आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैं तो बैठा यादो पुरानी में खोया...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्यांनी दार उघडले आणि आपल्या लेखनाच्या खोलीत बसायला लावत पाणी आणण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात गेले. तोवर लेखक-दिग्दर्शक, गीतकार, गायक, अभिनेता अशी बहुरंगी ओळख असलेल्या पीयूष मिश्रा यांचे घर म्हणजे नेमके काय, याचा अदमास घेणे सुरू होते. भिंतीवर मिश्रांच्या अभिनयमुद्रांचं दर्शन घडवणा-या फोटोफ्रेम, सोफ्यापलीकडल्या
मेजावर त्यांची स्वत: लिहिलेली पुस्तके, पॅडला लावलेली वा-याने फडफडणारी काही अर्धवट कोरी पाने, आणि मागील खिडकीतून येणारा स्वच्छ प्रकाश... एकंदरीत कलंदर कलावंताचा आवास असल्याच्या खुणा लक्ष वेधून घेत होत्या.
तेवढ्यात पाण्याचा ग्लास पुढ्यात ठेवत मिश्रा एका जागी बसले. त्यांच्या उजव्या अंगाला असलेला हार्मोनियम त्यांनी नुकताच रियाज केल्याची साक्ष देत होता.
‘जैसे हरएक बात पे डेमोक्रेसी मे लगाने लग गयो बन
जैसे दूर देस के टॉवर में घुस जाये रे एरोप्लेन’
‘गुलाल’ चित्रपटातल्या ‘राणाजी म्हारे’ या गीतामधल्या या ओळी. प्रादेशिक परिस्थितीसुद्धा जागतिकीकरणाच्या रेट्यात बदलायला लागलीय, हे यासारख्या गाण्यांमधून मिश्रा यांनी अचूक हेरले होते. इतकी कमालीची संवेदनशीलता, सामाजिक जाणीव एकीकडे; व दुसरीकडे एखाद्यासाठी झोकून द्यायचे वा पार एखाद्यापासून अलिप्त व्हायचे, जगाशी कधी ‘तशरीफ’से
संवाद साधायचा, तर कधी काेशात जात समाजावर लेखनातून भाष्य करायचे, हा मिश्रा यांचा स्वभाव. एकंदर हा माणूस अजब रसायन आहे. एकेकाळी दारू रिचवल्याशिवाय जगू न शकणा-या या माणसाची नशा आता टेबलावरची पुस्तके, हार्मोनियम, लेखणी आणि बोटे एखाद्या तंतुवाद्यावर फिरवल्यासारखी करत सतत गुणगुणणे यात सामावलीय, हे
जाणवायला वेळ लागत नाही. मनामध्ये अखंड विचार सुरू असताना सहज काही तरी पुटपुटले जावे, तसा त्यांचा सुरुवातीचा आवाज असतो गाताना. याच शैलीत मिश्रा आपली एनएसडीतली आणि दिल्लीतली वीस वर्षे उलगडत जातात.
फ्रिट्झ बेनविट‌्झ (Fritz Bennewitz) या त्यांच्या एनएसडीत शिकवणा-या आवडत्या गुरूंचा फोटो सोफ्यालगतच्या भिंतीवर फ्रेम करून लावलेला असतो. बेनविट‌्झ यांनी ‘हॅम्लेट’ अत्यंत वेगळ्या नजरेतून दाखवलं, आमच्याकडून ते करवून घेतलं. एकच संहिता पण त्याकडे बघण्याचा विविधांगी दृष्टिकोन बेनविट‌्झ यांनी दिला.’ मिश्रा हे सगळे सांगत जरी होते तरी त्यांच्या सांगण्यापेक्षा ती बोलकी भिंतच सारं काही सांगू पाहात होती. खरे तर ‘अरे रुक जा रे बंदे’सारखं ब्लॅक फ्रायडेमधलं त्यांनी लिहिलेलं गाणं अजूनही लक्षात राहणारं. मिश्रा यांना त्या चित्रपटातला आपला रोल कापला गेल्याची फिकीर नाही. ना आपण मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केल्याची खंत. ‘गँग्ज ऑफ वास्सेपुर’मधील नसीर वा ‘मकबूल’मधील ‘काका’ कायमचे लक्षात राहतील, अशा भूमिका केल्यानंतर मिश्रा यांनी मुळात आपल्या भूमिकांची संख्या
मोजावीच कशाला. ‘मी खरे तर अभिनयापेक्षा जगणे शिकत होतो. एनएसडीतून मी बाहेर पडलो त्या वेळी अॅक्ट वन थिएटरमध्ये मी, मनोज वाजपेयी, विशाल भारद्वाज अशी मंडळी काम करत होतो. एनएसडीचा परिसरदेखील अभिनयाच्या प्रशिक्षणाइतकाच आमच्यात भिनला असला तरी केवळ एनएसडीपुरती मला माझी रंगभूमी सीमित ठेवायची नव्हती. ‘अॅक्ट वन थिएटर’मध्ये काम करत असताना आम्ही तत्कालीन सामाजिक-राजकीय विषय हाती घ्यायचो, त्यावर लिहायचो.’ मिश्रा बोलता बोलता गतकाळातल्या आठवणींमध्ये रमले हाेते.
‘अॅक्ट वन थिएटरमध्ये काम करत असतानाच सतरा-एक वर्षांपूर्वी मी ‘पत्ते अनारां दे’ नाटक लिहीत होतो.
भारत-पाकिस्तानच्या फाळणीची गडद पार्श्वभूमी असलेले ते नाटक होते. लाहोरमधील अनाराच्या झाडाखाली लहानपणापासून अनेक क्षण एकत्र घालवलेल्या अकरा मुली तारुण्यात येतात, तेव्हा आपल्या राजकुमाराची स्वप्ने स्वाभाविकपणे रंगवत असतात. त्यातील हुस्ना नावाची एक तरुणी तिचा प्रियकर जावेदबरोबर आपले भावी आयुष्य रंगवण्यात रंगून गेलेली असते. फाळणी होते नि सगळ्या मुली कुठल्या कुठे पांगतात. तिचा प्रियकर भारतात जातो, पण हुस्ना मात्र पाकिस्तानातच अडकते. काही काळ लोटतो, प्रियकराचे लग्न होते. हुस्ना मात्र अद्याप अविवाहितच असते.
अस्वस्थ प्रियकर तिला पत्र लिहितो,
‘मैं तो हूँ बैठा ओ हुस्ना मेरी यादो पुरानी में खोया
पल पल को गिनता पल पल को चुनता
बीती कहानी में खोया
पत्ते जब झडते हिंदोस्ता में
यादे तुम्हारी बोले...’
स्वत:शी संवाद साधत असल्यासारख्या या ओळी गाता गाता मिश्रा थांबले... पेशावर येथे अलीकडेच झालेल्या लहान मुलांच्या हत्येची वेदना त्यांच्या आवाजात उतरली. ‘पार्टिशन का दुख गले से अभी तक नहीं उतरा तो ये पेशावर का हत्याकांड हुआ... हम रो रहे थे जब टेलिविजनपर मासूम बच्चों की चीखे, उनका आक्रोश दिखा रहें थे... मासुमियत भी
नहीं बक्षी इन लोगों ने मजहब के नाम पे।’ एक कलाकार म्हणून हुस्नासारखे गाणे लिहिले खरे; पण माणूस म्हणून गोठवून टाकणारा भवतालचा हिंसक अनुभव अनेकदा नि:शब्द करतो, तशी मिश्रा यांची अवस्था झाली होती. बोलता बोलता मिश्रा उठतात, आपल्या टेबलवरील ‘मेरे मंच की सरगम’ आणि ‘जब शहर हमारा सोता है’ ही पुस्तके हलकेच उचलतात, ‘कोई किताब माँगता है तो मेरे करिअर की सफलता मुझे मिल गयी ऐसे लगता है’ असे सांगत साहित्यावरचे
प्रेम व्यक्त करीत आपल्या पुढ्यात ठेवतात. त्यावर स्वत:ची स्वाक्षरी करत सुपूर्द करतात. पुन्हा त्यांच्या ओठी त्याच ओळी असतात, ‘हुस्ना’च्या... ‘लाहोर के उस पहले जिले के दो परगना में पहुंचे...’ मनानं तोवर लाहोर व दिल्लीपर्यंतचा प्रवास करायला सुरुवात केलेली असते... मिश्रा यांच्या गाण्याची नि आवाजाची हीच खरी ताकद असते...
dahalepriyanka28@gmail.com