आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ज्ञानपीठ’ आणि ब्रीदहीन लेखक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात फारसे काही घडत नाही, असा सूर एका बाजूला लावला जात असताना विचारवंत -साहित्यिकांच्या लिखाण-भाषणाने वैचारिक विश्व ढवळून निघू लागले आहे. विशेषत: गेल्या महिन्याभरात ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबेंनी जातिव्यवस्था आणि साहित्यातील देशीवाद याला अनुसरून केलेल्या टीका-टिप्पणीचे पडसाद वाचक-अभ्यासकांमध्ये प्रकर्षाने उमटू लागले आहेत. सखोल चिंतन, पक्की वैचारिक बैठक आणि प्रभावी युक्तिवाद ही वैशिष्ट्ये जपणा-या कसबेंनी पुणे येथे पहिला कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार प्रदान करताना समाजातील जातिव्यवस्थेच्या अंगाने भाष्य केले होते, तर अलीकडेच ‘परिवर्तनाचा वाटसरू’ नियतकालिकात त्यांचा साहित्यातील देशीवादाची कठोर चिकित्सा करणारा प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला. या दोहोंतील एकसमान आशयसूत्रांचा खास ‘रसिक’च्या वाचकांसाठी सादर केलेला हा संक्षिप्त अंश ...
दक्षिण आशियाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांचे एक अभ्यासक मिल्टन सिंगर यांनी भारतीय समाजव्यवस्थेसंबंधी असे लिहून ठेवले आहे की, “भारतातील काही विचारवंतांची एक विचारधारा असे मानते, की भारतातील विविध समाजगटांचे आधुनिकीकरण होणे केवळ अशक्य आहे. कारण त्यांच्या पारंपरिक सामाजिक संस्था आणि विश्वास यांची जनमानसावर इतकी घट्ट पकड आहे की, त्यांचे आधुनिकीकरण होणे शक्य नाही. भारतातील दुसरी विचारधारा असे मानते, की भारतात आधुनिकीकरण शक्य आहे. परंतु त्यासाठी पारंपरिक समाजव्यवस्था दूर सारावी लागेल किंवा तिला विभक्त कुटुंबपद्धतीत, सामाजिक वर्गात, खुल्या बाजारव्यवस्थेत, विवेकनिष्ठ शासकीय व्यवस्थेत आणि वैश्विक ज्ञान-विज्ञानाच्या प्रक्रियेत परिवर्तीत करावे लागेल.

परंतु दुस-या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतीय उपखंडाच्या झालेल्या फाळणीनंतर एक तिसरी प्रभावी विचारधारा पुढे आली. तिने थेट विचारले, “दक्षिण आशियात आधुनिकीकरण शक्य आहे की नाही हा मुळी प्रश्नच नाही तर ते कशाप्रकारे येईल हा आहे.”१
या तिन्ही विचारधारांपैकी तिसरी विचारधारा मला महत्त्वाची वाटते. मिल्टन सिंगर यांनी वरील लिखाण केले तोपर्यंत जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती. ती १९९० साली सुरू झाली. आधुनिकीकरण हे पाश्चिमात्य देशात मध्ययुगाच्या शेवटी होऊन गेलेल्या पुनरुज्जीवन आणि प्रबोधनाच्या (Renaissance) चळवळीतून उदयाला आले. पश्चिमेकडे निसर्ग आणि सामाजिक शास्त्रात जे नवनवे शोध लागले, त्यातून जागतिक समाजमन घुसळून निघाले. वैज्ञानिक शोधांना, तंत्रज्ञानाला जशा राष्ट्र, प्रदेश, धर्म, संस्कृती यांच्या सीमा नसतात, तशाच आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेलाही नाहीत. आधुनिकीकरणाने पुढे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये प्रदान केली ती अखिल मानवजातीसाठी दिलेली आहेत. जागतिकीकरणाकडे याच आधुनिकीकरणाची आर्थिक अभिव्यक्ती या दृष्टीने पाहिले जाते. जागतिकीकरणाचे एक जनक अर्थशास्त्राचे नोबेल विजेते जोसेफ स्टिगलित्झ यांनी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेसंबंधी जरी काहीसे असमाधान व्यक्त केले असले, तरी जागतिकीकरणातून कोणत्याही राष्ट्राची सुटका होण्याची चिन्हे नाहीत. जागतिक पातळीवरील या सर्व वेगवान घडामोडीमुळे सर्व विकसनशील राष्ट्रे संपूर्ण जगाच्या मानवजातीशी संवादी कसे बनता येईल, या दिशेने प्रयत्न करीत आहेत. भारतासारख्या स्थितिशील (conservative) मनोवृत्ती असलेल्या काही विचारवंतांना मानवजातीसमोरील आणि भारतासमोरील उभ्या असलेल्या या जटिल समस्येची त्यांच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा पारंपरिक व्यवस्थेच्या अतिरेकीपणामुळे म्हणा कल्पना येत नाही, असे जाणवू लागले आहे. उलट ही मंडळी या समस्येकडे अतिशय थिल्लरपणे आणि भावविवश होऊन पाहतात, असे दिसते. या आव्हानाशी पारंपरिक समाजव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करून सामना करता येणार नाही. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामाजिक विकासाची प्रक्रिया इतकी गतिमान होऊन पुढे गेलेली आहे की, तिला परत मागे फिरण्याचे सर्व रस्ते अर्थव्यवस्थेने कायमचे बंद करून टाकले आहेत. याची कल्पना नसणे म्हणजे थोर अज्ञानात आपापल्या जातीत आत्मरत (narcissit) जीवन जगणे आणि तेच आदर्श मानून इतरांनीही तसेच जीवन जगावे असा आग्रह धरणे, हे केवळ अज्ञानमूलकच नाही तर ती एक मानसिक विकृतीच आहे. याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत.

भारतात त्याच्या अगदी प्राचीन काळापासून परस्परविरोधी तत्त्वज्ञान संप्रदायांचा वारसा आहे. स्थूलमानाने त्याची विभागणी वैदिक आणि अवैदिक दर्शने अशी केली जाते. या दोघांच्या संघर्षातून आणि समन्वयातून भारतीय तत्त्वज्ञान विकसित झाले आहे. याचप्रकारे आधुनिक महाराष्ट्रालाही दोन परस्परविरोधी विचारधारांचा वारसा लाभलेला आहे. त्यापैकी पहिला वारसा हा लोकमान्य टिळक, चिपळणूकर, सावरकर आणि गोळवलकर या हिंदू राष्ट्रवादी मंडळींचा आहे. दुसरा वारसा हा मध्ययुगातील संतांच्या चळवळीपासून सुरू होतो आणि महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याजवळ संपतो. एकोणिसाव्या शतकापासून या दोन्हीही विचारपरंपरांत घनघोर संघर्ष सुरू होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या संघर्षाने ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचे रूप धारण केले. तोपर्यंत या चळवळी संघटित होत्या. त्यातच विसाव्या शतकातील दुस-या दशकात दलित चळवळ स्वतंत्रपणे उभी राहिली. भारताच्या राजकीय स्वातंत्-याच्या चळवळीत राजकीय सत्तेतील वाट्यावरून ब्राह्मणेतर चळवळीत फूट पडली आणि मराठा-मराठेतर असा सुप्त संघर्ष सुरू झाला. स्वातंत्र्योत्तर काळात दलित जाती-जमातीत हेच घडले. तिच्यातही महार-महारेतर असा संघर्ष कधी सुप्त तर कधी प्रकट रूपात व्यक्त होऊ लागला. या संघर्षाचे लोण सांस्कृतिक जीवनापर्यंत झिरपत गेले. १९६०च्या दशकात दलित साहित्याच्या चळवळीने जोर धरला आणि एका समर्थ साहित्य व्यासपीठाचा पाया घातला. काही काळ ही चळवळ सर्व जाती-धर्मांच्या समविचारी साहित्यिकांची होती. तिलाच पूरक आणि पोषक ग्रामीण साहित्याची चळवळ माझे मित्र प्रा. मा. रा. लामखेडे यांनी संगमनेर तालुक्यातील बोटा या खेडेगावात १९७९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण साहित्य संमेलन भरवून सुरू केली. या संमेलनाला बाबूराव बागूल, दया पवार यांच्यापासून ते आनंद यादव, रंगनाथ पठारे एकाच व्यासपीठावर हजर होते. त्यानंतर आदिवासी लेखक एकत्र येऊन त्यांनीही आदिवासी साहित्य संमेलने भरविली. त्यानंतर शरद पाटील, नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, रामप्रसाद तौर इ. साहित्यिकांनी दलित, ग्रामीण आणि आदिवासी साहित्याचे एकच व्यासपीठ ‘दआग्रा’ या नावाने सुरू करण्यासाठी एक मसुदा तयार केला. दआग्राची एक साक्री आणि दुसरे वाळवा येथे संमेलने पार पडली. साहित्यनिर्मितीसाठी चळवळ उभी केली तर बहुजन समाजाच्या तरुणांना अभिव्यक्त होण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि समविचारी मित्रांची वैचारिक देवाणघेवाण होऊन त्यांच्या लिखाणाला प्रेरणा मिळावी; ते काय आणि कसे लिहितात यापेक्षा त्यांनी मनातील सर्व न्यूनगंड फेकून लिहिते व्हावे, हा त्यामागील उद्देश होता. या सर्व चळवळींशी मी त्यांच्या जन्मापासून संबंधित होतो. त्यांच्यापैकी काहींच्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही मी भूषविले होते. या चळवळी वेग घेत असतानाच डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ‘कादंबरी’ हा निबंध १९८० साली लिहिला. या निबंधात त्यांनी ‘स्वदेशीवाद’ असा शब्द वापरून नेटिव्हिझमची मांडणी अगदी थोडक्यात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘स्वदेशीवादा’तील ‘स्व’ काढून टाकून फक्त ‘देशीवाद’ हा शब्द ठेवला. त्यांच्या या देशीवादाची मांडणी त्यांनी पुढे १९८३ साली केली. नेमाडे यांना या स्वदेशी किंवा देशीवादाची आवश्यकता का वाटली, याचाही आपल्याला शोध घ्यावयाचा आहे.
हा शोध घेण्यासाठी ज्ञानपीठ पारितोषिकविजेते ज्येष्ठ कादंबरी लेखक आणि विचारवंत डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी वृत्तपत्रातून ज्या सनसनाटी मुलाखती दिलेल्या आहेत आणि तारस्वरात जी भाषणे केलेली आहेत त्यांचे निमित्त झाले असले, तरी त्यांच्या लिखाणात आणि मुलाखतीत ज्या ज्ञानशाखांची केवळ नावे घेतली आहेत, परंतु त्यांच्यासंबंधी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, त्यांच्याच आधाराने त्यांच्या वैचारिक भूमिकेची चिकित्सा करायची आहे. त्यांनी या सर्व खटाटोपात सिंधू संस्कृती, मातृसत्ता, जातिव्यवस्था, संतचळवळ, देशीवाद, ब्रिटिश साम्राज्यशाही, इंग्रजी शिक्षण, आधुनिकता, दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य इ. विषयांवर टीकाटिप्पणी केलेली आहे. सर्वसामान्यपणे असे मानले जाते, की वैचारिक लेखनातून किंवा समीक्षेतून वाचकांच्या मनातील गोंधळ क्रमाने कमी कमी होत जात असतो. नेमाडे यांच्या वैचारिक लेखनातून वाचकांच्या मनातील गोंधळ कमी होण्याऐवजी तो वाढतानाच दिसतो. ते सध्या ज्या काही अचाट गोष्टी सांगत आहेत, त्यांचा प्रतिवाद करण्याचे धाडस ना पुरोगामी विचारांच्या मंडळींना होताना दिसते, ना साहित्यिकांना. याचे कारण गेल्या दशकावर त्यांनी या ना त्या प्रकारे साहित्य अकादमीसारख्या संस्थेत निर्माण केलेला दबदबा आहे. परंतु त्या साहित्यिक राजकारणाबद्दल नंतर चर्चा करू. तूर्त नेमाडे यांच्या डोक्यातील गोंधळ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू.

डॉ. नेमाडे यांचा वैचारिक गोंधळ
कोणत्याही प्रकारच्या वैचारिक लेखनाला एक शिस्त असते. ज्या ज्ञानशाखांचा लेखक हवाला देतो, त्यांची केवळ नावे लिहून किंवा बोलून उपयोगाचे नसते. त्या ज्ञानशाखेचे आपल्याला किती ज्ञान आहे, हे वारंवार तपासत पुढे जावे लागते. नव्या अभ्यासाने जुनी मते बदलावी लागतात किंवा त्यात दुरुस्त्या कराव्या लागतात. त्यांच्या वैचारिक लेखनात कुठेही संदर्भग्रंथांची, तळटीपांची, अवतरणांची उपस्थिती दिसत नाही. अशा वैचारिक लेखनाला बेजबाबदार आणि बेशिस्त लिखाण मानले जाते. वैचारिक लिखाण करणे ही एक जोखीम असते. ती अतिशय जबाबदारीने पेलायची असते. तसे झाले नाही तर विचारवंत एखाद्या ईश्वरासारखा किंवा त्याच्या अवतार, प्रेषितासारखा स्वयंभू बनतो आणि तो एक अलौकिक उपदेशक बनण्याचा प्रयत्न करीत असतो. नेमाडे यांच्या बाबतीत काहीसे असेच झालेले आहे. त्यासंबंधीची त्यांनी केलेली विधाने विवेचनाच्या ओघात येतील.
नेमाडे यांनी टीकास्वयंवर या लेखसंग्रहात२ टीकाकारांना एक ताकीद दिलेली होती. “टीका हे चिंतन गोंधळ संपल्याखेरीज बाहेर येता उपयोगाचे नाही व ते सर्व साहित्यास संपूर्णपणे आपोआप लागू झाले पाहिजे. (टीस्व, २०) परंतु ही ताकीद स्वतःसाठी मात्र नाही. त्यांच्या लिखाणातील काही वाक्यांतून कोणताही स्पष्ट अर्थ निघत नाही. त्यांनी त्यांच्या वैचारिक लिखाणात अशी काही निसरडी वाक्ये लिहिली आहेत, की त्यांचा अर्थ परस्परविरोधीही निघू शकतो. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासंबंधी केलेली विधाने त्यांना इतिहास म्हणजे काय, याचेच अज्ञान दर्शविणारा आहे. याचा अर्थ त्यांचा मानववंशशास्त्र (Anthropology), पुरातत्त्वशास्त्र (Archaeology) इ. ज्ञानशाखांचा मुळीच अभ्यास नाही, असा होत नाही. परंतु त्यांचा तो अभ्यास साहित्य किंवा भाषाशास्त्र यांच्या अनुषंगाने झालेला आहे, हे त्यांच्या लिखाणात स्पष्टपणे जाणवते. एखाद्या ज्ञानशाखेचा आनुषंगिक अभ्यास असल्याने तो वरवरचा किंवा फारच झाले तर उपयोगापुरता असतो. कोणत्याही अभ्यासकाला किंवा विचारवंताला नेहमीच आपल्या मर्यादांची जाणीव असावी लागते, त्याशिवाय तो विकसित होत नाही. ज्यांना ती नसते ते एकतर ठोंबे बनतात किंवा प्रेषित. नेमाडे यांचे या मर्यादांकडे दुर्लक्ष झाल्याने एक तर ते निसरडी वाक्ये बोलतात किंवा जे अशक्य आहे ते करून दाखविण्यासारखी ‘पुन्हा एकदा मातृसत्ताक नियम, कायदे प्रस्थापित केले पाहिजेत’ (समाज प्रबोधन पत्रिका, जाने-मार्च २०१५), ‘सगळ्यांचा मिळून एकसारखा इतिहास आहे’ (स.प्र., उक्त), ‘आर्य फार अलीकडे आले. त्याच्याही साठ हजार वर्षांपूर्वीपासून आपल्याकडे लोक राहातच होते.’ (स.प्र., उक्त.) आपली कृषिसंस्था नीट करायची असेल, तर आज ना उद्या ही ग्रामसंस्था नीट करावीच लागेल. आणि पूर्वीसारखी संपूर्ण ग्रामस्वायत्तता आल्याशिवाय ती नीट होणार नाही.’ (स.प्र., उक्त) अशी प्रेषिती वाक्ये उच्चारावी लागतात. फार फापटपसारा नको, म्हणून तूर्त एकाच नियतकालिकातील उदाहरणे उद्धृत केली आहेत. नेमाडे यांना खरंच मातृसत्ता माहीत आहे? तिचा ऐतिहासिक तपशील त्यांच्या लिखाणात कुठेही दिलेला नाही. तिचा कालखंड कोणता, याचाही निर्देश नाही. तिचे कायदेकानू कोणते होते, याचीही काही माहिती नाही. मातृसत्तेवर इंग्रजीत विपुल लेखन उपलब्ध आहे. तिच्या केलेल्या संशोधकांचे, मॉर्गन, बेशोफेन, फ्रेडरीक एंगल्स यांपैकी कोणाच्याही नावाचा त्यांच्या लिखाणाला स्पर्श झालेला नाही. इंग्रजी साहित्य हा नेमाडे यांच्या अभ्यासाचा खास विषय. इंग्रजी वाङ‌्मयात अभिजात मानली गेलेली इस्किलसी ओरेस्तियन ट्रिलॉजी ही कलाकृती तरी त्यांनी वाचायला हवी होती. तिच्यात मातृ-पितृसत्तेच्या संघर्षाचे उत्तम विवेचन आहे. आजच्या स्त्री-पुरुष समतेच्या काळात मातृसत्तेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार हा स्त्री-पुरुष विषमतेला अधोरेखित करणारा आहे. इतिहासातील प्रचंड संघर्षानंतर मानवजातीने लोकशाहीसारखी आणि समाजवादासारखी स्त्री-पुरुष समतेवर उभी असणारी जीवनपद्धती शोधून काढली आणि ती अंगीकारली आहे. नेमाडे इतिहासाची चाके उलटी फिरवणार आहेत काय? त्यांच्यात तेवढे सामर्थ्य आहे काय? त्यांनी पहिल्यांदा आपल्या लिखाणातील जाणीवपूर्वक गाळलेल्या जागा भराव्यात.

‘भारतात सर्वांना मिळून सारखा इतिहास आहे’ हे त्यांचे वाक्य अकरावी-बारावीतले विद्यार्थी वाचून हसतील. समान इतिहास आणि समान स्मृती हा ‘राष्ट्र’निर्मितीतील एक प्रमुख घटक असतो. भारत त्याच्या इतिहासात आधुनिक राष्ट्रसंकल्पनेच्या दृष्टीने कधीच राष्ट्र बनू शकले नाही, याचे एक कारण समान इतिहास आणि समान स्मृतींचा अभाव आहे, हे कोणताही राज्यशास्त्रज्ञ किंवा इतिहासकार आज नाकारीत नाही. इथे आलेल्या आर्य, शक, कुशाण, हून, मुसलमान यांना समान ऐतिहासिक वारसा आहे? यातून इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज मुद्दाम वगळले आहेत. हे सोडून इतर टोळ्या, वंश आणि धार्मिक गट एकात्म होते. ब्रिटिश साम्राज्यशाहीने त्यांचे विघटन केले, असा नेमाडे यांचा आरोप आहे. असे होते तर भारताची फाळणी का झाली? ती ब्रिटिशांनी केली की हिंदू-मुस्लिम समाजांनी? स्वातंत्-यानंतर एका काळात द्रविडस्थानच्या मागणीने आणि खलिस्तानच्या मागणीने जोर धरला होता. तो ब्रिटिशांमुळे? आजही उत्तरपूर्व भारत खदखदतो आहे. तिथे गेलेल्या भारतीय माणसाला स्वतःपेक्षा वेगळे समजून इंडियन समजतो. नेमाडे आसाममध्ये बसून कोणते संशोधन करतात? इथल्या केवळ धार्मिक गटांनाच नव्हे तर इथल्या प्रत्येक जातीला स्वतःला स्वतंत्र इतिहास आहे आणि परस्परविरुद्ध स्मृती आहेत. अनेक जातींनी त्या मौखिक परंपरेने टिकवून ठेवल्या आहेत. ‘भारतात आर्य येण्यापूर्वी साठ हजार वर्षांपूर्वी भारतात माणसे राहातच होती.’ हे नेमाडेंचे विधान मानववंशशास्त्राच्या दृष्टीने तपासले पाहिजे. ही माणसे कोणती होती? त्यांची उत्पादनाची साधने कोणती होती? साठ हजार वर्षांपूर्वी संस्कृतीचा जन्म झाला होता का? मानवी संस्कृती पहिल्यांदा कुठे आणि कशी जन्माला आली? संस्कृतीचा उगमच मुळी शेवटच्या हिमयुगानंतर झाला. तो इ.स.पूर्वी पन्नास हजार वर्षांपूर्वी. अल्तामिरा वगैरे ठिकाणी आदिमानवाने काळोख्या गुहेत जी चित्रे आपल्या हाताच्या छापासह काढली, त्यांचा काळ वीस हजार वर्षांपूर्वीचा आहे. माणूस काही ईश्वराने निर्माण केलेला प्राणी नाही. त्याला ओल्ड टेस्टामेंटमधील ईश्वराने निर्माण केले नाही, ना त्याला ऋग्वेदाच्या पुरुषसूक्ताप्रमाणे ब्रह्म्याच्या तोंडातून, छातीतून, मांड्यातून किंवा पायातून निर्माण केले. तो अमिबापासून स्वप्रयत्नाने विकास पावलेला प्राणी आहे. चार्ल्स डार्विन यांचे नाव निदान शाळेत तरी नेमाडे यांनी शिक्षकाकडून ऐकले असावे. त्यांच्या उत्क्रांतीवादाचाही त्यांना अल्प परिचय असावा. अॅस्ट्रोलोपिथिकस, होमो-इरेक्टस आणि होमोसॅपियन म्हणजे आताचे आपण सर्व जण उत्क्रांत होत आजच्या अवस्थेला आलो आहोत. या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील खरा माणूस अद्याप उत्क्रांत व्हायचाच आहे. आपल्यापुढची मानवजाती निर्माण करण्याचा प्रयत्न केविन वॉरविक यांनी केला आहे. त्याला त्यांनी ‘सायबॉर्ग’ असे नाव दिले आहे. ते आणि त्यांच्या पत्नी सहा महिने त्या अवस्थेत वावरल्या आणि त्या अवस्थेतील अनुभवांचे कथन त्यांनी आपल्या I Syborg या आत्मचरित्रात केले आहे. परंतु हा निसर्गाने बहाल केलेल्या आणि मानवाकडे अतिशय विश्वासाने सुपूर्द केलेल्या उत्क्रांतीचा विश्वासघात करणे आहे. नेमाडेंना जर हे काही माहीत असेल तर ते होमो-सॅपियन-सॅपियन म्हणजे आजच्या माणसाचा विचार, त्यापूर्वीच्या अवस्थेतच का अडकून पडले आहेत? तीच अवस्था आदर्श होती असे का मानत आहेत?

ग्रामव्यवस्था पूर्वीसारखी स्वायत्त करून स्वयंपूर्ण खेड्याच्या पुनरुज्जीवनाची केलेली घोषणा म्हणजे अपूर्व दूरदृष्टीचे दुर्मीळ उदाहरण आहे. नेमाडेंना कृषिसंस्थेबद्दल प्रेम आहे. नेमाडेसारखाच मीही औरंगपूर, ता. अकोले, जि. अहमदनगर या छोट्या गावात वाढलो असल्यामुळे पेरणी सोडून बाकी सर्व शेतीची कामे मी करू शकतो. मॅट्रिक होईपर्यंत रोजंदारीवर ती कामे मी केलेली आहेत. त्यामुळे मलाही शेतीबद्दल फार प्रेम आहे. परंतु शेतीचे अर्थशास्त्र काय सांगते? कोणत्याही खेड्याला स्वयंपूर्ण करायचे असेल तर त्याच्या आवश्यकता लक्षात घेऊन विविध प्रकारची पिके घ्यावी लागतील. शेतकरी ते मान्य करतील? दोन एकराच्या आतल्या कोणत्याही शेतक-याला उत्पादनखर्चही मिळत नाही. मी स्वतः तीन वर्षे हा धंदा करून प्रत्येक वर्षी वीस हजार रुपयांचा तोटा सहन करून तो सोडला. आजही अनेक वर्षे पडित पडलेली उदासवाणी शेते बघून आत गलबलते. म्हणून मी औरंगपूरला जाणेच सोडून दिले आहे. आज पाच एकरांपेक्षा जास्त शेती असलेल्या बागायतदारालाच शेती परवडू शकते. आज शेती भांडवली झालेली असल्यामुळे नगदी पिकावर शेतक-यांचा अधिक जोर आहे. हयातभर बाजरीची भाकरी खाणारे संपूर्ण औरंगपूर बाजरीला पारखे झाले आहे. सारे शिवार ऊस, घास, पालेभाज्या, टमाटे यांनी फुलले आहे. आणि बाजरीचे उत्पादन परवडत नाही म्हणून गरीब कोरडवाहू शेतक-यांची शेते पडीक आहेत. गाव स्वयंपूर्ण करणे म्हणजे मर्यादित उत्पन्न घेणे. मग बाजारपेठांचे काय? अतिशय परिश्रमाने उभ्या केलेल्या बाजार समित्यांचे काय? गाव स्वयंपूर्ण करणे म्हणजे मर्यादित उत्पन्न घेणे. गाव स्वयंपूर्ण करण्याला पहिला विरोध शेतकरीच करतील. शेतकरी आणि गाव सुखी करायचे असतील तर आमची सत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, हा वृथा अभिमान सोडला पाहिजे आणि शेतीवरील लोकांची संख्या कमीत कमी केली पाहिजे. ते काम पूरक व्यवसाय आणि औद्योगिकीकरणच करू शकेल. आजचे खेडे नेमाडेंचे आदर्श गाव राहिलेले नाही. त्याचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मनावर अधिराज्य स्थापन केले आहे. संपूर्ण जग त्यांच्या टीव्हीच्या स्क्रीनवर झळकते आहे. त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत जाणवेल इतका फरक पडलेला आहे. त्यांना नेमाडेंनी भैरू त्याची बायको, डोईवर भाकरीची पाटी बांधावर बसून गुडघ्यावर कांदा फोडून भाकरी खाण्याच्या आणि पाटातील पाणी ओंजळीने पिऊन ढेकर देण्याच्या फालतू आणि कालबाह्य गोष्टी सांगू नयेत. आता भैरूही शर्ट-पँटवाला बनला आहे आणि त्याची बायकोही पाचवारी गोल पातळ नेसते आहे. युरिया आणि इतर रासायनिक खतांनी पाटाचे पाणी दूषित झाले आहे. नेमाडेंना भारतीय पोशाखाचे फार आकर्षण आहे. त्याची रसभरीत वर्णने त्यांनी केली आहेत. नेमाडेंनी धोतर नेसून सकाळी दहाच्या सुमारास लोकलने प्रवास करून दाखवावा आणि कासोट्याला जपून दाखवावे. सर्व स्त्री-पुरुषांना त्यांचा मनपंसत आणि सोयीचा पोशाख करण्याचे स्वातंत्र्य असावे. एवढे मोठे लुगडे सांभाळीत बसण्यापेक्षा आपल्या परवडतील असे ड्रेस शिवावेत. अशा नवा ड्रेस घातलेल्या, अंगावर सेफ्रॉन धारण केलेल्या आणि रुमालाने डोके झाकून काम करणा-या तरुण मुली शेतावर दिसू लागल्या आहेत. त्या संख्येने कमी असल्या तरी त्यांची संख्या वाढेल. नेमाडे यांचे लिखाण वाचताना ते त्यांनीच निर्माण केलेल्या एका युटोपियात अडकलेले जाणवते. त्यांचा युटोपिया आणि प्रत्यक्ष वास्तव यांचा त्यांना मेळ घालता येत नाही, म्हणून ते स्वतःच एका प्रचंड वैचारिक गोंधळात सापडले आहेत. ‘शंभरपट वाचावं आणि एकपट लिहावं, असं मानणारा मी माणूस आहे’ (स.प., उक्त) असं स्वतःचं वर्णन त्यांनी स्वतःच केलं आहे. त्यांच्या वैचारिक लिखाणात तरी तो माणूस दिसत नाही. त्यात दिसतो तो माणूस शंभरपट वाचणारा आणि शंभर विषयांवर बेताल लिहिणारा आणि बाष्कळ बोलणाराच दिसतो.

नेमाडे यांनी त्यांच्या ‘हिंदू’ या कादंबरीच्या हिंदी अनुवादाच्या प्रकाशन समारंभात जोरदार भाषण केले. ते ‘साधना’ साप्ताहिकाच्या ९ मे २०१५च्या अंकात बाळासाहेब पाटील यांनी अनुवाद करून छापले. त्यात त्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीबद्दल विशेषतः लॉर्ड मेकॉले यांच्याबद्दल काही विधाने केली आहेत. त्यात त्यांनी मेकॉले यांची शिक्षणपद्धती भारतीय संस्कृतीला एकवचनी बनविणारी होती, असे म्हटले आहे. त्याच्या लिखाणात इतरत्रही हाच सूर असून ती इंग्रजांनी भारतावर लादली, असेही प्रतिपादन आहे. खरंच हे खरं आहे? एखाद्या महान संस्कृतीला एक क्षुल्लक शिक्षणपद्धती एका फटका-यात आमूलाग्र बदलवित असते? तिला अनेकवचनीचे एकवचनी करू शकते, इतकी ती निर्जीव असते? जर असे असेल तर ती निर्जीव का बनली, याचा शोध घ्यायला नको? तो ब्रिटिशांनी घ्यायचा की स्वदेशीवादी भारतीयांनी? अशा निर्जीव संस्कृतीला जनतेने का म्हणून कवटाळायचे? ब्रिटिशांनी इंग्रजी भाषा भारतीयावर लादली, की इंग्रजी शिक्षणाची मागणी भारतीयांनीच केली? मेकॉलेची शिक्षणपद्धती लागू होण्यापूर्वी ब्रिटिश भारतीयांना संस्कृत आणि अरेबिक भाषा शिकणा-या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देत होते. या विद्या प्राप्त होऊनही विद्यार्थी बेकार राहात होते. त्यांनी ब्रिटिश सरकारकडे काय मागणी केली होती? दि. ३१ डिसेंबर १८२३ ला राजा राममोहन रॉय यांनी गव्हर्नर हॅमहर्स्टनला उद्देशून लिहिलेल्या पत्राचा मजकूर काय होता? संस्कृत भाषेचा प्रचार करण्यासाठी ‘ऋग्वेदा’सारखे महत्त्वाचे आणि प्राचीन वाङ‌्मय छापण्यास इंग्रजांनीच पुढाकार घेतला होता. मॅक्समुल्लरने संपादित केलेला ऋग्वेद १८४९ साली प्रसिद्ध झाला. त्यासाठी लॉर्ड मेकॉले यांनी खूप प्रयत्न केले. १८४७ सालच्या एप्रिल महिन्यात ईस्ट इंडिया कंपनी आणि मॅक्समुल्लर यांच्यात एक करार झाला. त्याप्रमाणे ऋग्वेदाचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी प्रत्येक छापील पानाला चार पौंड देण्याचे ठरले होते. ब्रिटिशांनी मराठी भाषेच्या विकासासाठी काहीच केले नाही? ज्यांना आज आपण सर्वच डोक्यावर घेऊन नाचतो आहोत, ती तुकारामाची गाथा कुणी छापली? नेमाडेंनी स्वतःच याचा उल्लेख करताना लिहिले आहे, “१८६८ साली तुकारामाची गाथा इंग्रजाच्या हट्टामुळे प्रथम छापली गेली, तेव्हा ह्या कुणबी ग्रंथाची विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी हेटाळणी केली.” (टीस्व, ७२) महात्मा जोतिराव फुले, न्या. रानडे, आगरकर इ. सुधारकही इंग्रजीची मागणी करीत होते. राजा राममोहन रॉय, म. फुले इ. समाजसुधारकांनी शिक्षणासंबंधी ज्या मागण्या सुचविल्या होत्या, त्या सर्वांचा समावेश मेकॉले यांच्या शिक्षणपद्धतीच्या आराखड्यात केलेला आहे. मेकॉले यांनी ब्रिटिश पार्लमेंटला जो मसुदा सादर केला आणि ज्याची चर्चा २ फेब्रुवारी १८३५ला झाली, तो नेमाडेंनी मुळातून वाचावा. नेमाडे यांनी आपले मेकॉले यांच्याबद्दलचे मत रा. स्व. संघाने आणि त्यांच्या समर्थकांनी मेकॉलेच्या नावावर जो खोटा मजकूर छापला आहे त्यावरून केलेले स्पष्ट दिसते. मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीवर पुढे विस्ताराने लिहिले जाणारच आहे.

डॉ. भालचंद्र नेमाडे यांची डॉ. गोरख थोरात यांनी घेतलेली मुलाखत समाज प्रबोधन पत्रिकेच्या जाने.-मार्च २०१५च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “पुरातत्त्व कधीच खोटं बोलत नाही... पुरातत्त्व हा खुद्द पुरावाच असतो.” खरंच पुरातत्त्व इतकं स्वायत्त आहे? आतापर्यंत जेवढी उत्खनने झालेली आहेत, त्यांचा कालखंड कोणत्या निकषावर ठरत होता? त्याचे निकष पुरातत्त्वशास्त्राकडे होते? चीनमध्ये जे सांगाड्यांचे अवशेष (Fossil) सापडे त्यावरून चार लाख वर्षांपूर्वी आजचा होमो सॅपियन म्हणजे आपला निकटचा पूर्वज होमो-इरेक्टर चीनमध्ये शेक्याट्यांच्या आजूबाजूला बसलेला होता. त्याचा कालखंड ठरविण्यासाठी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचाच आधार घेतला ना? उत्खननात सापडलेल्या पुराव्यांचा आणि संस्कृतीचा तपशील तेथील भाषेचा उलगडा झाल्याशिवाय ठरविता येईल? माणसाचा आणि निसर्गाचा अभ्यास करणा-या ज्ञानशाखांवर अगदी इतिहासासहित डार्विनच्या उत्क्रांतीवादाने कोणते बदल केले, असे म्हणण्यापेक्षा त्यांचा विकास कसा केला, याची थोडी तरी जाणीव नेमाडे यांना आहे? पुरातत्त्वात सापडलेल्या फॉसिल्सची कालगणना करण्याची डॉ.डब्ल्यू. ए. लिबी यांनी शोधून काढलेली रेडिओ कार्बनची शास्त्रीय पद्धती कधी शोधली गेली? त्यापूर्वी कालगणना कशाच्या आधारावर करीत होते? विसाव्या शतकाच्या मध्यान्ही लागलेला रेडिओ कार्बन पद्धतीचा सिंधू संस्कृतीचा कालखंड ठरविण्यात उपयोग का होत नाही? पुरातत्त्व हे स्वायत्त शास्त्र नाही. किंबहुना कोणतेही शास्त्र स्वायत्त नसते. शास्त्र स्वायत्त असल्याचा सिद्धान्त कधीच कालबाह्य झालेला आहे. आज सर्व ज्ञानशाखा परस्परावलंबी बनल्या आहेत. पुरातत्त्व हे मानववंशशास्त्र, इतिहास, भाषाशास्त्र, उत्क्रांतीवाद, भूगोल यांच्या मदतीशिवाय कोणतेही निष्कर्ष काढू शकत नाही. या सर्वांची चर्चा आपण सिंधू संस्कृतीच्या विवेचनाच्या वेळी विस्ताराने करू.

याच मुलाखतीत नेमाडे यांनी स्वतःबद्दल पुढे सांगितले आहे, “मला सांखलीयांसारखे चांगले चांगले गुरू मिळाले. गो. पु. देशपांडेंसारखे इतिहासाचे खंदे विद्यार्थी माझे मित्र होते. याबाबतीत मी फार भाग्यवान आहे.” हे वाचून समाधान वाटले, कारण नेमाडे कोणाच्या तरी प्रति कृतज्ञता व्यक्त करू शकतात. परंतु नेमाडे यांचे लिखाण आणि मुलाखती वाचत असताना या दोघांचाही प्रभाव दूरन्वयानेही कुठे दिसत नाही. डॉ. सांखलीयांना मी कधी भेटलो नाही. परंतु ज्या डेक्कन कॉलेजात असताना त्यांनी अमूल्य असे संशोधन केले, त्याचे मला आकर्षण होते. त्याची ओळख व्हावी आणि डेक्कन कॉलेजच्या समृद्ध ग्रंथालयाचा उपयोग करता यावा, म्हणूनच केवळ मी डेक्कन कॉलेजचा ट्रस्टी होण्यास होकार दिला. गेली पंधरा-वीस वर्षे मी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती जवळून घेत असतो. सांखलीया हे एक अतिशय नम्र संशोधक होते आणि त्यांना पुरातत्त्वाच्या आणि स्वतःच्या मर्यादांची नम्र जाणीवही होती, हे त्यांच्या Born For Archaeology या आत्मचरित्रावरून समजते. त्यांनी या आत्मचरित्रात पुरातत्त्वाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. ते लिहितात, “मी विशेषतः मिश्रा यांचे स्वागत केले कारण मला याची जाणीव झाली की, पुरातत्त्वशास्त्र विशेषतः प्रागैतिहासिक (prehistory) पुरातत्त्वशास्त्राला मानववंशशास्त्राच्या भक्कम पायावर उभे केलेच पाहिजे. केवळ वस्तूंचा शोध लावणे पुरेसे नाही. त्यांचे व्यवस्थित विश्लेषण (interpretation) करता आले पाहिजे. हा सरावासाठी आदिम माणसांच्या जीवनाचे, त्यांच्या रूढी आणि पद्धतींचे आणि सामाजिक रचनेच्या अंतरंगांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मी ज्या अधिकाराच्या जागेवर होतो, त्याची कर्तव्ये मी फार कमी प्रमाणात निभावली. मी नेहमीच असा विचार करीत असे की, सामाजिक मानववंशशास्त्रात पारंगत असलेला विद्यार्थी आपल्या विभागाचे भूषण ठरू शकेल.”३
कोणताही महान संशोधक नम्र तर असतोच, परंतु आपल्या समकालीनांबद्दल, ते त्याचे टीकाकार असले तरी, उदार दृष्टिकोन ठेवून त्यांच्याशी संवाद चालूच ठेवीत असतो. त्याच्या स्वतःच्या विचारविकासाची ती पूर्वअट असते. या दृष्टीने सांकलीयांच्या आत्मचरित्रातील एक प्रसंग नोंदविणे आवश्यक वाटते. त्यांच्या Prehistory and Protohistory of India and Pakistan या ग्रंथावर Times of Indiaत डी. डी. कोसंबी यांनी सडकून टीका केली होती. त्यामुळे व्यथित झालेल्या मनःस्थितीतही सांकलीयांनी कोसंबींशी पत्रव्यवहार केला. त्यांना डेक्कन कॉलेजच्या भेटीचे निमंत्रण दिले. चर्चा करून त्यांचे गैरसमज दूर केले. कोसंबींनीही उदार मनाने ते स्वीकारले. या भेटीचे वर्णन करताना सांकलीयांनी लिहिले आहे, ""I also think it to be a great honour to be complemented by no less a person than Professor D. D. Kosambi.''४ नेमाडे त्यांच्या समकालीनांशी कसे वागतात. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्यासारख्या अख्खे आयुष्य समीक्षक म्हणून आणि गाढे व्यासंगी म्हणून ज्यांनी व्यतीत केले, त्यांच्या लेखनाबद्दल काय प्रतिवाद केला? त्यांचे भक्त मोठ्या अभिमानाने आणि भक्तिभावाने सांगतात, ‘नेमाडे कधीही प्रतिवाद करीत नाहीत.’ हा खुजेपणा आहे. प्रतिवाद करण्यासाठी सक्षम आणि गतिमान असावे लागते. नेमाडे यांच्यात ही सक्षमता आणि गतिमानता असेल का, याबद्दल मला शंका आहे.

आता गो. पु. देशपांडे यांच्याबद्दल. गोपुंची आणि माझी गेल्या तीन दशकांची मैत्री होती. माझ्या ‘आंबेडकर आणि मार्क्स’ या १९८५ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथावर गोपुंनी Economic and Political Weeklyत दीर्घ परीक्षण लिहिले होते. गोपुंच्या मनावर मार्क्सवादाचा अमीट असा प्रभाव होता. त्यांचा डी. डी. कोसंबीसहित देवराज चनाना, देविप्रसाद चट्टोपाध्याय इ.सारख्या भारतीय आणि पाश्चिमात्य मार्क्सवादी विचारवंतांच्या लेखनाचा गाढा अभ्यास होता. नेमाडेंच्या लिखाणात कुठेही डी. डी. म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या लिखाणाचा उल्लेख दिसत नाही. उलट मार्क्सवादाबद्दल आणि भारतीय कम्युनिस्टांबद्दल त्यांच्या मनात बराच द्वेष असावा. त्यांनी धर्मानंद कोसंबींचा निदान ‘हिंदी संस्कृती आणि अहिंसा’ हा ग्रंथ वाचला असावा. परंतु त्यांच्या नावावर स्वतःची मतेच खपविली आहेत. नेमाडे ‘टीकास्वयंवर’मध्ये लिहितात, ‘कोसंबी म्हणतात की, या सर्व उदाहरणांवरून भारतावर घडून आलेल्या अनेक प्रभावांचा असा एक क्रम दिसून येतो की, ज्यामुळे देशी सर्जकशीलतेचा कोणताही उद्रेक अशक्य ठरावा.’ (टीस्व, २४७) हे धादांत खोटे आहे. धर्मानंद कोसंबींच्या निदान ‘हिंदी संस्कृती आणि अहिंसा’ या ग्रंथात तरी स्पष्टपणे दिसत नाही. नेमाडेंची तळटीपा न देण्याची बेशिस्त स्वतःच्या मताचा प्रचार करण्यासाठी इतरांच्या नावांचा दुरुपयोग करण्यासाठीच जन्मलेली आहे. नेमाडे यांनी ‘मुळात बाबिलोनियाचा कासी संहारक आणि ज्याने सिंधू संस्कृतीच्या ब्राह्मणांना कुत्-याचे मांस खावयास लावले होते, तोच देवांचा राजा इंद्र पुढे ब्राह्मणांना इतका पूजनीय झाला की त्याच्यावर स्तोत्रे लिहिली गेली.’ (टीस्व, २४७). असा जो संदर्भ दिला आहे, तो वाचला असता नेमाडे काय बरळत आहेत, याची जाणीव होते. कोसंबींनी ‘वैदिक संस्कृतीचा उगम व विकास’ या शीर्षकाखाली (पृ. २९-३१) जे विवेचन केले आहे ते नेमाडे म्हणतात तसे मुळीच नाही. नेमाडेंनी शोधून काढलेला हा कासी संहारक कोण? ऋग्वेदाच्या ४।८ या सूक्ताचा कर्ता वामदेव हा ऋषी होता. या सूक्ताच्या शेवटच्या ऋचेत तो म्हणतो, “खाण्याला काही न मिळाल्यामुळे मी कुत्र्याची आतडी शिजविली. देवामध्ये रक्षण करणारा मला कोणी सापडेना. माझ्या बायकोने केलेली माझी विडंबना मी पाहिली, अशा स्थितीत श्येनाने म्हणजे इंद्राने मला मध दिला.” यावरून असे दिसते की, हा ऋषी पूर्ववयात अत्यंत दरिद्री होता. पुढे इंद्राची स्तोत्रे रचण्याचा धंदा पत्करून इंद्राकडून मोठी देणगी मिळविली. इंद्राने त्या ब्राह्मणाला कुत्र्याचे मांस खावयास लावले नाही तर उलट त्याला मध दिला. नेमाडे समजतात तसा वामदेव हा ब्राह्मण सिंधू संस्कृतीतील नव्हता तर त्याच्या नावात ‘देव’ हा शब्द असल्यामुळे तो मूळचा एलाममधीलच राहणारा असावा. नेमाडे काय काय खोटं पचवितात, याची कल्पनाच केलेली बरी. नेमाडेंचा हा लेख त्यांच्या ‘टीकास्वयंवर’ या लेखसंग्रहात ‘वाङ‌्मयीन प्रभावाच्या अभ्यासाचा सैद्धांतिक आराखडा = आंग्लभारतीय संदर्भात’ या लांबलचक नावाने छापला आहे. मुळात तो नेमाड्यांच्या इंग्रजी प्रबंधावर आधारलेला आहे. त्याचे भाषांतर चंद्रशेखर जहागिरदार यांनी केलेले आहे. जहागिरदार हे उत्तम अभ्यासक आणि समीक्षक आहेत. त्यांनीही भाषांतराच्या अशा पाट्या टाकाव्यात. भाषांतरकाराने केवळ शब्दशः भाषांतर करायचे असते. शक्य तो तळटीपातील मूळ संदर्भग्रंथ शोधून त्या तपासायच्या असतात. नेमाडे यांनी कोसंबींच्या तोंडी घातलेल्या इंग्रजी वाक्यांऐवजी त्यांना कोसंबींच्या ‘हिंदी संस्कृती आणि अहिंसा’ या ग्रंथातून मूळ मराठी वाक्ये घालता येणे शक्य होते. तेही नेमाडे यांच्याप्रमाणेच बेफिकीर दिसतात. असे थापेबाजी लिखाण करून प्रबंध सादर करता येतो काय? आणि वाङ‌्मयीन प्रभावाच्या अभ्यासाचा सैद्धांतिक आराखडा मांडता येतो काय? गुरू आणि मित्रांच्या बाबतीत इतके भाग्यवान असणारे नेमाडे गुरू आणि मित्रांच्या प्रेम आणि ज्ञानवर्षावातही नर्मदेच्या गोट्याप्रमाणे कोरडेच कसे राहिले? याचे उत्तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून नेमाडे यांना द्यावेच लागेल. पळपुटेपणा करून चालणार नाही.
डॉ. भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यातील कोणत्याही लेखकापेक्षा मुलाखती देण्यात सर्वाधिक माहीर आहेत. त्यांचे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. त्यांनी आजवर पन्नासेक मुलाखती दिल्याची नोंद त्यांच्या ‘निवडक मुलाखती’ या पुस्तकात आहे.५ मुलाखतीत अनेक सोयी असतात. आपले जे विचार वाचकांना समजले नसतील, त्यांचे अधिक स्पष्टीकरण करता येते. त्यातून आपल्या साहित्यिक उपक्रमाचा प्रचार आणि प्रसारही होतो. काही भडक विधाने करून आपल्याकडे वाचकांचे लक्षही वेधून घेता येते. पाहिजे त्या वेळी ‘आपण असे म्हणालोच नव्हतो’ असा यू टर्न घेण्याची त्यात सोयही असते. नेमाडे यांचे संपूर्ण सांस्कृतिक आणि साहित्यचिंतन हे भू-सांस्कृतिक मुद्द्यावर केंद्रित झाल्याची स्पष्ट कबुली त्यांनी एका मुलाखतीत (स.प्र., उक्त) आणि ‘टीकास्वयंवर’मध्ये दिल्यामुळे यात मतभेद असण्याचे कारण नाही. मुळात संस्कृतीचा विचार केवळ भू-सांस्कृतिक (Geo-Cultural) अंगाने करणे अशास्त्रीय आहे. संस्कृतीच्या अभ्यासासाठी भूमी म्हणजे प्रदेशाला महत्त्व असते. परंतु त्यात धर्म, चालीरीती, परंपरा, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था यांनाही तितकेच महत्त्व असते. यापैकी कोणत्याही एकाच अंगाने विचार केला तर तो अभ्यास एकांगी आणि झापडबंद होतो. नेमाडे यांचा हिंदुत्वाचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदू मूलतत्त्ववाद्यांप्रमाणेच आहे. फरक एवढाच की, नेमाडे तो प्रादेशिकतेच्या अंगाने करतात, तर हिंदू राष्ट्रवादी तो धर्माच्या आधारावर करतात. सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद काहीसा नेमाडे यांच्यासारखाच होता. सावरकरांनी जेव्हा हिंदू राष्ट्रवादाची व्याख्या-
‘असिंधु सिंधुपर्यंत यस्य भारतभूमिका।
पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः।।’
अशी केली, तेव्हा गोळवलकर गुरुजी प्रचंड संतापले. भारतात ‘प्रादेशिक राष्ट्रवाद’ विरुद्ध ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ यांच्यात नेहमीच संघर्ष झालेला दिसतो. त्यामुळे नेमाडे यांचा भू-सांस्कृतिक हिंदुत्ववाद, सावरकरांचा प्रादेशिक राष्ट्रवाद आणि गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद नीट समजून घेतला पाहिजे, म्हणजे नेमाडे यांची हिंदुत्वाची भोंगळ भूमिका सूत्रबद्ध करता येईल. नेमाडे यांना सिंधू नदीच्या अलीकडील सर्व धर्म, वंश, जातिसमूहाला हिंदू म्हणूनच मान्यता द्यायची आहे. सावरकरांच्या भूमिकेत पितृभूला अधिक महत्त्व देऊन नेमाडे यांच्या हिंदू समूहातील मुसलमान, ख्रिस्ती यांना वजा करायचे, तर गोळवलकर यांनी प्रादेशिक राष्ट्रवादाची संभावना "Serai Theory of Territorial Nationalism' (प्रादेशिक राष्ट्रवादाचा धर्मशाळा सिद्धान्त) या शब्दात केली आहे. त्यांच्या मताप्रमाणे, ‘येथे फार प्राचीन काळापासून हिंदूंचे एक पूर्ण विकसित राष्ट्र होते आणि येथे राहात असलेल्या अन्य विविध जाती एक तर ज्यू, पारशी याप्रमाणे आश्रयार्थ आलेल्या पाहुण्या जाती होत्या किंवा मुसलमान, ख्रिश्चन यांसारख्या आक्रमक तरी होत्या. या सर्व परस्पर भिन्न गटांना- केवळ ते अपघाताने एकाच भूप्रदेशात, एकाच शत्रूच्या सत्तेखाली राहतात एवढ्याच कारणामुळे या भूमीचे पुत्र कसे म्हणता येईल?’६ नेमाडे त्यांच्या हिंदुत्वातून कोणालाही वगळू इच्छित नाहीत. त्यांच्या लिखाणात एक-दोन हिंदू नावे आली की लगेच दोन-तीन मुसलमान नावे ठरलेली असतात. त्यामुळे नेमाडे यांचा हिंदुत्ववाद एका मर्यादेपर्यंत गोळवलकरांच्या हिंदुत्वाच्या कल्पनेपर्यंत जातो आणि तिथेच थांबतो. त्याचे कारण नेमाडेंचे हिंदुत्व आडवे आहे तर गोळवलकरांचे उभे. नेमाडे ज्या Horizontal आणि Vertical या शब्दांचा खेळ खेळत असतात, त्यामुळे देशी वाचकांना त्यांचे हिंदुत्व, सावरकर आणि गोळवलकर यांच्यापेक्षा व्यापक वाटणे साहजिक आहे. परंतु त्यांनी ती कल्पना अमर्याद व्यामिश्र बनविल्यामुळे ती निसरडी तर झालीच, परंतु दुर्बोधही बनली. परंतु नेमाडे यांच्या समग्र लिखाणाचा विचार करता काही गोष्टी स्पष्ट होतात. गोळवलकर-सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद ब्राह्मण वर्ग वर्चस्वावर आधारित आहे, हे स्पष्ट आहे.

भारतातील हिंदुत्ववादी जसजसे सत्ता प्राप्त होत जाते तसतसे आक्रमक बनतात. नेमाडेंचीही भूमिका तशीच क्रमाने आक्रमक होत गेली आहे. भारताच्या इतिहासासंबंधी एक गोष्ट आपण सतत ध्यानात ठेवली पाहिजे की, मध्ययुगापासून भारतावर जी आक्रमणे झाली त्यांनी जातिसंस्थेतील खालच्या, अधिक खालच्या जातींना राजकीय सत्तेत सहभागाची संधी दिली आहे. उदा. मुसलमानांचे भारतावर आक्रमण झाल्यानंतरच हिंदू वर्णव्यवस्थेतील सर्वात खालच्या वर्गाला म्हणजे शूद्रांना म्हणजेच शेतकरी जातींना सत्तेत सहभागी करून घेण्यात आले. महाराष्ट्राचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते, की त्यात मराठा जात आघाडीवर होती. मुस्लिम राज्यसत्तेने सामाजिक अभिसरणाला सुरुवात केल्यापासून ब्राह्मणांना हास्यास्पद ठरविण्याचे उद्योग सुरू केले. एकनाथांची संपूर्ण गुरूपरंपरा चाँद बोधले यांच्यापासून ते मुहम्मद घौस या सूफी संतापर्यंत जाते. सूफींच्या प्रभावामुळे म्हणूनच संत एकनाथ अधिक समतावादी बनले. त्यांच्या भारुडात ब्राह्मण आणि बैल, ब्राह्मण आणि कुत्रा यांच्या ओतप्रोत विनोदी संवादांतून बहुजन समाजात ब्राह्मणांची प्रतिमा जी डागाळली ती आजपर्यंत ब्राह्मणांना पुसता आली नाही. मुसलमानी सत्तेने मराठ्यांना जहागीरदा-या, मनसबदा-या देऊन सत्तेत समाविष्ट केले. भोसले घराणे त्यात आघाडीवर होते. शिवाजीचे आजोबा मालोजी यांच्यापासून ते वडील शहाजीपर्यंतचे पूर्वज मुस्लिम सत्तेत नोकरदार होते. शिवाजी पुणे परगण्याच्या सत्तेवर येऊ नये, म्हणून ब्राह्मणांनी तो शूद्र असल्यामुळे त्याच्या राज्याभिषेकापासूनच खळखळ केली. उच्चकुलीन मराठ्यांनाही शिवाजी नकोच होता. ते त्याला पंक्तीला घेत नसत. शिवाजीचा चिटणीस बाळाजी आवजी हा कायस्थ होता. त्याच्या मुलाच्या मुंजीच्या वेळी ब्राह्मण विरुद्ध इतर असा संघर्ष झाला. त्याचा निकाल शिवाजीने १६६० साली ‘ब्राह्मणांची खळखळ होती... ज्याचा धर्म त्यांनी करावा. त्यात बखेडा करू नये’ या शब्दात दिला. राज्याभिषेकाच्या वेळीचा संघर्ष शिवाजीने गागाभट्टाला एक लाख सुवर्ण होनाच्या दक्षिणेने मिटवला. तरीही ब्राह्मणांची खळखळ थांबेना. शेवटी राज्याभिषेकानंतर शिवाजीने १६७५ साली प्रभावळीच्या सरदाराला लिहिलेल्या पत्रात ‘ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो’ या शब्दात ब्राह्मणांना तंबी दिली. मृत्यूपूर्वी तीन वर्षे अगोदर १६७७ ला शिवाजीने ‘जातीविवेक स्कंदपुराणांतर्गत श्याद्रीखंड ज्याची त्यांनी नीट वहिवाट आचरणे’ सल्ला देऊन सर्व जातींनी एकदिलाने राहण्याचा आदेश दिला.७ खेड्यातील सत्ता पाटील, पाटलीण, कुलकर्णी, महाजन, शेट्ये यांच्याकडे गेली. त्यामुळे भारतीय सरंजामशाही पक्की झाली. नेमाडे ग्रामव्यवस्थेचे जे वर्णन करतात, तिच्यातील जातिव्यवस्था श्रेणीबद्धच होती. फक्त ब्राह्मणवर्चस्व संपून वर उल्लेखिलेल्या जातींचे वर्चस्व निर्माण झाले. ते आजपर्यंत अबाधित राहिले. खेडी अलुतेदार-बलुतेदार आणि कारागिरांच्या शोषणावर पोसली गेली. नेमाडेंच्या ‘हिंदू’ कादंबरीत ‘देणारे’ पाटील आणि ‘मागणारे’ अलुतेदार-बलुतेदार यांचे वर्णन आलेच. त्यामुळे देणारा उच्चस्थानी आणि घेणारे किंवा मागणारे पायरीवर. ही नेमाडेंची आदर्श ग्रामव्यवस्था. देणा-यांचे उदार मन नेमाडेंनी उत्तम चित्रित केले आहे, परंतु मागणा-यांच्या मनात प्रवेश करण्याइतपत प्रतिभा त्यांच्याकडे नसल्याने त्यांची लाचारी, अगतिकता, परावलंबित्व त्यांना भावलेले दिसत नाही.

ब्रिटिशांच्या भारतातील आगमनाने पुन्हा सामाजिक अभिसरणाला चालना मिळाली. शूद्रांच्याही खालच्या अतिशूद्र किंवा पंचम वर्णातील अस्पृश्य जातींना ब्रिटिशांनी सैन्यात दाखल करून घेऊन आणि सैनिकांच्या मुलांना शिक्षण सक्तीचे करून अस्पृश्यात एक नवा सैनिकी वर्ग निर्माण केला. आजच्या आपल्या सैन्यातील महार बटालियन त्याचे अवशेष आहे. त्यामुळे गावगाड्यातील अस्पृश्य जातींपैकी महारापर्यंत ब्रिटिश सत्ता झिरपली. पहिल्या आणि दुस-या महायुद्धात त्यांनी मर्दुमकी दाखविली आणि विदेशात राहिल्याने त्यांच्या जाणिवा अधिक विस्तारल्या. डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी हे या सैन्यात सुभेदार होते. एकोणिसाव्या शतकातील संपूर्ण दलित चळवळीचे नेते-गोपाळबुवा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि विसाव्या शतकातील डॉ. आंबेडकर ही ब्रिटिश आर्मीची अपत्ये आहेत. महारांनी ब्राह्मणी वर्चस्व असलेल्या पेशवाईचा अंत कोरेगावच्या लढाईत केला म्हणून ब्राह्मणांचे एक नंबरचे शत्रू महार बनले. कोरेगाव, जि. पुणे येथील विजयी स्तंभ याची साक्ष आजही देतो. महारांनी गावगाडा सोडला, वंशपरंपरेने आलेली कामे झिडकारली म्हणून खेड्यातील पाटील आणि इतर कारभारी महारांचे शत्रू बनले. त्यांच्या मनातील महारांबद्दलचा सारा राग १९५६ सालच्या धर्मांतरानंतर स्त्रियांच्या नग्न धिंडी काढण्यापासून ते बहिष्कारापासूनच्या सर्व प्रयत्नांत अभिव्यक्त झाला आहे. महारांनी गावगाडा सोडताना जी उपासमार, त्याग, अन्याय आणि छळ धै-याने आणि बाणेदारपणे सहन करून शहराकडे कूच केले, तो त्याग आणि बाणेदारपणा दाखविण्याचे धैर्य महारेतर अस्पृश्य जातींना न झाल्यामुळे त्या गावकुसाच्या बाहेर सुरक्षित राहिल्या. महारांनी सुरक्षिततेचे कवच स्वाभिमानासाठी फेकून देऊन असुरक्षित जीवन जगणे पसंत केले. त्यामुळेच ते आधुनिकतेच्या प्रक्रियेत सामील होऊ शकले. त्यामुळे तर ते सर्वांपासूनच तुटले. आज महार सामाजिकदृष्ट्या सर्व जातींनी एकत्रित येऊन केलेल्या कोंडीच्या चक्रव्यूहात आहे. त्यातही खेड्यातील महार अधिक. ब्राह्मणांना समाजसुधारणेची एक दीर्घ परंपरा आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, आगरकर, न्या. रानडे, न्या. गोखले, एस. एम. जोशी, कॉ. डांगे इ.ची नावे घेता येतील. ब्राह्मणेतर आणि दलितेतर मध्यम जातींना ती परंपरा नाही. किंवा ती असूनही त्यांनी स्वीकारली नाही. म. जोतिराव फुले यांना त्यांनी जातीय अहंकाराने माळीच मानले. राजर्षी शाहू यांचे क्षत्रियत्व तेवढे स्वीकारले, परंतु त्यांचा सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे झिडकारला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे तर नावही त्यांना माहीत नाही आणि असलेच तर ते त्यांना ब्राह्मणाळलेले मानतात. आजच्या महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे स्थूल चित्र असे दिसते की, इंग्रजी शिक्षणामुळे आणि इंग्रजांच्या सहवासामुळे ब्राह्मण आणि महार जाती या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत अग्रभागी आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मणांची संख्या कमी असल्याने आणि राजकीय सत्तेपासून दूर असल्याने ते बदलले आहेत. ते अधिकाधिक उदारमतवादी होत आहेत. म्हणून त्यांच्या मुली आंतरजातीय विवाह करीत आहेत. त्यांनी त्यामुळे मुलींचे खून केलेले ऐकिवात नाही, परंतु ब्राह्मणेतर जातीत असे खून ही नित्याची बाब आहे. उत्तरेतील खाप पंचायत याच्या साक्षीला आहे. महाराष्ट्रातही अशा खुनांचे प्रकार काही कमी नाहीत. अर्थात, या मध्यमजातीही आता हळूहळू शिक्षणाच्या प्रसारामुळे आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत येत आहेत. परंतु त्यांच्या मनातील त्यांच्या जातीचे श्रेष्ठ स्थान पुसणे त्यांना अवघड जाते. कारण त्यांचे आधुनिकीकरण सामंती मानसिकतेतच होत आहे.

जातिव्यवस्थेसंबंधी एवढे दीर्घ विवेचन करण्याचे कारण या विवेचनाशिवाय नेमाडे यांची मनोवृत्ती आपल्याला समजणार नाही; म्हणून नेमाडे यांनी प्रा. गो. म. कुलकर्णी यांना १९८५ साली दिलेल्या मुलाखतीकडे आपले लक्ष वेधायचे आहे. ती टीकास्वयंवरमध्ये छापली आहे. तिच्यातील मजकुरातून नेमाडेंच्या मनातील गोंधळ अधिक स्पष्टपणे उलगडून दाखविता येईल. या मुलाखतीत (टीस्व, १५४-६०) नेमाडे म्हणतात, “जातिसंस्था बदलल्यास म्हणजे समानतेच्या तत्त्वावर समाजरचना झाली तर ती अर्थातच संपेल.” चला, निदान जातिसंस्था नष्ट होऊ शकते एवढे तरी नेमाडे वदले. त्यानंतर कुलकर्णी यांनी प्रश्न विचारला, “दलित अस्मिता ठेवण्यात ‘व्हेस्टेड इंटरेस्ट’ असं तुम्हाला वाटते का?” या प्रश्नाला उत्तर देताना नेमाडे म्हणतात, “दलित अस्मिता ठेवण्यात ‘व्हेस्टेड इंटरेस्ट’ आहेत. आज दोन विघ्नसंतोषी जातीय गटांना असा इंटरेस्ट आहे. ते गट म्हणजे, १) अशी अस्मिता जागृत ठेवल्याने बहुजन समाजात दुफळी निर्माण करणारा शहरी ब्राह्मण गट व २) त्या वेगळेपणाचे फायदे उपटणारा सुशिक्षित महार गट, जो सवलतीच्या राजकारणानं पोसला आहे. मराठी समाजाच्या पारंपरिक एकजिनसीपणाला हे दोन्ही गट आव्हान ठरतील.” (टीस्व, पृ. १५८-५९.) मला जातींचा उल्लेख करून लिहिणे फारसे आवडत नाही. परंतु ते करणे नेमाडे यांनी भाग पाडले आहे. सवलती काही महारांनाच मिळाल्या नव्हत्या. त्या सर्वच अस्पृश्य जातींना मिळाल्या होत्या. मग विविध प्रांतातील विशिष्ट जातीच पुढे का गेल्या? खुद्द नेमाडे यांची लेवा पाटीदार ही जात सधन आणि जमीनदार असूनही ओबीसीत समाविष्ट आहे. नेमाडे यांनी महारांबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या आणि तशाच भावना लेवा पाटीदाराबद्दल मराठा पाटील, देशमुखांच्या असणे स्वाभाविक आहे. कारण ते लेवा पाटीदारांना बरोबरचे मानीत नाहीत. त्यांच्यात बेटीव्यवहार निषिद्ध आहे. नेमाडे यांच्या जळगाव जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण लेवा पाटीदार आणि इतर सर्व यांच्यातील संघर्षावर उभे आहे. महाराष्ट्राचे एक विचारवंत नेते मधुकरराव चौधरी, जे दुरून का होईना माझ्या नातेसंबंधातील असल्यामुळे खिरोद्याला त्यांच्याकडे आणि त्यांच्या शिक्षणसंस्थांना मी अनेकदा भेटी दिल्या आहेत. त्यामुळे त्या राजकारणातील जातीय बारकावे मला ब-यापैकी माहीत आहेत. कोणतीही जात केवळ आरक्षणामुळे पुढे जाते, असे मानणे भ्रम आहे. आरक्षणाचा लाभ घेण्याची इच्छा आणि कुवत त्यांच्यात निर्माण व्हावी लागते. ती इच्छा आणि कुवत आधुनिकीकरणातून मिळते. नेमाडे यांनी विविध ठिकाणच्या नोक-या स्वीकारताना त्यांच्या ओबीसी कार्डचा उपयोग केला की नाही, हे कळत नाही.

नेमाडे यांची जातिव्यवस्थेची भूमिका ज्ञानपीठ मिळाल्यानंतर अधिक आक्रमक बनली. जे नेमाडे १९८५ साली ‘जाती संपू शकतील’ असे म्हणत होते, ते २०१५ साली ‘... आज धर्म नाहीसा करून जातिव्यवस्था कायम राखणे आवश्यक आहे.’ (दिव्य मराठी, नाशिक आवृत्ती, ६.४.१५) अशी घोषणा करू लागले. त्यानंतर ‘आपल्या देशात जातिव्यवस्था पक्की होत नाही तोपर्यंत काही खरं नाही.’ (सकाळ, जळगाव आवृत्ती, दि. १ जून २०१५) असे शंभू पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगू लागले. आणि जातिसंस्थेचे अस्तित्व टिकविण्यासाठी ‘जातिव्यवस्था मोडली तर देश टिकणार नाही’ (दिव्य मराठी, ना.आ., दि. ६.४.१५) असा खणखणीत इशारा त्यांनी संपूर्ण भारतवासीयांना दिला. शेवटी तर दैवाचा हवाला देऊन त्याच मुलाखतीत जातिव्यवस्थेवर शेवटचे भाष्य करताना म्हटले आहे, ‘या देशातल्या प्रत्येकाला जातिव्यवस्था लागू शकते. मग तो हिंदू, मुसलमान, शीख कोणीही असो. हिंदुस्थानातल्या प्रत्येक समूहाला जातिव्यवस्था असणारच आणि ती जात नाही. हा विधिलिखित नियम आहे.’ आता एकदा दैवाच्या विधिलिखिताचाच हवाला दिला की सर्वांची बोलतीच बंद होणार.

नेमाडे यांच्या समग्र वैचारिक लेखनाचे वाचन केल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे जाणवली की, त्यांचे समग्र व्यक्तिमत्त्व सिंधू संस्कृती, देशीवाद आणि जातिसंस्था यांनी पूर्णपणे ग्रासून टाकलेले दिसते. ते कशावरही लिहू, बोलू देत; शेवटी ते या विषयांवर येणार, हे ठरलेलेच आहे. एखाद्या गोष्टीबद्दल मनोग्रस्त होऊन इतर गोष्टींचा विचार न करणे किंवा त्या गोष्टींच्या विरोधी गोष्टींना अजिबात महत्त्व न देणे, त्यांची टिंगलटवाळी करणे किंवा त्यांना तुच्छ लेखणे ही स्वस्थ मनोवृत्तीची लक्षणे नसतात. मानसशास्त्रात त्याला obsession म्हणतात. हे झपाटलेपण एका विशिष्ट मर्यादेकडे गेले की माणूस मानसिकदृष्ट्या निरोगी राहात नाही. माणसाचे विचार जेव्हा विशिष्ट कल्पनांना, प्रतिमांना आणि इच्छांना एकसारखे चिकटून राहून त्याच्यावर अधिराज्य गाजवू लागतात, तेव्हा त्यांचा विवेकाशी असलेला सांधा तुटतो. त्यामुळे अनेक अनर्थ होतात. कधीकधी तर त्या प्रतिमा, कल्पना आणि इच्छा स्वतःच्या आभासातून माणूस स्वतःच जन्माला घालीत असतो. नेमाडे यांचे वर उद्धृत केलेले विचार वाचले की, नेमाडे त्याच मार्गाने निघाल्याचे स्पष्ट होते. सिंधू संस्कृतीची एक आभासक कल्पना त्यांनीच जन्माला घातली आणि जातिसंस्था टिकविण्याच्या इच्छेचे तेच जनक आहेत. वास्तविक सिंधू संस्कृतीचे स्वरूप त्यांच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळे आहे आणि जातिसंस्था आता मरणासन्न झाली आहे. कारण तिचा वंशानुपरंपरागत तीच कामे करण्याच्या सक्तीचा पायाच भांडवलशाहीने उद्ध्वस्त करून टाकला आहे. तिने माणसाची जातीची, धर्माची, प्रदेशाची किंवा वंशाचीही ओळख पुसून टाकली आहे. माणसाला पूर्णपणे एक व्यक्ती (individual) बनवून टाकलेले आहे. तिने सरंजामशाही किंवा सामंती व्यवस्थेतील नाती, जिव्हाळा, प्रेम, जो नेमाडे यांचा आदर्श आहे तो पूर्णपणे ओरबाडून काढला आहे आणि माणसाला पूर्णपणे नागवे करून त्याला स्वार्थी बनवले आहे. हे सामाजिक गतिशास्त्र नेमाडे यांना समजणे अवघड आहे. कारण त्यांच्या लिखाणात मला कुठेही विरोधविकासवाद, ऐतिहासिक भौतिकवाद, धर्मसमीक्षा, अंतर्विरोध, डायलेक्टिकल लॉजिक इत्यादीसारखे शब्द सापडले नाहीत. गोपुंसारख्या मित्राकडून ते त्यांनी समजून घ्यायला हवे होते. कोणतेही वैचारिक लिखाण करताना प्रत्येकाने त्यांचे म्हणणे मान्य असो किंवा नसो, परंतु कार्ल मार्क्स, सिग्मंड फ्रॉईड आणि चार्ल्स डार्विन अभ्यासणे आवश्यकच असते. ते वाचणे नेमाडे यांच्या ‘हिंदू’ कादंबरीइतके रटाळ आणि बोअरिंग करणारे नसले तरी ते चिकाटीने समजून घ्यावे लागते. मी नेमाडे यांच्यापेक्षा वयाने लहान असलो तरी प्रेमाचा एक सल्ला देऊ इच्छितो. निदान तो तरुण अभ्यासकांना तरी मार्गदर्शक ठरेल. फ्रॉईड, मार्क्स आणि डार्विन यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे आणि त्यांना समजून घ्यायचे, याचे रस्ते मला एरिक फ्रॉम यांनी दाखविले. त्यांच्यामार्फत या तिघांशीही घट्ट मैत्री होऊ शकते.

नेमाडे यांची कार्ल मार्क्स आणि फ्रॉईड यांच्याबद्दलची दृष्टी त्यांनी स्वतःच दूषित करून घेतली असावी. “श्रमाला महत्त्व हा भाग सोडल्यास फार पूर्वीपासूनच साम्यवाद मला स्वतःला पटत नाही. सगळं राष्ट्र हेच मुख्य केंद्रस्थान आणि व्यक्तीची आयडेंटिटी गौण, हे साम्यवादाचं तत्त्व मला केव्हाच पटलं नाही. व्यक्तीलाच गौण ठरवून कोणताही समाज पुढे जाईल, असं वाटत नाही. त्यात हिंदू लोक हे मुळात व्यक्तिवादी आहेत.” “...भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यामधलं तत्त्व (समाजवाद) हे मला अधिक ग्राह्य वाटतं.” मार्क्सवादाबद्दलचे नेमाडे यांचे हेच आकलन असेल आणि त्यांच्या मतावर ते ठाम असतील - त्यांना तसे राहण्याचे स्वातंत्र्य निश्चितच आहे, परंतु ते आकलन तोकडे आणि अज्ञानमूलक आहे. मार्क्स यांनी व्यक्तीला गौण मानले असे त्यांना कोणी सांगितले? "Development of each should be the condition for development of all.' हे तर मार्क्स यांच्या विचारांचे मुख्य सूत्र आहे. त्यासंबंधी फार विवेचन न करता कार्ल मार्क्स यांच्या Philosophical Manuscriptचे इंग्रजी भाषांतर बी. टी. बोटोमर यांनी केले आहे. त्यावरून दीर्घ प्रस्तावनेच्या रूपाने एरिक फ्रॉम यांचा Marx's Concept of Man हा ग्रंथ तरी वाचला जावा. नेमाडे स्वतःला समाजवादी समजतात, परंतु त्यांना हे माहीत नसावे की, समाजवाद ही मार्क्स यांच्या ऐतिहासिक भौतिकवादातील शेवटून दुसरी कडी आहे. शास्त्रीय समाजवादाची मांडणी मार्क्स आणि एंगल्स यांनी पहिल्यांदा केली. ज्या पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. आंबेडकरांवर पाश्चिमात्य फेबियन समाजवादाचा प्रभाव होता, ते सर्व मार्क्सवादीच होते आणि भारतीय समाजवादी स्वतःला मार्क्सवादीच समजत होते. या सर्व गोष्टींची चर्चा मी अतिशय विस्ताराने ‘भक्ती आणि धम्म’ या ग्रंथात केली आहे. नेमाडेंच्या लिखाणात फ्रॉईड यांचा उल्लेखही अगदी उडता, नावापुरताच येतो. डार्विनबद्दल तर बोलायलाच नको. नेमाडे यांनी आपली ठाम आणि अचल मते अभ्यासातून नव्हे तर पूर्वग्रहातून केलेली आहेत. याचे कारण त्यांच्यात काही गोष्टींबद्दल घर करून बसलेले ऑब्सेशन आहे. त्यांच्या कारणांचा शोध त्यांच्या जीवन आणि लेखनावरून घेता येणे सहज शक्य आहे. या ऑब्सेशनमुळे नेमाडे देशीवादाचे समर्थन करीत करीत शेवटी हिंदू मूलतत्त्ववादाला भिडले. तरीही त्यांच्यात जातीची एक दरी कायम आहे. अलीकडे शिक्षित झालेली आणि जातीय अस्मितेने भारलेली प्रत्येक जात या ना त्या प्रकारे मूलतत्त्वाकडे झुकताना दिसत आहे. अर्थात, त्यात ऑब्सेशनचा दुरन्वयाने का होईना संबंध आहेच. हिंदू राष्ट्रवाद्यांचा हिंदू मूलतत्त्ववाद ब्राह्मण श्रेष्ठत्वावर आहे. दलितांची मने बुद्ध आणि आंबेडकरांच्या केवळ नावांनी इतकी ग्रासून गेली आहेत की, त्या पलीकडे काही विचार, तत्त्वचिंतन आहे, असे ते मानीतच नाहीत. सब कुछ आंबेडकर! त्यांच्या पलीकडे कोणी नेता नाही आणि विचारही नाही. त्यांना समजलेला किंवा न समजलेला आंबेडकर त्यांच्या दृष्टीने जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आणि त्यांनी व्यक्त केलेले विचारच सर्वश्रेष्ठ आहेत. त्यात काहीही बदल नको. त्यांचा विकास तर अजिबात नको. मुसलमानी तालिबानींना मुहम्मदासोबत इतर कुणाचे नाव घेतले तर त्यांची जशी तळपायाची आग मस्तकात शिरते, तशीच भावना दलितांची होताना दिसते आहे. अलीकडे तर बाबासाहेबांसोबत म. फुल्यांचे नाव घ्यायला आणि त्यांच्या प्रतिमेशेजारी फुल्यांची प्रतिमा ठेवायलाही विरोध केला जात आहे. हा आंबेडकरद्रोह आहे. नेमाडेंचा हिंदू मूलतत्त्ववाद ब्राह्मण आणि महार वर्चस्वाविरुद्ध असल्याने तो गावगाड्यांचे समर्थन करणारा सामंती हिंदू मूलतत्त्ववाद आहे. त्याचे स्पष्टीकरण विवेचनाच्या ओघात पुढे येईलच. ब्राह्मणी हिंदुत्ववाद ठोस, व्यक्तरूपात आहे, तर नेमाडेंचा सामंती हिंदुत्ववाद ढोबळ आणि धर्मशाळारूपी आहे, एवढाच त्यात फरक आहे.

नेमाडेंचा जीवनसंघर्ष केवळ आत्मप्रस्थापनेसाठी
डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी त्यांची नैतिक भूमिका त्यांच्या ‘टीकास्वयंवर’ या लेखसंग्रहात स्पष्ट केली आहे. त्यांनी लेखकाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या अशा दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी पहिली ‘साहित्याचे मोठेपण लेखकाच्या व्यक्तिमत्त्वावरून सिद्ध होते. व हे व्यक्तिमत्त्व आजच्या पैशाला आणि मानमान्यतेला उच्चबिंदू मानणा-या आपल्या समाजात टिकविणे हे एक मोठे व्रत आहे.’(टीस्व, २०). दुसरी गोष्ट, ‘ब्रीदहीन लेखक निर्माण झाले की आपोआप धंदेबाजी, अड्डेबाजी सुरू होते. मानमरातब, उपजीविका व भौतिक विकास ह्यासाठी लेखकाने ब्रीद सोडावे की नाही, हा वैयक्तिक मुद्दा आहे हे खरे; परंतु असे ब्रीदहीन लेखक जोपर्यंत पारंपरिक प्रतिष्ठा भोगत आहेत, लिहिणे हा आमचा धंदा नसून ती एक सांस्कृतिक जबाबदारी आहे, असे त्यांच्यासकट आपण सर्व जण मान्य करीत आहोत, तोपर्यंत लेखनाची काहीतरी कसोटी आपण अंगीकारली पाहिजेच. एवढेच नव्हे तर ती वापरलीही पाहिजे. त्याबद्दल मौन पाळणे हा अधमपणा होय.’ (टीस्व, २५-२६). नेमाडे यांचे हे बाणेदार लिखाण इ.स. १९६८ सालातील आहे. त्या काळात क्रमाने लिटल मॅगझिनवाल्यांचा अड्डा विस्कळीत होत होता आणि तोपर्यंत साहित्याच्या क्षेत्रात कुठलाही मानमरातब नेमाडे यांना प्राप्त झाला नव्हता. अड्डा असल्याशिवाय मानमरातब मिळत नाही, या वास्तवाची जाणीव असल्यामुळे त्यांनी १९८३ सालापासून देशीवादाचा अड्डा स्थापन केला. आणि पुढे तो क्रमाने वाढवीत आणि संघटित केला. अर्थात या स्वतंत्र अड्ड्याच्या निर्मितीमागे दलित आणि ग्रामीण साहित्याची चळवळ आहे. परंतु त्याची चर्चा आपण पुढे करू.

समाजजीवनातील कोणत्याही अड्ड्यांच्या स्थापनेमागील मूळ हेतू हा त्या त्या क्षेत्रातील आत्मप्रस्थापनेचा असतो. नेमाडे यांच्या लिखाणातून आणि मुलाखतीतून लेखकाची अनेक ब्रीदे स्पष्ट झालेली आहेत. त्यांनी एके ठिकाणी असे लिहिले आहे, ‘इंग्रजीत लिहिणारा भारतीय लेखक हा वसाहतवादी यंत्रणेने पोसलेल्या अशा एका व्यत्ययमूलक भाषिक अवस्थेत काम करणारा घटक आहे. भाषिकदृष्ट्या शोषल्या गेलेल्या आपल्या समाजाचा मी एक सभासद आहे आणि माझ्या स्वातंत्-याची खूण म्हणून दृश्य स्वरूपात मी माझ्या समाजाची भाषा वापरणार, हे लेखकाचे प्राथमिक व्रत इंग्रजीत लिहिणारे भारतीय लेखक वेगवेगळ्या मोहापायी किंवा अज्ञानापायी विसरलेले दिसतात.’ (टीस्व, ५०). त्यांच्या याच विचाराचा अत्युच्च विकास म्हणजे ‘अफूसारखी इंग्रजीवर बंदी आणावी.’ (सकाळ, ना.आ., दि. ६.४.२०१५.) या मागणीत झाली आहे. अलीकडे उच्चारलेल्या त्यांच्या दोन महावाक्यांपैकी हे एक आणि दुसरे, ‘जातीचा अंत म्हणजे या देशाचा अंत.’ (दिव्य मराठी, ना.आ., दि. १५.६.२०१५) हे होय. नेमाडे यांच्या या मौलिक आणि बाणेदार महावाक्याने देशी माणूस हुरळून गेला नाही तर नवलच! अशी वाक्ये प्रत्येक महापुरुषांना आत्मप्रस्थापनेसाठी उच्चारावीच लागतात. त्याशिवाय जनता त्यांना स्वीकारीत नसते. यातून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णही सुटले नाहीत. परंतु नंतरच्या भगवद्गीतेवरील भाष्यात भाष्यकारांनी भगवंताचे गीतेतील महावाक्य कोणते, याबद्दल गोंधळ घातला. बंकिमचंद्र चतर्जींनी गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ (गीता, २.४७) असे मानले तर योगी अरविंदांनी ‘सर्वधर्मान्परित्यज मामेकं शरणं व्रज’ (गीता, १८.६६) गीतेतील हा संपूर्ण श्लोक महावाक्य मानला. स्वामी विवेकानंदांनी तर आणखीन वेगळाच श्लोक उद्धृत केला. क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैनश्वय्युपपद्यते (गीता, ३.३) हा संपूर्ण श्लोक गीतेतील महावाक्य मानला. त्या श्लोकाचा अर्थ ‘म्हणून हे अर्जुना नपुंसकतेच्या आहारी जाऊ नकोस. ते तुला योग्य दिसत नाही. हे परंतप! हृदयातील तुच्छ दुर्बलतेला त्यागून युद्धासाठी उभा हो.’ असा आहे. मी माझ्या गीताभाष्यात भगवंतांना दूर सारून अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांना अधिक महत्त्व दिले.९ कारण त्यांची उत्तरे भगवंतांना समग्र गीतेत कुठेच दिलेली नाहीत. मी ‘तस्मान्नार्ह वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्बांधवान्। स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्थाम माधव।।’ (गीता, १.३७) या अर्जुनाने विचारलेल्या मूळ प्रश्नाला गीतेचे महावाक्य मानले आहे. त्याचा अर्थ, ‘हे माधवा! आमचे बांधव आणि धृतराष्ट्राचे पुत्र यांना मारण्यासाठी आम्ही योग्य नाहीत. कारण आमच्याच कुटुंबीयांची कत्तल करून आम्ही सुखी होऊ शकतो?’

त्यामुळे आत्मप्रस्थापनासाठी आणि लोकसंग्रहासाठी अशी वाक्ये प्रत्येक देवाला मसिहाला उच्चारावीच लागतात. डॉ. नेमाडे यांना ज्ञानपीठ स्वीकारल्यानंतरही आपण त्या पातळीवर गेल्याची अनुभूती मिळाली असावी. त्यामुळे अशी महावाक्ये त्यांनी उच्चारली तर त्यात काही गैर आहे, असे मला वाटत नाही. परंतु प्रश्न असा आहे की, नेमाडे लेखकासाठी जी ब्रीदे सांगत होते आणि ज्या नैतिकतेचा ते पुरस्कार करीत होते, त्यांचे पालन तरी त्यांच्या जगण्याच्या काळात केले आहे काय? याचा आपण आता विचार करणार आहोत. ते स्वतः ब्रीदहीन आणि अनैतिक का बनले, याचेही मानसशास्त्रीय विवेचन करणार आहोत. परंतु त्यापूर्वी मानवजातीसंबंधीचा एक सिद्धान्त नीट समजून घेऊ. त्यामुळे नेमाडे यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडू शकेल. त्याचप्रमाणे आत्मप्रस्थापनेसाठी आपल्याच विचारांच्या आणि इच्छांच्या विरोधी जाऊन आत्मविसंगत तडजोडी कशा करतो यावरही प्रकाश पडू शकेल.

प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ते जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी माणसांची ‘मान्यतेसाठी’ त्यांच्या जीवनात कोणकोणते आणि कसे संघर्ष केले, हे समजून घेणारे एक सूत्र उपलब्ध करून दिलेले आहे. परंतु त्याची सुरुवात ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस यांच्या विचारापासूनच झाली आहे. त्यामुळेच त्यांचे शिष्य प्लेटो यांचा ‘रिपब्लिक’ हा ग्रंथ या गोष्टी समजून घेण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. सॉक्रेटिस यांनी मानवी आत्म्याचे तीन भाग कल्पून त्यापैकी एक भाग मानवी इच्छेचा (desiring part of the soul) मानला आहे. माणसातील ‘मान्यतेच्या इच्छेच्या’ मानसशास्त्रीय भागाला कालौघात विविध तत्त्वचिंतकांनी विविध शब्दांनी संबोधिले आहे. सॉक्रेटिस-प्लेटोने त्याला Thymos किंवा spiritedness तर मॅकिएव्हेलीने त्याला Desire for glory (कीर्तीची इच्छा); थॉमस हॉब्जने त्याला pride (अभिमान) किंवा vainglory (गर्व); ऍलेक्झांडर हेमिल्टनने त्याला Love for fame (प्रसिद्धी प्रेम); हेगेलने त्याला Recognition (मान्यता) तर फ्रेडरिक नित्शेने त्याचे वर्णन Beast with red cheeks असे केले आहे. माणसाताली मान्यतेच्या अनिवार इच्छेशी संबंधित असलेल्या या मानसशास्त्रीय प्रेरणेला अभिव्यक्त करणारे हे सर्व शब्द माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या महत्त्वाच्या भागाशी संबंधित आहेत. माणसाच्या मनात त्याला स्वतःला, त्याच्या आजूबाजूच्या माणसांना आणि वस्तूंना मूल्य (value) देण्याचा विचार येणे आणि त्या मूल्याला स्वतः मान्यता देण्याची आणि इतरांकडून मान्यता मिळविण्याची गरज भासणे, असे त्या भागाचे दुहेरी स्वरूप असते. मानवी व्यक्तिमत्त्वाचा हा एक भाग असा आहे, जो माणसातील अभिमान, राग, शरम इ. भावनांचा स्रोत आहे. म्हणूनच त्याला केवळ इच्छित किंवा बुद्धीत संकुचित करता येत नाही. माणूस हाच खरा स्वतःचा आणि इतिहासाचा निर्माता असल्यामुळे त्याला जसा स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हावे लागते, तसेच स्वतःला स्वयंनियंत्रितही करावे लागते. त्याची मान्यतेची इच्छा त्याने नियंत्रित केली नाही तर ती अमर्याद बनते आणि माणूस Thymosच्या पुढच्या पायरीवर जातो. ती वरची पायरी असते Megalothymiaची. म्हणजे इतरांपेक्षा श्रेष्ठत्वाच्या मान्यतेची इच्छा. तिलाच "Desire to be recognized as superior' असा इंग्रजीत शब्दप्रयोग वापरला जातो. प्रत्येक माणसात स्वाभिमानाची, आदरभावाची आणि स्वतःच्या योग्यतेची जाणीव कमी-अधिक प्रमाणात असतेच. ती रास्त आणि नैतिकही असते. परंतु माणूस एकदा Megalothymiaच्या वरच्या पायरीवर गेला की तो नैतिक-अनैतिकतेची आणि ब्रीदाची भाषा पूर्ण विसरतो. तो कोणालाच समकक्ष मानीत नसतो. तो स्वतःला इतरांपासून श्रेष्ठ मानून इतरांपेक्षा श्रेष्ठत्वाच्या मान्यतेसाठी अगदी काहीही करायला तयार होतो. कोणत्याही आत्मविसंगत तडजोडी करतो. प्रसंगी प्राणाची बाजीही लावू शकतो. एकेकाळी तो त्याच्यासाठी लढाया करून प्रदेश पादाक्रांत करीत असे. आधुनिक काळात तो राजकारणात संघर्षरत राहतो. धर्मात तो चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करतो आणि ग्रामव्यवस्थेतील आपल्या श्रेष्ठ स्थानाच्या मान्यतेसाठी जातिव्यवस्थेचा पुरस्कार करतो आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वतःचा मठ स्थापन करून मोठमोठ्या साहित्यिक, समीक्षकांची तुच्छतापूर्वक संभावना करतो. नेमाडेंचे वैचारिक लिखाण, मुलाखती आणि भाषणे वाचल्यानंतर ते Megalothymiaच्या पायरीवर रूढ झाल्याचे स्पष्ट दिसते. ते पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल.
डॉ. नेमाडे यांचे पहिले ब्रीद होते, ‘मी माझ्या या समाजाचीच भाषा वापरणार.’ ते आपले व्रत आहे, अशी त्यांची नैतिक भूमिका आहे. नेमाडेंनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात हे ब्रीद आणि नैतिकता आचरिली? ‘ललित’ या मासिकाच्या जून २०१५ च्या ‘भालचंद्र नेमाडे विशेषांका’त त्यांचा जो परिचय सुरुवातीला छापला आहे, त्यावरून तरी तसे दिसत नाही. त्यांनी १९७९ पासून इंग्रजी लिखाणाला सुरुवात केली. ‘वारकरी चळवळीची आविष्कार शैली’ हा ‘टीकास्वयंवर’मध्ये मराठी भाषांतर करून छापलेला लेख मुळात ‘जर्नल ऑफ एशियन ऑफ अँड आफ्रिकन स्टडीज’मधून प्रथम इंग्रजीतून प्रसिद्ध झाला. १९८१ साली त्यांनी ‘अगेन्स्ट रायटिंग इन इंग्लिश = अॅन इंडियन पॉईंट ऑफ व्ह्यू’ या इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर करून ‘भारतीयांचे इंग्रजी लेखन’नंतर तयार केला गेला. देशीवादाची मांडणी करणारा पहिला लेख नेमाडेंनी ‘द कन्सेप्ट ऑफ नेटिव्हिजम’ या शीर्षकाखाली लिहिला. तो १९८४ साली ‘न्यू क्वेस्ट’ या इंग्रजी नियतकालिकातून प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याचे मराठी भाषांतर करून ‘साहित्यातील देशीयता’ हा देशीवादाचा पाया घालणारा लेख आकाराला आला.१० अशी आणखीही काही उदाहरणे देता येतील. याला काय ब्रीद पाळणे म्हणतात की नैतिकता? हे सारे उपद्व्याप आत्मप्रस्थापनेसाठी आणि श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी स्वतःशी केलेला द्रोह आहे.

नेमाडे केवळ इंग्रजी लिहीतच नाहीत तर इंग्रजी बोलतातसुद्धा. नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांचा सपत्निक सत्कार केला. सत्कारानंतर नेमाडे यांनी ‘कोसला’च्या इंग्रजी अनुवादाची प्रत राज्यपालांना सप्रेम भेट म्हणून दिली. (महाराष्ट्र टाइम्स, १६.२.२०१५.) सुवर्णमहोत्सवी ज्ञानपीठ प्रदान समारंभातील सत्काराला उत्तर देणारे भाषण इंग्रजीतूनच केले. (सकाळ, ना.आ., २६.४.२०१५.) आपल्या लेखनाचे इंग्रजी भाषांतर करून घेणारांची त्यांनी नेहमीच खिल्ली उडविलेली आहे. खरंच त्यांच्या मनात त्यांच्या लेखनाचा इंग्रजी भाषांतर करून घेण्याचा विचार कधीच आला नव्हता? त्यासंबंधी स्वतः विलास सारंग यांनी लिहून ठेवले आहे, “मला आठवण झाली. बरेच वर्षांपूर्वी नेमाडे यांनी मला पत्र लिहून विचारणा केली होती, तीही ‘टिपिकल’ नेमाडे पद्धतीने. ‘आमचे काही मित्र म्हणतात, की ‘कोसला’चं भाषांतर करायला सर्वात तुम्हीच योग्य आहात तेव्हा...’ मी त्या वेळी नाही म्हटलं... तो नकार नेमाडे यांच्या संवेदनशील मनात असेल काय?”११ नेमाडे यांच्या या वागण्याला माझी कोणतीही हरकत नाही. परंतु स्वतः आत्मविसंगत वागून नाकाने कांदे का सोलावेत? स्वतः कोरडे पाषाण राहून लोकांना ब्रह्मज्ञान का सांगावे? एवढेच माझे म्हणणे आहे.
डॉ. गोरख थोरातांना मुलाखत देताना “तुमच्या साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा काय आहेत? आणि साहित्याच्या बाबतीत तुमचे आदर्श कोण आहेत?” नेमाडे यांनी पुढील उत्तर दिले, “...नंतर मी एम.ए.ला भाषाशास्त्र, अॅन्थ्रॉपॉलॉजी असे विषय घेतले. त्याच्या वाचनामुळे आपण कशा पद्धतीने समाजाकडे पाहावे, ही दृष्टी मिळत गेली. त्यानंतर मी इंग्रजी साहित्याच्या संपर्कात आलो. त्यामुळे तर अगदी अफाटच क्षेत्र मला खुलं झालं. फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश अशा सगळ्या भाषांचे मोठमोठे कलाकार जवळ आले. यादी करायचीच ठरली तर शंभरेक आदर्श निघतील. अगदी होमरपासून ते दोस्तोव्हस्की, टॉलस्टॉय, शेक्सपिअर आणि आपल्या संस्कृत भाषेतले बाणभट्ट वगैरे मोठी यादी होईल. तसेच भाषांतराच्या माध्यमातून अनेक भाषांतले लेखक जवळ आले... शंभरपट वाचावं आणि एकपट लिहावं असं मानणारा मी माणूस आहे.” (स.प्र., जाने-मार्च २०१५) डॉ. नेमाडे यांच्या अफाट वाचनाबद्दल कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. परंतु फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश कलावंतांचे लेखन इंग्रजी भाषेत अनुवादितच झाले नसते तर - हे अफाट क्षेत्र नेमाडेंना कसं खुलं असतं? निदान एवढय़ापुरते तरी नेमाडेंनी इंग्रजी भाषेबद्दल ऋण व्यक्त करावेत आणि कृतज्ञता दाखवावी. कृतज्ञ व्हायचं की कृतघ्न हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. प्रश्न एवढाच आहे, की एवढे अफाट क्षेत्र बहुजन समाजातून पुढे येणा-या तरुणांना खुलं कसं करून द्यायचं? इंग्रजीवर अफूसारखी बंदी घालून की इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद पाडून? इंग्रजी माध्यमांच्या शाळाबद्दल माझीही काही वैयक्तिक मते आहेत. परंतु ती मी इतरांवर लादू इच्छित नाही. काळ झपाट्याने बदलतो आहे. लहान मुलेही पोगो चॅनलवर कार्टून फिल्म्स बघताहेत. तरुण टीव्हीवरील इंग्रजी चित्रपट पाहात आहे. इंग्रजी आत्मसात करणे किंवा इंग्रजीतच विचार करणे हे पूर्वीप्रमाणे अशक्य राहिलेले नाही. नेमाडे यांच्याप्रमाणेच माझेही इंग्रजी शिक्षण आठवीपासूनच सुरू झाले. माझे एक निरीक्षण असे आहे, की मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्या मुलांच्या मनात इंग्रजीबद्दल एक न्यूनगंड तयार होत असतो. फार थोडे लोक तो भेदून बाहेर येतात. सर्वातच नेमाडे यांच्यासारखी क्षमता नसते. असा न्यूनगंड खुद्द नेमाडे यांच्यातही निर्माण झाला होता, हे त्यांनीच लिहून ठेवले आहे. ‘मघाची सुंदर सुसंस्कृत मुलगी गोड आवाजात आणि सुंदर इंग्रजीत म्हणाली, तुमची टेस्ट खूप डेव्हलप होऊन गेली असेल. त्यामुळे तुम्हाला ते सगळं ट्रश वाटत असेल. मला मराठी कथा आवडतात. मला मराठी थोडंसं येतं. अर्थात लिटररी टेस्टही नाहीच! चांगदेवला पुन्हा तो सुसंस्कृतपणाचा मऊ रेशमी फटका बसला. आणि त्यानं स्वतःच्या बोलण्याची तिच्या बोलण्याशी तुलना केली. त्याला एकाएकी हीनगंड वाटायला लागला.’१२ इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी बाकी काहीही केले असले तरी इंग्रजी भाषेत बोलण्याचा आत्मविश्वास दिला आणि खेड्यातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड म्हणा किंवा हीनगंड, तो पुसून टाकला. ज्याला त्याला कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यायचे याचे स्वातंत्र्य अबाधित असले पाहिजे. नेमाडे अलीकडे स्वदेशी मंडळींकडून इंग्रजी आणि इंग्रजी भाषेच्या माध्यमाबद्दल जी स्टंटबाजी होत आहे, तिच्यात पूर्णपणे अडकले आहेत.

पारितोषिकाबद्दलही नेमाडेंची उक्ती आणि कृती यात बेइमानी स्पष्ट दिसते. त्यांनी ‘सरकारनं पारितोषिके देऊ नयेत असं मला वाटतं.’ (टी.स्व., २८०.) साहित्य अकादमीच्या पारितोषिकाबद्दल ‘पारितोषिके पटकावणा-या एकदोन ठरावीक गटामध्ये घाण वास मारताना दिसतात हे साहित्य अकादमीने आजपर्यंत पुरस्कारलेल्या बहुतेक निकृष्ट दर्जाच्या पुस्तकावरून सिद्ध करता येते.’ (टी.स्व., ६४) हा त्यांचा लेख १९८२ सालचा आहे. पुढे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे, “एकतर राष्ट्रीय पारितोषिक ही कंपूशाहीतून निर्माण होणा-या दोनचार मूर्ख माणसांच्या मर्जीवर ठरत असतात... दिल्लीतल्या राजकारणी लोकांचे जोडे पुसणारे साहित्यिक किंवा त्यांचे हितचिंतक मराठीत नाहीत हे दुसरे एक कारण आहे. वस्तुतः इतर भाषांतील ज्ञानपीठ पारितोषिके मिळवणा-या साहित्यिकांच्या तोलाचे महाराष्ट्रात आज पंचवीस तरी लेखक आहेत.” (टी.स्व., ३०१) ज्ञानपीठ पारितोषिकाबद्दल नेमाडेंची ही भूमिका १९८५ सालातील आहे. तोपर्यंत त्यांना साहित्य अकादमीचासुद्धा पुरस्कार मिळालेला नव्हता. नेमाडे यांच्या कादंबरीत आलेली वाक्ये त्यांच्या पात्रांची आहेत. त्यांचा नेमाडे या लेखकाशी काय संबंध? अशी भूमिका घेणारे त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांनी पुढील एका मुलाखतीत हा त्यांच्या चाहत्यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. “कलावंत म्हणून वेगळं मत आणि माणूस म्हणून वेगळं मत असतं असं काही मला आतापर्यंतच्या माझ्या आवडत्या लेखकावरून आणि माझ्यावरूनही मान्य होण्यासारखे नाही.” (टी.स्व., ३०२) यासंबंधीचा अधिक खुलासा करताना डॉ. थोरात यांनी मुलाखतीत “कोसला’चा पांडुरंग सांगवीकरचा चांगदेव चटुष्ट्याचा चांगदेव पाटील ते ‘हिंदू’तल्या खंडेरावापर्यंतचा कसा प्रवास घडला?” विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नेमाडे म्हणतात, “याची एक बाजू म्हणजे ते माझ्याच जीवनक्रमाचे टप्पे आहेत. ‘कोसला’ लिहिली तेव्हा मी विद्यार्थी होतो, आता शिकायचं नाही, म्हणून आलेल्या फ्रस्टेशनमधून पांडुरंग सांगवीकर आला. पुढे बाराएक वर्षांनी एक प्राध्यापक म्हणून मी जे इकडे तिकडे फिरलो आणि मला जे अनुभव आले, त्यातून एक फॉर्म शोधून मी त्याच्याद्वारे महाराष्ट्रातली जातिव्यवस्था आणि जातीयता, अनेक गावं, त्यांची आपापली पूर्वीपासून उत्क्रांत होत असलेली रचना, संस्कृती, पोटशाखा यावर चिंतन केलं. याच्यातून चांगदेव पाटील पुढे आला. (स.प्र., उक्त) म्हणजे ‘बिढार’मधील चांगदेव किंवा चांगी म्हणजे खुद्द नेमाडेच आहेत, हे स्पष्ट दिसते.

डॉ. नेमाडे यांनी एका मुलाखतीत साहित्य अकादमीची पारितोषिके कशी आणि कुणाला मिळतात, यासंबंधीच्या उत्कृष्ट दृष्टान्ताचा सानंद उल्लेख केलेला आहे आणि तो ‘बिढार’मध्ये आहे, हेसुद्धा आवर्जून सांगितले आहे. (टी.स्व., २८०) काय आहे तो दृष्टान्त? तो पुढीलप्रमाणे-
“काय रे साल्या चांगो, कुठून आलास इकडून. पॅरडाइजमध्ये बसलो होतो. प्रधानला चहा पाजला. पार संतापून गेलाय प्रधान. साल्याला दुसरं बक्षीस. तेही विभागून. बरी जिरली साल्याची. हर्नियाचं ऑपरेशन लांबणीवर टाकणार आता तो. सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात! मग मी त्याला एक क्लासिकल उपमा दिली. भाद्रपदात नवनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेवढय़ात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं. तसं प्रधानचं झालं! खरं म्हणजे सगळीकडेच म्हातारी कुत्री बोकळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षिसात तीच, रेडिओवर, साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात - सगळीकडे हेच बापे मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे.” (बिढार, पृ. ४५, ४६.)
स्पष्ट नाव घेऊन असे लिहिणे ही लिखाणाची पातळी कोणती? नेमाडे यालाच सर्जनशीलता म्हणतात काय? कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तेव्हा त्यांचे वय ६२ वर्षांचे होते. त्यामुळे त्यांनी त्यासाठी प्रयत्न निश्चितच केले नसावे. त्यांचा आणि माझा केवळ स्नेहच नव्हता तर वीस वर्षे आमचा पत्रव्यवहारही होता. त्यामुळे कुसुमाग्रजांना नेमाडेंपेक्षा मी अधिक जवळून पाहिले होते. नेमाडेंना तो वयाच्या अवघ्या ५३व्या वर्षी मिळाला. ज्ञानपीठ दोघांनाही ७६व्या वर्षी मिळाले. म्हणजे नेमाडेंनी साहित्य अकादमी पारितोषिक मिळविण्यासाठी काय काय करावे लागते, हे जे त्यांनी वर सांगितले आहे, ते सर्व केले असणार. त्याला कारणही तसेच आहे. त्यांचे ‘टीकास्वयंवर’ हे लेखसंग्रहाचे पुस्तक आहे. साहित्य अकादमी स्वतंत्र ग्रंथाला पुरस्कार देते. मी काही काळ तिचा एक सदस्य होतो. साहित्य अकादमीच्या नॉर्म्सप्रमाणे फुटकळ लेखसंग्रहाला पारितोषिक न देण्याचे अध्याहृतच धरलेले होते. तरी ते त्यांना कोणत्या कंपूने दिले? याचे उत्तर नेमाडे देणार नसले तरी ते सर्वश्रुत आहे. माझ्या मनात एक शंका अशी आहे, की कुसुमाग्रजांबद्दल नावानिशी इतक्या खालचा आणि अश्लीलतेची सीमा गाठणारा दृष्टान्त देण्याचे कारण त्यांच्या स्वतःच्या आत्मप्रस्थापना करण्याच्या प्रवृत्तीला कुठेतरी धक्का लागला असावा. त्यांच्या ‘देखणी’ या कवितासंग्रहाला तो मिळावा अशी त्यांची इच्छा असावी. कारण ‘देखणी’चा प्रकाशनकाळ १९९१चाच आहे. खरे काय ते नेमाडे यांनाच ठाऊक! आश्चर्य म्हणजे नेमाडे यांनी कुसुमाग्रजांच्या नावाने असलेला पुरस्कारही स्वीकारला. याला म्हणतात बाणेदारपणा आणि नैतिकता. नेमाडे यांच्या आत्मप्रस्थापनी वृत्तीच्या हव्यासापोटी ते किती ‘बनेल’, निर्ढावलेले आणि बेरकी असू शकतात, हे याचे उदाहरण आहे. त्यालाच देशी भाषेत ‘कोडगेपणा’ असा शब्द आहे.

नेमाडे नेहमीच लेखकांच्या आणि प्रकाशकांच्या कंपूशाहीच्या विरोधात बोलत आले. सारी बक्षिसे तेच वाटून घेतात असे त्यांचे प्रतिपादन. त्यात तथ्य आहेच. कोणत्याही मोठ्या पुरस्कारात लॉबिंग असतेच. ते गृहीत धरूनच पुरस्कार स्वीकारायचे की नाकारायचे हे लेखकानेच ठरवायचे असते. अगदी त्यांना मिळालेला जनस्थान पुरस्काराचा विचार करायचे ठरले तर त्याच्या निवड समितीवर कोण होते? त्यात रामदास भटकळ हे त्यांचे प्रकाशकच होते. सतीश काळसेकर, संजय जोशी, नीरजा, जयंत पवार, दासू वैद्य आणि सिसिलिया कार्व्हालो ही सर्वच मंडळी एक तर त्यांच्या कंपूतली, मित्रपरिवारातील किंवा चाहत्यांच्या वर्गातीलच होती. ज्ञानपीठ पुरस्कारात लॉबिंग नव्हते? नामवर सिंह हे एक मार्क्सवादी विचारवंत आहेत. त्यांच्या लेखनाशी माझा ब-यापैकी परिचय आहे. तारुण्यात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडणूकही लढविली होती. साहित्य अकादमीतील राजकारणामुळे नेमाडे त्यांच्या सहवासात आले. ब्राह्मण आणि दलित यांच्याबद्दलची भूमिका दोघांची सारखीच होती. नेमिशराय या हिंदी लेखकाच्या आत्मचरित्रावर त्यांनी भरभरून लिहिले होते. स्वतः मार्क्सवादी असूनही ठाकूर असल्यामुळे ते कधीच डीकास्ट होऊ शकले नाहीत, म्हणून तेही नेमाडे यांच्याप्रमाणेच पाश्चिमात्य शिक्षण आणि संस्कृतीच्या विरोधात जागतिक पातळीवर प्रस्थापित झालेल्या देशीवादी (Nativism) चळवळीत सामील झाले. नामवर सिंह हे नेमाडे यांचे मित्र नाहीत काय? ज्ञानपीठ देण्यात त्यांचा पुढाकार नाही काय? जागतिक पातळीवरील देशीवादी चळवळीत आत्मप्रस्थापन करण्यासाठी तर देशीवादाची संपूर्ण मांडणी इंग्रजी भाषेत लिहून केली. मराठीत ती उशिरा आली.
नेमाडे हे खानदेशातील राहणारे आहेत. त्यातही पूर्व खानदेशातील. नेमाडे यांनी विचार केला तर त्यांच्या पूर्वजात पहिला सुशिक्षित कितव्या पिढीत होता? बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची तर बंदीच होती. ती कोणी आणि कधी उठविली गेली? ख्रिस्ती मिशन-यांनी १८४६ पासून खानदेशात आपले शैक्षणिक कार्य सुरू केले. पश्चिम खानदेशचे सोडा, परंतु पूर्व खानदेशात पहिली शाळा भडगाव येथे सुरू केली. ती सर्व जातींसाठी खुली होती. शिक्षणाचा प्रसार वाढविताना त्यांनी शिक्षणक्षेत्रात आधुनिक ज्ञान-विज्ञान आणले. त्यांनी भुसावळ येथे सुरू केलेल्या मिडल स्कूलमध्ये १४० विद्यार्थी शिकत होते. भुसावळला चार बोर्डिंग स्कूल्स, दोन मुलींच्या शाळा, तीन ट्रेनिंग स्कूल. “मिशन-यांनी दिलेल्या आधुनिक शिक्षणामुळे व स्थानिक भाषांतून दिलेल्या शिक्षणामुळे स्थानिक भाषांच्या विकासाला हातभार लागला. आजच्या एकविसाव्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेतील विज्ञान आणि माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात खानदेशातील ग्रामीण भागातील लोकांचे हात बळकट करण्याचे काम याच शिक्षणाने केले.”१३ हे काम पेशवाई का करू शकली नाही? मिशन-यांनी शाळाच सुरू केल्या नसत्या, त्यांनी शिक्षणाचा पायाच घातला नसता तर धनाजी नाना आणि मधुकरराव चौधरींनी त्यावर कळस कसा रचला असता? नेमाडे हे ख्रिस्ती मिशनने घातलेल्या पायाचे आणि त्यावर चढविलेल्या कळसाचे अपत्य आहेत. नेमाडे एका खेडेगावातून पुढे येऊन इतके उच्च शिक्षण घेतात, त्या शिक्षणाचा पाया मिशन-यांनी खानदेशात घातला होता याबद्दल तरी त्यांनी कृतज्ञता दर्शवायला हवी.

कोणताही माणूस एकदा आत्मप्रस्थापनेसाठी स्पर्धेत उतरला की तो कोणाबद्दलही कृतज्ञ राहत नसतो. नेमाडे यांना भारतीय देशीवादाचे प्रमुख नेते व्हायचे आहे आणि जागतिक पातळीवरील देशीवादी चळवळीचा एक प्रवक्ता बनून नोबेल पारितोषिक समितीचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. याचे सूतोवाच त्यांनी डॉ. थोरात यांना दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ते सांगतात, “आपल्याकडे साहित्य अकादमीसारख्या संस्थांना हे नोबेल पुरस्कारवाले दरवर्षी विचारणा करतात. ... भारतातील अनेक संस्था समीक्षक दरवर्षी या संस्थांना नावं पाठवितात. पण ते नोबेल कमिटीचे लोक कधीच त्याची दखल घेत नाहीत. पण यावेळी मी अशा संस्थेत असल्यामुळे हे नाव पाठविण्याचं काम माझ्याकडे होते. मी असं पत्र पाठविलं की, इकडून आम्ही नावे देण्याची बिलकूल गरज नाही. कारण गेल्या शंभर वर्षांत जर त्यांना भारतातला एकही लेखक सापडला नाही, तर याच्यानंतरही ते कशाला शोधताहेत हे? ... सेकंड क्लास युरोपियनांना नोबेल पुरस्कार मिळतो, पण फर्स्ट क्लास इंडियन माणसाला मात्र गेल्या शंभर वर्षांत तो मिळत नाही. ते मिळत नसेल तर फुकट या पुरस्काराला एवढा मान तरी का द्यावा? ... दरवर्षी आपण नाव पाठवायचं आणि त्यांनी आपल्यातल्या कोणालाच द्यायचं नाही, असं शंभर वर्षं? ही बुरसटलेली वृत्ती आहे आणि ती त्यांना कळली पाहिजे, उलट आधीचं टागोरांनाही दिलेलं काढून घ्यायला हरकत नाही. पण त्यावेळी होऊन गेलं ते, कारण त्यावेळी तिथे त्यांचे फॉलोअर्स होते, येट्ससारखे लोक होते. पुन्हा कॅथॉलिक लॉबी त्याच्यात वरचढ असते, वगैरे. त्यामुळं ते जुळलं.” (स.प्र., उक्त.) मुलाखतीच्या शेवटी मुलाखतकाराने नेमाडे यांच्याबद्दल भक्तिभाव प्रदर्शित करून मुलाखतीचा शेवट करताना लिहिले आहे, “१९१३ला खंडित झालेली नोबेल पुरस्काराची परंपरा येत्या काही वर्षांत तुमच्या माध्यमातून पुन्हा सुरू होईल. यासाठी तुम्हाला शुभेच्छा!” नेमाडे यांनी नोबेल कमेटीचे लक्ष वेधून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ते मिळाले की त्यांचा जीवनसंघर्ष सार्थ ठरेल.
कोणत्याही क्षेत्रातील आत्मप्रस्थापन करण्याच्या विविध पद्धती असतात. नेमाडे यांचा साहित्यक्षेत्राचा प्रवास लघुनियतकालिकापासून सुरू झाला. या चळवळीने तरुण साहित्यिकांना लिहिते केले आणि आत्मविश्वासही दिला. पारंपरिक समीक्षेची मूल्ये त्यांनी नाकारल्यामुळे वातावरण मोकळे झाले. परंतु या चळवळीला दुसरीही एक बाजू होती. त्यांनी आत्मप्रस्थापनेसाठी त्यांच्या काळातील प्रसिद्ध साहित्यिकांना लक्ष्य करून त्यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली. त्यातून ना दुर्गा भागवत सुटल्या ना विजय तेंडुलकर. हा सारा प्रकार आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी होता. त्याशिवाय साहित्यक्षेत्रात त्यांना आत्मप्रस्थापना करणे अशक्य होते. अशोक शहाणे यांनी या चळवळीत अश्लील, शिवराळ भाषेची परंपरा सुरू केली. राजा ढाले यांच्यापासून ते नेमाडे यांच्यापर्यंत ती परंपरा अबाधित ठेवली गेली. आत्मप्रस्थापनेचा दुसरा प्रकार हा स्वतः सर्जनक्षम बनून वाङ‌्मयनिर्मिती करणे हा होता. तो या सर्वांनाच जमणारा होता असे नाही. भालचंद्र नेमाडे आणि सतीश काळसेकर यांनी निर्मितीप्रक्रियेत स्वतःला झोकून दिले. ज्यांच्यात ती कुवत नव्हती त्यापैकी चंद्रकांत खोत यांच्यासारखे अध्यात्माच्या मार्गाला लागले, तर दया पवारांना ‘महारवाड्यातून बाहेर कधी पडणार?’ असा प्रश्न हातातील किचेन बोटाभोवती फिरवत राजा ढाले विचारू लागले. परंतु वाङ‌्मयनिर्मितीच्या क्षेत्रात आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणून आत्मप्रस्थापनेसाठी ते राजकारणात उतरले. शिवराळ परंपरेचा वारसा चालवीत ‘साधने’च्या स्वातंत्र्यदिन विशेषांकात राष्ट्रध्वजाला xxx घालून त्यांनी राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. दलित पँथरची स्थापना करून दलित तरुणांना अन्याय-अत्याचाराविरोधी संघटित केले. दलित चळवळ गतिमान झाली. परंतु दलित पँथरच्या स्थापनेत नामदेव ढसाळ यांचा मोठा वाटा असल्याने आणि एक जागतिक कवी बनण्याची त्यांच्यातील क्षमता ओळखून पँथरचे नेतृत्व ढसाळच करतील, या भयगंडाने ते ग्रासले. ढसाळ कम्युनिस्ट असल्याचा आरोप करून ढाले यांनी पँथर फोडली. कारण दलित समाजातील प्रचंड कम्युनिस्ट विरोध त्यांच्या पथ्यावर होता. ते कोणत्याही वरचढ माणसाला ‘कम्युनिस्ट’ संबोधून दलितात आत्मप्रस्थापनेचा प्रयत्न करू लागले. दलित पँथरच्या फुटीने संपूर्ण दलित तरुणाईचा मुखभंग झाला. तरुण कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत गेले. एक संपूर्ण पिढी सर्वार्थाने उद्ध्वस्त करण्याचे कार्य करणा-या त्यांना कार्यकर्त्यांनी कधीच माफ केले नाही. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. ‘मास मूव्हमेंट’ नावाची संघटना पँथरच्या धर्तीवर सुरू केली, परंतु तिला अजिबात प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती दुर्लक्षित झाली. तरीही ढालेंतील चिकाटी संपली नव्हती. शेवटी ते प्रकाश आंबेडकरांच्या आश्रयाला गेले. तिथे बरीच वर्षे राहिले. प्रकाश आंबेडकरांकडून काहीच मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे त्यांनी त्यांनाही सोडले. आता ते घरी बसून आहेत. ना साहित्यनिर्मिती, ना नावावर एखादा स्वतंत्र ग्रंथ, ना कवितासंग्रह, ना कादंबरी. सर्जनाची प्रचंड शक्ती असूनही त्यांच्या नावावर कोणतीही साहित्यकृती नाही ही वेदना देणारी गोष्ट आहे. समाजसंघटनात अपयशी आणि राजकारणात व्यर्थ वाया घालवलेली वर्षे ही त्यांच्यातील आत्मप्रस्थापनेची हाव त्यांना निराशाग्रस्ततेकडे घेऊन गेली. त्यांच्यापैकी नेमाडे आणि काळसेकर साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात खूप पुढे गेले. दोघांनाही भरपूर मानमान्यता मिळाली. परंतु दोघांत एक फरक आहे. त्याचे कारणही त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनात आहे. काळसेकरांनी इतरांपेक्षा स्वतःला कधीच श्रेष्ठ मानले नाही. त्यांनी त्यांचे ‘माणूसपण’ जपून ठेवले आहे. प्रत्येकात ‘मान्यतेची इच्छा’ असतेच. ती जोपासावीही लागते. परंतु ती अमर्याद झाली की मानवी व्यक्तिमत्त्वात काही दोष निर्माण होतात. म्हणूनच प्लेटोच्या ‘रिपब्लिक’ ग्रंथाचे पहिले सहा खंड हे मान्यतेच्या इच्छेची जोपासना आणि तिचे नियंत्रण (cultivation and training of thumos) कसे करावे यासंबंधीच्या शिक्षणाला वाहिलेले आहेत. नेमाडे अलीकडे एखाद्या राजकीय नेत्यासारखी जी भाषणे करीत आहेत, त्यावरून तरी त्यांचे नियंत्रण सुटल्यासारखे जाणवते. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या शताब्दी सोहळ्यात त्यांनी एक सनसनाटी विधान केले, “सन १९०१ च्या पूर्वी मराठा ही जातच नव्हती. ब्राह्मण राष्ट्रवाद रोखण्यासाठी इंग्रजांनी ‘मराठा’ शब्द हायजॅक केला.” (दिव्य मराठी, ना.आ., दि. १५.६.२०१५.) आता याला काय म्हणावे? तुकाराम, शिवाजी स्वतःला कधी मराठा म्हणत नव्हते. कारण मराठे त्यांना मराठा मानीत नव्हते. मराठ्यात ९६ कुळी आहेत. त्यात तुकाराम आणि शिवाजींच्या कुळीचा समावेश नाही. हे दोघेही कुणबी होते. कुणबी आणि मराठा यांच्यात खूप फरक आहे. त्या दोन उच्च-नीच श्रेणी आहेत. शिवाजीच्या काळात मोरे, घोरपडे, वाडीचे सावंत वगैरे शहाण्णव कुळी मराठे शिवाजीला पंक्तीला जेवू देत नसत. शिवाजी वेगळे बसत. नेमाडे यांनी जगाचा इतिहास तर सोडाच, परंतु महाराष्ट्राचा इतिहासही नीट अभ्यासलेला नाही. इंग्रजद्वेषापोटी नेमाडे इतिहासाचा आपलाप का करीत सुटले आहेत? महाराष्ट्रात मराठा आणि कुणबी या दोन्हीही जाती आडव्या नव्हे तर श्रेणीबद्ध उभ्या होत्या हे सिद्ध करणारे शेकडो पुरावे महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात सापडतात. त्याची सविस्तर चर्चा आपण पुढे करू.
नेमाडे यांनी मांडलेल्या देशीवादाला मोजक्या साहित्यिकांनी स्वीकारले. त्यांच्या देशीवादाच्या मर्यादा खेड्यातून पुढे आलेल्या सर्जनशील साहित्यिकांपैकी रंगनाथ पठारे यांनी स्पष्टपणे नोंदविल्या आहेत.१४ इंग्रजी भाषेतील वाङ‌्मयाचा अफाट व्यासंग आणि इतिहासाचा अभ्यास यामुळे ते वेगळे आहेत. राजन गवस यांच्यासारखा समर्थ सर्जनशील लेखक मात्र देशीवादाच्या भोव-यात इतका अडकला की तो जीवनसंघर्षातील प्रत्यक्ष विषयाऐवजी गावरान मराठी भाषेतील आणि कृषिसंस्कृतीतील शब्द, म्हणी यातच पुरता अडकला. ते ज्या शब्दसमूहाचे संशोधन करतात ते सर्वश्रुत आहेत. त्यांनी त्यांच्यातील सुप्त सर्जनशीलतेला प्रकट करण्यासाठी नेमाडे यांच्याप्रमाणे इतिहासाभिमुख होण्याऐवजी वर्तमान जीवनसंघर्षाभिमुख आणि भविष्याभिमुख होण्याची गरज आहे. अर्थात हे त्यांनी ठरवायचे आहे.

आत्मप्रस्थापनेसाठी तिसरा एक प्रकार वापरला जातो. त्याच्यात आपले माहात्म्य दाखविण्यासाठी प्रेषिताप्रमाणे एखाद्या सहजासहजी समजून घेता न येणा-या गूढ भाषेत आणि न समजणा-या इंग्रजी फेकीतील असे शब्द उच्चारायचे की, ते सामान्यांच्या डोक्यावरून जावेत, परंतु त्यामुळे ते प्रभावित व्हावेत. पूर्वी भाषणे करणा-यात संस्कृत श्लोक आणि इंग्रजी कोटेशनचा उपयोग केला जाई. त्याला अस्सल देशी शब्द ‘शँटिंग’ करणे असा आहे. विदर्भात मी अनेक देशी तरुणांच्या तोंडी अनेकदा ‘का बा उगीच शँटिंग करून राहिलास’ अशी वाक्ये ऐकली आहेत. नेमाडे करीत असलेल्या शँटिंगचा उत्तम नमुना अनिकेत जावरे यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत दिसतो. नेमाडे किती विषयावर कसे बोलतात, हे त्यातून समजते. ही मुलाखत नेमाडे यांना समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. खरं म्हणजे त्या सर्वच ‘निवडक मुलाखती’ तरुण साहित्यिकांनी वाचून पाहण्यासारख्या आहेत.१५ त्यांना धार्मिक, आध्यात्मिक, साहित्यिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि विज्ञानातील तत्त्वज्ञानाची किती अगाध माहिती आहे, हे जाणवते आणि नेमाडे कसे कसे, काय काय थापा मारतात, हे उघड होते. त्यांच्या अनेक मुलाखती चंद्रकांत पाटील, विलास खोले, नारायण बांदेकर वगैरे स्तुतिपाठकांनी घेतल्या असल्या तरी अनिकेत जावरे यांनी बहुधा त्यांची मुलाखत त्यांची फिरकी घेण्याच्या उद्देशानेच घेतलेली दिसते. तिच्यात नेमाडे पुरते गोंधळलेले दिसतात आणि जावरे स्थिर. हा कुणीतरी कुशाग्र बुद्धीचा मुलाखतकार असला पाहिजे. मुलाखतीचा पहिला भाग वाचताना ते अमराठी असावेत असे वाटले, परंतु दुसरा भाग वाचल्यावर त्यांचे मराठी उत्तम असल्याचे जाणवले. या मुलाखतीत प्रश्नांची लांबी जास्त आणि उत्तरांची कमी. जावरे यांनी त्यांना देकार्तच्या मन आणि शरीर यांच्या विभागणीपासून ते हिंदू कादंबरीपर्यंत अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यात एक प्रश्न असा विचारला आहे की, “अॅग्रेशनविषयी आपली मते काय? विशेषतः इन्ट्रा स्पेसिफिक अॅग्रेशन. समजा, दोन मासे आहेत. ते तुम्ही जलपात्रात सोडले, तर पहिली गोष्ट ते टेरिटरीसाठी भांडणार. पण आधी ते नुसतंच ऍग्रेशन दाखविणार. अ-भाषिक संवाद, हालचाली वगैरे मानवातही होतं. माझा आधार म्हणजे कॉन्रॅड लॉरेन्झ. अॅग्रेशन हे मुख्यतः टेरिटरीसाठी असतं असं गृहीत धरलं जातं की, एकाच जातीचे दोन एकत्र आले, तर त्यांच्यात टेरिटरीसाठी लढा होईल?” नेमाडे यांचं उत्तर असं - “जर त्याचा संबंध फक्त टेरिटरीशीच लावत असलात तर मला हे व्यक्तिमत्त्वाचं एक हेल्दी एक्स्प्रेशन आहे असं वाटतं. कारण अॅग्रेशनमुळे प्रश्न सुटले नाहीत, तर मग दुसरा पर्याय उरत नाही. अस्तित्वासाठी ही टेरिटरीची जाणीव फार महत्त्वाची आणि आवश्यक आहे.” (निवडक मुलाखती, पृ. ३२). नेमाडे यांनी या प्रश्नाचा मुख्य रोखच दुर्लक्षित केला आहे. आता कॉन्रॅड लॉरेन्झ (Konrad Lorenz) यांचा विषय निघालाच आहे, तर त्यासंबंधी आणि आक्रमणाच्या प्रवृत्तीसंबंधी दोन शब्द लिहावेसे वाटतात. लॉरेन्झ यांच्या On Aggression आणि King Solomon's Ring या दोन्हीही प्रमुख ग्रंथांशी माझी ब-यापैकी ओळख आहे. माझ्या ‘मानव आणि धर्मचिंतन’ या ग्रंथात जीवनकलहाचे स्वरूप आणि आक्रमणाच्या प्रवृत्तीचे विवेचन करताना या ग्रंथांचा आधार घेतला आहे. ते तुलनेने अलीकडे आलेल्या प्राणिवर्तनशास्त्राच्या (ethology) क्षेत्रातील एक मोठे शास्त्रज्ञ होते. या शास्त्राचा अभ्यास जरी मॅकडूगलपासून सुरू झाला असला तरी ते ‘व्हायटॅलिस्ट’ म्हणजे पदार्थ किंवा रसायन इ. शास्त्रांच्या पलीकडच्या कोणत्या तरी गूढ शक्तीमुळे चालतात, असे मानणारे होते. त्यांच्या दुर्दैवानं त्यांच्या जीवनात या गूढ शक्तीचा शोध न लागल्याने त्यांना प्राण्यांच्या वर्तणुकींचा अभ्यास नीट करता आला नाही. आपल्याकडेही खेड्यापाड्यात अशी समजूत आहे की ज्या माणसाने निळावंतीची पोथी वाचली आहे, तो पक्ष्यांशी बोलू शकते. किंवा पक्ष्यांची भाषा त्याला समजते. हाच समज बायबलमध्येही होता. लॉरेन्झ यांनी तो
There was never a King like Solomon,
Not since the world began;
Yet Solomon talked to a butterfly
As a man would talk to a man.
रुडयार्ड किप्लिंगच्या (Rudyard Kipling) यांच्या या ओळी उद्धृत करून गूढ शक्तीचे अस्तित्व नाकारले. जावरे यांचा आधार जर लॉरेन्झ असतील तर त्यांनी आक्रमणाचे कारण केवळ प्रादेशिक असते, असे त्यांच्या माझ्या आकलनावरूनही तरी दिसत नाही. प्राणिजगतात आक्रमणाची अनेक कारणे असतात. मानवासहित सर्व प्राणिसृष्टीत आक्रमणाची भावना असते, परंतु ती जुने मानसशास्त्र समजत होते तितकी राक्षसी किंवा विनाशकारी नव्हती. सिग्मंड फ्रॉईड हे पहिले मानसशास्त्रज्ञ, की ज्यांनी ‘उपजत प्रवृत्ती (instinct) या स्वयंस्फूर्त असतात’ हे दाखवून दिले. त्यामुळे ते अनेकांच्या टीकेचे धनी झाले. माणसातील आक्रमक प्रवृत्ती ही मानवनिर्मित विभाजित सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाने उत्पन्न केलेली एक विकृती आहे असे फ्रॉईडोत्तर मानसशास्त्रज्ञ मानू लागले. माझ्या या विवेचनाचा रोख जावरे यांनी नेमाडे यांना विचारलेल्या देशीवादाचा तत्त्वाचा आक्रमणाच्या प्रवृत्तीशी आपण संबंध जोडता काय? या प्रश्नाकडे आहे. नेमाडेंनी डार्विनच्या "Survival of the fittest'चे तत्त्वही नीट समजून घ्यायला हवे. त्यातील ‘जीवनकलह’ हा दोन परस्पर वेगळ्या जातीतील प्राण्यातील मुळी नाहीच आहे. त्याचा चुकीचा अर्थ लावून यापूर्वीच डार्विनवर भरपूर अन्याय झालेला आहे. डार्विन एकाच जातीतील किंवा निकडचे नाते असलेल्या दोन जातीतील (species) प्राण्यात असलेल्या कलहाबद्दल किंवा स्पर्धेबद्दल बोलत होते. ते नेमाडे म्हणतात तसे आजच्या शस्त्रधारी माणसाबद्दल बोलत नव्हते. ‘सर्व्हायवल ऑफ दि व्हल्गरिस्ट’ - यामुळे ‘सर्व्हायवल ऑफ दि फिटेस्ट’च्या तत्त्वात भरच पडेल. हे नेमाडे यांचे विवेचनच व्हल्गर आहे. (पृ.३०). लॉरेन्झ यांनी मानवी समाजरचना आणि प्राणिसृष्टीतील समाजरचना यात बरेच साम्य दाखविले आहे. माणूस आणि घुशी हे दोन्हीही प्राणी आपापल्या टोळीत, कळपात किंवा भारतीय व्यवस्थेच्या संदर्भात बोलायचे ठरले तर आपापल्या जातीत एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात; परंतु टोळी, कळप किंवा जात याच्याबाहेरील स्वजातीय (species) प्राण्यांशी मात्र ते भयंकर वैरभाव दाखवितात. परंतु अन्नाचा तुटवडा पडला की ते आपसातही जीवघेणा संघर्ष करतात. स्वजातीयाविरुद्ध आक्रमणाची प्रवृत्ती केवळ प्रादेशिक कारणामुळे येत नाही. लॉरेन्झ यांच्या मताप्रमाणे तिला अनेक कारणे असतात. उदा. वैयक्तिक संबंध आणि प्रेम हेसुद्धा एक कारण सांगितले जाते. परंतु आक्रमणाची प्रवृत्ती यांच्यापेक्षा लक्षावधी वर्षांनी जुनी आहे. प्राणिसृष्टीतील वैयक्तिक संबंधाची प्रवृत्ती ही साधारणतः ज्या माशांना, पक्ष्यांना आणि सस्तन प्राण्यांना हाडाचा सापळा असतो त्यांच्यातच दिसून येते. परंतु हे प्राणी तर पृथ्वीच्या इतिहासातील तिस-या कालखंडाच्या पहिल्या भागापूर्वी अस्तित्वातच नव्हते. याचा अर्थ, प्राण्यातील स्वजातीवरील आक्रमणाची प्रवृत्ती प्रेमाशिवायही अस्तित्वात राहू शकत होती, असा होतो. वैयक्तिक मैत्री आणि प्रेम यांना मुळीच महत्त्व न देणारे असे नाईट हेरॉन पक्ष्याचे निनावी कळप आपल्याला दिसतात. लॉरेन्झ यांनी प्रादेशिकतेपेक्षा आक्रमणाच्या प्रवृत्तीला अधिक महत्त्व दिलेले होते. लॉरेन्झ यांच्या मताप्रमाणे आक्रमक प्रवृत्तीशिवाय प्रेम असूच शकत नाही. द्वेष हा प्रेमाचाच धाकटा भाऊ असला, तरी त्याचे स्वरूप नेहमीच्या आक्रमक प्रवृत्तीपेक्षा वेगळे असते. द्वेष हा एकाच व्यक्तीवर केंद्रित असतो, तसेच प्रेमही. अनेकदा द्वेष ही प्रेमानंतर उद‌्भवणारी भावना असते. आपण एखाद्या व्यक्तीचा खरा किंवा मनापासून द्वेष त्याच वेळी करू शकतो, ज्या वेळेपूर्वी आपण तिच्यावर मनस्वी प्रेम केलेले असते. नेमाडेंनी जावरे यांच्या पुढील प्रश्नाला दिलेले उत्तर हे उत्तरच नाही. तो केवळ शब्दांचा खेळ आहे. आक्रमणाचे तत्त्व देशीवादाच्या तत्त्वाशी उत्तम प्रकारे जोडता येऊ शकेल.
अनिकेत जावरे यांनी पुढे प्रश्न विचारला आहे, “चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या मुलाखतीत आपण म्हटलं आहे की, पुढील ‘हिंदू’ या कादंबरीत भारतीयांनी हिंदू म्हणून त्यांची आयडेंटिटी ओळखली पाहिजे. इथपर्यंत ती कादंबरी येते. हा आपल्या पश्चिमेवर अवलंबून राहण्यावरचा उपाय आहे का? विसाव्या शतकामध्ये आपली सामूहिक किंवा वैयक्तिक आयडेंटिटी ही धर्मावर आधारणं योग्य आहे का? हा उपाय ‘सोशली व्हायबल’ आहे का? की कादंबरीच्या जगतातील हा एक उपाय आहे? जी आपल्याला आहेत, असं म्हणतात, त्या आपल्या भारतीय ‘मुळांचं’ हे रिवायटलायझेन आहे का?” नेमाडे यांचे उत्तर आहे, “पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या संस्कृतीला झालेल्या अनेक रोगांवरचा हा उपाय नाही. हे माझ्या सर्जनशील विचाराचं स्वाभाविक कल्मिनेशन आहे की, आपल्याला एक आयडेंटिटी असू शकते. हे स्वतःची ओळख सापडण्यासारखं आहे, की सिंधू नदीच्या बाजूला जन्मलेल्या लोकांना हिंदू म्हणतात. पण माझ्या येत्या कादंबरीत - जी येण्यासाठी अनेक वर्षे घेत आहे दुर्दैवानं - मी फक्त धर्माच्या अर्थानं हा शब्द वापरीत नाही. प्रतिमांसाठी मुख्यतः आणि एका भूभागाविषयी प्रपोझिशन. माझ्यासाठी या उपखंडात राहणारा प्रत्येक माणूस हिंदू आहे. त्यात पाकिस्तानही येतं. कारण इतिहासाच्या सुरुवातीच्या काळापासून या युनिटमध्ये एक डिस्टिंक्ट संस्कृती निर्माण झाली. पण त्याची जाणीव मध्ये कुठेतरी हरवली गेली. आपल्या लोकांच्या भारतीय इतिहासाबद्दलच्या अनेक सिद्धान्तामुळे, म्हणजे इंडो आर्यन दंतकथा वगैरे - यामुळे हा कशावरचा उपाय नसून आपण कोण आहोत, याची जाणीव करून घेणं आहे. कारण कादंबरीचं सेटिंग म्हणजे परदेशी राहणारे भारतीय असं आहे. परदेशी राहणा-या भारतीयासाठी हे मापक फार ‘व्हायबल’ आहे. पारशी असोत की मुस्लीम ते इंडियन असतात. हिंदू म्हणजे या अर्थानं. मला वाटतं, मुळात असाच अर्थ होता या शब्दाचा, फक्त ‘फॅनॅटिक्स’नी याचा वापर चुकीच्या अर्थानं केला. आणि हे भारतीय रूट्सचं ‘रिवायटलायझेशन’ हा माझा उपाय मुळीच नाही. कारण जेव्हा ‘रिवायटलायझेशन’ म्हणजे काय, हे लोकांना कळेल तेव्हाच ते शक्य होईल. ज्याला ‘ब्राऊन रेस’ म्हणतात त्याच्याशी आयडेंटिफिकेशन करणं आहे हे एक प्रकारचं आणि ‘सोशली व्हायबल’बद्दल मला वाटतं भविष्यात इतिहास हा ‘रेस ओरिएंटेड’ असणार आहे. आतासुद्धा तशी सुरुवात झाली आहे. आपल्याला कुठल्याही किमतीनं धर्म उखडून वंश-रेसच्या भाषेत विचार करणं आवश्यक आहे. कारण अमेरिका असो की युरोप, इंग्लंड हे सत्य उरतंच की, प्रत्येक वंशाची भिन्न सांस्कृतिक आयडेंटिटी आहे आणि राष्ट्रीयत्व किंवा धर्मामुळे आपले प्रश्न सुटलेले नाहीत.” पुढचा प्रश्न नेमाडेंना अधिक नागडे करणारा आहे. तो - “म्हणजे आपलं म्हणणं आहे की, धर्म किंवा राष्ट्रानुसार वर्गीकरण न करता वंशानुसार लोकांचं वर्गीकरण करावं?” नेमाडे उत्तर देतात, “होय. वंश आणि भौगोलिक प्रभाव - तुमच्या सांस्कृतिक मिलिऊ, इथॉसवर भौगोलिक परिणाम खोलवर असतात. आणि जीवशास्त्रीयही. या अर्थानं मी हिंदू म्हणतो.” (निवडक मुलाखती, पृ. ३५-३६.) नेमाडे पुढे एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात, “लेखकानं समाजशास्त्रज्ञ असावं, याच्याशी मुळीच सहमत नाही. हा माझा कन्सर्न मुळीच नाही.” (पृ. ३७). मग लेखकानं हिटलरसारखं वंशवादी फॅसिस्ट होण्यासाठी वंशशास्त्रज्ञ होणं हा लेखकाचा कन्सर्न आहे? नेमाडेंचे हे अतिप्रगल्भ चिंतन बिचा-या गरीब जनतेला कितपत समजेल, हे सांगता येत नाही. हीच देशीवादी मराठी आहे का? ती फक्त जावरे, नेमाडे आणि प्रकाशक लोकवाङ‌्मय गृहालाच समजू शकेल. नेमाडे यांच्या शब्दात मे. पुं. रेग्यांची पाटणकरांना आणि पाटणकरांची रेग्यांना! प्रसिद्ध करताना एखादा मजकूर वाचकांना समजेल निदान याप्रकारे तरी छापला जावा. आणि भाषांतरकारांनी तरी इतकी बेफिकिरी का दाखवावी? का तो वाचकांना समजूच नये, असा उद्देश त्यामागे होता? ही काय भानगड आहे? हे काय चाललंय?
चला, निदान यातून नेमाडे यांचे आरपार विवस्त्र दर्शन तरी झाले. नेमाडे यांचे सामंती हिंदुत्वाचे आणि प्रादेशिकतवादी संस्कृतीचे दर्शन झाले होते. ते आता त्याच्या पुढच्या टप्प्यावर म्हणजे वांशिक संस्कृतीवादाच्या हिटलरच्या टप्प्यावर गेले आहे. कोणताही फॅसिस्ट काही गोष्टींचा उपयोग करून घेत असतो. त्याच्याकडे एक सांस्कृतिक श्रेष्ठत्वाची भक्कम भावना असावी लागते आणि त्याला समाजाला भयभीत करता येण्यासाठी एक शत्रूही लागतो. ब्राह्मणी हिंदू मूलतत्त्ववाद्यांनी आमचे राष्ट्र एकेकाळी परिपूर्ण ‘हिंदू राष्ट्र’ होते, अशी भावना पक्की केली होती. आणि मुसलमान, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट हे तीन शत्रू जनतेसमोर उभे केले होते. नेमाडे यांचा सामंती हिंदू मूलतत्त्ववाद आता सिंधू संस्कृतीला आदर्श मानून वांशिक संस्कृतीला महत्त्व देत आहे. त्याचे शत्रू ब्राह्मणी हिंदू राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर विचारांची माणसे आणि या वांशिक सांस्कृतिकवादाला विरोध करणारे सर्व दलित, पुरोगामी आणि विवेकाचा पुरस्कार करणारे समुदाय आहेत. याचे सूतोवाच त्यांनी वर उल्लेखिलेल्या पुण्यातील भाषणात केले आहे. ते म्हणाले, “पाश्चात्त्यांच्या नादाला लागून आपण ‘सेक्युलर’ वगैरेच्या नादाला लागलो. बुद्ध, फुले, आगरकरांनासुद्धा या देशातल्या जातिसंस्था मोडता आल्या नाहीत. तरी उथळपणाने जातीचा अंत वगैरे बोलतो आपण, जातीचा अंत म्हणजे या देशाचा अंत, हे भान आपल्या लोकांना नाही.”(दिव्य मराठी, ना.आ., दि. १५.६.२०१५) म्हणून महाराष्ट्रातल्या वर्ण, वर्ग, जाती-स्त्रीदास्य अंताचा लढा करणारे नेमाडेंच्या शत्रूस्थानी आहेत. हे आव्हान त्यांनी आता स्वीकारलेच पाहिजे.
नेमाडे यांनी या सामंती हिंदू फॅसिझमची मांडणी ज्या आधारे केली आहे, त्या सिंधू संस्कृती, देशीवाद, संतचळवळ, जातिव्यवस्था इ. प्रत्येक विषयाची विस्ताराने मांडणी करू. सुरुवात सिंधू संस्कृतीने होईल.
संदर्भ टिपा
१.Singer Milton, The Modernization of Occupational Cultures in South Asia, Duke University (१९७३), Introduction.
२.नेमाडे भालचंद्र, टीकास्वयंवर, साकेत, औरंगाबाद (१९९०)
३."I particularly welcome Mishra, because I have realized that archaeology - particularly Prehistory - should be firmly based on anthropology. It is not enought to discover objects. These have to be interpreted - an exercise that requires an insight into the life of the primitives, their customs, manners, and social structure. While I myself, could do little with all the duties I was saddled with, I had always thought that well-trained students in social anthropology would be an asset to the Department.'' Sankalia H. D., Born For Archaeology, B. R. Publishing Corporation Delhi (year not mentioned), p. ६५.
४.उक्त, पृ. १०९.
५.नेमाडे भालचंद्र, निवडक मुलाखती, लोकवाङ‌्मय गृह, मुंबई (दु. आ.) (२०१०)
६.गोळवलकर मा. स., विचारधन, हिंदुस्थान साहित्य, पुणे (१९७१), पृ. १२५-२७.
७.मुरंजन सुमंत, पुरोहितवर्गवर्चस्व व भारताचा सामाजिक इतिहास, प्राज्ञपाठशाळा, वाई (१९९०), पृ. १५८-६१.
८.नेमाडे भालचंद्र, निवडक मुलाखती, लोकवाङ‌्मय गृह, मुंबई (दु. आ.) (२०१०)
९.कसबे रावसाहेब, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह, लोकवाङ‌्मय, मुंबई (दु.आ.) (२०१५), विभाग दुसरा ‘मामेकं शरणं ब्रज।’
१०.थोरात हरिश्चंद्र, साहित्याचे संदर्भ, मौज प्रकाशन, मुंबई (२००५), पृ. १६९.
११.सारंग विलास, लिहित्या लेखकाचं वाचन, शब्द, मुंबई (२०११), पृ. ७३.
१२.नेमाडे भालचंद्र, बिढार, पॉप्युलर, मुंबई, ति.सा., तिसरे मुद्रण (२०१२), पृ. ५२.
१३.कोरडे योगेश आणि पाटील मधुकर, ग्रामीण समाजाची मूलतत्त्वे, प्रशांत पब्लिकेशन, जळगाव (२०१५), पृ. ८७-८९.
१४.पठारे रंगनाथ, जागतिकीकरण आणि देशीवाद, लोकवाङ‌्मय गृह, मुंबई (२००३)
१५.नेमाडे भालचंद्र, निवडक मुलाखती, लोकवाङ‌्मय गृह, मुंबई (दु. आ.) (२०१०)

(लोकवाङ‌्मय गृहाच्या वतीने प्रसिद्ध होणा-या ‘साहित्यातील देशीवाद आणि समाजातील जातिव्यवस्था’ या आगामी ग्रंथातील पहिले प्रकरण)