आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला छळणारी अपूर्णता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पण का कुणास ठाऊक, मी माझ्या स्वत:च्या कवितेबद्दल समाधानी नाही. माझ्या कवितेतली अपूर्णता मला सतत छळत असते. मला छळणारी अपूर्णता म्हणजेच माझ्या कवितेचे खरे बळ आहे. मला छळणारी ही अपूर्णताच माझ्या कवितेमागची खरी प्रेरक शक्ती आहे.
विता हा साहित्यप्रकार माझ्या आकर्षणाचा विषय जरी असला तरी माझ्यातली कवितेची निर्मिती हे एक गूढ आहे. माझ्यातल्या कवितेचा जन्म हे एक कुतूहल आहे. माझ्या ध्यानीमनी नसताना माझ्या मनात अचानक कवितेचा कोंब फुटतो आणि कळत नकळत त्या कोंबाचं झाड होतं. तसं पाहिलं तर माझ्यासाठी कवितेची निर्मिती ही जरी आल्हादकारक वाटत असली तरी जोपर्यंत ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत ती मला अस्वस्थ करते. बेचैन करते. कवितेचा प्रवास हा असा अनाकलनीय आहे.

सगळ्या कवींचे संवेदनशील मन हे नेहमी भावभावनांनी भारावलेले असते. माझ्याही अशाच भावगंधाचा दरवळ माझ्या कवितेतून देण्याचा मी प्रयत्न करत असतो. दैनंदिन जीवनात अनेकविध प्रसंग-घटना घडत असतात. माझ्या कविमनात नेमकं हेच भावचित्र रुजतं... भिनतं आणि मग ती भावऊर्मी शब्दांना घेऊन उत्स्फूर्तपणे बोलकी होत जाते. कागदावरचं ते बोलकेपण असते माझी कविता! माझी कविता वाचकांशी बोलते, बोलीभाषेतही तिची सहजता वाचकांना उमगते आणि भावतेही. ‘कविता म्हणजे काय?’ या पारंपरिक व्याख्या करण्याच्या प्रक्रियेमध्ये मी कधीच अडकलो नाही. ‘वृत्तीला जे भावले, अनुभवास जे पावले’ ते प्रांजळपणे कागदावर उतरवत राहिलो. अशा प्रक्रियेतून ज्या रचना तयार झाल्या, त्या म्हणजे माझ्या कविता. ज्या क्षेत्रामध्ये आपला पिंड पोसला गेलाय, त्या परिसरातल्या घडामोडी आपल्या मनावर सतत आघात करीत असतात. आपले संस्कारित मन त्यांची सातत्याने नोंद घेत असतं आणि मग त्या विषयाचे चिंतन सुरू होते. या चिंतनाचं परिपक्व प्रकटीकरण जो तो आपापल्या प्रज्ञेनुसार करतो. चिंतनाच्या प्रकटीकरणाची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. या लालित्यालाच कदाचित प्रतिभा किंवा अभिव्यक्ती म्हणावं.

अशाच काहीशा धारणेमधून माझी अभिव्यक्ती, माझे स्वतंत्र चिंतन शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होत गेलं. माणूस, त्याचे अंतरंग, त्याचा समाज, कुटुंब यामधला अतूट निसर्ग हा माझा कवितेचा आवडीचा प्रांत आहे. निसर्गाचा आधार घेतल्याशिवाय कुठलेही तत्त्वज्ञान जोरकस ठरत नाही. अर्थात, कुठल्याही कवितेचा संवाद निसर्ग प्रतीक-प्रतिमाशिवाय अल्प ठरावा. आताशा मला तर निसर्गात माणूसपण शोधण्याची सवयच जडली आहे. शेवटी निसर्ग आणि माणूस म्हणजे काय? एका नाण्याच्या दोन बाजूच. दोघांचेही अस्तित्व वेगळे असले तरी ते परस्परात बेमालूम मिसळलेले. आपल्या स्वत:च्या समजुतीनुसार व्यक्त केलेला मनमोकळा अभिप्राय हा नेहमी प्रांजळ असतो. माझी कविता ही मी नोंदवून घेतलेल्या घटनांवरच्या अभिप्रायासारखी आहे. ती केवळ प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही, तर काही प्रश्नही निर्माण करते. काही वेळेस ती काही मूलभूत प्रश्नांची उकल शोधण्याचा स्तुत्य प्रयत्नही करते. माझी कविता गूढ भूतकाळात फारशी रमत नाही अन् उद्याच्या उज्ज्वल भविष्याच्या काल्पनिक स्वप्नामध्येही स्वत:ला नेत नाही. मात्र, वर्तमानाच्या वास्तवतेला प्रमाण मानून ती रोज नव्याने उगवण्याचा प्रयत्न करीत राहते.

कमीत कमी शब्दांतून जास्तीत जास्त परिणाम साधण्याची शक्ती कवितेमध्ये असते. बंदुकीची गोळी लहान असते, परंतु तिच्यात छाती भेदून टाकण्याची जबरदस्त ताकद असते. कविता लिहिताना नेहमी मी बंदुकीची गोळी डोळ्यासमोर ठेवतो, त्यामुळे कवितेचा परिणाम अधिक तीव्र होताना मला जाणतो. कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, श्रीधर शनवारे, निरंजन उजगरे, नारायण कुळकर्णी-कवठेकर, उत्तम कोळगावकर, दासू वैद्य हे माझे आवडते कवी. त्यांच्या कविता नुसत्या वाचल्याच नाहीत, तर मनात रुजवून ठेवल्या आहेत. दुर्बोधतेच्या वळणांनी जाणारी कविता लिहिण्यापेक्षा सुबोध अंगाने जाणारी कविता रसिकांच्या मनात अधिक खोलवर बिंबते. दुर्बोधतेच्या वळणांनी जाणारी कविता लक्ष वेधून जरी घेत असली, तरी ती साऱ्यांनाच कळते असे नाही. चारचौघांच्या आवडीचा तो भाग असावा, परंतु कवितेचं कळणं, कळून उमजून येणं हे सर्वसामान्य वाचकांच्या पदरी पडावं, या धारणेतून मी सुबोध अंगाने जाणाऱ्या कवितेला जाणीवपूर्वक स्वीकारले आहे.
प्रत्येक घरातील स्त्री, घरातल्या या स्त्रीचा मानसिक कोंडमारा, दोन पिढ्यांच्या विचारांमध्ये तिची होणारी वैचारिक घुसमट हा माझा आवडता विषय. या विषयावरच्या अनेक कविता मी लिहिल्या. अशाच धाटणीची, परंतु मोजक्या शब्दांतून व्यक्त झालेली ‘वात’ नावाची कविता आहे. स्वत:ला अंधारलेल्या काळजात ठेवून दुसऱ्यांना उजळ करण्यासाठी स्त्रीचे सतत जळणे, हे मला दिव्याच्या वातीसमान भासले. खरे म्हणजे ही स्त्री प्रत्येक घरात आहे. अशी वात प्रत्येक घराघरात आहे. ही वात, ही स्त्री शब्दांच्या माध्यमातून कवितेच्या रूपातून तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यातले स्त्रीचे रूप पिढ्यान‌्पिढ्यांच्या आरशात असेच राहील, असे मला वाटते.
मुलगा म्हणाला,
‘आई, दिव्याची वात मोठी कर,
मला वाचता येत नाही’
वडील म्हणाले,
‘अगं दिव्याची वात कमी कर,
मला झोप लागत नाही’
आई रात्रभर
दिव्याची वात कमी-जास्त करत राहिली
आयुष्यभर दोघांमध्येच
वातीसारखी जळत राहिली.

स्वत:चा बाज, स्वत:ची लय, स्वत:ची वृत्ती, स्वत:च्या मर्यादा सांभाळत माझ्या कुवतीनुसार मी कविता लिहितो आहे. पण का कुणास ठाऊक, मी माझ्या स्वत:च्या कवितेबद्दल समाधानी नाही. माझ्या कवितेतली अपूर्णता मला सतत छळत असते. मला छळणारी अपूर्णता म्हणजेच माझ्या कवितेचे खरे बळ आहे. मला छळणारी ही अपूर्णताच माझ्या कवितेमागची खरी प्रेरक शक्ती आहे.
(शब्दांकन - विष्णू जोशी)
vishnujoshi80@gmail.com