निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेली रंगीबेरंगी फुलपाखरे. त्यांच्या जीवनातल्या विविध अवस्था आणि स्थित्यंतराचा प्रवास अभ्यासणे हे खूप वैशिष्ट्यपूर्ण व चित्त वेधून घेणारे.
आपण आपल्या रोजच्या जीवनात तसेच आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात, बागेत, माळरानावर, जंगलात, फिरत असताना रंगीबेरंगी फुलपाखरे पाहायला मिळतात आणि आपल्या मनात कुतूहल जागे होऊन आपल्याला प्रश्न पडतो की, फुलपाखराचा सुरवंट ते एक सौंदर्याने नटलेले फुलपाखरू हा प्रवास नेमका कसा होत असेल? मग आपण त्याची माहिती मिळवायला सुरुवात केल्यावर अत्यंत रंजक जग आपल्यासमोर येते.
“अंडी, त्यातून बाहेर येणा-या खादाड अळ्या, अळ्यांनी विणलेले कोश आणि मग कोशातून हळुवारपणे बाहेर येणारं फुलपाखरू” हे त्यांचे जीवनचक्र. या कोशातून बाहेर येण्याच्या घटनेतही एक गंमत आहे. फुलपाखरांना रंगापेक्षाही गंधाची जाण उत्तम असते. अशा कोशात आकारास येणारे फुलपाखरू मादी असेल, तर त्या प्रजातीची नर फुलपाखरे आधीच त्या कोशाभोवती घिरट्या घालायला सुरुवात करतात. कारण त्यांना कोशातून बाहेर आल्या आल्या, त्या मादीशी मिलन करायचं असतं. फुलपाखरांचं आयुष्यमान हे कमीत कमी आठ दिवस ते जास्तीत जास्त दोन ते तीन महिन्यांपर्यंत असतं. या अल्पशा काळात त्यांना पक्षी, नाकतोडे, कोळी या भक्षकांपासून स्वत:चा बचाव करीत प्रजनन करावं लागतं.
फुलपाखरांच्या मिलनानंतर मादी सर्वात आधी शोधते, ती तिच्या प्रजातीसाठी उपयुक्त अशा खाद्य वनस्पती किंवा फूड प्लॅण्ट्स. या फूड प्लॅण्ट्सचेही विविध प्रकार. त्यातील काही तर विषारीदेखील असतात. फूड प्लॅण्ट्सचा शोध घेतल्यानंतर मादी त्या झाडांच्या पानांखाली अंडी घालते. अंडी पानांखाली घालण्यामागे ती उपद्रवी, भक्षक प्राण्या-पक्ष्यांना दिसू नयेत, हे मुख्य कारण असते. एका पानाखाली एक अंडे घातले जाते.
त्यामुळे पुढे त्या पानावर सुरवंटाची गर्दी वाढून त्यांना खाद्य अपुरे पडत नाही. अंडी आपोआपच काही दिवसांनी उबतात, त्यातून अगदी लहान आकाराचा सुरवंट बाहेर पडतो. हा सुरवंट कवचातून बाहेर पडतो. बाहेर आल्याबरोबर तो सर्वप्रथम आपल्याच अंड्याचे कवच खाऊन टाकतो. ते खाल्ल्यानंतर तो पानांकडे वळतो. पानांच्या काठापासून सुरुवात करून तो मध्यापर्यंत पान खातो. हा सुरवंट अतिशय अधाशी असतो. या त्याच्या अधाशी वृत्तीमुळे त्याची वाढ जलद होते. थोड्या दिवसांतच सुरवंट कित्येक पटीने वाढतो.यामध्ये टायगर जातीची फुलपाखरे मिल्कविड (ज्या झाडाचे पान तोडल्यावर पांढरट, दुधट रंगाचा रस निघतो.) या झाडाच्या पानांवर अंडी घालतात. मिल्कविड विषारी असते; पण त्याच्या विषाचा परिणाम सुरवंटावर जराही होत नाही. ते वेगाने पानांचा फडशा पाडतात आणि शरीरात विष शोषून घेतात. त्याचा फायदा परभक्षी प्राणी-पक्ष्यांपासून बचाव करताना होतो. अशा सुरवंटाला किंवा फुलपाखराला खाताच भक्षकाला गरगरते किंवा उलट्या होतात. त्यातून तो धडा शिकतो, अशा फुलपाखरांच्या नादी लागत नाही.
सुरवंटाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याचे कोशात रूपांतर होण्याची अवस्था सुरू होते. झाडाच्या फांदीवर एका ठिकाणी तो स्वतःला लाळेच्या साहाय्याने चिटकवतो व काही काळातच आपली कातडी उतरविण्याची प्रक्रिया सुरू करतो. ही प्रक्रिया फारच हळू घडते व सुरवंटाचे रूपांतर कोशात होते. कोश ही स्थिर अवस्था असते. या काळात ते काहीच खात नाही, की हालचालही करत नाही. या अवस्थेत धोकाही तेवढाच जास्त असतो. त्यामुळे ब-याच फुलपाखरांचे कोश हिरवे किंवा फांदीच्या रंगरूपाचे असतात. त्यामुळे ते भक्षकांना झाडापेक्षा वेगळे ओळखता येणे, कठीण असते.
कोश कालांतराने काळपट किंवा गडद होत जातो. हा गडदपणा कोशातील फुलपाखरांची वाढ दर्शवितो. पूर्ण गडद व काळसर झालेल्या कोशात पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू असते. यानंतर एखाद्या भल्या पहाटे कोवळ्या उन्हात, कोश एका बाजूने तडकतो व ओलावल्या पंखांनी हळुवारपणे पूर्ण वाढ झालेले सुंदर फुलपाखरू बाहेर येते. कोशातून बाहेर पडलेले फुलपाखरू लगेच उडण्यास असमर्थ असते.
थोडा वेळ ते कोशावर बसूनच पंख वाळवते. पंख वाळतात आणि आपल्याला पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराचे दर्शन घडते. हा क्षण फुलपाखराच्या आयुष्यातील व सर्व अवस्थांमधील अत्यंत देखणा व सुंदर अनुभव असतो. तो अनुभवायला मिळणे हे भाग्याचे असते. कारण, बरीच फुलपाखरे साधारणपणे भल्या पहाटे कोशातून बाहेर येतात.
अंडी, सुरवंट व कोश या अवस्थाही प्रत्येक फुलपाखरांमध्ये वेगवेगळ्या असतात. काहींचे सुरवंट भडक, चटकन दिसणारे; तर काहींचे निसर्गाशी, निसर्गातल्या रंगाशी, आकारांशी मिळतेजुळते, काही चमकदार व उठून दिसणारे असतात. या विविध चित्तवेधक अवस्थांचे निरीक्षण, अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण अवलोकन करणे हे मनाला निश्चितच खूप आनंद मिळवून देणारे असते. फुलपाखरांच्या ‘फूड प्लॅण्ट्स’ची ओळख व त्यांच्या अधिवासांची ओळख झाल्यावर तुम्ही पण त्यांचे सुरवंट व कोश शोधू शकता. एकदा हा शोध लागला की, आपल्या जगण्यातही रंगांची मनसोक्त उधळण सुरू होते...
saurabh.nisarg09@gmail.com