आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Nano Technology By Vilas Gavraskar, Divya Marathi

करिअर : नॅनो टेक्नॉलॉजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नथिंग इज परमनंट इन लाइफ, एक्सेप्ट चेंज अर्थात बदल हाच जीवनामध्ये कायम असतो. तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हे अगदी शंभर टक्के खरंच. सतत नवनवीन काहीतरी बदल घडत असतात आणि आजची टेक्नॉलॉजी अवघ्या दोन तीन वर्षांच्या आतच जुनी होते. पूर्वीचे अतिप्रचंड दिसणारे महाकाय कॉम्प्युटर्स कुठे आणि तळहातावर मावतील असे पाम टॉप कुठे! सगळा खेळ टेक्नॉलॉजीचाच ! आता आणखी सूक्ष्म तंत्रज्ञान नव्याने उदयास येत आहे, नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून! ही एक स्वतंत्र शाखाच आपल्या विद्यार्थी मित्रांपुढे उघडकीस येत आहे. ही नक्की नॅनो टेक्नॉलॉजी आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आण्विक किंवा अणूसारख्या गोष्टी मोजता येतील एवढ्या सूक्ष्म पद्धतीने वापरले जाणारे तंत्रज्ञान! भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र, जीवतंत्रज्ञान, जीवविज्ञान यांचा एकत्रित मिलाफ करून वापरात येणारी रचना म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजी! ज्या विद्यार्थ्यांना वरील सर्व शास्त्रांची विशेष आवड आहे त्यांच्यासाठी हे शास्त्र किंवा तंत्रज्ञान म्हणजे एक बुद्धीला चालना देणारे एक आव्हानात्मक करिअर म्हणायला हवे. एका सुईचा अग्रभाग हा एक मिलिमीटरचा असेल तर तो दहा लाख नॅनोमीटरच्या बरोबरीचा मानला जातो. तसेच मानवी शरीरातील लालपेशी ही २.५ मायक्रोमीटर असेल तर नॅनोमीटरमध्ये हीच संख्या अडीच हजारांच्या आसपास असते. थोडक्यात म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये युनिट ऑफ मेजरमेंट किंवा मोजण्याचे एकक ही संकल्पना फार रूढ आहे. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये याच संकल्पनेवर आधारित मायक्रोचिप्सद्वारे अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल घडवला जाऊ शकतो. कुठल्या क्षेत्रामध्ये ही नॅनो टेक्नॉलॉजी उपयोगात आणली जाऊ शकते बरं ?
नॅनो टेक्नॉलॉजीवर सध्या जगभरातून बरेचसे संशोधन चालू असून तिचा वापर जीवशास्त्र, जैविकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, मुक्त ऋण विद्युत कणांचे शास्त्र (इलेक्ट्रॉनिक्स) सौंदर्य प्रसाधने आणि काही इतर क्षेत्रांमध्ये होतो. म्हणजेच करिअरच्या दृष्टीने फार मोठ्या संधी इथे उपलब्ध आहेत. नॅनो टेक्नॉलॉजी ही सतत नवनवीन क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल घडवत असते. जसे कर्करोगासंबंधित औषधांमध्ये या तंत्रज्ञानामुळे रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी शिवाय रुग्णांना उपचार करण्यास मदत होऊ शकते. तसेच सौर ऊर्जा, बॅटरीज, विद्युत उपकरणे, बायोकंडक्टर डिव्हायसेस, तसेच पृष्ठभाग विज्ञान (सरफेस सायन्स), सेंद्रिय रसायन (ऑरगॅनिक केमिस्टी), मॉलिक्युलर बायोलॉजी अर्थात आण्विक जीवशास्त्र अशा ठिकाणीदेखील नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर हळूहळू होताना दिसतोच. मात्र जगभरातून अजूनही बरेच संशोधन चालले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना करिअर म्हणून खरोखरीच रिसर्च सायंटिस्ट सारख्या संधीसुद्धा उपलब्ध आहेत. ही नवी टेक्नॉलॉजी समर्थपणे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रेनर्स आणि टीचर्सचीदेखील नितांत गरज आहे. अनेकविध क्षेत्रांमध्ये नॅनो टेक्नाॅलॉजी विषय घेऊन बॅचलर्स किंवा मास्टर्स +पीएचडी केलेल्या विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये खूप मागणी आहे.
हा कोर्स कुठे बरं शिकवला जातो?
भारतामधील प्रमुख आयआयटी मुंबई, मद्रास, कानपूर, दिल्ली, खरगपूर इथेही हा कोर्स शिकवला जातो. शिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रूरकेला इनिस्टट्यूट ऑफ सायन्स, बंगलूर, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, अमिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे देखील बॅचलर्स, मास्टर्स किंवा अल्प कालावधीचे किंवा इंटिग्रेटेड म्हणजेच सलग ५ वर्षे बॅचलर्स + मास्टर्स असेही कोर्सेस उपलब्ध आहेत. तेव्हा विद्यार्थांची तयारी मात्र भरपूर असायला हवी. कमित कमी १२ ते १४ तासांच्या अभ्यासाची सवय असायलाच हवी. एखाद्या अपयशाने नाउमेद न होता जिद्दीने प्रयोग करत राहण्याची वृत्ती असायला हवी. अद्ययावत तंत्रज्ञान, शास्त्र यांची पुस्तके, नियतकालिके वाचण्याची सवय असायला हवी.