आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Poet Bahinabai Chaudhari By Dr. Pratima Ingole

माझी माय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरक्षर बहिणाबाई थेट नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेशी आपले नाते जोडतात, हे तसे अचंबित करणारेच आहे. प्रज्ञेची देवता मानणाऱ्या सरस्वतीला बहिणाबाई देवी म्हणत नाहीत.
तर साक्षात ‘माय’ म्हणतात. तेव्हा, मग प्रतिभावंतांनाही त्यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो....
हिणाबाईची ‘माझी माय सरसोती’ ही कविता म्हणजे एक सरळ महाकाव्य आहे. चराचरात सामावलेला अदृश्य ईश्वर आणि त्याचे बहिणाबाईंना पंचमहाभूतांच्या माध्यमातून होणारे दृश्य दर्शन याचे अतिशय कलात्मक आणि हृद्य असे चित्रण या कवितेत आलेले आहे. पावसात सामावणारे सृष्टिचक्र, मातीमधून उगवणारे जगण्याचे मूलतत्त्व, अरूपाचे रूप दाखवणारा सूर्याचा उजेड, देवाचा पायरव सृष्टीवरील पानांच्या सळसळीतून ऐकणाऱ्या बहिणाबाई खरंच सरस्वतीच्या लेक शोभतात. आभाळातील रंगातून, वाऱ्याच्या झुळकीतून त्या देवाचे अस्तित्व शोधतात. म्हणूनच निसर्गकन्या ठरतात.
निरक्षर बहिणाबाई थेट नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेशी आपले नाते जोडतात, हे तसे अचंबित करणारेच आहे. प्रज्ञेची देवता मानणाऱ्या सरस्वतीला बहिणाबाई देवी म्हणत नाहीत, तर साक्षात ‘माय’ म्हणतात. तेव्हा, मग प्रतिभावंतांनाही त्यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो. कारण प्रतिभेची प्रतीकात्मक प्रतिमा म्हणून सरस्वतीच्या अमूर्त रूपाला मूर्त रूप बहिणाबाई देतात, ते फक्त आपल्या लेखनाचे श्रेय देण्यापुरतेच. तेव्हा आपल्याला तुकारामाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ‘अंतरिचे धावे स्वभावे बाहेरी’ अशीच खरे तर बहिणाबाईंची स्थिती आहे. तरी त्या म्हणतात,
‘मायी माय सरोसती,
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपितं कोरली’
प्रतिभेच्या अलौकिक रूपाला बहिणाबाईंनी चढवलेला हा लौकिकाचा साज तितकाच मनोहारी आहे, जितका सृष्टीचा आविष्कार. खरे तर निसर्गसृष्टीतील अद्भुताला दिलेले ऐहिक रूप हेच त्यांच्या कवितेचे मर्म आहे. कारण, त्यांचा खरा गुरू निसर्गच आहे. तोच त्यांना शिकवीत आला आहे. त्यामुळेच त्या देवाचे रूपही निसर्गात शोधतात. देव कुठे आहे? तर तो पावसात सामावला आहे आणि मातीमधून उगवतो आहे. बहिणाबाई साध्या संसारी स्त्री होत्या. पण त्यांची भूमिका सावता माळ्याशी समांतर आहे. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ सारखीच ती कर्मकृतीशी एकरूप झाली आहे. भूमिकन्या बहिणाबाई आपल्या कृषिकर्मातच सरस्वती शोधतात. देव शोधतात. जगण्याचे सत्त्व शोधतात. जगण्यासाठी बळही प्राप्त करतात. पावसाच्या माध्यमातून जमिनीवर अंकुरणाऱ्या पिकांमध्ये दिसणारे ईश्वराचे हिरवे रूप सर्वात श्रेष्ठ आहे. असा त्यांना साक्षात्कार होतो. त्यामुळेच त्या त्याचा पुरस्कार करतात. निरक्षर असूनही ठासून म्हणतात, पोथ्या, पुराणे, गीता, भागवत वाचणे, ऐकणे व्यर्थ आहे. त्यातून जर तुम्ही काही बोध घेत नसाल, बोध घेऊन आचरणात आणत नसाल तर त्यांचे स्तोम माजविणे व्यर्थ आहे. त्यापेक्षा पावसात सामावणारे सृष्टीचे तत्त्वज्ञान आणि मातीतून उगवणारे निसर्गाचे, कल्याणाचे तत्त्वज्ञान जास्त अनमोल आहे. जास्त उपयोगाचे आहे. ते निसर्गसूक्त आहे.
‘माझ्यासाठी पांडुरंग
तुझे गीता भागवत
पावसात समावते
माटीमधी उगवते’
या कवितेतून त्यांनी बोलीचा पुरस्कार केलेला आहे, तद्वतच कर्तव्याचा जयजयकार केलेला आहे. कर्तव्याकडे पाठ फिरवून केलेल्या देवपूजेला काही अर्थ नाही, असे सांगणारी ही कविता संसाराची गाथा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाची ती पोथी आहे, तर निसर्गाची सुंदर पैठणी आहे. पांडुरंगही गुंफला जावा, इतकी बहिणाबाईंच्या अक्षरांची वीण घट्ट आहे. निसर्गातील पानाफुलात त्यांनी पांडुरंगाला गुंतायला भाग पाडले आहे. ज्या मनाचा ठाव लागत नाही, ते मनही त्यांच्या कवितेत गुंफले गेले आहे. कारण ती हृदयाच्या बोलीची साद आहे. म्हणूनच बहिणाबाईंच्या कवितेत कुणाचेही मन गुंतल्याशिवाय राहत नाही. त्याचे साधे बोलणे मनाला पटल्याशिवाय राहत नाही. देवाच्या दर्शनाने जर मनातला अंधार दूर होत नसेल, तर त्या दर्शनाचा काही उपयोग नाही. मुद्दाम आटापिटा करून देवळात जाणे व्यर्थ आहे. कारण तो तुमच्या सभोवती आहे. तो बघण्याचे टाळून केलेला खटाटोप अकारण आहे. देवाच्या दर्शनाने मनातील विकृतीचा अंधार नष्ट झाला तरच तो देव, असेही त्या सुचवतात.
बहिणाबाईंना सृष्टीच्या पंचतत्त्वाचे विलक्षण आकर्षण असावे. त्यामुळे त्यांनी या कवितेत पंचमहाभूतांना लौकिकत्व बहाल केले आहे. देवरूप दिलेले आहे. पावसात सामावणारे ‘आप’ या पंचमहाभूताचे सानुले रूप आहे, तर मातीमधून उगवणारे पीक पृथ्वीचे कोवळे कौतुक आहे. त्याला सूर्याच्या उगवण्याने मनात उजळणाऱ्या प्रकाशाची जोड दिली आहे. कारण जगण्याची प्रेरणा हा प्रकाशच देतो, तर वायू देवाच्या अस्तित्वाची पाठीवर थाप मारतो आणि धरणीमायच्या मायेचा सुगंध फुलाफुलातून काढून माणसापर्यंत पसरवितो. त्यामुळेही तुम्हाला धरतीची आश्वासक माया लाभते. तुमचे चित्त प्रसन्न होते. याशिवाय तुमचे जगणे सुसह्य होण्यासाठी आकाश रंग उधळते. तुम्हाला जगणे प्रेरक ठरण्यासाठी निसर्ग आभाळात रंग खेळतो. तोच साक्षात पांडुरंग असतो. कारण पांडुरंगच धरतीच्या साह्याने, पंचमहाभूतांच्या मदतीने सगळे खेळ करतो. मग धरती फळते, फुलते आणि धरतीचे हे दान स्वीकारून माणूस घडत जातो. त्याचा पिंड वाढत जातो.
‘धरती मधल्या रसाने
जीभ माझी सवादते
तेव्हा तोंडातली चव
पिंडामधी ठाव घेते’
हाच रसास्वाद बहिणाबाईंच्या प्रतिभेला अनादी चैतन्ययुक्त मूलद्रव्य पुरवितो. याचा प्रत्यय या कवितेत येतो.
सरल महाकाव्य
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपितं पेरली.
माझ्यासाठी पांडुरंग
तुझं गीता-भागवत
पावसात समावतं
माटीमधी उगवतं.
अरे देवाचं दर्शन
झालं झालं आपसुक
हिरिदात सूर्यबापा
दाये अरूपाचं रूप.
तुझ्या पायाची चाहुल
लागे पानापानांमधी
देवा तुझं येनं-जानं
वारा सांगे कानामधी.
फुलामधी समावला
धरतीचा परभय
माझ्या नाकाले इचारा
नथनीले त्याचं काय?
किती रंगवशी रंग
रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग
रंग खेये आभायात.
धर्ती मधल्या रसानं
जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव
पिंडामधी ठाव घेते.