आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डौलदार आणि निरागस...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तम विनोद वाचणे हा दिवसाची चांगली सुरुवात करण्याचा मार्ग आहे. अनेक जण दिवसाची सुरुवात पूजाअर्चा, स्तोत्र, प्रार्थना यांनी करतात. मी बर्‍याचदा वुडहाऊस वाचतो. पी. जी. वुडहाउस हा चांगला विरंगुळा आहे. ताणतणाव दूर करायला किंवा मूड बदलायला वुडहाऊसइतका सुंदर लेखक नाही. पी. जी. वूडहाऊसने आपल्या पात्रांचे एक वेगळे जग तयार केले. जीव्हज आणि बर्टी वूस्टर, लॉर्ड एम्सवर्थ, डॉ. सॅली, गोष्टी सांगणारे मिस्टर मलीनर आणि त्यांचे अनेक नातेवाईक, अंकल फ्रेड अशा निरागस पात्रांची दुनियाच त्याने साकारली. त्याच्या जीव्हज असलेल्या कथा-कादंबर्‍यांची सुरुवात कपड्यांबद्दलच्या मतभेदाने होते. अमुक टाय वापरू नये, तमुक सूट वापरू नये, यासारख्या भांडणाने सुरुवात झाली तरी शेवटी बर्टी वूस्टरला जीव्हजचेच म्हणणे ऐकावे लागते. कारण त्याच्यावर ओढवलेले संकट जीव्हजने दूर केलेले असते. ही संकटेही विचित्र असतात. कधी बर्टीला नात्यातल्या व्रात्य मुलाला सांभाळायचे असते, तर कधी कुणाचा प्रेमभंग घडवून आणायचा असतो; कधी कुणाला धडा शिकवायचा असतो, तर कधी कोणाचे हृदयपरिवर्तन करायचे असते.
वुडहाऊसचा जन्म 1881चा. काही काळ त्याने बँकेत नोकरी केली आणि छोट्या मुलांच्या मासिकासाठी कथा लिहिल्या. वयाच्या तिशीपर्यंत तो लेखक म्हणून प्रस्थापित झाला. पण ‘समथिंग फ्रेश’ या कादंबरीमधून त्यांना त्यांची आजची शैली गवसली, असे म्हणता येईल. हे पुस्तक 1913मध्ये प्रसिद्ध झाले. वुडहाऊसचे ‘द इनिमिटेबल जीव्हज’ हे पुस्तक जीव्हज आणि बर्टी वूस्टर नायक असलेले पुस्तक 1923 मध्ये प्रकाशित झाले आणि हे दोघेही नायक आज 90 वर्षांनंतरही लोकप्रिय आहेत. वुडहाऊसच्या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पात्रे निरागस आणि साधी असतात. त्याच्या कथा-कादंबर्‍यांचे प्लॉट या विचित्र समस्यांनी भरलेले आहेत. ‘बॅचलर अनॉनॉमस’ या कादंबरीत दोन धनाढ्य मित्र पैज लावतात. जो आधी लग्न करेल तो पैज हरला. ‘डॉक्टर सली’ या कादंबरीत नायक सलीच्या प्रेमात पडतो, जिला हा श्रीमंत, आळशी आणि वडिलोपार्जित संपत्तीवर मौज करणारा नायक अजिबात आवडत नसतो. तिचा सहवास लाभावा म्हणून तो तिला चक्क व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून बोलावतो. त्याचा कट लक्षात आल्यावर ती त्याची कानउघाडणी करते आणि कायमचा नकार देते. ती निघण्याच्या तयारीत असताना तो आपल्या कामाला लागतो आणि तिच्या लक्षात येते की त्याची अवाढव्य शेती, गुरे, खूप गडी या सर्वांचे व्यवस्थापनाचे प्रचंड काम तो करत असतो. मग तिचे हृदयपरिवर्तन होते.
वुडहाऊस आपल्या संगीतिकांसाठी (म्युझिकल्ससाठी) प्रसिद्ध होता. गाय बोल्टन या लेखकाबरोबर मिळून त्याने अनेक संगीतिका लिहिल्या. ब्रॉडवेवर त्याच्या एकाच वेळी पाच संगीतिका चालू असत. आपल्याकडे वुडहाऊसच्या कथा ‘मोहिनी’ मासिकातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या. अगदी जीव्हजच्या आणि गोल्फच्या कथाही. ‘साहित्य संस्कृती मंडळ’ या नावाने
व. ह. गोळे यांनी वुडहाऊस कथांचा एक संग्रह प्रसिद्ध केला आहे. कुमुदिनी रांगणेकर यांनीही काही कादंबर्‍यांचा अनुवाद केला होता. गोल्फचे नियम माहीत नसले तरी त्याच्या गोल्फकथांचा आस्वाद घेता येतो. त्याच्या प्रेमकथांमध्ये नायकाला एखादी विचित्र अशी अट पूर्ण करावी लागे. प्रामुख्याने मलीनरच्या कथांमध्ये हे आढळते. ब्लांडिंग कॅसल संग्रहातली
‘पिगहुऽऽऽई’ ही कथा घ्या. यातील लॉर्ड एम्स्वर्थच्या पुतणीला अँजेलाला ठरलेले लग्न मोडून अमेरिकेहून परत आलेल्या जेम्सशी लग्न करायचे आहे. एम्सवर्थ ठाम नकार देतात. पण त्यांचा आवडता पाळीव पिग जेवत नसतो. त्याला विशिष्ट प्रकारे
हाक मारल्यावर तो जेवेल, असे जेम्स त्यांना सांगतो आणि तशी हाक मारून दाखवतो. लॉर्ड जेम्सवर खुश होतात आणि त्यांचा प्रेमाला असलेला विरोध मावळतो. आपल्याकडच्या ‘जाने तू या जाने ना’सारख्या सिनेमावर वुडहाऊसच्या स्कूलचा प्रभाव
दिसतो. अनेकदा तो प्लॉट लेखक मित्रांकडून विकत घेई. वुडहाऊस 93 वर्षे जगला आणि त्याने 80-90 कादंबर्‍या लिहिल्या. शेकडो कथा लिहिल्या. अनेक संगीतिका आणि नाटकांचे लेखन केले. इंग्रजी भाषेचा सारा लवचिकपणा आणि डौल त्याच्या लेखनात दिसतो. वुडहाऊसच्या लेखनाइतकेच त्याचे व्यक्तिमत्त्व निखळ आणि निर्मळ होते. त्याला जर्मनांनी अटक केली. गोबेल्सने चतुरपणे त्याला जर्मन रेडिओवर भाषणे करायला लावली आणि ब्रिटिश लोक आपल्या आवडत्या लेखकाचा द्वेष करू लागले. (यामुळेच बहुधा तो अमेरिकेत स्थायिक झाला) पण कडवटपणा त्याला शिवला नाही. ‘वुडहाऊस ऑन वुडहाऊस’ या पुस्तकात त्याची आत्मचरित्रपर तीन पुस्तके एकत्र केली आहेत. तीसुद्धा त्याच्या कथा-कादंबरीइतकीच रंजक आहेत. पॅरिस रिव्ह्यूमधील त्याची मुलाखत वाचताना जाणवते की त्याच्या पात्रांसारखा तोही निरंतर आनंदात असे.
shashibooks@gmail.com