नीरज म्हणजे कमळ. चिखलात उमलून सर्व परिसर आपल्या सुगंधाने मोहित करणा-या कमळपुष्पाप्रमाणे गीतकार नीरज यांचे प्रत्येक गाणे रसिकांच्या मनाला सुगंधित करते. कमळ जसे भ्रमराला स्वत:कडे आकर्षित करते, नीरजची गाणी रसिकांना अशीच मुग्ध करतात. नीरजच्या गाण्यातील मकरंदरूपी भावभावना कानसेनांना खिळवून ठेवतात. नीरज यांच्या शब्दरूपी पाकळ्यांची ओढच न्यारी. मग ते प्रेमगीत असो की विरह गीत असो; रसिक त्यात न्हाऊन निघतोच.
गोपाळदास सक्सेना हे ‘नीरज’ यांचे खरे नाव. उत्तर प्रदेशातील इटावा येथे जन्मलेला हा कविराज, पुढे हिंदी साहित्यातील बडे प्रस्थ बनला. इटावा येथील प्राथमिक शिक्षणानंतर गोपाळदास महाविद्यालयीन शिक्षणासाठी कानपुरात गेले. साहित्याची आवड त्यांना उपजतच. त्यातच शब्दांचा मेळा त्यांना भावायचा. त्यातून कवितांचा छंड जडला. तो त्यांनी मनापासून जपला. ‘नीरज’ या कविनामाने हा कवी अधिकाधिक फुलत गेला. त्या काळी कवी संमेलनाला प्रतिष्ठा होती. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचा प्रभाव असलेला नीरज कविसंमेलनात मोठ्या तडफेने कविता सादर करी. एकदा चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आर. चंद्रा यांनी नीरज यांच्या कविता ऐकल्या. त्यांना नीरजच्या शब्दांनी मोहित केले. त्या वेळी ते ‘नई उम्र की नई फसल’ हा चित्रपट बनवत होते. त्यांनी नीरज यांना गीते लिहिण्याचा आग्रह केला. पण नीरज प्रकाशझोतात आले, ते ‘चा चा चा’ या चित्रपटामुळे. यातील ‘सुबह ना आयी, शाम न आयी’ आणि ‘वो तुम न थी’ ही महमंद रफी यांच्या आवाजाने नटलेली गाणी खूप गाजली. त्यानंतर शंकर-जयकिशन आणि सचिन देव बर्मन या त्या काळी यशोशिखरावर असलेल्या संगीतकारांचे नीरज यांच्या साध्या, रसाळ, आशयघन शब्दांनी लक्ष वेधून घेतले. देव आनंद त्या वेळी ‘प्रेम पुजारी’ चित्रपटाची जुळवाजुळव करत होता. सचिनदांनी नीरज यांचे नाव गीतलेखनासाठी सुचवले. नीरज यांना ‘नवकेतन’तर्फे बोलावण्यात आले. सचिनदांनी नीरज यांना सर्व सिच्युएशन समजावून सांगितली. या गाण्यात रंग, रंगिला आणि शराब यायलाच हवे, अशी अट घातली. नीरज यांनी सर्व काही शांतपणे ऐकून घेतले. कागद, पेन उचलला आणि शब्दांना साद घातली. कागदावर शब्द उमटले, ‘रंगीला रे, तेरे रंग मे यूँ रंगा है मेरा मन!’ सचिनदा या शब्दांनी प्रभावित झाले, परंतु त्यात शराब कोठेच नव्हते. नीरज यांनी दुसरी ओळ लिहिली ‘छलिया रे, ना बुजेगी किसी ‘जल’से ये अगन!’ झाले. सचिनदा आणि नीरज यांचे सूर जुळले. या सूरमय मैत्रीतून मग जन्माला आली, अनेक अविस्मरणीय गाणी! प्रेम पुजारी, तेरे मेरे सपने, गॅम्बलर, छुपा रुस्तम, शर्मिली हे या जोडीचे काही गाजलेले चित्रपट. सचिनदांबरोबरच शंकर-जयकिशन यांच्या बरोबर नीरज यांची वेव्हलेंग्थ चांगली जुळली.
सरळ, साधी रचना, गेय व अचूक आशयघन शब्द, उपमा व रुपकांचा समर्पक वापर ही नीरज यांच्या शैलीची वैशिष्ट्ये. महाविद्यालयात हिंदी साहित्य शिकवण्यात नीरज यांचा हातखंडा. शिकवण्याच्या अनोख्या शैलीमुळे ते विद्यार्थ्यांत अत्यंत लोकप्रिय. ‘शर्मिली’मध्ये ‘तेरा काजल लेकर रात बनी, तेरी मेहंदी लेकर दिन उगा, तेरी बाली सुनकर सूर जगे, तेरी खुशबू लेकर फूल खिला’ अशा समर्पक उपमांची पेरणी करत तिचे सौंदर्य खुलवण्यासाठी नीरजच हवेत. ‘पहचान’मध्ये ‘बस यही अपराध मै सौ बार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ’ असे वास्तव सांगायचे धाडस नीरजमुळे शक्य झाले आहे.
‘ए भाई जरा देख के चलो...’(मेरा नाम जोकर)मधले वास्तव, ‘आज मदहोश हुआ जाए...’(शर्मिली)मधली नशा, ‘जीवन की बगिया महकेगी...’(तेरे मेरे सपने)मधला स्वप्नवाद, ‘काल का पहिया घुमे...’(चंदा और बिजली)मधला काळाचा महिमा, ‘ताकद वतन की हमसे है...’(प्रेम पुजारी)मधला राष्ट्रवाद, ‘आप यहाँ आए किस लिए...’(कल आज और कल)मधला खट्याळपणा, ‘धीरे से जाना खटियन मे...’(छुपा रुस्तम)मधील विडंबन, ‘खिलते है गुल यहाँ...’(शर्मिली) मधला विरहभाव शब्दांत गुंफताना नीरज यांच्या अभिजात लेखणीला लाभणारी झळाळी निव्वळ अवर्णनीय!
हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळात दिग्गज संगीतकारांबरोबर काम करूनही काहीसे दुर्लक्षित राहिल्याची खंत पद्मभूषण सन्मानप्राप्त नीरज यांच्या संवेदनशील कविमनाला नेहमीच अस्वस्थ करत आली. त्यामुळेच ते म्हणतात, इतने बदनाम है हम इस जमाने में, तुमको लग जाएगी सदियाँ हम को भूलाने में...
kajaykulkarni@gmail.com