आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Poem Creation By Loknath Yashwant, Rasik, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझ्या कवितेला झाला सूर्यस्पर्श

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवितेने माझी निवड केली आणि मी कविता आविष्कारू लागलो. डॉ. अरुण लिमये कविता स्पर्धा झाली, त्यात मी माझ्या कविता पाठविल्या होत्या. त्याचे परीक्षक कविवर्य नारायण सुर्वे हे होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कविता म्हणून माझ्या कवितेची निवड झाली. १९८५मध्ये अमरावती येथे दलित साहित्य संमेलन होते. त्यात सहभागी होण्यासाठी मी चंद्रपूरहून गेलो होतो. नव्यानेच कविता लिहीत असल्याने मी कवितेविषयी खूपच जागृत होतो, आताही आहे. माझे आवडते कवी नारायण सुर्वे हेही या दलित साहित्य संमेलनासाठी अमरावतीला आले होते. मातीने माखलेला अस्सल माणूस, अशी त्यांची आणि माझी पहिलीच डोळाभेट झाली होती. प्रथमच मी त्यांना बघत होतो. तीन दिवस चालणा-या संमेलनाच्या दुस-या दिवशी ते एकटेच सभामंडपाच्या बाजूला फ‍िरताना मला आणि कवी प्रसेनजित ताकसांडे यांना दिसले.
मी म्हणालो, नारायण सुर्वे यांना आपण चहा प्यायला घेऊन जाऊ. रात्री झालेल्या कविसंमेलनात प्रसेनजितने स्टेजवर न जाता प्रेक्षकांतच उभे राहून नामांतराची कविता म्हटली. रात्रीच्या कवितेची प्रशंसा करता करता त्यांनी माझाही परिचय विचारला. माझे नाव ऐकून ते थोडे आठवल्यासारखे करायला लागले. मी त्यांना म्हटले, ‘सर, डॉ. अरुण लिमयेंच्या कविता स्पर्धेत आपण माझी कविता निवडली होती.’ हे ऐकून ते चकित झाले आणि म्हणाले, ‘तो तू लोकनाथ आहेस काय?’ मी म्हणालो, ‘हो सर.’ सुर्वे सर आपुलकीने म्हणाले, ‘अरे, माझा विश्वासच बसत नाही. तू पाठविलेल्या कविता मी वाचल्या. त्या सगळ्या मला आवडल्या. तुझा मी शोधही घेतला. मी तुला खूप वयस्क असा प्रौढ समजत होतो. तुझं वय काय?’ मी म्हणालो, ‘चोवीस.’ ‘तू त्या मला पाठव.’ लोकवाङ‌‌्मयच्या युगांतरसाठी मी कविता पाठविल्या. नंतर त्या त्यांनी युगांतरमध्ये प्रकाशितही केल्या. आताशा माझ्या कवितेचा जो बाज आहे, जी कविता मांडणी आहे, त्याला सुर्वे सरांबरोबर झालेली ती चर्चा आहे. त्या चर्चेतून माझ्या हाती कवितेची सूर्यफुले आलीत.
कवितेवर प्रगाढ निष्ठा, बेसुमार आस्था आणि कवितेसाठी सर्व काही करण्याची दुर्दम्य इच्छा पाहिजे. कविता माणसाच्या दु:खाशी लटणारी असावी, माणूस वस्त्यांत फ‍िरणारी असावी, माणसांची असावी. कविता मांडायची कशी, हा ज्याच्या-त्याच्या वकुबाचा भाग आहे. ज्याच्या-त्याच्या क्षमतेची ती लढाई आहे. कवितेवर केलेले श्रम आणि रियाज ही ज्याची-त्याची बाजू आहे. मी ठरवले की, कवितेची मांडणी आपल्याच पद्धतीने करावी, मग अर्वाचीन वगैरे मराठी कवितेच्या परंपरा काहीही सांगोत. आपला त्यांच्याशी काहीही संबंध नाही. जीवन आपले, कविता आपली. मुख्य म्हणजे दलित बांधव १९६० पासून लिहू लागला, ज्या दलितांना जातिधर्माच्या नावावर इथल्या स्वयंघोषित तथाकथित ज्येष्ठांनी नागवून टाकले; त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. त्यांच्या अनेक पिढ्या गारद करून टाकल्या. ज्यांना निसर्गाने मुबलक दिलेले पाणीही नाकारले, त्यांनी हे ‘स्वान्त सुखाय’वाले चंद्र-ता-यांत, राजाराणींच्या कथांत, निसर्गाच्या कवेत २४ तास हवेत उडणारे सांगतील तेच लिहावे काय? दलितांचे जीवनच वेगळे आहे. त्यांना माणूस म्हणूनच नाकारले गेले आहे. त्यांच्या समस्याच वेगळ्या आहेत. तेव्हा अर्थातच त्यांची कविताच वेगळी आहे. दलित कवितेला पारंपरिक मान्यता अथवा सौंदर्यशास्त्र की काय म्हणतात, ते लावून कसे चालेल?
मी माझ्या पद्धतीने माझ्या कवितांचा शोध घेत होतो. वेगळी मांडणी अन् वेगळा घाट या दरम्यान मी सुरेश भटांच्याही संपर्कात आलो. त्यांच्या साप्ताहिक बहुमतचे ‘बहुमतांच्या कविता’ सदर मला त्यांनी संयोजक म्हणून वर्षभर चालवायला दिले होते. त्यांच्या संपर्कात दोन वर्षे राहूनही मी गझल कधी केली नाही. नाही तर सुरेश भटांनी ज्यांच्या खांद्यावर सहज हात ठेवला ते गझलच्या वर्कशॉपमध्ये यमकाची आताही हातोडा घेऊन जोरदार ठोकपीठ करताहेत, असे खूप माझ्या परिचयातले आहेत. या कविताविषयक घालमेलीच्या दिवसांत माझ्या आयुष्यात बाबुराव बागूल आले नि माझे आयुष्यच उजळून निघाले. कविता किंवा एकूणच साहित्य ही ‘मजाकबाजी’ किंवा ‘स्वान्तसुखाय टाइमपास’ नसून ती अतिशय गंभीर बाब आहे, जीवनसत्य मांडणारी बाब आहे आणि तो त्या त्या काळचा इतिहास असतो, हे मला उमगले. याच कवितामंथनाच्या दिवसांत मला मनस्वी सद्गृहस्थ भेटले ते ना. बा. ठेंगणी. ते माझ्या कवितेशी परिचित होते. कवितेविषयीची त्यांची जाण अतिशय उच्च दर्जाची होती.
नाबांनी मला सांगितले की, तुझी कवितांच्या विषयाची निवड उत्कृष्ट आहे. त्यांनी मला आवर्जून जातक कथा आणि खलील जिब्रानच्या कथा वाट्टेल तिथून वाचायला सांगितल्या. मी जातक कथा आणि खलील जिब्रान संपूर्ण मिळवून झपाट्याने वाचून काढला. याचा मला पुढे फायदाच झाला. नंतर माझी व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांच्याशी भेट झाली. सप्रे सरांचं जागतिक वाङ‌्मयाचं अतिशय प्रगाढ वाचन. त्यामुळे रोजच्या चर्चेतून मी जागतिक वाङ‌्मयाशी जोडलो गेलो. पुढे ‘अस्मितादर्श’कार डॉ. गंगाधर पानतावणे यांच्याशी माझा स्नेह जुळला आणि अस्मितादर्शच्या माध्यमातून त्यांनी माझी कविता महाराष्ट्रभर पोहोचवली.
ही सर्व उत्तुंग माणसे मला योग्य वेळी भेटली आणि त्यामुळेच माझी संपूर्ण कविता सूर्यप्रकाशाने उजळून निघाली.
- शब्दांकन : विष्णू जोशी
vishnujoshi80@gmail.com