आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Poem Creation By Ravi Korde, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोवतालच्या निसर्गाने लिहिते केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी जीवन अर्थपूर्ण करणारी कविता ही अद्भुत गोष्ट आहे. बाह्य चराचराचे, जगण्याचे दु:खकारी अनुभव सगळ्यांकडेच असतात; पण कवी एखाद्या जादूगारासारखा आपल्या जाणिवांना नेणिवेच्या अस्सल कसोटीवर शब्दबद्ध करतो. आपण जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो, त्या पर्यावरणाचा आपल्यावर खोल परिणाम होत असतो. माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील मेटे या खेडेगावात झाला. शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय. त्यामुळे कृषीसंबंधी जाणिवांनी माझ्या मनात लहानपणापासून घर केले. जगण्यातील विषण्णता, अगतिकता व सर्व बाजूंनी होणारी परवड शब्दात येत गेली. कृषिसंस्कृतीचं निसर्गाशी असलेलं नातं व त्याच्या प्रतिकूलतेतून आलेली वाताहत कवितेचं मुख्य केंद्र बनली.

‘केवळ फाटत नाही जमीन
फाटतात हृदयेही
जेव्हा अस्मानीचा राजा
गावच सोडून जातो’
माझा जन्म एका वारकरी कुटुंबात झाला. वडील कीर्तन-प्रवचन करीत असल्याने संतवाङ्मयाची ओळख लहानपणापासून झाली. अभंगाची लय, नाद, अर्थ या सर्वांनी मनावर गारूड केलं. कदाचित त्याचाच परिणाम असेल की, वारकरी संप्रदायातील प्रतिमा माझ्या कवितेत येत गेल्या. माझ्या मते, कविता ही कधीच केवळ मनोरंजनाचं साधन होऊ शकत नाही. जगणं समृद्ध करण्याचं ते महत्त्वाचं साधन आहे, असं मला वाटतं. चांगल्या कवितेचं अंतिम उद्दिष्ट हे केवळ वाचकालाच नाही तर स्वत: क वीलाही चांगलं व पहिल्यापेक्षा उत्तम माणूस बनवणं हेच असतं. काव्यप्रवासामध्ये वाचकाला मोलाचे स्थान असते. तो एक सहसर्जक असतो आणि त्याने वाचल्यानंतरच काव्यसंप्रेषणाचे वर्तुळ पूर्ण होते. आपल्याकडे असा समज आहे की, गंभीर कविता लोकांना समजत नाही. मला हा आरोप खोटा वाटतो. आपल्याकडे संतसाहित्य हे खेड्यापाड्यातील लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. एका अभंगावर दोन महिने प्रवचन करणारी तसेच पूर्ण संतसाहित्य मुखोद्गत असलेली माणसे या महाराष्ट्रात आहेत. गंभीर लिहिणे म्हणजे दुर्बोध, अनाकलनीय लिहिणे नव्हे; तर जीवनाच्या गंभीरतेबद्दल लिहिणे, खरेपणाबद्दल लिहिणे होय.

कविता नेहमीच बदलाची भाषा करते. मानवी मूल्यांना जोखडात टाकणा-या परंपरा ती तुडवते व एका आदर्श जीवनाची प्रार्थना करते. कविता ग्रामीण, शहरी, स्त्रियांची इ. अशी असते, असे मला वाटत नाही. समस्त मानवी जीवनाबद्दल आत्यंतिक करुणा हे कोणत्याही चांगल्या कवितेचं केंद्रक असतं. केवळ माणूसच नाही तर निसर्ग एवढंच काय, सृष्टीतल्या निर्जीव घटकांबद्दलही कवितेला नेहमीच आदर असतो. माणसाच्या माणसाशी आणि माणसाच्या सृष्टीशी असलेल्या आदिम नात्यांचा शोध कविता घेत असते. कविता का सुचते? यापेक्षाही ती सुचते ही कोणत्याही सर्जकासाठी अपरिहार्यता असते. कोणत्याही स्वरूपात अभिव्यक्त होणं ही माणसाची गरज आहे. आणि हे माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. स्वानुभवाला पुन्हा अनुभवण्याचा तो प्रत्ययकारी प्रसंग असतो. अनुभवाचा अस्सलपणा हा कवितेलाही अभिजात पातळीवर नेऊन पोहोचवतो. कविता ही केवळ कल्पनेची भरारी असत नाही, तर कल्पना ही भविष्यातील सत्याचे अवलोकन असते.
लहानपणी शाळेत जाताना मी नदी, नाले ओलांडून जात असे किंवा गुरंढोरं चारताना निसर्गाशी जवळून संबंध यायचा. निसर्गाशी तादात्म्य होणे, हाही एक सृजनाचाच अनुभव आहे; जो शब्दांना साद घालू शकतो. पुढे मराठवाडा साहित्य परिषदेत विद्यार्थिदशेत राहत होतो, तेव्हा तेथील ग्रंथालयातून अनेक उत्तमोत्तम मराठी पुस्तके वाचता आली. तसेच इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्याने जागतिक साहित्य वाचता आलं. वाचनाने चांगल्या साहित्याची ओळख झाली. काव्यप्रवास हा खरं तर एकट्याचा नसतोच. आपल्याबरोबर असलेल्या मित्रांचा वाटा त्यात मोलाचा असतो. अशी नातेसंबंधाची घट्ट आणि परिपक्व वीण कवितेला आधारभूत ठरते. श्रीधर नांदेडकरांसारख्या मोठ्या मनाच्या कविमित्राने मला नेहमीच प्रेरणा व उभारी दिली आहे. किंवा दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास, त्यांच्या कवितेवरील निष्ठेमुळे त्यांच्या सहवासात येणा-या प्रत्येकालाच ही प्रेरणा आणि उभारी आपोआपच मिळते. गुरुवर्य चंद्रकांत पाटील सरांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मला ंिमळाले आणि माझा काव्यप्रवास सुकर झाला. कधी कधी भोवतालच्या निसर्गाने लिहिते केले आणि काही ओळी आपसूकच बाहेर पडत गेल्या.
आम्ही चिंब भिजायचो
वावर भिजल्यागत आणि
धारांची दोरी धरून
जाऊन बसायचो
आभाळाच्या देशात
मोडणा-या माणसाला उभं करण्याची ताकद कवितेत आहे. नवी जीवनदृष्टी घेऊन वाचकांसमोर जाते आणि त्यांच्या जाणिवांना अधिकाधिक प्रगल्भ करते. कविता एका मानववादी जगाचं स्वप्न पाहते. परंतु हा रस्ता सोपा नाही, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. श्रीधर नांदेडकरांच्या शब्दात सांगायचे झाल्यास येथून आता परतीचा रस्ता नाही. म्हणून येणा-या दिवसांत संयतपणे अनुभवांची मांडणी करत हा रस्ता मला चालायचा आहे...(शब्दांकन -विष्णू जोशी )