँ… त्या अर्थाने नंदना-लिसा यांचंही कूळ सुश्मिताशी जुळणारं आहे. हेच खरं तर स्पर्धेतल्या तमाम नट्या आणि अनुभवसमृद्ध नंदना-लिसा यांच्यात वेगळेपणही आहे.