आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिशाची फॅशन का बरं नाही?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२७ सप्टेंबरच्या मधुरिमामध्ये मृण्मयी रानडे यांचा ‘एक खिसा घ्या शिवुनि’ हा लेख वाचला. पूर्णपणे दुर्लक्षित अशा अतिमहत्त्वाच्या विषयाला या लेखात हात घातला आहे. अभिनंदन.
मी लहानपणापासून आतापर्यंत माझ्या सर्व कपड्यांना (जीन्स सोडून) खिसा शिवून घेते. लहानपणी आई मला मुलांचे कपडे घालायची, त्याला खिसा असे. शाळेत जायला लागल्यावर शाळेचा गणवेश व इतर कपड्यांना दोन खिसे आई शिवून घ्यायची. पण आठवीला मुली खिसा पाहून हसायच्या. त्यांच्या मते, लहान मुलींच्या कपड्यांनाच खिसा असतो. म्हणून मी नववीला गेल्यावर कोणत्याच ड्रेसला खिसा शिवला नाही. त्या वर्षी आमची सहल अंजिठा लेणीला गेली. मीही इतर मुलींप्रमाणे आईच्या बटव्यात पैसे ठेवून तो खाऊच्या डब्याच्या पिशवीत ठेवला. पण नेमके बटव्यातले पैसे चोरीला गेल्याने सहलीच्या सर्व आनंदावरच पाणी फिरले. तेव्हापासून माझ्या गरजेच्या सर्व महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी माझा हक्काचा खिसा प्रत्येक कपड्याला मी स्वत: शिवून घेते. नंतर कॉलजला गेल्यावर काही मुली माझ्या आधुनिक टॉपला, सलवारला पाहून म्हणायच्या, ‘खिसा’ शेंगदाणे फुटाणे लपवून खाण्यासाठी की कॉपी लपवण्यासाठी केला आहे? कधी कधी खूप टिंगल व्हायची, खिशाची लाज वाटायची, पण मी खिसा कधीही सोडला नाही.

माझ्या आजीच्या (आईची आई) लुगड्याच्या खोचणीत एक छोटी कापडी खास कप्प्यांची रंगीत पिशवी २४ तास खोचलेली असायची. सर्व आवश्यक सटरफटर वस्तू त्यात असायच्या. अगदी शेतात गेल्यावर जखम झाल्यास किंवा काही चावल्यास औषधी जडीबुडी, फळे वगैरे कापायला छोटी सुरी, काटा मोडला तर, कानात किडा गेला तर काटा चिमटा, कानकोरणं, तेल, सुई, दोरा, आगपेटी, अगदी काहीही गरज पडली की, आजीच्या बटव्यात ते हात घालताच मिळायचं. तो बटवा म्हणजे जादूचा होता, माझ्या आजीचा खिसाच जणू. त्या काळातील प्रत्येक स्त्रीकडे अशी खिसारूपी पिशवी असायचीच. पण असा उपयुक्त ‘आजीचा खिसा’ माझ्या आई-मावश्यांनीच काय पण इतर स्त्रियांनीही कदाचित जुन्या (फॅशनचा) पद्धतीचा असेल म्हणून स्वीकारला नाही. व त्या साडीच्या खोचणीत, साडीच्या पदरात बांधून, किंवा ब्लाउजमध्ये असुरक्षितपणे पैसे, मोबाइल वगैरे ठेवतात; तर मोठ्या वस्तूंसाठी पर्सचं लोढणं असतंच टांगलेलं. मग पैसे चुकून पडले, चोरीला गेले की ओरडत व रडत बसतात. यात चूक स्त्रियांची नाही, पुरुषांची आहे, असे म्हणता येणार नाही. कारण स्त्रियाच कपड्यांना खिसा शिवत नाहीत व माझ्यासारख्या एखादीने खिसा शिवला तरी सर्व गटातील स्त्रिया-मुली खिसा पाहून गमतीने हसतात. पण खिशाची उपयुक्तता कोणीही डोळे उघडे ठेवून पाहात नाही. हो, पण जर एखाद्या स्टारने एखाद्या चित्रपटात खिसा असलेला सलवार-कमीज घातला वा साडी नेसली तर कदाचित स्त्रिया-मुली फॅशन म्हणून तरी आपल्या साडी-ड्रेसला खिसा शिवतील, ही अपेक्षा आपण करू शकतो. पण अशी खोटी अपेक्षा करण्यापेक्षा आपणच एक नवीन ‘फॅशन’ काढून आपल्या वस्तू सुरक्षित राहण्यासाठी साड्या, ब्लाउज व इतर कपड्यांना ‘खिसा’ तयार करून घेतला पाहिजे. इतर स्त्रियांचाच थोडा विरोध, टिंगल, हशा पत्करून थोडी लाज वाटली तरी ती सोडून नवीन सुरुवात, नवी पद्धत सुरू करावी. सुरुवात कुणाला तरी करावीच लागते. मी ती सुरुवात केली आहेच.

arunananaware55@gmail.com
बातम्या आणखी आहेत...