आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमालयाची सावली : नेपाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूकंप केवळ भौगोलिक असत नाहीत. ते सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक असतात; तसे भाषिक आणि साहित्यिकही! हिमालयाच्या कुशीत विसावलेली नेपाळी भाषा सुनकोशी, त्रिसुली, मर्शांगधी, सेती, काली गंडकी, कर्नाली नद्यांच्या खो-यात जन्मली. नेपाळला सामावून घेणा-या खो-याने अनेक भौगोलिक भूकंप अनुभवले. त्यात केवळ मनुष्यहानी झाली नाही, तर भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक पडझडही! तरी नेपाळी भाषा आणि साहित्य सतत विकसित होत राहिले, ते माणसास मिळालेल्या नैसर्गिक वरदानामुळे! निसर्ग जितका प्रतिकूल, माणूस सांस्कृतिकदृष्ट्या तितकाच
दृढप्रतिज्ञ!
असं दिसतं की, नेपाळीच्या प्रारंभीच्या प्रवासात संस्कृत भाषेची साथ-संगत तिला लाभली. उपरोल्लेखित नद्यांच्या कुशीत, द-या-खो-यात, गुंफेत
ध्यान, चिंतन, मनन, तप, साधना करणारे पूर्ववर्ती ऋषी-मुनी. त्यांची ज्ञानभाषा संस्कृत होती. रामायण, महाभारत, गीता ग्रंथच त्यांचे प्रेरणास्रोत!
पर्वतीय प्रदेशातील विविध बोली व पर्वतीय प्रदेशात येत राहणारे पर्यटक, यात्री यांच्या संकर, संपर्कातून नेपाळी आकारली, ती गुरखाली, खस कुरा, पहाडी, पर्वतीय अशा अनेक नावांनी ओळखली जाते. भारत, नेपाळ, सिक्किम, बांगलादेश, म्यानमार, तिबेट, भूतान इत्यादी देश-प्रदेशात बोलली जाणारी ही भाषा. आजमितीस सुमारे चार कोटी लोक नेपाळी बोलणारे आहेत. त्यातले निम्मे भारतातील आहेत. नेपाळची राष्ट्रभाषा असलेली नेपाळी भारतातील घटनामान्य भारतीय भाषा आहे. सिक्किम व पश्चिम बंगाल राज्यांची ती राजभाषा आहे. देवनागरी लिपीत लिहिली जाणारी नेपाळी. आज तिच्यात सुमारे ८०% शब्दसंपदा हिंदीतून घेण्यात आली आहे. त्यामुळे संस्कृत, हिंदी, बंगाली, मैथिली भाषिक शब्द नेपाळीत आढळतात.
सुमारे ५०० वर्षांपूर्वी कर्नाली, भेरी, सेती नद्यांच्या पंचक्रोशीतील गुरखे पूर्वेकडे स्थलांतरित झाले. हे गुरखे खस जनजाती समूहात राहात. खाम पर्वतीय प्रांत हे त्यांचे मूळ निवासस्थान. पण तेथील मुखियांच्या जाचाला कंटाळून ते तराई प्रांतात... पर्वत पायथ्याशी येऊन भात शेती करत स्थिरावले. निसर्गाच्या प्रतिकूलतेने गुरखा वंश काटक बनला. पोखरा आणि काठमांडूमधील प्रदेशाचं एक छोटं राज्य आकारलं. हेच मूळचं गुरखालँड!
लामजुंगचा राजकुमार द्रव्यशहाने सन १५५९मध्ये गुरखाभूमीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून विधिवत राज्याभिषेक करत स्वतंत्र राज्याची घोषणा केली. आपल्या राज्याची राजभाषा नेपाळी बनवली. स्वतंत्र सैन्यदल स्थापन केले. या सैन्याचा लौकिक आजही भारतीय सेनेत असलेल्या स्वतंत्र गुरखा रायफल्स बटालियनच्या रूपात अढळ आहे. पुढे गुरखासैन्य भगीरथ पंतांच्या सैनापती पदाच्या काळात अजिंक्य मानलं गेलं. अठराव्या शतकात सिंहासनारूढ झालेल्या पृथ्वीनारायण शहा नरेशांनी साम्राज्याचा लोकविस्तार करत छेत्री(क्षत्रिय), ठाकूर(ब्राह्मण), मगर, गुरुंग अशा सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र करून आपल्या पर्वतीय साम्राज्याचा विस्तार केला. या विस्तारित साम्राज्याची तत्कालीन भाषा गोरखाली हीच आजची
नेपाळी होय. ब्रिटिश, चिनी साम्राज्यांना तोंड देत स्वतंत्र नेपाळ हिमालयाच्या कुशीत, सावलीत सुरक्षित आहे. तो त्याच्या अनाक्रमक, अहिंसक, हिंदू धर्माचरणामुळे!

नेपाळी अन्य भाषांप्रमाणे प्राचीन काळी बोली होती. तिचं आद्य लिखित रूप चौदाव्या शतकातलं. अशोक चिल्लाची इसवी सन १३२१ची ब्रान्झ पट्टी उपलब्ध आहे. सर्वात जुना ग्रंथ म्हणून ‘खंड खंड्या’(१६३२)चा उल्लेख होत असला तरी ‘स्वस्थानी भारत कथा’(१६५८), ‘बाज परीक्षा’(१७००)सारखे ग्रंथही उपलब्ध आहेत. परंतु त्यांचे लेखक अज्ञात आहेत. असे असले तरी वर्तमान नेपाळी साहित्याच्या पूर्वखुणा मात्र पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतरच्या(१८५७) काळानंतरच दिसतात. त्यामुळे नेपाळी साहित्याचा इतिहास आहे, अवघ्या शंभर-दीडशे वर्षांचाच!

आधुनिक नेपाळी साहित्याचा प्रारंभ अाद्यकवी भानुभक्तपासून मानला जातो. त्यांनी रामायणाचा नेपाळी अनुवाद केला. भानुभक्तांपूर्वी शुवानंद दास, राधाबल्लभ अर्ज्याल, पृथ्वीनारायण शहा, शक्तिबल्लभ अर्ज्याल, गुमानी पंत यांसारखे कवी नेपाळीत होऊन गेले. पण मान्यता लाभली, ती मात्र भानुभक्तांनाच. त्यांनी रामायणाशिवाय ‘बधु शिक्षा’, ‘भक्तमाला’, ‘राम गीता’ सारखे ग्रंथ रचले. बसंत पध्या ल्युइन्टेल, यदुनाथ पोखरेल, हिन्ब्या
करनी बिद्यापति, ललित त्रिपुरा शुंदरी हे या काळातले अन्य रचनाकार होत. भक्ती आणि शृंगार रसाने भरलेले नेपाळी साहित्य. लेखनाथ पौडेलांनी लिहिलेल्या ‘सुक्ति सिंधु’(१९१७)मधील उत्तान शृंगाराच्या अतिरेकामुळे त्यावर बंदी घालण्यात आली. या घटनेने नेपाळी साहित्याची दिशा बदलली व ते सामाजिक प्रश्नांचं प्रतिबिंब बनलं.

नेपाळी साहित्य आधुनिक बनलं ते अनेक कारणांनी. एक म्हणजे, नेपाळमध्ये राजेशाहीचा विलय होऊन लोकशाही राजवट सुरू झाली. नेपाळमध्ये ‘बुट पॉलिश आंदोलन’, ‘सडक कविता क्रांती’, "अस्वीकृत जमात की कविता’ (दलित काव्य), ‘राल्फ आंदोलन’ अशांमुळे सामाजिक परिवर्तने घडून येऊन साहित्य लेखन नवनव्या विषयांना स्पर्श करत राहिलं. ‘भूक कविता’सारख्या प्रवाहांनी सर्वहारा, वंचित वर्गाच्या व्यथा-वेदनांना वाट करून
दिली. याचा परिणाम भारतीय नेपाळी साहित्यावर पडणं स्वाभाविक होतं.

भारतात नेपाळी भाषेला घटनेच्या आठव्या परिशिष्टातील ‘भारतीय भाषा’ म्हणून मान्यता मिळणं, तिला साहित्य अकादमीने ‘भारतीय भाषा’ म्हणून स्वीकृत करणं, ती राजभाषा बनणं यातून नेपाळी भाषा व साहित्य भारतात गतिमान झालं. तिचा शिक्षणातील प्रवेश व व्यवहारामुळेही नेपाळी भाषा व साहित्यास गती मिळाली. आज जगात व भारतात नेपाळी कविता, कथा, कादंबरी, निबंध, नाटक, समीक्षा, प्रवासवर्णन असं बहुविध लेखन होत
आहे.

समकालीन नेपाळी कविता ही वर्तमान घुसखोरीची प्रतिक्रिया असून नेपाळी कवी अत्यंत संवेदनशील मनाने वर्तमानाचे प्रश्न चित्रित करताना
दिसतात. केदार गुरुंग म्हणतात -
यह तो चरम आधुनिक युग है न!
कोई कुछ भी कर सकता है
करवा सकता है
इसलिए तो, बहुत से लोग
इसी माध्यम से
मेरे चेहरे की बिक्री कर सकते है।
भारतीय नेपाळी कवितेत रामचंद्र गिरी लिखित ‘कर्ण-कुंती’(१९८९) हे महाकाव्य, मोहन ठाकुरींचा काव्यसंग्रह ‘नि:शब्द’(१९९६), जसयोजन ‘प्यासी’चं
‘शांति संदेह’(२००४) यांना असाधारण महत्त्व असून या रचना साहित्य अकादमीने गौरविल्या आहेत.
वास्तववादी लेखन हा नेपाळी कथेचा पाया होय. पुरोगामी आदर्श, यथार्थ मनोविज्ञान, प्रयोगशीलता यामुळे ही कथा वाचकांना साद घालत राहते. शिवकुमार राय लिखित ‘खहरेय’(१९७८), शरद छेत्रींचा कथासंग्रह ‘चक्रव्यूह’(१९८६), सनु लागांचा "मृगतृष्णा', बिक्रम बीर थापांचा ‘बिशौन शताब्दी की मोनालिसा’(१९९९), लखीदेवी सुंदासांचा ‘आहत अनुभूति’(२००१) आणि नंदा हंकीमांचा ‘सत्ताग्रहण’(२०१४) या संग्रहातील कथा म्हणजे आजचे
पर्वतीय भारतीय जीवन. नेपाळी कादंबरीकारांनी नेपाळी समाजास आपल्या रचनांच्या माध्यमातून पारंपरिकतेतून मुक्त केले, असे म्हटले तर ते वावगेही ठरू नये आणि
अतिशयोक्तपूर्णही! आदर्श रामराज्यवादी चरित्रे, जमीनदार, सनातनी, सवर्ण अशा चरित्रांऐवजी कादंबरीकारांनी समकालीन माणसं आपले चरित्र नायक बनवले. या संदर्भात ओकिमा ज्ञानांची ‘सूनाखरी’(१९८१), इंद्र सुंदास लिखित ‘नियति’(१९८३), प्रेम प्रधानांची ‘उदासीन रुखारु’(२००२), भीम दहालांची ‘द्रोह’(२००६)सारख्या कादंब-यांचा दाखला देता येणे शक्य आहे.
लक्ष्मण श्रीमाळांचा नाटक संग्रह ‘कर्फ्यू’(२००७) असो वा मन बहादूर प्रधानांचे प्रवासवर्णन ‘मन का लहर रा रहरहरू’(२०१३) अशांतून नेपाळी साहित्यिक साहित्याच्या सर्व प्रांतात संचार करतात, हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. आज नेपाळी लेखक जगभर पसरलेले आहेत. ते नेपाळच्या टेकड्या आणि तराईतून निसर्गाची अक्षय ऊर्जा जगभर विस्तारत आहेत. पण ते अजून हिमालयाच्या सावलीतून मुक्त झालं नाही. कोणतीही भाषा ज्या मृद‌्गंधातून जन्मते, तिच्या पाऊलखुणांचे संस्कार, प्राचीन पदचिन्हे घेऊनच ती विकसित होत असते. निसर्गाचा परीघ तसाच राहतो. रुंदावतात, फक्त जाणिवांची क्षितिजे. गुरखा रखवालीसाठी जगभर परागंदा होऊन फिरतो आहे; पण आपली नेपाळी टोपी, तुमान, कट्यार त्यानं सोडलेली नाही. विश्वास आणि गुरखा या एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्या देशांच्या अंतर्बाह्य सीमांचे रक्षण करत, एका अर्थाने साहित्य, संस्कृती,सीमांचे रखवाले बनून, हिमालयासारखे अटळ, अभेद्य, अविचल उभे आहेत. म्हणून नेपाळी भाषा आणि साहित्य विकसित असले तरी अभेद्य राहिले
आहे.

drsklawate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...