आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभा निवडणूक पुढल्या महिन्यात आहे. 31 मेपर्यंत केंद्रात नवे सरकार अस्तित्वात येईल. प्रसारमाध्यमे आणि मार्केटिंग एजन्सीजच्या सर्वेक्षणांवर विश्वास ठेवायचा, तर पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नरेंद्र मोदी तूर्त आघाडीवर आहेत. मोदी दृढनिश्चयी विकासपुरुष आहेत, असे त्यांचे समर्थक सांगतात. बारा वर्षांत गुजरातचा विकास ज्या प्रकारे त्यांनी घडवला, त्याला तोड नाही. जे बोलतात ते करून दाखवतात. अशाच खंबीर नेतृत्वाची देशाला आज गरज आहे. भाजपने आपल्या प्रचार मोहिमेत मोदींच्या याच नेतृत्वगुणांचा कर्कश उद्घोष चालवला आहे. विरोधकांच्या नजरेत मात्र मोदी ‘मौत के सौदागर’ आहेत. गुजरात नरसंहाराच्या गंभीर आरोपांची गडद पार्श्वभूमी त्यामागे आहे. याखेरीज मोदींविषयी ‘स्नूप गेट’सह अनेक दंतकथा प्रचलित आहेत. एककल्ली, स्वेच्छाचारी अन् हिटलरी मनोवृत्तीचा मोदींसारखा पंतप्रधान भारताला परवडणार आहे काय? असा विरोधकांचा सवाल आहे. मात्र, प्रचार मोहिमेत समर्थक आणि विरोधकांच्या केंद्रस्थानी मोदी आहेत. व्यक्तिमत्त्वातल्या गुणदोषांमुळे गेल्या दहा वर्षांत मोदी देशातले सर्वाधिक वादग्रस्त मुख्यमंत्री अन् त्याचबरोबर नवश्रीमंत मध्यमवर्गाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत.
राजकीय नेत्यांचे स्वत:चे एक खास वर्तुळ असते. जनमानसात नेत्याची प्रतिमा कशी उंचावेल, यासाठी या वर्तुळातले खास लोक सतत प्रयत्नशील असतात. कोणी रणनीती ठरवतो, कोणी अर्थकारणाचे व्यवस्थापन पाहतो, तर कोणी प्रशासनिक दूताचे काम करतो. प्रादेशिक पक्षांच्या बहुतांश नेत्यांचे कुटुंबीय ही जबाबदारी सांभाळताना दिसतात. बड्या नेत्यांच्या सेवेसाठी स्वत:ला जन्मभर वाहून घेणारे काही मोजके प्रशासकीय अधिकारीही देशात आहेत. या तुलनेत मोदी मात्र सर्वार्थाने वेगळे आहेत. एका सत्तेतून दुसरी सत्ता हस्तगत करण्यावर त्यांचा दृढविश्वास आहे. आपल्या मर्जीनुसार वाटचाल करणारे ते एकसुरी नेतृत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याऐवजी सर्वांनी मुकाटपणे आपल्या मागे यावे, याविषयी ते आग्रही आहेत. भाजपमधेही नेतृत्वाच्या शिखरावर म्हणूनच आज मोदी केवळ एकटेच उभे दिसतात. त्यांच्या टीममध्ये क्रमांक दोनवर कोणी नेता नाही. पत्रकारांशी खासगीत बोलताना एक ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘मोदींबरोबर काम करायचे तर एक तर त्यांचे नोकर बनून त्यांची मर्जी संपादन करावी लागते अथवा शत्रू बनून त्यांचा सामना करावा लागतो. बरोबरचा सहकारी म्हणून मोदी कोणालाही वागवत नाहीत. मोदींची नोकरी पत्करली तर अमित शहा लेव्हलपर्यंत प्रमोशन होते अन् त्यांचे शत्रुत्व स्वीकारले तर त्याचा एक तर हरेन पंड्या होतो अथवा संजय जोशी होतो.’ मोदी केंद्रात गेले तर त्यांच्यामागे गुजरातचा मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर भाजपचा एकही नेता म्हणूनच बहुधा देत नाही.
देशासमोरचे मॉडेल राज्य म्हणून ज्या गुजरातचा गौरव भाजपचे नेते सांगतात, तिथे सलग बारा वर्षे याच पद्धतीने मोदींनी कामकाज चालवले. लोकशाही संस्थांच्या कामकाजावर मोदींचा कितपत विश्वास आहे? याचा अधिकृत पुरावा हवा असेल, तर गुजरात विधानसभेची अधिकृत वेबसाइट सहज उघडून पाहा. 1960मध्ये गुजरात राज्य अस्तित्वात आले. तेव्हापासून 2014 पर्यंत 19 मुख्यमंत्री झाले. पाच वेळा राष्टÑपती राजवटही गुजरातने अनुभवली. गुजरात विधानसभेच्या आजवरच्या इतिहासात, विशेषत: मोदींच्या बारा वर्षांच्या कारकीर्दीत, वर्षाकाठी सर्वात कमी (सरासरी फक्त 30 दिवस) विधानसभेचे कामकाज चालल्याची नोंद आहे. बारा वर्षांत विधानसभेत मोदींनी क्वचितच (अवघ्या पाच-सहा वेळा) तोंड उघडले. तेदेखील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अथवा बजेट प्रस्तुत करताना. मोदींकडे असलेल्या
खात्यांची उत्तरे त्यांचे राज्यमंत्रीच देतात. ‘बाते कम, काम ज्यादा’ या तत्त्वावर आमच्या नेत्याचा विश्वास आहे, असे त्यांचे चेले सांगतात.
नरेंद्रभाईंचे विरोधक म्हणतात : मोदी खुदपसंद, स्वयंकेंद्रित व हेकेखोर आहेत. मोदींनी मात्र राजकीयदृष्ट्या अव्यवहार्य वाटणा-या या स्वयंकेंद्रित पद्धतीलाच आपले शक्तिस्थळ बनवले. नवश्रीमंत मध्यमवर्गाला त्यांच्यातला हाच ‘गुण’ सर्वाधिक भावला. रा. स्व. संघ आणि भाजपच्या वर्तुळात मोदींचे वर्चस्व आणि रुबाब दिवसेंदिवस याच वैशिष्ट्यांमुळे वाढला. इमेज बिल्डिंगसाठी जगातल्या कुशल आणि महागड्या जनसंपर्क कंपन्यांच्या सेवा तैनात करण्यात आल्या आहेत. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर मोदींना लाखो फॉलोअर मिळवून देण्यात या कंपन्या यशस्वी ठरल्या आहेत. मुकेश अंबानी अन् रतन टाटांसारख्या उद्योगपतींची पंतप्रधानपदासाठी पहिली पसंत मोदी आहेत. मोदी समर्थकांना याचा सार्थ अभिमान वाटतो. मोदी ब्रँडपुढे भाजपतले अन्य नेते सध्या अक्षरश: बोन्साय भासत आहेत. मुरली मनोहर जोशींना आपला वाराणसी मतदारसंघ मोदींसाठी लवकरच रिकामा करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसारख्या बुजुर्ग नेत्यांना मनधरणी करण्याची पाळी यावी, हे मोदींच्या शक्तिस्थळाचे यश मानावे काय? देशातल्या मतदारांना खरोखर असा पंतप्रधान अभिप्रेत आहे काय?
suresh.bhatewara@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.