आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नटसम्राट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाट्यव्यवसायात एक नटसम्राट होऊन गेला, तो म्हणजे यशवंत दत्त (जन्म ७ नोव्हेंबर १९४५). यशवंत दत्त (यशवंत दत्त यांचे वडील दत्तात्रय महाडिक म्हणजे मा. छोटू. आपल्या अभिनयाने त्यांनी रुपेरी पडदा गाजविला होता, पण लौकिक यश त्यांच्या पदरात फारसे पडले नाही. यशवंत दत्तांची आई वत्सलाबाई यांनीही चित्रपटात कामे केलेली.) यांना आम्ही प्रेमाने ‘बाबा’ म्हणत असू. बाबाला फिलिप्स कंपनीत नोकरी लागली आणि त्याच्यातील कलावंत ख-या अर्थाने बहरू लागला. सरकारी नाट्यस्पर्धा असोत वा अन्य एकांकिका स्पर्धा, बाबामधील धुरंधर कलाकाराने त्यानंतर कधीच मागे वळून बघितले नाही.

बाबाचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं, ‘नाथ हा माझा’. ८ नोव्हेंबर १९७६ रोजी रंगमंचावर आलेल्या या नाटकात बाबाने ट्रक ड्रायव्हर सुभानरावची भूमिका केली होती. एका श्रीमंत घरातील बिघडलेल्या मुलीला हा सुभानराव कसा वठणीवर आणतो, याची कथा या नाटकात मांडण्यात आली होती. दुर्दैवाने हे नाटक मला नाही बघता आलं, पण त्याच वेळी बाबाचा ‘सुगंधी कट्टा’ हा सिनेमा या काळात माझ्या पाहण्यात आला. डॉ. श्रीराम लागू, जयश्री गडकर यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात होत्या. हा सिनेमा यातील गाण्यांमुळे त्या काळी खूप गाजला. या सिनेमातली बाबाने केलेली खलनायकाची भूमिकाही माझ्या लक्षात राहिली. त्यानंतर बाबाला मी नाटकात पहिल्यांदा पाहिलं ते ‘वेडा वृंदावन’मध्ये. हे नाटक पाहिलं तेव्हा मी शाळकरी मुलगा होतो. ‘वेडा वृंदावन’ हे नाटक त्या काळी गाजलेल्या पिसाट खुनी रामन राघव याच्या जीवनावर आधारित होतं. या भूमिकेत बाबाने जे रंग भरले होते, त्याला तोडच नव्हती. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने या नाटकाची निर्मिती केली होती. ती एखाद्या व्यावसायिक नाट्यसंस्थेने केली असती तर या नाटकाचे शेकडो प्रयोग नक्की झाले असते.
यशवंत दत्त उर्फ बाबाने भूमिका केलेले ‘नटसम्राट’ नाटक पाहिले आणि मी बाबाच्या प्रेमातच पडलो. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका मिळाल्यावर बाबाने ती उत्तम वठावी, यासाठी खूप मेहनत घेतली. आपला दमसास वाढावा म्हणून नाटकातले संवाद म्हणत तो पुण्यातील पर्वतीच्या टेकडीवर जात असे. आपल्या वडिलांचे जीवन बाबाने जवळून बघितले होते. त्यांच्या अनेक लकबी त्याने नटसम्राट साकारताना वापरल्या. एेन चाळिशीतच त्याने सत्तरीतला नटसम्राट ताकदीने उभा केला. मी नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका अनेक नटांनी केलेली पाहिली आहे; पण मला सर्वात जास्त भावली ती आमच्या बाबाची भूमिका. आजही नटसम्राट नाटक आठवलं की डोळ्यासमोर येतो, तो फक्त बाबाच. विशेष करून शेवटचा कोसळून पडण्याचा प्रसंग. बाबाच्या अभिनयामुळे हा प्रसंग पाहताना अंगावर काटा यायचा. आणखी एक गोष्ट विसरू शकत नाही ती म्हणजे, कविमनाचा बाबा नटसम्राटमधली ‘सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे, अंधारातल्या म्हाता-याला फक्त तुझा हात दे’ ही कविता कितीतरी सहजतेने प्रेक्षकांच्या काळजाला भिडेल अशा रीतीने म्हणायचा. शेक्सपिअरच्या किंग लिअर, मॅकबेथ आणि ऑथेल्लो या तीन नाटकांतील कथानक लेखक वसंत कानेटकर यांनी ‘गगनभेदी’ या नाटकात एकत्र मांडले. चंद्रलेखा निर्मित या नाटकात आधी अभिनेते मधुकर तोरडमल काम करत होते, पण काही कारणास्तव तोरडमलांनी नाटक सोडल्यावर त्यांची जागा बाबाने घेतली. बाकी सर्व कलाकार तेच असल्यामुळे तालमींना जास्त दिवस लागले नाहीत. मला तोरडमलांचं काम जेवढं आवडलं होतं तेवढंच बाबाचंही आवडलं.

चंद्रलेखाच्या आणखी एका नाटकात बाबाने रिप्लेसमेंट केली होती, ती ‘प्रेमाच्या गावा जावे’ या नाटकात. व्यवसायातील माझ्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत मला आवडलेले ‘प्रेमाच्या गावा जावे’ हे एकमेव विनोदी नाटक असेल, ज्यात कमरेखालचा एकही विनोद नाही. या नाटकातील अभिनेते अरविंद देशपांडे यांच्या निधनामुळे या तुफान चाललेल्या नाटकाचे थांबलेले प्रयोग बाबाने पुन्हा एकदा रिप्लेसमेंट करण्याची तयारी दाखवल्यामुळे सुरू झाले. त्यानंतर चंद्रलेखा संस्थेच्या ‘सोनचाफा’, ‘वादळ माणसाळतंय’, ‘सुख पाहता’ या नाटकांतून अभिनय केला. ‘प्रेमाच्या गावा जावे’ आणि ‘सोनचाफा’ या दोन्ही नाटकांत बाबाने आजोबाची भूमिका साकारली, तर बाबा आमटेंच्या जीवनावर आधारित ‘वादळ माणसाळतंय’ या नाटकात आमटेंची भूमिका साकारली होती. ‘सुख पाहता’ या नाटकात तर बाबाने सहा विविध भूमिका केल्या होत्या. या सहाही भूमिका करताना प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा राहील, याची काळजी बाबाने घेतली होती. यातली खोटे दात लावून केलेली वकिलाची भूमिका मला खूप आवडली होती. याच दरम्यान बाबाला ‘श्री तशी सौ’ हे विनोदी नाटक मिळाले. विनोदी नाटकाला लागणारे टायमिंग बाबाकडे जबरदस्त होते. त्यात या नाटकात बाबाला गिरीश ओक आणि वंदना गुप्ते यांची साथ मिळाल्यामुळे याही नाटकाने त्या काळी धमाल केली. ‘कालचक्र’ हे बाबाचं आणखी एक उत्तम नाटक. यात एका वृद्ध जोडप्याची समस्या मांडण्यात आली होती. ‘नटसम्राट’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘सोनचाफा’नंतर बाबाने समर्थपणे पेललेली आणखी एक म्हाता-याची भूमिका म्हणजे ‘कालचक्र’तील त्याचा अभिनय.

बाबाला सिनेमातही खूप छान भूमिका मिळाल्या. मला त्याचे आवडलेले सिनेमे ‘सुगंधी कट्टा’, ‘भैरु पैलवान की जय’, ‘पैजेचा विडा’, ‘आयत्या बिळावर नागोबा’, ‘फटाकडी’, ‘शापित’ इत्यादी. ‘शापित’ सिनेमातील बाबाचा अभिनय देशभर गाजला. ‘शापित’साठी बाबाला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता. बाबाने मराठीत केलेला शेवटचा सिनेमा ठरला ‘सरकारनामा’. यातील मुख्यमंत्र्याची भूमिका बाबाने अप्रतिम साकारली होती. हिंदीत बाबाला ‘क्रोध’ या सिनेमामुळे चांगला ब्रेक मिळाला. यातील खलनायकाची भूमिका खूप गाजल्यामुळे बाबाला अनेक हिंदी चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. बाबा माणूस म्हणूनही उत्तम होता. ‘नटसम्राट’ या नाटकाच्या दौ-यात मी स्वत: हा अनुभव घेतला आहे. सहका-यांशी जमवून घेणं, हा बाबाचा गुणविशेष. पुण्याचा रात्रीचा प्रयोग करून पहाटे बस पाच-सहा वाजता शिवाजी मंदिरच्या दारासमोर उभी राहिली की बाबा आधी गेटच्या बाजूलाच असलेल्या दुकानात जात असे, एक ग्लास गरम गरम दूध आणि जिलेबी खात असे. मी बाबाला कारण विचारलं तर मला म्हणाला, दिनू सकाळी गरम दूध, जिलेबी एकत्र घेतलं की जागरण आणि डोकेदुखीचा त्रास होत नाही. माणुसकी व माणसांना जपणारा असा हा आमचा बाबा. त्याच्या अकाली निधनाने सिनेनाट्यसृष्टी एका नटसम्राटाला कायमची मुकली.

dinupednekar1963@gmail.com
बातम्या आणखी आहेत...