आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Poem By Heramb Kulkarni, Divya Marathi

कविता शिक्षणाची: नव्हता मला वेळ तेव्हा....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसभर हात काम करीत होते तेव्हा
तुझ्याशी खेळायला वेळ नव्हता जेव्हा
छोटे खेळ खेळायला सांगितलेस जेव्हा
नव्हता मला वेळ तेव्हा....
धुणी भांडी शिवण स्वयंपाक
जात होता यातच वेळ
गोष्टींचे सुंदर पुस्तक घेऊन आलीस तेव्हा
मी म्हटले ‘परत कधी तरी’...तेव्हा...
रात्री झोपण्याकरिता तुला थोपटत होते
प्रार्थना ऐकता ऐकता दिवा मालवत होते
हलक्या पावलांनी खोलीचे दार लावत होते जेव्हा
आता वाटते थोडा वेळ तेथेच थांबले तर
बरे झाले असते....तेव्हा...
वर्षे उलटली काळ भरभर सरकत गेला
आणि माझ्या कळीचा संसार उमलला
तू माझ्याजवळ आणि मी तुझ्याजवळ नाही
तुझ्या गुजगोष्टी सांगायला तू पण जवळ नाही
आता नाहीत ती गोष्टीची पुस्तके
नाहीत तुझे ते भातुकलीचे खेळ
नाहीत ऐकण्याकरिता त्या तुझ्या गोड सायंप्रार्थना
आणि नाहीत तुझे ते मधुर आवाज किलबिलाटासह...
आता मी थकले माझे हात देखील क्लांत झाले आहेत
दिवस खूप मोठे वाटताहेत....
आणि मनात एकच खंत सतत
तेव्हा तुला मी थोडा वेळ दिला असता तर...
तर...बरे झाले असते...
शिक्षणाच्या कवितेत घरातल्या शिक्षणाची ही एक सुंदर कविता आहे. ही मूळ इंग्रजी कविता, मराठीत आलीय. कवी माहीत नाही. जळगावच्या शिक्षणप्रेमी चंद्रकांत भंडारींनी पाठवली आहे. पालक म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी आपण काय करायला हवे होते हे सांगणारी ही कविता. कोणत्याही पालकाच्या मनात आपण हे केले नाही याची अपराधी भावना मनात निर्माण करणारी ही कविता. या कवितेची ताकदच मुळात ही आहे की, कोणत्याही पालकात ती मुलाला आपण वेळ दिला नाही, त्याचे कुटुंबातील शिक्षण आपण केले नाही याची बोच निर्माण करते आणि तसे करायला हवे याबाबत सजगता निर्माण करते.


शिक्षण म्हणजे केवळ जे शाळेत होते तितकेच नसते. शिक्षण हे शाळा सोडून घरातसुद्धा सुरूच असते. पालकांना वाटते आपण चांगली शाळा निवडली. मुलांना शिकवणी लावली की मुलांचे शिक्षण होईल असे वाटत राहते, परंतु पालकांनी मुलांनी वेळ देण्यातून जितके चांगले शिक्षण होते तितके कशानेच चांगले शिक्षण होत नाही. मुलांचे चांगले शिक्षण व्हायला मुलांना प्रेम फक्त हवे असते. पालकांचा सहवास हवा असतो. पालक ती उणीव वस्तूंचा मारा करून करून भरून काढतात. त्यांना वाटते की ते केले की झाले, परंतु तसे नसते. मुलाचे कुटुंबासोबत शिक्षण होणे गरजेचे असते. हे शिक्षण अनौपचारिक असते. शाळा आणि घर यांनी एकत्र येऊन शिक्षण करायचे असते. त्यांच्यात एक अन्योन्यसंबंध आहे. विनोबा भावे म्हणतात त्याप्रमाणे ‘शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत गेले पाहिजे’ पण पालक म्हणून आम्ही इतके आत्मकेंद्रित झालो आहोत की, आम्हाला आमच्या मुलांच्या भावविश्वाची जाण नाही. मुले आमच्या सहवासाला भुकेली आहेत, पण आम्ही मात्र तो न देता मुलांवर वस्तूंचा मारा करत राहतो.


फक्त ऐकलेली एक गोष्ट आठवते. एका मॅनेजरला 48000 रुपये पगार असतो. तो घरी आला तरी ऑफिसचेच काम करत राहतो. मुलाशी कधीच बोलत नाही. एकदा मुलगा त्याच्यासमोर येतो. तो म्हणतो बाबा मला वाढदिवसाला मिळालेले हे 200 रुपये घ्या. तुमचा एका दिवसाचा पगार 1600 रुपये आहे म्हणजे 8 तासांपैकी एका तासाला तुम्हाला 200 रुपये तासाला मिळतात. बाबा माझे हे 200 रुपये घ्या आणि मला एक तास वेळ द्या... यावर भाष्य करायची गरज आहे का....ही कविता म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये हाच या कवितेचा संदेश आहे...

herambrk@rediffmail.com