आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Narendra Modi By Suresh Bhatewar, Divya Marathi

इंडिया नव्हे, मोदी फर्स्ट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे बुजुर्ग नेते, मुरली मनोहर जोशींची काशी (वाराणसी) त्यांच्या हातातून निसटली. वाराणसीच्या उमेदवारीची माळ नरेंद्र मोदींच्या गळ्यात पडली! लालजी टंडनना डावलून पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनाही अपेक्षित असलेला लखनऊ मतदारसंघ मिळाला. पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरणा-या अरुण जेटलींना सुरक्षित मतदारसंघ पुरवण्यासाठी ‘हास्यसम्राट’ नवज्योतसिंग सिद्धू यांना स्टेडियमबाहेर पडावे लागले. भाजपची ताजी उमेदवार यादी पाहिली, तर ‘इंडिया फर्स्ट’ घोषणेपासून ‘मोदी फर्स्ट’पर्यंत भाजपच्या नाट्याचा पहिल्या अंकाचा प्रवास पार पडला आहे.


देशभर नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट असल्याची चर्चा आहे. मोदी समर्थकांना वाटते, हेच वास्तव आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणांच्या अंदाजांचा कल मोदींच्या बाजूने आहे. भाजपचे विरोधक म्हणतात, मोदींचा प्रभाव आहे; मात्र लाट नाही. शक्याशक्यतेच्या अशा वातावरणात राजकीय गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. जहाज बुडण्याची भीती वाटताच सर्वप्रथम उंदीर पळ काढतात, या उक्तीनुसार विविध पक्षांतले काही नेते भाजपच्या दिशेने धावत सुटले आहेत. ज्या राजकीय पक्षांनी गेली दहा वर्षे स्वत:ला भाजपपासून कटाक्षाने दूर ठेवले, ते पक्ष आज मोदींवर स्तुतिसुमने उधळत त्यांच्याशी हस्तांदोलन करायला आतुर आहेत. मोदींचा पुरस्कार करणा-या भाजपमध्ये सारे काही जर आलबेल आहे, मग याच पक्षाच्या राष्‍ट्रीय स्तरावरचे बहुतांश ज्येष्ठ नेते अस्वस्थ का आहेत? मोदी फर्स्ट योजनेवर भाजप स्वार असेल, तर आम्ही नेमके कुठे? समजा, मोदी पंतप्रधान झालेच तर आमचे काय? हा प्रश्न तर या अस्वस्थतेच्या तळाशी नाही?


राजकीय निवृत्ती हा शब्द भाजपच्या शब्दकोशात नाही. वाजपेयींच्या कालखंडात स्वत:ला ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ म्हणवणा-या पक्षात दोन गोष्टींचे सध्या वाटप झाले आहे. त्याग आणि शिस्त कार्यकर्त्यांनी पाळावी, सत्तेचे सुख मात्र नेत्यांपुरते सीमित असावे. गुजरातच्या उमेदवारांची यादी भाजपने अद्याप जाहीर केलेली नाही; मात्र उमेदवारांच्या यादीत आपले नाव असेल की नाही, याची लालकृष्ण अडवाणींना वयाच्या 87व्या वर्षी चिंता लागून राहिली. अलाहाबाद असो की काशी, मुरली मनोहर जोशी ज्या मतदारसंघातून निवडून येतात, तिथे मित्रांपेक्षा शत्रूंची संख्या अधिक बनवतात, अशी त्यांची ख्याती. भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच जाहीरपणे ‘मोदीजी तुम राज करो, जोशीजी अब त्याग करो’ अशा घोषणा देताना दिसतात. मोदींपुढे पायघड्या घालणारे लालजी टंडन राजनाथसिंह यांच्यासाठी नव्हे, तर मोदींसाठी लखनऊ मतदारसंघ सोडायला तयार होते. राज्यसभेचे गाजर दाखवल्याबरोबर तूर्त ते शांत आहेत. कलराज मिश्र दोन वर्षांपूर्वी वयाच्या 74व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकले. मोदींच्या लाटेत, त्यांना आता लोकसभा निवडणूक लढवायची आहे. ‘जिंदा कौमे पाच साल का इंतजार नहीं करती’ या वाक्यानुसार त्यांचा डोळाही सुरुवातीला लखनऊ मतदारसंघावर होता. अखेर देवरिया मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आला. पक्षातल्या असंतुष्ट बुजुर्गांची अशी बरीच लांबलचक यादी आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज भाजपच्या प्रथम श्रेणीतील लोकप्रिय नेत्या. उत्तम दर्जाच्या खासदार आणि प्रभावी वक्त्या. भाजपच्या ‘पीएम इन वेटिंग’च्या यादीत सुरुवातीला त्यांचे नाव आघाडीवर होते. मोदींची दावेदारी जाहीर झाल्यापासून त्या अस्वस्थ असल्याचे जाणवते आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात त्या बेधडकपणे जाहीर मतप्रदर्शन करतात. त्यांचे ताजे ट्विट्स पाहिले तर प्रश्न पडतो, की त्यांचे हे चौकार भाजपसाठी आहेत की विरोधकांसाठी? अडवाणींची दाट सावली, त्यांच्या प्रतिक्रियांमागे असल्याचे दिसते.


1999मध्ये भाजपने लोकसभेच्या 182 जागा जिंकल्या. वाजपेयी पंतप्रधान झाले. 2009मध्ये पक्षाची लोकसभेतील सदस्यसंख्या 116पर्यंत खाली आली. हे वास्तव बदलायचे तर नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, हा साक्षात्कार रा. स्व. संघाला झाला. गोव्याच्या राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्याला अनुसरून मोदींकडे सुरुवातीला पक्षाच्या प्रचारप्रमुखाची आणि कालांतराने पंतप्रधानपदाच्या दावेदारीची जबाबदारी भाजपने सोपवली. पक्षाचे ज्येष्ठ नेते अडवाणी या घोषणेवर नाराज होते. ही नाराजी त्यांनी अजिबात लपवून ठेवली नाही. संसदीय मंडळाचा राजीनामा देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सरसंघचालक मोहनराव भागवतांच्या हस्तक्षेपानंतर हा तिढा तात्पुरता दूर झाला. या घटनेनंतर एकमेकांना अनेकदा भेटण्याचा योग मोदी आणि अडवाणींवर आला; मात्र परस्परांमधील अंतर दूर झाले, असे चित्र काही दिसले नाही. अडवाणींनी मध्य प्रदेशात जाऊन शिवराजसिंहांची प्रशंसा केली. मोदींच्या विरोधात त्यांना उभे करण्याचा प्रयत्न केला. सुषमा स्वराजांनी या सर्व प्रकरणात सूचक मौन पाळले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांची मोदीविरोधी भूमिका पक्षांतर्गत मोदीविरोधकांच्या हातातले एक प्रभावी हत्यार होते. मोदींच्या दावेदारीमुळे भाजपला राष्‍ट्रीय स्तरावर एकही मित्रपक्ष मिळणार नाही, असा त्यांचा तर्क होता. प्रत्यक्षात असे घडले नाही. राजकीय स्तरावर मोदींची मुसंडी चालूच राहिली.
मोदींच्या अश्वमेधाची घोडदौड सध्या देशभर सुरू आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘मोदी फर्स्ट’चा अतोनात उत्साह आहे. पक्षात मात्र अंतर्कलह आहे. नजीकच्या काळात त्यातून कोणते प्रश्न उद्भवतील, कोणालाच सांगता येत नाही. अशा वातावरणात ‘इंडिया फर्स्ट’ची पताका घेऊन हिंडणा-या मोदींना पंतप्रधानपदाची लढाई बहुधा एकाकीच लढावी लागणार आहे.


suresh.bhatewara@gmail.com