Home »Magazine »Rasik» Article On Parshi Community

...आणि पारशी एकजीव झाले

लीला आवटे | Jan 05, 2013, 21:22 PM IST

  • ...आणि पारशी एकजीव झाले

इराण ही पारशांची मातृभूमी. काही शतके इराणवर पारशी राजांची सत्ता होती; परंतु इ.स. 636 आणि 641मध्ये कदेसिया आणि नेहवांद येथील लढायांत अरबांचा विजय झाला. इराणवर अरबांची सत्ता आली. कट्टर इस्लामवाद्यांच्या अमलात पारशांचा धार्मिक छळ सुरू झाला. कित्येक पारशी कुटुंबे इराणचा त्याग करून अन्य देशांत स्थलांतर करू लागली. याच क्रमात काही पारशी कुटुंबांनी ठाणे, भडोच (गुजरात) वगैरे ठिकाणी कायम वास्तव्य केले.
इ.स. 700 पासून ख-या अर्थाने पारशी भारतात येऊ लागले. त्यांनी प्रथम गुजरातच्या किना-यावरील संजाण येथे वसाहत केली. त्या वेळी संजाणमध्ये जाधव राणाच्या दरबारात हजर झालेल्या एका पारशी धर्मप्रमुखाने उपस्थितांना उद्देशून म्हटले की, या दुधाने भरलेल्या भांड्यात मी हे नाणे टाकत आहे; जे तुम्हाला दिसत नाही. आम्हीदेखील तुमच्यात असेच समरस होऊन जाऊ. त्यानंतर लगेच त्याने त्या दुधात साखर टाकली. म्हणाला, ‘या साखरेने दूध गोड झाले आहे. आम्हीदेखील इथल्या जीवनात अशीच गोडी निर्माण करू .’
संजाणनंतर खंबायत, वारियाव, ठाणे, भडोच, नवसारी, मुंबई, पुढे 19व्या शतकाच्या प्रारंभी पुणे वगैरे ठिकाणी पारशांनी वास्तव्य केले. अगदी प्रारंभापासूनच देशाच्या एकूण लोकसंख्येत पारशी लोकांची संख्या अगदीच कमी; परंतु या समाजाने निरनिराळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. भारत हाच आपला देश मानला. भारतात राहणा-या लोकांचे बंधुप्रेम संपादन केले आणि याच आत्मीयतेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. इतकेच नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वही केले. त्यात अग्रणी होते दादाभाई नौरोजी. दादाभाई हे काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांना राष्ट्रीय चळवळीचे प्रणेते (ग्रँड ओल्ड मॅन) असे म्हणतात. 1886, 1893 आणि 1906मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांना अर्थशास्त्राची उत्तम जाण होती. ‘पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया’ या आपल्या ग्रंथात ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या साधनसंपत्तीची लूट कशी चालवली आहे आणि लक्षावधी रुपये हिंदुस्थानातून दरवर्षी ते कसे घेऊन जात आहेत; त्याच वेळी दारिद्र्यात पिचणा-या हिंदी लोकांच्या बाबतीत ते कसे अमानुष क्रौर्याने वागत आहेत, हे त्यांनी आकडेवारीनिशी दाखवून दिले. एका दृष्टीने आर्थिक राष्ट्रवादाचे ते जनक होते.
दादाभाई नौरोजींनंतर काँग्रेसच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण वाटा उचलला, तो फेरोजशहा मेहेता यांनी. दादाभार्इंना ते गुरुस्थानी मानत. स्वत:ला आलेल्या अनुभवातून ब्रिटिशांच्या कारभाराचा फोलपणा त्यांना जाणवला आणि 1878च्या शस्त्रबंदीचा कायदा बदलला पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडली. 1893मध्ये प्रथमच हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या. मुंबई, येवला, मालेगाव, बेळगाव येथे दंगलीचे लोण पसरले. तेव्हा लोकमान्य टिळकांचे प्रयत्न होते, फक्त हिंदूंची निषेध सभा घेण्याचे. न्यायमूर्ती रानडे आणि फेरोजशहा मेहेतांचे प्रयत्न होते, हिंदू-मुस्लिमांची एकत्रित सभा घेऊन जातीय सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे. टिळकांनी 10 सप्टेंबरपर्यंत थांबायचे कबूल केले. 10 सप्टेंबरला पुण्याला केवळ हिंदूंची मोठी सभा भरवण्यात आली. नेमस्त आणि जहाल मतप्रवाहांची ही पहिली टक्कर होती.
टिळक आणि मेहेतांचे राजकीय मतभेद तीव्र असले तरी 1915च्या नोव्हेंबरमध्ये फेरोजशहांच्या मृत्यूनंतर ‘केसरी’तील लेखात टिळकांनी नोकरशाहीवरील फेरोजशहांनी केलेल्या निर्भय टीकेची मुक्तकंठाने प्रशंसा करताना म्हटले की, ‘फेरोजशहांचा निडरपणा, स्वातंत्र्यावरील प्रेम, नागरिकांच्या हक्कांसाठी लढण्याची जिद्द वादातीत आहे.’ एकूणच, फेरोजशहांच्या राजकीय सच्चेपणाविषयी टिळकांना आदर होता.
के. एफ. नरिमन हे स्वातंत्र्यपूर्व काळातील पारशी समाजातील प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. कायद्याचा अभ्यास करण्यास ते पुण्याहून मुंबईला आले. वकील झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. ते स्वत:ला झोरोअ‍ॅस्ट्रियन महाराष्ट्रीयन म्हणत. ते लोकमान्यांना गुरू मानत. त्यांना नेमस्तांचे राजकारण पटले नाही. गांधीजींच्या काळात त्यांनी चित्तरंजन दास-मोतीलाल नेहरूंच्या काँग्रेस स्वराज्य पार्टीत प्रवेश केला. गांधी-जवाहर-पटेल वगैरे कायदे कौन्सिलबाहेर चळवळ करू पाहत; तर स्वराज पार्टीवाले प्रांतिक आणि केंद्रीय कायदेमंडळात राहून सरकारला विरोध करत. मुंबई कायदेमंडळाचे सभासद या नात्याने त्यांनी सरकारच्या विकास खात्यातील भ्रष्टाचारावर नेमके बोट ठेवले. त्यांच्या मागणीप्रमाणे चौकशी करण्यात आली. नरिमनवर बदनामीचा खटला भरला. सरकार विरुद्ध नरिमन असा हा न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष होता. नरिमन त्यात विजयी झाले. प्रांतिक कायदेमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर के. एफ. नरिमन यांनी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात 1930मध्ये भाग घेतला. त्यांना दोन वर्षांचा कारावास घडला. गांधींच्या आदेशाप्रमाणे आठ वर्षे त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला नाही. परिणामी आठ वर्षे आर्थिक प्रश्नांना तोंड देत राहिले. 1934मध्ये केंद्रीय विधानसभेसाठी नरिमन यांनी निवडणूक लढवली नाही. ते राजकीय विजनवासात गेले. प्रयत्न करूनही त्यांना पुन्हा प्रकाशझोतात येता आले नाही.
त्या काळात होमी मोदी स्वत: नावाजलेले वकील होते; परंतु वकील सी. एन. वाडिया यांच्याशी भागीदारी करून कापड-गिरण्यांच्या व्यापात ते पडले. केंद्रीय कायदेमंडळात ते मिल मालकांच्या मतदारसंघातून निवडूनही गेले. उद्योजक म्हणून प्रस्थापित होत असतानाच त्यांचा राजकारणाकडेही ओढा होता. 1943च्या नोव्हेंबरमध्ये म. गांधी व काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांची ताबडतोब मुक्तता करा, असे आवाहन मोदी यांनी व्हाइसरॉयला केले. क्रिप्स मिशनच्या योजनेप्रमाणे राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, असेही त्यांचे मत होते. ते मुंबईचे राज्यपालही झाले. 1948मध्ये त्यांची संविधान समितीवर निवड झाली आणि अल्पसंख्याक उपसमितीवरही त्यांना घेण्यात आले. त्या काळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात निरोधन, परदेशी कपड्यांची होळी वगैरे कार्यक्रमात शेकडो स्त्रियांनी भाग घेतला; त्यात पारशी भगिनीही मागे नव्हत्या. त्यात गोशी बेन, पेरिनबेन आणि खुर्शीदबेन या तिन्ही बहिणी अग्रभागी होत्या. मिथुबे पेटीट या तर खेड्यापाड्यांत स्वयंसेविकांचे पथक घेऊन जात आणि चरखा, सूतकताई, दारूगुत्त्यावर निरोधन वगैरे कार्यक्रमाचा प्रचार करत. त्यांना लोक प्रेमाने ‘माँजी’ म्हणत.
परोपकार हा पारशी समाजात खोलवर रुजलेला गुण आहे. या गुणाचे दर्शन जमशेद मेहतांच्या रूपाने समाजाला त्या काळात घडले होते. जमशेदजी फाळणीपूर्व हिंदुस्थानात कराचीचे 13 वर्षे महापौर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कराची सर्वात स्वच्छ शहर म्हणून नावाजले गेले. जात, धर्म, तत्त्वज्ञान कसलाही भेद न करता ते गरजू लोकांना सढळ हाताने मदत करत. त्यांची भूतदया आणि परोपकारी वृत्ती इतकी सर्वमान्य झालेली होती की 7-1-1986 या जन्मशताब्दीनिमित्त पाकिस्तान इस्लामिक राज्य असूनही तेथे त्यांच्या नावे पोस्टाचे तिकीट काढण्यात आले. पाकिस्तानच नव्हे, तर अन्य इस्लामिक राज्यांनीही जमशेद मेहता या गैरमुस्लिम पारशी दानशूराचा पुढे उचित सन्मान केला. एकूणच, राष्ट्रीय चळवळीच्या स्थापनेपासून पारशी समाजाने योगदान दिले आहे. मग स्थानिक स्वराज्य राबवणे हा स्वातंत्र्य भावनेचा आविष्कार होय, या भावनेने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य असो वा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळी असोत किंवा सशस्त्र क्रांतियुद्धाचा मार्ग असो; सर्वच प्रकारच्या कार्यात पारशी समाजाने मोलाचा सहभाग देऊन भारताशी असलेल्या नात्यांची पाळेमुळे घट्ट रुजवली.

लोककल्याणकारी समाज
पारशांमधील सत्यप्रेम, लोककल्याणाची तळमळ आणि समाजोपयोगी कामांसाठी सढळ हस्ते देणग्या देणे ही या समुदायाची खास वैशिष्ट्ये आहेत. सर्वच पारशी श्रीमंत आहेत, असे नव्हे. 1864च्या अहवालाप्रमाणे मुंबईत तेव्हा केवळ 50,000 पारशी होते. त्यातील बहुसंख्य मध्यमवर्गीय होते. त्यातील 90 टक्के लोक व्यापार, अर्थव्यवहार, स्थावर मालमत्तेचे व्यवहार, जमाखर्च, लाकूड आणि धर्मगुरू या क्षेत्रांत गुंतलेले होते. पारशी केवळ व्यापार, उद्योग करतात असेही नाही. 1974च्या गणनेनुसार 10 टक्के पारशी कुटुंबे कारखानदारीत होती, तर 80 टक्के लोक वैद्यकीय क्षेत्र, वकिली व्यवसाय, पत्रकारिता व अन्य सेवा क्षेत्रे यांत गुंतलेले होते.
(लेखिका या ज्येष्ठ शिक्षिका, मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या ‘जाग मना जाग’ या ग्रंथास महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे.)

Next Article

Recommended