आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्मफेस्ट: वासनेचा वेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अँड गॉड क्रिएटेड वुमन’ हा सिनेमा २८ नोव्हेंबर १९५६ला फ्रान्समध्ये रिलीज झाला आणि ब्रिजिट बार्डो रातोरात स्टार बनली. अमेरिकेत हा सिनेमा रिलीज व्हायला आणखी एक वर्ष लागलं. तोवर ब्रिजिट बार्डो एक झंझावात बनली होती. सिनेमाच्या पडद्यावरची पहिली निम्फोमॅनिअॅक! तिच्या सिनेमाने अमेरिकन सिनेमातली लैंगिक प्रतिनिधित्वाची व्याख्या बदलली. त्या काळातल्या कडक सेन्सॉरशीपमुळे सिनेमातले शरीरसंबंध दाखवणारे अनेक सीन कापले गेले. तिने साकारलेल्या ज्युलिएट या पात्राच्या लैंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मानसशास्त्राच्या भाषेत अशा या लैंगिकतेला ‘निम्फोमॅनिअॅक’ असे नाव आहे. एखाद्या बाईने असे असणे वगैरे ठीक आहे; पण त्यावर सिनेमा बनताना आणि हे सर्व पडद्यावर दाखवताना बाईच्या लैंगिकतेकडे एकूणच बघण्याचा दृष्टिकोन जागतिक स्तरावर बदलला जाऊ शकतो, तो बीभत्स होऊ शकतो, असं अनेकांचं म्हणणं होतं. यामुळेच अमेरिकेतल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांनी या फ्रेंच सिनेमाला विरोध केला. पोलिसांनी अनेक ठिकाणी सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवलं.

ब्लादिमीर नोबाकोवची ‘लोलिता’ ही कादंबरी याच काळातली. त्यात निम्फोमॅनिअॅक लोलिताचं वय हे साडेबारा वर्षे होतं. ३९ वर्षांचा प्रोफेसर हम्बर्ट हम्बर्ट लोलिताच्या प्रेमात पडतो. तिच्याकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षिला जातो. तिच्या शरीरावर त्याचं प्रेम बसतं आणि त्यानंतर तिच्याशी सेक्स करण्याबद्दल त्याच्या मनात येणारे विचार, त्यातून घडणारं पुढचं कथानक... ‘अँड गॉड क्रिएटेड वुमन’नं निम्फोमॅनिअॅक या शब्दावरून जेवढा वाद तयार केला नव्हता, त्याहून शंभरपटीनं लोलिताचा वाद गाजला. युरोप आणि अमेरिकेत कॅथॉलिक पंथानं या कादंबरीवर बंदी घालण्याची मागणी केली. पण तोवर कादंबरीनं विक्रीचे सर्वच रेकॉर्ड मोडले होते. त्या काळी आपण लोलिता लपून-छपून वाचली, असे सांगणारे अनेक जण सापडतात. ही ब्लादिमीर नोबोकोव या लेखकाला मिळालेली पोचपावतीच म्हणावी लागेल. ‘लोलिता लाइट ऑफ माय लाइफ, माय सीन, माय सोल’ असं म्हणणारा प्रोफेसर हम्बर्ट हम्बर्ट आणि लोलिता पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य स्टॅनली कुबरिक या दिग्दर्शकानं उचललं होतं. यासाठी एमपीएए या अमेरिकेतल्या निर्माता-दिग्दर्शकांच्या सेल्फ सेन्सॉरशीपच्या सील कोडला सामोरं जावं लागलं. या दोन्ही मुख्य पात्रांमध्ये सेक्स सीन सोडा, पण साधा किस सीनही नसावा, या अटीवर सिनेमा बनवण्याची परवानगी देण्यात आली. कुठलाही सेक्शुअल कंटेंट नसलेल्या कुबरिकच्या निम्फेट लोलितालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ‘हाऊ दे कॅन एवर मेक फिल्म ऑन लोलिता’ असा टॅगलाईनच हा सिनेमा बनला आणि तो प्रचंड चाललाही. फ्रान्समधल्या स्त्रीवादी लेखिका सिमॉन द बोहुआर यांनी निम्फोमॅनिअॅक या विषयाला धरून ‘ब्रिजिट बार्डो अँड लोलिता सिन्ड्रोम (१९६०) हे पुस्तक लिहिलं. ‘सेकंड सेक्स’ आणि ‘हिस्ट्री ऑफ सेक्स’ अशी पुस्तकं लिहिलेल्या सिमॉन यांना निम्फोमॅनिअॅक या मानसशास्त्रीय विषयाचं अप्रूप होतं. त्यापेक्षा जास्त आश्चर्य त्याला साहित्य आणि सिनेमा माध्यमातून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाचं होतं.

‘अँड गॉड क्रिएटेड वुमन’ या सिनेमातून जागतिक स्तरावर ब्रिजिट बार्डोची तयार झालेली सेक्स सिम्बॉल ही प्रतिमा आणि निम्फेट म्हणून अगदी नुकत्याच वयात येणा-या साडेबारा वर्षांच्या लोलिताचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन त्यांनी या पुस्तकातून स्पष्ट केला. पहिल्यांदा ब्रिजिट बार्डोला पाहिल्यावर ती सर्वसामान्य बाईसारखीच वाटली. अगदी साधी. तुमच्या-आमच्या घरातली. तरीही तिच्यात काहीतरी खास बात होती. पुरुषांना आकर्षित करण्यासारखं असं सर्व काही होतं. ती पर्फेक्ट निम्फेट होती, असं सिमॉन यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलंय. यानंतर हॉलिवूड आणि जागतिक पातळीवर स्त्रियांची लैंगिकता आणि निम्फोमॅनिअॅक या विषयावर अनेक सिनेमे आले. पण २०१३मध्ये आलेले निम्फोमॅनिअॅक व्हॉल्युम-१ आणि निम्फोमॅनिअॅक व्हॉल्युम-२ हे दोन सिनेमे अलीकडे जास्त चर्चेचा भाग बनले. वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये दोन्ही मिळून सुमारे पाच तासांचे असलेले हे सिनेमे सलग दाखवण्यात आले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

दिग्दर्शक लार्स वॉन टियर यानं निम्फोमॅनिअॅक व्हॉल्युम-१ आणि निम्फोमॅनिअॅक व्हॉल्युम-२ या दोन्ही सिनेमांतून स्त्रीच्या लैंगिकतेची ही बाजू प्रभावी मांडलीय. ती प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून मांडण्यात आलीय. निम्फोमॅनिअॅक ‘जो’ आणि प्रचंड पुस्तकं वाचून जगभरातलं तत्त्वज्ञान कोळून प्यायलेला ‘सेलीग्मन’ या दोन्ही पात्रांमधल्या संवादातून हे दोन्ही सिनेमे पुढे जातात. निम्फोमॅनिया या मानसशास्त्रीय विषयाला हात घालून लैंगिकतेच्या तत्त्वज्ञानाचं नवीन दालन दिग्दर्शक टियर खुलं करून देतो. निम्फोमॅनिअॅक ‘जो’च्या जडणघडणीचा भाग आहे. ‘लव इज द सिक्रेट इन्ग्रीडेंट ऑफ सेक्स’ म्हणजेच प्रेमभावना ही लैंगिक संबंधातला गुप्त घटक आहे, असं म्हणत लैंगिकता ही प्रेमभावनेच्या अगोदरचा नैसर्गिक भाग आहे, असं सांगण्याचं धाडस दिग्दर्शक लार्स वॉन टियरनं केलंय.

सिनेमातलं मुख्य पात्र असलेल्या ‘जो’ला आपण निम्फोमॅनिअॅक असल्याबद्दल अभिमान आहे. ती ते लपवत नाहीए. तिनं आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारलेय आणि म्हणूनच जगानेही आपल्याला तसेच स्वीकारावे, असे ती ठामपणे सांगते. सिनेमात एका ठिकाणी ती म्हणते, ‘काही लोक व्यसनाधीन लोकांना दोष देतात, अनेकांना त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. पण माझी व्यसनाधीनता वासनेतून तयार झालेली आहे, गरजेतून नाही. या वासनेतून माझ्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी बिघडल्यात’, असं म्हणणा-या ‘जो’चा हा निम्फोमॅनिअॅक बनण्याचा प्रवास पहिल्या भागात दाखवण्यात आलाय. दुस-या भागात म्हणजे दिग्दर्शक लार्स वॉन टियरनं सेक्स, निम्फोमॅनिया आणि कॅथॉलिक पंथाचा त्याबद्दलचा अाध्यात्मिक दृष्टिकोन यावर भर दिलाय. जोहान सिबास्थिन बाक आणि लुत्विथ वन बिथोवन या दोन कंपोजरच्या कंपोजिशन आणि निम्फोमॅनिया यांचा संबंध साधण्याचा प्रयत्नही केलाय. बाकच्या पोलीफोनीचा आणि निम्फोमॅनिअॅक सेक्सचा थेट संबंध कसा आहे, हे सिनेमातून ठोस दाखवलं गेलंय, हे विशेष.
narendrabandabe@gmail.com
बातम्या आणखी आहेत...